शोभा भागवत लिखित ‘आपली मुलं’ या पुस्तकातील लेख
लेख 1: आपण मुलांशी बोलायला शिकू या !
लेखन: शोभा भागवत
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे
आवृत्ती पहिली: 15 मे 1984
मुलं २-३ वर्षांची होती तेव्हाचं आठवतं. दोघं आपापसात भांडणं करून तक्रारी करायला आली की मी म्हणायची, बघू बरं, माझ्याकडे बघा दोघांनी. कोण खोटं बोलतंय मला डोळ्यात बरोबर दिसतं आणि खरं बोलणारं मूल डोळ्याला डोळा भिडवून पाहू शकायचं. खोटं बोलणारं हसू लागायचं, नाही तर गोरंमोरं व्हायचं. तो झगडा तिथेच मिटायचा. पुढे-पुढे तर आपली बाजूच खरी आहे, हे पटवण्याची घाई असलेलं मूल आपली चिमुकली अंगठ्याजवळची बोटं दोन्ही डोळ्यांच्या खाली ठेऊन, डोळे ताणून मोठे करून म्हणायचं- ‘बघ माझ्या डोळ्यांत. मी खरं बोलतोय.’
हा निरागपणा नंतर मात्र राहत नाही. तो वेगवेगळी रूपं घेत जातो. आता ७-८ वर्षांची मुलं आपली बाजू हिरीरीनं मांडतात. चुकून समजण्यात चूक झाली, त्यांच्यावर आरोप केले तर दुखावतात. कधी कोण खरं कोण खोटं सांगतो आहे, कळेनासं होतं. रुसवे-फुगवे होतात आणि मग मलाच म्हणावंसं वाटतं, खरं-खोटं मला ठरवता येत नाहीय; पण माझ्या डोळ्यांत तुम्हा दोघांविषयी सारखंच प्रेम तरी दिसतंय ना तुम्हाला? रागावू नका बाबांनो !
ही आपलीच मुलं आपल्याला किती गोंधळून टाकतात! लहानपणी वाटतं ही मोठेपणी कशी होणार आहेत, कोडंच पडतं. मोठी झाल्यावर कोडं पडतं ही अशी का झाली ? त्यांचे गुण, त्यांचे दोष हे आपल्या दोघांपैकी कोणाचे? आणि हे मिश्रण मजेशीर असतं. कधी आपण मुलगा वडलांसारखा, मुलगी आईसारखी असे शिक्के मारायला उत्सुक असतो. केवळ दिसण्याच्या बाबतीतच नाही, तर स्वभावाच्या बाबतीतसुद्धा. लकबींच्या बाबतीतसुद्धा. वडलांसारखा धाडधाड पाय आपटत झपाझप इकडून-तिकडे जाणारा, धडाधडा कपाटाची दारं लावणारा, वस्तू ठेवताना-हमखास आवाज करणारा मुलगा, मनात कुठं तरी आईसारखा हळवा असतो, प्रेमळ असतो. पुन्हा त्या प्रेमातही एखादी छटा वडलांच्या प्रकारच्या प्रेमाची असते. अर्थात आयाच प्रेमळ आणि हळव्या असतात आणि वडील धडपडे असतात, असे मला शिक्के मारायचे नाहीत; पण एकदा मुलगा वडलांसारखा असं ठरवून आसपासची मंडळी त्याच्यावर विशिष्ट स्वभाव, वागणं, आवडी-निवडी लादायला लागतात. तोही तसं अनुकरण करू लागतो आणि मुलाला स्वतंत्र व्यक्ती म्हणून वाढण्यात आपण अडथळे आणतो. मूल कसं आहे ते डोळसपणे शोधतच नाही.
आज आपण मुलांशी बोलतो, त्याच्याबद्दल जे बोलतो, त्यातून तो स्वतःची प्रतिमा बनवत असतो. त्यामुळं आपलं मूल चांगलं व्हावं असं वाटत असेल, तर फार जबाबदारीनं बोलायला आपण शिकलं पाहिजे. तसं आपण बोलत नाही.
हे समजून बोलणं, जबाबदारीनं बोलणं, आपल्याला लहानपणापासून कधी शिकवलेलंच नसतं. आपल्या आजूबाजूच्या मोठ्या माणसांतसुद्धा विचारपूर्वक शब्द वापरणारी, निवडणारी माणसं क्वचितच आढळतात.
त्या अर्थानं आपण भाषा कधी नीट शिकतच नाही. काही वाक्यप्रचार केवळ पुन्हा-पुन्हा कानावर पडले, म्हणून तोंडात बसतात, काही आवडले म्हणून कुठेही वापरले जातात. अतिशयोक्तीनं बोलणारी माणसं तर हवी तेवढी असतात. अशा बेजबाबदार बोलण्याचा परिणाम मनावर कितीतरी होत असतो.
याशिवाय आपल्याला ‘फणस’ प्रकारच्या मानसांचंही फार कौतुक ! बोलायला वाईट बोलणारा, हिडिस-फिडिस करणारा, ओरडणारा, रागावणारा माणूस मनातून मात्र फार चांगला आहे असं म्हटलं की, त्याचं बोलणं आपण माफ करून टाकतो. तो जर मनातून गोड आहे तर ती गोडी त्याच्या जिभेवर का येत नाही ? तो एखादी कृती मधेच प्रेमळपणाची करत असेल; पण तो सगळा काही प्रेमळ नसणार. आपलं मनं, आपले विचार, भावना, स्वभाव हे सगळं खरं तर चेहऱ्यावर डोळ्यांतून दिसत असतं. मनात ओलावा नसताना गोड बोलणाऱ्या माणसाचं बोलणं सुखावत नाही. अंगावर शहारे आणतं. अत्यंत स्वार्थी माणूस, वडिलकीचा आव आणून प्रेमानं बोलू लागला तर त्याचे शब्द रिकाम्या डबड्यासारखे खडखड करत मनावर चरे ओढत जातात. अप्रामाणिक माणसाची आश्र्वासनं वाऱ्याबरोबर उडत जाणाऱ्या कागदाच्या कपट्यासारखी दिसू लागतात. हे जर आपल्या वयाच्या निर्ढावलेल्या माणसांना चटकन कळतं तर सगळ्या भावना, जाणिवा कोवळ्या, ताज्या टवटवीत असणाऱ्या मुलांना किती कळत असेल !
‘फणस’ प्रकारच्या माणसांना मुलंही मान्य करतात, सोडून देतात, समजून घेतात, माफ करतात; पण हा ताण मुलांवर का द्यायचा? मनातलं प्रेम, मनातली काळजी, आस्था, माया, स्वप्नं- कधीतरी संताप, राग, जिद्द हे सारं जसंच्या तसं बोलायला आपण नाही का शिकू शकणार? प्रयत्न केला तर जमेल हे.
पण मुलांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून वागवा हे फक्त पुस्तकात वाचतो आपण. त्याचा अर्थ कळतच नाही. मुलं तुमची गुलाम नाहीत, तुमच्या २५ वर्षांपूर्वीच्या लहानपणाविषयीच्या शिळ्या कल्पना त्यांच्यावर लादू नका, तुमची अपुरी स्वप्नं पुरी करण्याची ती माध्यमं नाहीत, तुमच्या म्हत्वाकांक्षा पुढ नेण्यासाठी ती जन्माला आलेली नाहीत. हे सारं वाचतो आपण आणि तरीही आपल्याला हवं तसचं वागतो. का?
कारण मुलं वाढवतानाच काय, पण नवरा-बायकोनासुद्धा एकमेकांशी वागताना स्वतःला बदलायची तयारी ठेवायची असते, हे आपल्या मनात कधी रुजलेलंच नसतं. आपल्या आवडत्या माणसांसाठी स्वतःचे काही हेके सोडून देणं, मतं बदलणं, समंजस बनणं यातसुद्धा आनंद असतो. हे फार विकृतपणे फक्त बायकांवर आपण लादत गेलो; पण ते स्त्री-पुरुष, सर्वांच्या मनात रुजवू शकलो नाही आपण. हे माणूसपण आहे हे आपण विसरतो म्हणूनच सून घरात येण्यापूर्वी, तिच्यासाठीची चौकट घट्ट खिळे ठोकून तयार असते. त्यात ती बसली तर ठीकच. बसण्याचा प्रयत्न करण्याइतकी शहाणी, समंजस असली तर जिंकलीच; पण त्याविरुद्ध काही म्हणणारी असली तर ती वाईट !
आपल्याच मुलांच्या बाल-लीलांचं कौतुक करत असतानासुद्धा मुलांसाठी आपल्या काही चौकट तयार असतात. चौकटी खुज्या असल्या तर मुलानं हातपाय दुमडून त्यात स्वतःला बसवावं अशी अपेक्षा असते. चौकटी मोठ्या असल्या तर हातपाय ताणून त्यानं त्यात लोंबकळावं, अशी अपेक्षा असते. यापेक्षा आपण मुलांसाठी क्रॉसच का तयार ठेवू नयेत ? हात-पाय एकदा ठोकून टाकले खिळ्यांनी की काम झाले !
किती प्रकारच्या चौकटी असतात त्या? आपण केलेल्या स्वयंपाकाबद्दल मुलानं तक्रार न करता मुकाट्यानं जेवावं, तेसुद्धा आपल्याला त्यानं जेवढं जेवावं असं वाटतं तेवढंच जेवलं पाहिजे. आपण ठरवलेल्या कपाटात, ठरवलेल्या पद्धतीनं त्यानं कपडे, वस्तू ठेवल्या पाहिजेत, आपण आणलेल्या महागड्या खेळण्यांशी जपून खेळलं पाहिजे, आपण म्हणू त्याच मुलामुलींशी मैत्री केली पाहिजे, आपण म्हणू तेव्हा घेऊ तो अभ्यास केला पाहिजे, आपण म्हणू तेव्हा आपल्याबरोबर बाहेर आलं पाहिजे. नको असेल तेव्हा घरात राहिलं पाहिजे, आपण म्हणू त्या माणसांना त्यानं वाटेला लावलं पाहिजे, आपल्या प्रेमाच्या माणसांशी नीट वागलं पाहिजे. अशा अनेक चौकटी ! आणि यालाच आपण वळण म्हणतो. संस्कार म्हणतो !
पण या सगळ्यांबद्दल मुलाला काय वाटतं आपण विचारतो का ? विचार करतो का ? ओढाताणीच्या आपल्या जगण्यात खूप काही बदलता येतं असं नाही; पण संधी मिळेल तेव्हा तरी मुलांचा आतला आवाज ऐकला पाहिजे, काही वेगळे, छान अनुभव त्यांना दिले पाहिजेत, मोकळा श्र्वास घेऊ दिला पाहिजे.
आपण आपल्याच चिंता, प्रश्न, काळज्या, व्यवधानं, आवडी यात इतके व्यग्र असतो की, मुलांचा हा आवाज ऐकूच येत नाही आपल्याला. शक्य तेवढा तो आपण मारून टाकतो आणि मग हीच मुलं मोठेपणी दुसऱ्याचा आवाज ऐकेनाशी होतात. दुसरीकडे मोकळं, धीट काही बोलायला असमर्थ बनतात. एका चुकीच्या वागण्यानं दोन मोठे दुर्गुण आपण मुलांत रुजवतो.
पण आपण तरी काय दुष्ट आहोत का असं वागायला ? आपल्याला खरंच कळत नाही कसं वागावं ते. बालमानसशास्त्रज्ञ अनेक गोष्टी सांगतात, त्या पुरत्या कळतही नाहीत. आपल्या भाषेत समजेल असं कुणी काही सांगितलं, असं वागून पाहा, प्रयोग करून पाहा म्हंटल तर आपणही बदलू शकू. प्रयत्न करू.
बोलण्याबद्ल निश्चित काही प्रयोग आपल्याला करता येतील.
पहिली गोष्ट ऑर्डरी सोडणं कमी करणं, आज्ञा करणं कमी करणं. आपल्याला कोणी मनात नसताना एखादी गोष्ट करायला लावली, अपमानकारक बोलून करून घेतली तर आवडेत का ? तसंच ते मुलांनाही आवडत नाही. त्यामुळ हे कर, ते आण, तिकडे ठेव, इकडून उचल हे, न म्हणता, जरा करतेस का ? उचलून ठेवतेस का? प्लीज जरा ते दे रे, असं आपल्याला म्हणता येईल का ? म्हणून बघायचं.
धमक्या देणं सोडून द्यायला हवं, कारण धमक्या पोकळ असतात हे मुलांना कळतं आणि अमुक केलं नाहीस तर तमुक घेणार नाही, जेवताना देणार नाही इ. धमक्या मुलांना शुल्लक वाटतात. नको देऊस असं त्यांनी म्हंटल की आपली काय किंमत राहिल? मग आपला अहंकार म्हणून नेटानं ती धमकी तडीला नेणं यात पुन्हा वातावरण गढुळच करतो आपण. तेव्हा अमुक करायला हवं आहे ते योग्य कसं आहे हे समजावून सांगणं. जमेल का? धमकीनी मुलाला शरण आणणं अन्यायाचं आहे.
असं वागायचं नाही तसं वागालं पाहिजे, मित्रांना अजिबात घरी गोंधळ घालायला आणायचं नाही, खेळताना पसारा करून ठेवायचा नाही, अशा प्रकारच्या गोष्टींना काय म्हणायचं? अशा अटी घालू नयेत.
खेळताना पसारा झाला तरी चालेल; पण नंतर घर स्वच्छ ठेवलं की आपल्यालाच बरं वाटतं ना ? म्हणून तो पसारा नंतर आवरायचा म्हणजे, ‘घर छान करायचं’ यावर भर दिला पाहिजे. पसारा आवर म्हणजे इतका वेळा मूर्खपणा केलास, तो निस्तर असं म्हणणं हा अपमान आहे.
समजा मूल दिवाणावरची चादर विस्कटून बसलं आहे. ती चादर सारखी करायची आहे. त्याबद्दल त्याला चार शब्द बोलून ऊठ रे म्हणण्यापेक्षा आपण ही चादर नीट करूया का ? म्हणणं जास्त ठीक होईल. मूल मदतही करेल. हे नेहमी जमेल असं नाही; पण प्रयत्न करूया असं बोलण्याचा.
मुलांनी एखादी गोष्ट ठरवली आहे. ती घरातल्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं गैरसोईची आहे, तर त्याला तू ती गोष्ट रद्द करून टाक असं उत्तर एकदम देणं बरोबर नाही. एकदा शनिवारी शाळेतून येताना मुलगी एका मैत्रीणीच्या घरी जायचं असं ठरवून आली. त्यांच्यां मैत्रिणी-मैत्रिणीचं ते पक्क ठरलं होतं; पण घरात कुणी तिला पोहोचवायला नव्हतं. इतरही काही कार्यक्रम ठरले होते. तेव्हा जाऊ नको म्हटल्यावर ती म्हणाली, ‘मग तुम्हीच म्हणता ना, एकदा सांगितलेलं मोडायचं नसतं म्हणून ? मी नाही आता मोडणार !’ ‘ते बरोबर आहे, पण मोडावं लागेल. असं काही एकदम ठरवू नये. विचार करून ठरवावं. आईला विचारून सांगतो म्हणावं.’
– ‘सगळं काय ग तुला विचारून ठरवायचं? ’
‘मला विचारून असं नव्हे ग, पण मला माहीत असतं घरात काही इतर ठरलंय का म्हणून. शिवाय आता तू जाणार आणि संध्याकाळी लगेच परत येणार म्हणजे तुम्हाला पण खूप खेळता येणार नाही. उद्या दिवसभर सुट्टी आहे. उद्या येऊ का असं तिला विचार किंवा तिला आपल्याकडे बोलावं. मग खूप खेळा !’
– ‘मग आज मी तिच्याकडे जाते, उद्या ती इकडे येईल.’ ‘तू आज घरात हवी आहेस ना, त्याचं काय?’ – ‘मग आज ती इकडे येऊ दे, उद्या मी तिकडे जेईन.’
‘हं. चालेल मग, तिला विचार येते आहे का.’
अशा प्रकारे मैत्रिणीकडे जाणे या विषयावर त्या चिमुकल्या मुलीनी आपण स्वतंत्र मार्ग शोधून काढला, याचं मला महत्व वाटलं. तेव्हा कारणं न स्पष्ट करता मुलांना सल्ले देणं कमी केलं पाहिजे. मी हे कशासाठी म्हणतो किंवा म्हणते आहे, हे सगळ शब्दात सांगता आलं पाहिजे.
नुसते युक्तिवाद मुलांशी करू नयेत. भाषण देण्याच्या पद्धतीनं एखादा मुद्दा आपण स्पष्ट करू शकतो; पण तो पटेलच असं नाही. आपली विव्द्तेची हौस त्यात भागेल; पण मूल कंटाळेल. तेव्हा अत्यंत तर्कसंगत वादसुद्धा घालू नये. त्यातून आपण मुलाला तू किती मूर्ख आहेस ! ही साधी गोष्ट तुझ्या कशी लक्षात येत नाही हेच पटवून देतो, ते त्याला आवडत नाही. त्याचा अपमान होतो.
मुलाला वाईट विशेषणं देणं टाळलं पाहिजे. तू आळशीच आहेस, तू बावळटपणाच करतोस, हट्टी आहेस, इतरांची तुला पर्वा नाही, हावरट आहेस, दुष्ट आहेस असं म्हणू नये. मुलं हे शिक्के मारून घेतात. हिरमुसली होतात. तसचं वागू लागतात. कधी त्या एखाद्या दुर्गुणाचाच गुण बनवून त्याचा अभिमान बाळगतात. मग मोठेपणी ती असं म्हणतात- ‘मी आमच्या घरात हट्टी म्हणूनच प्रसिद्ध आहे. एकदा मला माझी मावशी रागानं बोलली. पुन्हा मी तिच्या घरात पाऊल ठेवलं नाही ! ती गेली तेव्हा तिच्या घरी गेलो !’ हा काय शहाणपणा म्हणायला का?
मुलाच्या वागण्याचा आपण परस्पर अन्वयार्थ लावून त्याच्यावर आरोप करू नयेत. ‘तू काय समजलास ? मी हे न कळण्याइतकी मूर्ख आहे काय ? तुला वाटलं असेल आपण आईला फसवू शकू…’
म्हणजे मुलाचा बिचाऱ्याचा आईला फसवण्याचा हेतू नसताना तो आरोप त्याच्यावर आपण करतो आणि आईला फसवण्याची एक शक्यताच त्याला दाखवून देतो.
मुलांची उलटतपासणी घेतल्यासारखे प्रश्न काही वेळा आपण विचारतो आणि त्याची उत्तरं कधीच लगेच मिळत नाहीत. मग ‘काय रे मुखस्तंभासारखा काय उभा आहेस, उत्तर दे, बोल, दातखीळ बसली का ?’ अशी मुक्ताफळं आपण टपाटपा टाकतो. मुलाचा भरपूर गोंधळ करतो. हे ताण मुलांवर घालू नये.
कित्येकदा मूल काय म्हणतं आहे, हे पुरतं समजून न घेता आपण विषय बदलतो, हसून घालवतो, माघार घेतो. असं करू नये. कारण मुलाला आपल्याबद्दल मग विश्वास वाटत नाही. त्याच्या बोलण्यात आपल्याला रस नाही, असं त्याला वाटतं आणि तो बोलेनासा होतो.
हे सगळं का टाळायचं ? कुणी तज्ज्ञ सांगतात म्हणून का ? अशी कल्पना करू या की कुणी तरी आपल्याशीच असं बोलतं आहे.
अशा पद्धतीनं असा अपमान करून, दुर्लक्ष करून, आपल्याला तराजूत घालून बोलतं आहे तर आपण काय करू ?
- आपण गप्प बसू.
- आपण वाद घालू.
- आपण हिरमुसले होऊ- आपला आत्मविश्वास ढळले.
- आपला आत्मप्रतिष्ठेला धक्का लागेल.
- आपल्याला राग येईल.
- आपल्याला अपराधी वाटेल.
- आपल्यावर दुसऱ्याचा विश्वास नाही असं वाटेल.
- आपल्याला कुणी समजून घेत नाहीय असं वाटेल.
- आपल्याला पुरतं बोलून देत नाहीय असं वाटेल.
- आपल्याला काही समजतं असं त्याला वाटत नाही असं वाटेल.
- आपल्याला कुणी तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय असं वाटेल.
- आपण कुणाला आवडत नाही असं वाटेल.
असा जर परिणाम आपल्यावर होईल तर मुलांवर त्याहून वेगळा परिणाम होईल का ? उलट हे सारं आईवडलांबद्दल असल्यानं त्याचे फारच तीव्र परिणाम होतील.
म्हणून असं बोलणं टाळलं पाहिजे. शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा म्हणतात; पण आपण तर आपल्या कोवळ्या पोरांवर रोज हजारो वार करत असतो, याची जाणीव झाली की फार अस्वस्थ वाटतं.
मुलं आपल्याशी मोकळेपणानं बोलावीत असं वाटत असेल तर त्यांचं म्हणणं ऐकायला आपण शिकलं पाहिजे. त्याला मान दिला पाहिजे. मग एखाद्या वेळी आपली छोटी मुलगी सांगते, ‘आज तुमच्या मित्रांना जेवायला बोलवायचं नाही. मग तुम्ही त्यांच्याशीच बोलत बसता आणि आमच्याशी मात्र बोलत नाही !’ आपले डोळे खाडकन उघडताना आणि ती चूक वेळीच सुधारण्याची संधी मिळते.
मुलांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून वाढवायचं, वागवायचं झालं, तर काही बंधन पाळावी लागतात. ती जीवनपद्धती बनवावी लागते. नेहमी आपल्याच मनासारखं वागता येत नाही. हवं तसं बोलता येत नाही.
बोलण्याइतके हे काही प्रयोग झाले. कसे जमतात बघू या आणि पुढच्या लेखात मुलांना काही आनंदाचे अनुभव कसे देता येतील हे पाहू या.
(या लेखाबद्दलचे प्रतिसाद कमेंट-बॉक्स मध्ये नमूद करा. शोभा ताईंपर्यंत आपल्या प्रतिक्रिया पोहोचवता येतील.
Read More blogs on Parenting Here