लेखक :  देवयानी खरे


पाऊस सुरु झाला की सगळीकडे कानी पडणारा बेडकांचा डरॉंव डरॉंव हा आवाज सृष्टीतील बदलाचा संकेत घेऊन येणारा असतो. गंमत म्हणजे पावसाळ्यापूर्वी जमिनीखाली समाधी लावून बसलेले हे बेडूक पावसाची चाहूल लागताच वर येतात. पाण्याजवळ, तळ्याकाठी, चिखलात असे कुठल्याही ओल्या भागात उड्या मारत फिरणारे हे बेडूक जिथे तिथे दिसतात.

निसर्गातील बदलांना स्वीकारणारे आणि कीटकांची संख्या मर्यादित ठेवणारे बेडूक नैसर्गिक समतोलासाठी किती महत्त्वाचे असतात ना? पण आपण त्यांच्यापासून लांबच राहतो कारण आपल्याला खरं तर बेडकांची भीती वाटत असते. मोठे घाबरतात हे पाहून लहान मुलंही बेडकांना घाबरायला लागतात. निसर्ग साखळीतलं बेडकांचं महत्त्व निर्विवाद आहे आणि भीती, किळस बाजूला ठेवून त्यांची माहिती गंमतशीरपणे आपण मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे या उद्देशाने चिकूपिकूच्या जुलै अंकाची थीम आम्ही ठरवली ‘डुबुक डुबुक बेडूक’.

बेडूक हा विषय विविधरंगी आहे, खऱ्याखुऱ्या रंगानेही आणि गुणांनीही. लहान मुलांच्या अंगात भरपूर उर्जा असते म्हणून ही मुलंही या बेडकांप्रमाणे घरभर उड्या मारत फिरत असतात असं आपण कित्येकदा म्हणतो. मुलांना आवडेल, वाचायला मज्जा येईल, नवी माहिती देता येईल आणि सोबतच कागदाचा बेडूक तयार करून बघण्याची ऍक्टिव्हिटी मुलांना देता येईल अशा रीतीने चिकूपिकूचा जुलै अंकाची मांडणी केली आहे. शिवाय पालकांना मुलांमधील बहुरंगी बुद्धिमत्तांचा शोध घेता यावा आणि आठ बुद्धिमत्तांमधील प्रत्येक बुद्धिमत्तेला वाव मिळावा याकरता चिकूपिकूतील गोष्टी-गाणी, कोडी, चित्रं आणि अॅक्टिव्हीटीज यांची आखणी करण्यात आली आहे.

अंकाच्या पृष्ठभागावर लिहिलेली जेष्ठ कवी विद्याधर शुक्ल यांची साध्या सोप्या भाषेतील कविता वाचून मुलांनाही कविता करण्याचा हुरूप नक्कीच येईल. ही संपूर्ण कविता खूप मस्त आहे,

‘टुणकन तळ्यात,
टुणकन मळ्यात बेडूकदादा खेळतात
रेनकोट नाही, टॉवेल नाही
तरी कोरडे कसे होतात’

ही कविता पूर्ण वाचायची असल्यास चिकूपिकूचा जुलै अंक नक्कीच वाचायला हवा. आपल्याला आणि मुलांना पडणारे सहज प्रश्न आणि त्यांची ही छानशी कविता. सोबतच या कवितेसाठी आणि अंकाच्या मुखपृष्ठासाठी काढलेली चित्रंही, चित्रकार अदिती गुणाजी हिने मोठाली आणि सुंदर रेखाटली आहेत. ‘बेडूक विशेष अंक’ असल्यामुळे आपण न पाहिलेल्या आणि अत्यंत अल्प प्रमाणात आढळणाऱ्या ‘जांभळ्या बेडकाची’ गोष्ट लिहिलीय, प्राणी आणि पक्षी अभ्यासक गिरीश जठार यांनी.

डायनोसॉरच्या आधीपासून असणाऱ्या या बेडकाविषयी तर फारच कमी जणांना माहित असावं. यासोबतच अजून काही प्रजातीतील बेडकांच्या गमतीदार गोष्टीही त्यांनी सांगितल्या आहेत. जुलै अंकाचे निमित्त साधून गिरीश जठार यांच्याशी नुकताच ऑनलाईन संवाद साधण्यात आला, त्यात बेडकाविषयी बरीच गमतीशीर माहिती मिळाली तीही तुम्हाला चिकूपिकूच्या यु ट्यूब चॅनलवर ऐकता येईल.

अंकातील विज्ञानाच्या गमतीजमती सांगणाऱ्या ‘सायन्स सैर’ या सदरातील बेंजामिन फ्रंकलिन यांची गोष्ट आकाशात चमकणाऱ्या विजेविषयी कुतूहल निर्माण करते.

‘आर्टिस्ट कट्टा’ या सदरात आभा ताईंनी चायनीज, जपानी, मधुबनी, इजिप्त, मेक्सिकन, अमेरिकन अशा सहा विविध शैलीतील बेडकांची चित्र दाखवली आहेत. या चित्रांमधून पालकांप्रमाणे मुलांनाही विविध शैलीतील चित्रांविषयी माहिती जाणून घेता येईल. लहान मुलांचा शब्दसंग्रह हा थोडा असतो पण त्यातही ही मुलं छोट्या छोट्या ओळीच्या भन्नाट कविता रचतात.

अश्याच एका पावणे तीन वर्षाच्या बालमैत्रिणीची कविता पण या अंकात वाचता येईल. अनेकदा आकाशात मोठ्ठाला ढग दिसला तर मुलांच्या आणि सहज आपल्याही तोंडून शब्द बाहेर पडतो, ‘ढोलु’ हो, ना? मग या जुलै अंकात दीप्ती देशपांडे यांनी लिहिलेली अशीच एक ढोल्या ढगाची कविता आहे आणि त्यासाठी हबीब अली यांनी सुंदर चित्र काढलं आहे. सोबतच प्राची मोकाक्षी यांनी लिहलेली’ Tuppy’s boat’ ही इंग्रजी भाषेतील कविताही मुलांना वाचायला, म्हणून पाहायला आवडेल. फारूक काझी यांच्या ‘पाऊस घरातला’ या मुलांमधली संवेदनशीलता टिपणाऱ्या कवितेत, एका छोट्या मुलाला कसली काळजी वाटतेय हे नक्की वाचा.

अंकातल्या बाकी गोष्टींमध्ये फिशिरा तिच्या चिमुकल्या मित्रांचे आईबाबा कसे शोधून देते, मातीवर चिकू आणि पिकूला दिसलेली नक्षी कोणाची हे शोधण्याची मज्जा, पेम्बाने घराजवळील झऱ्याचे पाणी अडवण्यासाठी केलेली आयडिया, छबी आणि बागुलबुवाला सापडलेले जादुई भुयार अशा छान छान गमती आहेतच.

पालकांकरिता चिकूपिकूच्या अंकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे यात बालशिक्षणतज्ज्ञ, डॉ. श्रुती पानसे यांनी लिहिलेले ‘मूल प्रश्न’ हे सदर. मुलांविषयी पालकांना अनेक प्रश्न पडतात, काहींची उत्तर सापडतात तर काही पालकांना या प्रश्नांपुढे नेमकं कसं वागावं हे कळत नाही. ‘मूल प्रश्न’ या लेखी संवादातून अनेक पालकांना आपल्या मुलांना जाणून घेण्यास मदत होतेय. चिकूपिकूच्या जुलै अंकात मुलांच्या झोपेविषयी श्रुती पानसे यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा पालकांना नक्की उपयोग होईल.

एकंदरीत चिकूपिकूचा जुलै अंक हा बदलांना स्वीकारण्याची समज देणारा आहे, मुलांना निसर्गातील ‘बेडूक’ या प्राण्याशी ओळख करवून देणारा आहे, निसर्गाच्या अधिक जवळ नेणारा आहे आणि सगळ्यांनी मिळून वाचावा असा आहे. तेव्हा रोज चिकूपिकूतल्या गोष्टी वाचूया आणि मुलांनाही वाचून दाखवूया!

Read More blogs on Parenting Here