लेखक :  श्रावणी उभे

मुलांना सांगू या मराठी महिने आणि सणांची माहिती | Marathi Months and Festival

 

बारा महिने असं म्हटलं की जानेवारी ते डिसेंबर हेच आठवतं. पण मराठी महिने खूप कमी जणांच्या डोक्यात येतात. भारतात हिंदू पंचांगानुसार बारा महिन्यांना बारमास म्हणतात. महिन्यातल्या एका दिवसाला तिथी असं म्हणतात. एका महिन्यात ३० दिवस असतात आणि हे महिने चंद्राच्या स्थितीनुसार बदलत असतात. चंद्राच्या कलेनुसार म्हणजे कमी-अधिक होण्याच्या स्थितीवरून एका महिन्याचे दोन भाग केले जातात. प्रत्येक भागामध्ये पंधरा दिवस असतात. आपण या स्थितीला पोर्णिमा आणि अमावस्या अशा शब्दात जाणतो. पौर्णिमेनंतर चंद्र कमी कमी होत जातो आणि अमावास्येला दिसेनासा होतो आणि मग अमावस्या ते पोर्णिमा पुन्हा चंद्रकला वाढीस लागते. त्यांना कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असे म्हणतात. प्रथम याबद्दल विस्तृतपणे जाणून घेऊ या.

कृष्ण पक्ष म्हणजे काय? (Krishna Paksha)

चंद्राच्या स्थितीवरून महिन्याचे दोन पक्ष पडतात. पौर्णिमा आणि अमावस्या यांच्यातील १५ दिवसाच्या अंतराला कृष्णपक्ष असे म्हणतात. पौर्णिमा झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाची सुरुवात होते. कृष्ण पक्षामध्ये चंद्राचा आकार हळूहळू कमी होत जातो आणि रात्रीचा अंधार वाढत जातो.

शुक्लपक्ष म्हणजे काय? (Sukla Paksha)

अमावस्या आणि पौर्णिमा यांच्यातील १५ दिवसाच्या अंतराला शुक्लपक्ष असे म्हटले जाते. अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून शुक्लपक्षाची सुरुवात होते. या पक्षामध्ये चंद्र अधिक बलवान होतो आणि रात्र कमी होते.

हे पण वाचूयात : संस्कार म्हणजे काय? मुलांवर संस्कार करणे म्हणजे नेमकं काय?

मराठी आणि इंग्रजी महिन्यांचा सुरु होण्याचा क्रम म्हणजे ऋतूनुसार सुरु होण्याची दशाही अगदी भिन्न आहे. ज्यांना मराठी महिन्यांची माहिती नाही त्यांना असे वाटू शकते की जानेवारी महिन्यातचं चैत्र महिन्याची सुरवात होते. पण असे नाही.

मराठी वर्षाचा पहिला महिना हा उन्हाळा लागला, उत्तरायण सुरु झालं की येतो. ज्याला आपण वसंत ऋतू असं म्हणतो. झाडांना नवी पालवी फुटते, थंडी ओसरलेली असते आणि सूर्याची उष्णता जाणवायला लागते. मराठी महिन्यांप्रमाणे मराठी ऋतूही तितकेच महत्वाचे. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे त्रिसूत्र आपल्या डोक्यात अगदी पक्क बसलंय पण मराठीत या ऋतू चक्राला सहा भागात विभागलं आहे. त्याचीही थोडक्यात माहिती घेऊया.

या ऋतूंची आणि त्यानुसार बारा महिन्यांची नावे (Marathi Months list) बघू या..

  • वसंत ऋतू – महिने : चैत्र, वैशाख
  • ग्रीष्म ऋतू – महिने : ज्येष्ठ, आषाढ
  • वर्षा ऋतू – महिने : श्रावण, भाद्रपद
  • शरद् ऋतू – महिने : आश्चिन, कार्तिक
  • हेमंत ऋतू – महिने : मार्गशीर्ष, पौष
  • शिशिर ऋतू – महिने : माघ, फाल्गुन

या मराठी ऋतू आणि महिन्यांच्या समीकरणातून भारतीय परंपरेत विविध सण साजरे केले जातात.

मराठी महिने व त्यातील सण (Marathi Months and Festivals)

1. चैत्र महिना :
चैत्र महिन्याला मराठी वर्षाचा पहिला महिना म्हणून ओळखले जाते. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना मार्च ते एप्रिल महिन्यांदरम्यान असतो. चैत्र महिन्याला Month Of Spring असे देखील म्हटले जाते.

2. वैशाख महिना :
वैशाख हा वर्षाचा दुसरा महिना असतो. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना एप्रिल-मे महिन्यांदरम्यान असतो. वैशाख महिन्याला पीक कापणीचा (season of crop harvesting) महिना म्हणून देखील ओळखले जाते. कारण या महिन्यामध्ये शेतकरी शेतातील नवीन पीक काढतात. पंजाब प्रांतामध्ये वैशाख महिन्याला बैसाखी असे म्हणतात. तेथे बैसाखी हा सण खूप मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. अक्षय्य तृतीया हा सण देखील वैशाखातच येतो आणि सोने खरेदीसाठी, शुभ कार्यांसाठी या सण अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो.

3. ज्येष्ठ महिना :
ज्येष्ठ महिना हा वर्षाचा तिसरा महिना आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना मे- जून महिन्यांच्या दरम्यान असतो. या महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यात वटसावित्री किंवा वटपौर्णिमा साजरी केली जाते.

4. आषाढ महिना :
मराठी वर्षाचा चौथा महिना म्हणजे आषाढ . इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना जून- जुलै महिन्यांच्या दरम्यान असतो. आषाढ हा जोरदार पावसाचा महिना म्हणून ओळखला जातो. आषाढ महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशी हे उत्सव येतात.

5. श्रावण महिना :
श्रावण हा वर्षाचा पाचवा महिना. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना जुलै -ऑगस्ट महिन्यांच्या दरम्यान असतो. रिमझिम पावसाचा आणि ऊन – पावसाच्या खेळाचा श्रावण म्हणजे सणांचा महिना! या महिन्यामध्ये नागपंचमी, नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाला, पोळा असे अनेक सण साजरे केले जातात. महाराष्ट्रात श्रावणी सोमवारी शंकराची पूजा केली जाते तर श्रावणातील मंगळवारी मंगळागौर साजरी केली जाते. श्रावणी शुक्रवारी बायका हळदी- कुंकू सुद्धा करतात.

हे पण वाचूयात : मुलांच्या मनातलं फुलपाखरू

6. भाद्रपद महिना :
मराठी वर्षाचा सहावा महिना भाद्रपद. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यांच्या दरम्यान असतो. हा महिना सर्वांच्या आवडीचा महिना आहे कारण या महिन्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. सर्वांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पांचे गणेश चतुर्थीला आगमन होते आणि १० दिवसांचा उत्सव, गणपतीची पूजा, आरत्या, सजावट, मोदक या सगळ्यांसह हा सण अतिशय उत्साहाने पार पडतो.

7. अश्विन महिना :
अश्विन हा वर्षाचा सातवा महिना. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यांच्या दरम्यान असतो. या महिन्यात सुद्धा खूप सण साजरे होतात. पहिल्याच दिवशी घटस्थापनेपासून नवरात्राची सुरुवात होते. महिन्याच्या दहाव्या तिथीला दसरा किंवा विजयादशमी हा महत्त्वाचा सण असतो. त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा आणि महिन्याच्या शेवटी सर्वांच्या आवडीची दिवाळी! हिंदू धर्मामध्ये साजरा होणारा सर्वात मोठा सण दिवाळी आहे. त्यातले वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे अश्विन महिन्यात येतात.

8. कार्तिक महिना :
कार्तिक महिन्याला वर्षाचा आठवा महिना म्हणून ओळखले जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यादरम्यान येतो. महिन्याचे पहिले दोन दिवस हे दिवाळीतील पाडवा व भाऊबीज म्हणून साजरे केले जातात.

9. मार्गशीष महिना :
मार्गशीष महिन्याला वर्षाचा नववा महिना म्हणून ओळखले जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांच्या दरम्यान येतो. या महिन्यामध्ये दत्त जयंती साजरी केली जाते.

10. पौष महिना :
पौष हा वर्षाचा दहावा महिना. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना डिसेंबर -जानेवारी महिन्यांच्या दरम्यान येतो. पौष महिन्यात मकर संक्रांत येते पण ती चंद्रावरून निश्चित होणाऱ्या तिथीनुसार नसते तर यादरम्यान सूर्यनारायणाच्या उत्तरायणाची सुरुवात म्हणून ओळखली जाते.

11. माघ महिना :
माघ महिन्याला वर्षाचा अकरावा महिना म्हणून ओळखले जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना जानेवारी -फेब्रुवारी महिन्यादरम्यान येतो. माघ हा थंडीचा शेवटचा महिना. या महिन्यामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो.

12. फाल्गुन महिना :
फाल्गुन महिना हा वर्षाचा बारावा म्हणजेच शेवटचा महिना म्हणून ओळखला जातो. हा इंग्रजी कॅलेंडरनुसार फेब्रुवारी-मार्च महिन्यांच्या दरम्यान असतो. फाल्गुन महिन्यामध्ये होळी, धुलीवंदन, रंगपंचमी हे सण साजरे होतात.

हे पण वाचूयात : आई-बाबांनी मुलांच्या भावना ओळखल्या तर?

अशाप्रकारे मराठी ऋतू आणि महिन्यांनुसार विविध सण-उत्सव साजरे केले जातात. आपल्या भारतीय परंपरेत आपण उत्साहाने हे सण साजरे करतो आणि ही परंपरा जपून ठेवण्यास मदत करतो. ऋतूनुसार येणाऱ्या या नैसर्गिक, भौगोलिक आणि स्थानिक गोष्टींचं महत्त्व या सगळ्या सणांमध्ये जपण्याचा प्रयत्न आपण नक्की करू या!

Read More blogs on Parenting Here