परंपरेनुसार यंदाही दिवाळी विशेषांक
- प्राजक्ता देशपांडे

 

निळा निळा रेशमाचा घालुनिया झगा...
पहाटेला परी येते हाती लाल फुगा..

मंगेश पाडगावकरांनी लिहिलेलं आणि पल्लवी सातव ह्यांनी गायलेलं हे श्रवणीय गाणं वाजत चिकूपिकूचा ह्यावेळचा दिवाळी विशेषांक प्रकशित झाला. ह्यावेळच्या दिवाळी विशेषांकाचा विषय आहे " अद्भुत". आपल्या भोवती खरंच खूप अद्भुत गोष्टी असतात. संपूर्ण निसर्गाचं अचंबित करणारा आहे. मूल जसं जसं मोठं होत जातं, तशा त्याला त्याच्या आजूबाजूच्या, निसर्गातल्या गोष्टी समजायला लागतात. त्या गोष्टींमागची प्रक्रिया, कारणं किंवा शोध मुलांच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी अद्भुत किंवा wow वाटतात.
Explore the Diwali Ank 2024 - ChikuPiku Marathi  Magazine

मुलांना जर वाचनाकडे वळवायचं असेल तर त्यांच्या हातात अशी पुस्तकं दिली पाहिजेत, जी फक्त वाचायला नाही तर बघायला सुद्धा आकर्षित करतील. आणि म्हणूनच या अंकात आहेत मुलांना wow वाटतील अशा गोष्टी, माणसं, गाणी किस्से आणि खूप छान, कलरफुल, मोठमोठ्ठाली चित्र. हा अंक तब्बल ७६ रंगीत चित्रांच्या पानांनी, २० गाणी-गोष्टींनी, आणि १५ पेक्षा जास्त ऍक्टिव्हिटीजनी गच्च भरलेला आहे.

 

अगदी अंकाचं मुखपृष्ठ सुद्धा त्याच्यावर लिहिलेल्या कवितेसारखं निळ्या रंगाचं आकाश तुमच्या डोळ्यासमोर उभं करतं. त्याच्या खाली दिलेला QR कोड स्कॅन करून तुम्ही पल्लवी सातव यांच्या आवाजात ही कविता ऐकूही शकता. अंकात मुलांची उत्कंठा वाढवतील अशा २० पेक्षा जास्त गोष्टी सुद्धा आहेत. चांदोबाची आणि गाईची जमलेली गट्टी याबद्दल वाचायला मिळेल. शब्दांच्या गोठोड्यात नवीन नवीन शब्द शिकायला मिळतील. स्वार्थी दैत्य कसा बरं इतका चांगला वागायला लागला..? हे कळेल. सायकलवर घर घेऊन संपूर्ण भारताची सैर करणाऱ्या प्रतीक दादाची गोष्ट सुद्धा या अंकात आहे. समजा घरातलं फर्निचर तुमच्याशी बोलायला लागलं तर काय गप्पा होतील हे सुद्धा अंकात सांगितलं आहे.

पहा पहा जादू झाली
दीपकळी माझी आली

किलबिलान राज्यातले दीपकळीला, काजवाराणी का म्हणायला लागले हे जाणून घेण्यासाठी हा अंक नक्की वाचा. याशिवाय अजब कोळ्याची गजब सफर, उडवणारा पतंग, स्वप्नांची खोली, घरात आमच्या चोर शिरला आणि आपले लाडके चिकू-पिकू ह्या गोष्टी वाचतानासुद्धा मुलांना धमाल येईल.

गोष्टींसोबतचं चिकूपिकूच्या मासिकाचं अजून एक खास वैशिष्ठ्य म्हणजे मुलांना गंमत वाटेल, गाता येतील अशी गाणी किंवा बडबडगीतं. परीचं घर, ढोबळा बाबा ह्या गमतीशीर कविता तर आहेतच पण एक कविता तर चक्क "उल्टा पुल्टा" दोन्हीकडून वाचता येईल अशी आहे. दिवाळी अंकाच्या निम्मिताने संदीप खरे यांची "देते कोण देते कोण" ही कविता, रवींद्रनाथ टागोर यांची "फुले फुले ढोले ढोले" ही बंगाली भाषेतली कविता त्याच्या हिंदी अनुवादासह दिली आहे. या कवितांसोबतचं ह्या नामवंत कवींशी मुलांची ओळख त्या निम्मिताने होईल. ह्यातल्या बहुतेक कवितांच्या खाली दिलेले QR कोड स्कॅन करून ह्या कविता ऐकता सुद्धा येतील.

"पॅरालिंपिकची अद्भुत स्पर्धा" या सदरात, मुलांना आपल्या व्यंगावर मत करून पॅरालिंपीक मध्ये अद्भुत कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची माहिती सुद्धा सोप्या शब्दात दिली आहे. प्राणी आणि पक्षी अभ्यासक गिरीश जठार, यांनी "अरे बापरे" या सदरात अद्भुत किंवा आश्चर्य वाटतील अशा निसर्गातल्या गोष्टी सांगितल्या आहेत आण आपली छोटी मैत्रीण इरानी, अमेरिकेच्या नॅशनल पार्क मध्ये ट्रिपला गेल्यावरची धमाल सांगितली आहे. मनोरंजनासोबतचं अशी काही सदरं कंटाळवाणं न वाटता मुलांच्या ज्ञानात भर नक्कीच घालतील.

 

ह्या दिवाळी विशेषांकात, गाणी आणि गोष्टींबरोबरच भरपूर ऍक्टिव्हिटीज सुद्धा आहेत, इतक्या की अगदी मुलांना शाळा सुरु होईपर्यंत पुरतील. दिवाळीच्या निम्मिताने "सोपी रांगोळी", आकाशकंदील काढणे आणि ग्रीटिंग कार्ड तयार करणे ह्या ऍक्टिव्हिटीज तर आहेतच त्याच बरोबर, चित्रावरून गोष्ट तयार करणे, गाणी ऐकत चित्र रंगवणे, चित्रातील गोष्टी शोधणे, भेंडी पॉप, कोलाज काम अशा अनेक ऍक्टिव्हिटीज आहे. दिवाळीच्या सुट्टीत आपली भावंडं जमल्यावर खेळता येईल असा बोर्ड गेम सुद्धा दिला आहे आणि जर भावंडं नसतील तर आई-बाबा किंवा आजी-आजोबा यांच्या सोबत खेळता येणारे खेळ सुद्धा "खेळ खेळू या" या सदरात दिले आहेत. "चिमणी चित्र" या सदरात आभा भागवत यांनी दिलेलं मंडाला आर्ट ही पालक आणि मुलं यांनी मिळून करायची ऍक्टिव्हिटी आहे. ह्यातल्या बहुतेक ऍक्टिव्हिटीज च्या खाली QR कोड दिला आहे तो स्कॅन करून तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटीची माहिती देणारा व्हिडीओ बघायला मिळेल. आणि गम्मत म्हणजे ह्या अंकात फिशीरा ठिकठिकाणी लपून बसली आहे, तिला शोधायला मुलांना खूप मजा येईल.
Explore Chimani Chitra Activity Book - ChikuPiku Marathi Magazine

आपल्या महाराष्ट्राला दिवाळी अंकाची खूप मोठी परंपरा आहे. वाचन आणि सण याची सांगड घालणारं कदाचित आपलं हे एकमेव राज्य असेल नाही..? मोबाइल, लॅपटॉपच्या या जगात दिवाळी अंक आपलं स्थान अजूनही टिकवून आहेत. त्यांची हीच परंपरा आपल्या लहान मुलांपर्यंत पोहचवू या. या दिवाळीत धमाल करू या, किल्ला बनवू या, फराळ करू या आणि पुस्तकांशी मैत्रीसुद्धा करू या.