दिवाळी म्हटलं की झगमगते दिवे, दारावर आकाशकंदील, नवीन कपडे, फराळ, अभ्यंगस्नान आणि आप्तेष्टांची भेट या सगळ्याचं गोष्टी डोळ्यासमोर येतात. दिवाळी हा सण वर्षातला सगळ्यात मोठा आणि आनंदाची पर्वणी घेऊन येणारा उत्सव आहे.
घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने जर विचार केला, तर दिवाळीकडे बघण्याचा प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा आहे. दिवाळी आली की घरातल्या आजी, आई घराची स्वच्छता, फराळ याच्या तयारीला लागतात तर आजोबा, बाबा घराची सजावट करणे, आकाशकंदील बनवणे, दिवाळीची खरेदी यात busy असतात. आता घरातली बच्चे कंपनी मात्र दिवाळीची सुट्टी लागताच, फराळावर ताव मारणे, किल्ला बनवणे यात रमून जाते. पण असं असलं, तरी एरव्ही शाळा क्लासेसमध्ये बिझी असणारी ही मुलं दिवाळीची सुट्टी लागल्यावर २-३ दिवसातच आईकडे,"मला कंटाळा आलाय", "मला बोअर होतंय" अशी भुण-भुण लावतात. अशा वेळी मात्र, काय करावं की मुलं बिझी राहतील आणि शिवाय या सणाचं महत्त्वसुद्दा त्यांना समजेल असा प्रश्न सध्या प्रत्येक पालकाला पडलेला असतो. जर आपणच आपल्या मुलांना या दिवाळीच्या तयारीत सहभागी करून घेतलं तर....? आपली कामं तर होतीलच शिवाय मुलांच्या डोक्याला सुद्धा उद्योग मिळेल. काय काय करता येईल बरं (Diwali Activities For Kids)? याचबद्दल काही टिप्स आम्ही आज देणार आहोत.
घरातली साफसफाई
आम्हाला अगदी मान्य आहे की साफसफाई म्हंटल्यावर आपल्याला मुलांना लगेच पंखे साफ करायला लावायचे नाही आहेत, पण त्यांची शाळेची पुस्तक आवरून कपाटात ठेवायला सांगणे, कपड्यांच्या घड्या करायला सांगणे किंवा घरातल्या त्यांना हाताळता येतील अशा वस्तू पुसायला सांगणे. अशी कामं आपण नक्कीच सांगू शकतो. आपापला शाळेचा कप्पा आवरणे, त्यांची खेळणी गोळा ठेवणे अशी काम दिवाळीलाच केली पाहिजेत असं नाही पण त्या निम्मिताने ही कामं ते शिकतील त्यांच्या अंगवळणी पडतील आणि एक चांगली सवय लागेल.
पणत्या रंगवणे
मातीच्या पणत्या किंवा दिवे हा दिवाळीच्या तयारीतील अविभाज्य घटक. मातीच्या पणत्या घरी बनवणे जरी किचकट प्रकार असला तरी, आजकाल बाजारात न रंगवलेल्या मातीच्या पणत्या मिळतात त्या घरी आणून मुलांना त्या रंगवायला देणे किंवा त्यावर काही रंगीत खडे चिटकवणे ही मुलांसाठी नक्कीच एक छान आर्ट अँड क्राफ्ट ची ऍक्टिव्हिटी होऊ शकते. यातून नक्कीच मुलांच्या कल्पना शक्तीला चालना मिळेल.
रांगोळी काढणे
दिवाळीत दारासमोर मोठमोठ्या रांगोळ्या काढणे ही दिवाळीची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. मुलांचा सुट्टीत आलेला कंटाळा दूर करण्यासाठो रांगोळीचे हे विविध रंग नक्कीच आपली मदत करू शकतात. रांगोळी काढण्यात बऱ्याच प्रकारे मुलं सहभागी होऊ शकतात म्हणजे अगदी रांगोळीचे ठिपके काढण्यापासून ते रांगोळीचे रंग भरण्यापर्यंत मुलं मदत करू शकतात. आजकाल बाजारात रांगोळीचे साचे मिळतात त्याच उपयोग करूनसुद्धा आपण मुलांना रांगोळी काढायला शिकवू शकतो. त्याच बरोबर फुलं किंवा फुलाच्या पाकळ्या वापरून मुलं रांगोळी काढू शकतील. यात कदाचित फुलाच्या पाकळ्या वेगळ्या करायलाही मुलं मदत करतील. Check out our insights on the Diwali Festival!
मंडाला आर्ट हा प्रकार तुम्हाला माहित असेलच, खूप छान नाजूक कलाकृती आहे. तुमच्या जर मुलाला चित्र रंगवण्यात जास्त interest असेल तर तर त्यानी रंगवलेलं एखादं मंडाला आर्ट जाड पुठ्यावर चिटकवून तुम्ही त्याचा रांगोळी म्हणून उपयोग करू शकता. आहे की नाही छान आयडिया? कदाचित मुलांनी काढलेली रांगोळी तुमच्या रांगोळी इतकी सुबक सुंदर नसेलही पण दिवाळीत दारासमोर मी रांगोळी काढायचे किंवा काढायचो ही आठवण त्याच्या किंवा तिच्या डोक्यात कायमची कोरली जाईल, नाही का?
आकाशकंदील बनवणे
रंगेबेरंगी कागद, काड्या, पुठ्ठा वापरून तयार केलेला आकाशकंदील दिवाळीचं एक प्रमुख आकर्षण आहे. घराच्या घरी आकाशकंदील बनवणे यासारखी आर्ट अँड क्राफ्टची छान ऍक्टिव्हिटी असुच शकत नाही. अगदी मोठा आकाशकंदील बनवणं शक्य झालं नाही तरी आजकाल घरात आपण छोटे छोटे आकाशकंदील लावतो, ते मुलांना बनवायला शिकवले तर संपूर्ण घराची सजावट होऊन जाईल.
दिवाळीचा फराळ
कुठलाही सण हा खाद्यपदार्थांशिवाय अपूर्ण आहे. दिवाळीतला फराळ हा तर झालाच पाहिजे !! चकली, चिवडा, लाडू हे पदार्थ आजकाल वर्षभर मिळत असले तरी बऱ्याच घरांमध्ये हे दिवाळीच्या वेळेस आवर्जून केले जातात. लाडू वळणे किंवा त्यावर मनुका लावणे ही काम मुलं आवडीने करतील याशिवाय केलेला फराळ हळू-हळू डब्यात भरणे, करंजी करताना त्याला छान आकार देणे ही कामंसुद्धा मुलांना शिकवली तर जमू शकतात. Don't miss out blog on " दिवाळीचा फराळ "
तोरण बनवणे किंवा घर सजवणे
दिवाळीत दारावरच्या तोरणाला फार मान आहे. मोती, वेगवेगळे बीड्स किंवा प्लॅस्टिकची फुलं वापरून केलेली तोरणं फारच आकर्षक दिसतात आणि ती करणं अवघडसुद्धा नाहीये. मुलांच्या आर्ट अँड क्राफ्टच्या ऍक्टिव्हिटी मध्ये याचा समावेश होऊ शकतो. आजकाल बाजारात मोठ्या प्रमाणात आर्टिफिशिअल फुलं उपलब्ध आहेत टी सुद्धा मुलांच्या मदतीने एका दोऱ्यात ओवून सुंदर तोरण तयार होऊ शकतं
याशिवाय हीच आर्टिफिशिअल फुलं वापरून तुम्ही घरात किंवा घराच्या दारात चिटकवून एक वेगळी सजावट सुद्धा करू शकता. याशिवाय देव पूजेसाठी लागणारे हार बनवताना सुद्धा मुलं मदत करू शकतात.
दिवाळी ग्रीटिंग कार्ड्स आणि गिफ्ट पॅकिंग
दिवाळीमध्ये ग्रीटिंग देण्याची पद्धत मागे पडत असली तरी घरातल्या एका लहान मुलाने स्वतःच्या हाताने तयार केलेल्या ग्रीटिंगचं नेहमीच कौतुक होतं. वेगवेगळ्या रंगाचे क्राफ्ट पेपर वापरून त्यावर चित्र काढून किंवा बीड्स, रंगीत खडे चिटकवून दिलेलं ग्रीटिंग किती छान वाटतं नाही का..? ग्रीटिंग कार्ड सोबतच वेगवेगळे गिफ्ट पॅकिंग करतानासुद्धा आपल्याला ह्या लहानग्यांची मदत होऊ शकते. चिकटपट्टी कापून देणे, गिफ्ट वर स्टिकर चिटकवणे ही कामं मुलं अगदी आनंदानी करतात.
इतर कामं
घरात वरती दिलेल्या कामाव्यतिरिक सुद्धा अनेक लहान-लहान कामं असतात. म्हणजे दुकानातून एखादी वस्तू आणणे, जवळच्या घरात एखादी वस्तू पोहचवणे ही कामं मुलांचं वय बघून तुम्ही त्यांना सांगू शकता.
ह्ह्या सगळ्या कामात मदत करताना मुलांकडून चुकून काहीतरी सांडू शकते, फुटू शकते पण लक्षात घ्या आपणही ही कामं पहिल्यांदा करताना काही चुका केल्याच असतील ना...? त्याशिवाय मूल शिकणार कसं ...? मुलांना नेहमीच त्यांच्याबरोबर खेळायला कोणीतरी हवं असतं किंवा मोठी माणसं जे करतात ते करायचं असतं त्यांच्या ह्याच गोष्टीचा आपण आपल्या कामात उपयोग करून घेतला तर काय हरकत आहे (Diwali Activities For Kids) .? मुलंसुद्धा कामं शिकतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्क्रीन टाइम पासून मुक्ती, जी सध्या काळाची गरज आहे. ह्या सगळ्या कामातून किंवा मदतीतून कदाचित मुलांना त्यांच्यातली एखादी कला गवसेल किंवा एखादा नवीन छंद सापडेल.
अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण आहे दिवाळी. एखादा सण तेव्हाच साजरा होतो जेव्हा त्यात कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा काही न काही सहभाग असतो. याच दिवाळीच्या निम्मिताने मुलांना सुद्धा या सणात योग्य प्रकारे सहभागी करून घेऊ या, दिवाळी फक्त फराळ, किंवा गिफ्ट्स इथं पर्यंत मर्यादित न ठेवता त्याचा नेमका उद्देश काय हे मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू या. तरच आपली संस्कृती योग्य प्रकारे जपली जाईल. Read more on Marathi Months and Festival.
ही दिवाळी तुम्हा सर्वाना आनंदाची भरभराटीची आणि आरोग्यदायी जावो ! शुभ दीपावली !!