लेखक : जयदीप कर्णिक
साधारण अठरा वर्षांपूर्वी डॉक्टरांनी एक पार्सल माझ्या हातात ठेवलं. दुपट्यात गुंडाळलेल्या त्या पार्सलने माझ्याकडे एकटक बघितलं आणि मी फिदा झालो. तोपर्यंत लहान बाळांना खेळवलं असलं तरी इतकं केवळ काही मिनिटांचं बाळ मी कधी हातात घेतलं नव्हतं. त्याचा तो मुलायम स्पर्श कधीही विसरता येणार नाही. त्यानंतर काही वर्षांनी घरात दुसरं पार्सल आलं. सानियाने आपल्या बाळमुठीत माझं बोट धरलं तो दिवस आणि आता आज-काल ती अर्णवच्या मदतीने मला बोटाच्या इशाऱ्यावर नाचवते यात इतकी वर्षं लोटलीत हे आज लिहायला घेतल्यावर जाणवतंय.
काय केलं या मधल्या वर्षांत? भरपूर धमाल केली. बाबा असण्यातला आनंद पुरेपूर उपभोगला. कालचा माणूस आणि आजचा माणूस वेगळा असतो असं म्हणतात. मुलं तर क्षणोक्षणी बदलत असतात. मोठी होत असतात. मोठी त्यांची तीच होत असतात, आपण फक्त पाणी, अधून मधून खत आणि लागलाच तर एखादा टेकू द्यायचा असतो. मुलांची ही मोठी होण्याची प्रक्रिया इतकी जबरदस्त आहे, इतकी भन्नाट आहे की ती चुकवणं म्हणजे आपल्या आयुष्यातील मोठा ठेवा हरपण्यासारखं आहे. त्यांना मोठी होताना, वाढताना बघणं यासारखं आनंदाचं आणखी दुसरं काही नाही.
अगदी लहान असताना, बोलता येत नसतानाही बाळं आपलं म्हणणं आपल्यापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचवतात. त्यांना हवं ते आपल्याकडून करवून घेतात. त्यांच्या आईइतकं सगळंच कळेल असं नाही पण जवळ राहिलं तर आपल्यालाही त्यांच्याशी गप्पा मारण्यातली मजा घेता येते. पहिल्या दोन तीन वर्षांत तर मुलं इतकी शिकत असतात की त्यांच्या स्वयं-अध्ययनाच्या क्षमतेची कमाल वाटते. ती पडतात, भोकाड पसरतात, स्वतःलाच हसतात आणि चक्क चालायला – धावायला लागतात ! त्या काळातल्या मुलांच्या आसपास राहिलं तरी कुणाला सकारात्मक कसं रहायचं याचे क्लासेस करावे लागणार नाहीत.
सानिया अगदी लहान असताना मला मात्र हा आनंद भरभरून घेता आला नाही. मी तेव्हा फिरतीच्या नोकरीवर असायचो. एकदा बाहेरगावी गेलो की दोन तीन महिन्यांनी परतायचो. मी गेलो की रोज माझी वाट बघत ती खिडकीत बसून राहायची. निळ्या जीन्सवाल्या कोणत्याही माणसाला बाबा म्हणून हाक मारायची. माझेही दिवस आणि मुख्यतः रात्री खूप वाईट जायच्या. तिच्यासाठी गाणी लिहायचो आणि फोनवरून ऐकवायचो. दोन तीन महिन्यांनी घरी जाऊ तेव्हा सानिया मला ओळखेल ना अशी सारखी धास्ती वाटत रहायची. ती मात्र घरी आलो की मला अजिबात सोडायची नाही. अगदी बाथरुमला गेलो तरी दाराबाहेर उभी रहायची. पुन्हा बाहेरगावी जाताना अगदी गलबलून जायला व्हायचं. शेवटी मी ती नोकरीच सोडली.
अर्णवच्या वेळेस मात्र अगदी पहिल्या दिवसापासून मला ती मजा अनुभवता आली. उपडं पडणं, रांगणं, उभ राहणं, चालणं, धावणं… प्रत्येक कृती भरपूर मेहनत घेतल्यावर जमणारी. पण मुलं ती किती आनंदानी आणि उत्साहानी करतात! स्वतः मजा घेतातच पण इतरांनाही खुश करून टाकतात. मुलं भाषा शिकतात ती तर कमालीची प्रोसेस असते. सानिया बरेच दिवस बोबडं बोलायची. अर्णव मात्र एकदम स्पष्टच बोलायला लागला. काहीतरी अगम्य बोलता बोलता अचानक मुलं एखादा शब्द बोलतात, आपल्याला हाक मारतात तेव्हाचा आनंद तर अवर्णनीयच.
मुलांना भरपूर वेळ द्यायचा हे मी आणि तृप्तीने ठरवलेलंच होतं. आवडीने कराव्याशा वाटणाऱ्या भरपूर गोष्टी असणं आणि त्या करण्यासाठी पुरेसा वेळ असणं आम्हाला महत्त्वाचं वाटत होतं. नोकरी आम्ही दोघेही करत होतो. मग उरलेल्या वेळेतील वेळ वाचवण्यासाठी दिवसातले किमान दोन तास खाणाऱ्या टीव्हीवर फुली मारली. मग मुलांशी खेळायला आम्हाला भरपूर वेळ मिळू लागला. पुढे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मुलांना टीव्ही घ्यायचा का हे विचारलं तर ‘वेडा आहेस का?’ असंच उत्तर मिळालं.
मुलांचे खेळ हा तर एक मोठ्ठा विषय आहे. मुलांना मैदानी खेळ खूपच आवडतात. सोसायटीच्या आवारात त्यांचे क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खोखो, लंगडी, स्केटिंग, बॅडमिंटन, डबा ऐसपैस असे कितीतरी मौसमी आणि गैरमौसमी खेळ चालू असायचे. पण तरीही त्यांना घरी येऊन परत आमच्याबरोबर खेळायचंच असायचं. आम्हीही ही संधी शक्यतो सोडली नाही. आम्ही मुलांशी खेळत असल्यामुळे मुलांची मित्रमंडळीही आमच्यावर बेहद्द खुश असायची. मुलं मोठी होत गेली आणि खेळायला घर अपुरं पडायला लागलं. मोठं घर घेणं शक्य नसल्यामुळे आहे त्या घरालाच मोठं करायचं असं ठरलं. हॉलमधला सोफा, खुर्च्या, शोकेस असं एक-एक कमी होत गेलं. आमची एक मैत्रीण तर प्रत्येक भेटीत आता घरातलं आणखी काय काढलं हा प्रश्न हमखास विचारायची. फर्निचर निघालं आणि हॉलचं रुपांतर एका छोट्याशा मैदानात झालं. मग काय, क्रिकेट, कबड्डी, लंगडी, पायमारी, आंधळी कोशिंबीर, शिवाजी म्हणतो असे खेळ आणखी जोशात व्हायला लागले. उत्साह, गोंगाट, आरडाओरडा एकदम चरमसीमेला जाऊन पोहोचला. शेजारच्यांना आणि मुख्य म्हणजे खालच्या मजल्यावरच्यांना त्रास होऊ नये ह्याची आम्ही काळजी घ्यायचो, पण “खूप छान वाटतं तुमच्या घरातून असे आवाज ऐकू आले की. तुमचं घर एकदम जिवंत आहे.” असं प्रशस्तीपत्र मिळालं आणि आमचा हुरूप आणखी वाढला.
रात्री झोपायला गाद्या घातल्या की झोप यायच्या ऐवजी खेळण्यासाठी जणू मॅट घातली आहे अशा समजुतीने मुलं रंगात यायची. चादरी अंगावर घेऊन वेगवेगळे खेळ व्हायचे. कोलांट्या उड्या व्हायच्या, कुस्त्या व्हायच्या. कुस्तीत कोणाची तरी रडारड होऊन सगळे चिडीचूप व्हायचे आणि गपगार झोपी जायचे. असंच एकदा रात्री काळोख केल्यावर शॅडो पपेट करायची टूम निघाली आणि तिने तर आम्हाला वेडच लावलं. मिट्ट काळोख करून बॅटरीच्या उजेडात मुलं – विशेषतः अर्णव खूप छान शॅडो पपेट करायचा. मुलांनी त्यावर संवाद लिहिले, नाटकं केली. पुढे पुढे तर कधी एकदा रात्र होतेय असं आम्हाला होऊन जायचं. उन्हाळ्यात रात्री आम्ही टेरेसमध्ये आकाशाखाली झोपतो. एखाद्या दिवशी मस्त गार वारं अंगावर घेत खूप उशिरापर्यंत कविता म्हणतो. सानियाला अगदी लहानपणापासून खूप कविता तोंडपाठ आहेत. रात्री दर थोड्या वेळाने बदलत जाणाऱ्या आकाशातले लखलखीत ग्रह तारे आपापसांत वाटून घेत आम्ही आमची श्रीमंती वाढवत जातो.
खेळाबरोबरच चवीचं खाणं हा आमचा सगळ्यांचा वीक-पॉईंट. आपल्या चवीचं खाणं आपल्याला दुसरं कोण कसं करून देऊ शकणार? स्वयंपाकघरात लुडबूड करण्याची मला लग्न व्हायच्या आधीपासूनच सवय होती. लग्नानंतरही ह्या सवयीचा मी तृप्तीबरोबर राहण्यासाठी भरपूर उपयोग करून घेतला. मुलं झाली आणि लवकरच बालकामगार म्हणून हाताशी आली. आमचा स्वयंपाक चालू असताना सानिया तिथेच ताट वाटीशी खेळत रहायची. निवडायला घेतलेले तांदूळ उडव, धान्य एकत्र कर, अशी महत्त्वाची कामं ती करत रहायची. तिचा स्वतःचा छोटासा पोळपाट होता. त्यावर छोट्या छोट्या चंद्र चांदण्या, वेगवेगळे पक्षी, फुलं-पानांच्या आकाराच्या चपात्या व्हायच्या आणि लगेच तव्यावर भाजून त्या गरमागरम खाल्ल्या जायच्या.
मुलांना सुरी, कात्री, खलबत्ता, गॅस, अशा शस्त्रांची आम्ही कधीच भीती घातली नाही. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि त्यांनीही मुद्दाम होऊन कोणतीही वेडीवाकडी गोष्ट केली नाही. मोठ्यांनाही होऊ शकतात अशा दुखापती सोडल्या तर बाकी कोणतेही अघटीत आमच्या घरी घडले नाही. पूर्ण स्वातंत्र्य दिल्यामुळेच वयाच्या चौथ्या वर्षी लिंबू स्वतः कापून घेऊन अर्णव सरबत करायला लागला आणि मस्त पापड भाजूनही घ्यायला लागला. मुलांना गॅसच्या आजूबाजूसही फिरकू न देणारी मित्रमंडळी असतांना सानिया चौथी पाचवीतच छान गोल गरगरीत व टम्म फुगणाऱ्या चपात्या करू लागली. दुसरी तिसरीतच अर्णव तीस चाळीस चपात्या सहज भाजायला लागला. आम्ही ऑफिसमधून आल्याआल्या अर्णवकडून गरमागरम चहा मिळायला लागला. आज मुलं मोठी झाल्यावर त्यांच्यामुळे पूर्वी कधीच न खाल्लेले अनेक देश विदेशी पदार्थ खायला मिळतायत.
अर्णवला सतत कसलं ना कसलं तरी दुकान काढायचं असायचं. घरून चहा, कॉफी, पोहे, शिरा, उपमा असं काहीतरी घेऊन सानिया आणि त्याने सलग दहा दिवस आमच्या सोसायटीच्या जवळच दुकान थाटलं होतं. एकदा दिवाळीत त्याने आणि मित्राने आकाशकंदील बनवून सोसायटीत विकले होते. दिवाळीत जवळच्या कुंभारवाड्यातून पाचशे पणत्या आणून त्या रंगवून तळजाईला तसेच घरोघर जाऊन पणत्या विकल्या. या सगळ्या धंद्यांचा हिशोबही अगदी काटेकोरपणे केला जायचा. पणत्या विकून आलेला फायदा त्यांनी एका स्वयंसेवी संस्थेला दिला होता. त्यानंतर दोन तीन वर्षं दिवाळीला लोक फोन करून पणत्या मागायचे. ह्या सगळ्या दिवसांत घर चैतन्याने भरून जायचं. सगळ्यांची लगबग लगबग चालायची. खाण्यापिण्याचीही शुद्ध राहायची नाही. त्यात कामगार म्हणून कधी मधी आम्हालाही भूमिका मिळायची. मात्र हिशोबात आमचा पगार मात्र कधी धरला गेला नाही.
गप्पा. अखंड आणि कुठूनही कुठेही पोचणाऱ्या गप्पा हे आमच्या घराचं आणखी एक वैशिष्ट्य. यात ट्रम्पने काय करायला हवं होतं, धोनीने निवृत्ती घ्यावी का यापासून यावर्षी सुट्टीत कुठे फिरायला जायचं इथपर्यंत कुठलाही विषय वर्ज्य नसतो. काही काळ दर आठवड्याला घरात मिटिंग आयोजित केली जायची. या मिटिंगमध्ये भरपूर वाद विवाद, चर्चा होऊन घरासंबंधीचे महत्त्वाचे निर्णय घेतले जायचे. मुलांची आई खूप छान गोष्ट सांगत असल्यामुळे मुलांनी मला गोष्ट मात्र कधी सांगू दिली नाही. मित्रमंडळींसोबतची गप्पाष्टकं, अड्डे यात आमच्यासोबत मुलंही रमायची. घरातल्या आम्हा चौघांनाही वाचनाचं व्यसन आहे. वाचलेल्या पुस्तकावर बोलायला, लेखकाच्या मुद्द्यांवर आपलं मत द्यायला, समोरच्याचं मत खोडून काढायला प्रत्येकजण नेहमीच तयार असतो. गप्पा, पत्ते यामध्ये रंगून गेल्यामुळे बस, ट्रेन, विमान चुकता चुकता राहिल्याचे अनेक किस्से आमच्या खात्यावर जमा आहेत. हे असे किस्से आठवत आम्ही अजूनही हसत असतो. मुलं वर्तमानात जगतात आणि सतत आपल्यालाही वर्तमानात आणतात. अनेक चढ-उतारात मुलांबरोबरच्या गप्पांनी मला आधार दिला आहे.
मुलं लहान असण्याचा आणि करिअरमध्ये काहीतरी करून दाखवण्याचा काळ बहुतेकदा एकच असतो. दोन्ही क्षेत्रं आपला भरपूर वेळ मागतात. बरेचदा मुलं आईकडे सोपवून बाबा मंडळी करिअर, पैसा, प्रतिष्ठा यांना प्राधान्य देतात. त्यांना तसं करावंच लागतं. न करणाऱ्या बाबाला बरेचदा उपहासाला, कुचेष्टेला सामोरं जावं लागतं. आपला समाज पुरुषाला केवळ अधून-मधूनच बाबा होऊ देतो. ह्या बाबाची आर्थिक- सामाजिक भार उचलणारा, रक्षण करणारा ही प्रतिमा समाजाला आणि अनेक घरांना जास्त आवडते. मुलांना कुणाचा तरी धाक हवाच हे पिढ्यानपिढ्याचं गृहितक त्यांना बागुलबुवा बनायला लावतं. बरेच बाबा मुलांना वेळ देता येत नाही याची बोच महागड्या वस्तू घेऊन भरून काढण्याचा प्रयत्न करतात. मुलांना आर्थिक निर्णय घेताना ‘जा बाबाला विचार’ असं म्हणण्याची अनेक घरांची पद्धत असते. काही घरात तर आईला, मुलं आणि बाबाच्या मधला दुवा बनायला लागतं. अशा बागुलबुवा, एटीएम मशीन किंवा त्रयस्थ बाबांची मला काळजी वाटते. मुलं मोठी व्हायला लागली की ही बागुलबुवाची प्रतिमा त्यांच्यात अंतर निर्माण करू लागते. घरांशी समरस नसलेले बाबा काही वर्षांनी अगदी केविलवाणे होऊन जातात. न घर का न घाट का अशी त्यांची अवस्था होऊन जाते.
आज लॉकडाऊनच्या काळात सगळे सक्तीने घरात असताना अनेक घरं हादरून गेली आहेत. सैरभैर झाली आहेत. त्यामुळे गरजेपुरता संवाद करणाऱ्या घरातील धुसफूस वाढली आहे. एकाच छताखाली बसून प्रत्येकजण आपापल्या आभासी दुनियेत रमण्याचा प्रयत्न करत आहेत. एकमेकात सुसंवाद असणारी घरं मात्र एकत्र मिळालेल्या वेळेचा छान उपयोग करताना दिसत आहेत. मुलांच्या समजूतदारपणाचा, सकारात्मक उर्जेचा, संकटातून मार्ग काढण्याच्या क्षमतेचा अशा घरांना मोठा फायदा होत आहे. कुटुंब माणसाच्या जगण्याचा सगळ्यात मोठा आधार ठरतो आहे.
आई आणि मुलांमधील जैविक नातं आपल्या सांस्कृतिक, सामाजिक जडणघडणीमुळे अजूनही बऱ्यापैकी घट्ट आहे. बाबा आणि मुलांमधील नातं आणखी समृद्ध, आणखी जिवंत होण्यासाठी मात्र जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत.
आज अनेक तरुण बाबा मोठ्या उत्साहानी आपल्या मुलांबरोबर वेळ घालवताना दिसतात. मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टीत रस घेणारे, त्यांच्यासोबत खेळणारे, गोष्ट सांगणारे, रडणाऱ्या मुलांची समजूत घालणारे, त्यांची आजारपणं काढणारे अनेक बाबा दिसतात. त्यांना बाबा असण्यातली खरी मजा कळली आहे हे बघून खूप छान वाटतं. सगळ्याच बाबांना ती मजा कळावी ही शुभेच्छा!
Read More blogs on Parenting Here