लेखक :  ऋषिकेश दाभोळकर


मी अनेकदा विचार करतो, की मी बाबा आहे म्हणजे नक्की काय आहे? समाजाने ‘बाबा’ म्हणजे काय या भूमिकेसाठी एक साचा ठरवला आहे. मी त्यात बसतो का? बसणं आवश्यक तरी आहे का? मी आणि माझी लेक – आम्ही खूप वेळ एकत्र घालवतो, आमच्यात एक छान नातं आहे. पण ज्याला पारंपरिकरीत्या ‘वडिलकीचं’ नातं म्हणतात, तसं ते नातं आहे का? पालनपोषणातील पालनाचा विचार केला, तर पालक म्हणून तिच्या निवाऱ्याचा आणि सुरक्षिततेचा जिम्मा आमचा आहे – तरी त्यातील सुरक्षिततेचा मोठा वाटा ‘बाबा’ म्हणून फक्त माझ्याचकडे आहे का? याच्याउलट पोषणकर्ते म्हणून असणाऱ्या पालकांच्या जबाबदारीत तिच्या आईचा रांधण्यातील वाटा माझ्यापेक्षा मोठा आहे का? याची काही स्टँडर्ड किंवा अचूक उत्तरं असतील तर मला माहीत नाहीत आणि त्याची फिकीरही मी करत नाही. माझ्यासाठी याची उत्तरं नकारार्थी आहेत. माझ्यासाठी मी बाबा आहे हे फक्त मी पुरुष असल्यामुळे मला दिलेलं ‘संबोधननाम’ आहे, ते माझं विशेषण नाही आणि माझी ‘भूमिका’ तर अजिब्बात नाही!

“मुलांची ‘जबाबदारी’ आईच निभावते अनेकदा आणि बाबांचा सहभाग कमीच असतो.” वगैरे वाक्यं आता जाहीरपणे ऐकू येणं कमी झालेलं दिसतं, पण प्रत्यक्ष आचार बघितला तर अनेक घरी अजूनही मुलांच्या विश्वात आईचा सहभाग अधिक असतो हे मान्य करावं लागेल. आमच्या बाबतीत बोलायचं, तर तिची जितकी जबाबदारी माझ्यावर आहे, तितकीच ती माझ्या बायकोवर आहे. पण हे आमचं तिचे आई-बाबा असणं म्हणजे ठरावीक भूमिकांमध्ये स्वत:ला बांधून घेणं असतं का? आमच्यापुरतं याचं उत्तर ‘नाही’ असं देता येईल.

माझा पालक म्हणून लेकीच्या विश्वात काय सहभाग असतो? याचं मोठ्ठं उत्तर आहे – टाईमपास करण्यात. मी आणि लेक मिळून, तर अनेकदा आम्ही तिघेही मिळून, अशक्य टाईमपास करतो. टाईमपास करणे, निरुद्देश कुचाळक्या करणे या उद्योगाला आमच्या दैनंदिन कार्यक्रमात सर्वोच्च स्थान आहे. या ‘टाईमपास’मध्ये मोठमोठ्याने बेंबीच्या देठापासून ओरडत गाणी म्हणणे असो, उडत्या चालीची गाणी लावून बेफाम नाचणे असो, आरशासमोर उभे राहून किंवा मोबाईलचा फ्रंट कॅमेरा सुरू करून आचकट-विचकट चेहरे करणे असो, घरातील एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात गडगडत लोळणे असो किंवा एकमेकांची मस्करी करणे असो किंवा उगाच फालतू विनोद करून ठो-ठो हसणे असो – अशा असंख्य गोष्टी आम्ही तिघेही सतत करत असतो. एक आणखी गोष्ट म्हणजे मी आणि लेक मिळून खूप सिनेमे बघतो, कार्टून्स बघतो आणि पुस्तकंही वाचतो. त्यामुळे फावल्या गप्पा मारायला आमच्याकडे सततच खूप विषय असतात. इतकं मी नक्की सांगू शकतो, की आमच्या नात्याची बैठक म्हणा, निकोप नात्याचा मूलाधार म्हणा, ही निरुद्देश भंकसच आहे!

पालक म्हणून आम्ही लेकीला काय ‘देतो’ किंवा ‘क्वालिटी टाईम’ कसा घालवतो याचं माझ्याकडे फार देदिप्यमान उत्तर नाहीच्चे. किंबहुना वेगवेगळ्या कला, साहित्य, संस्कार वगैरे करण्याची जबाबदारी पालक म्हणून आम्ही स्वत:वर लादून घेतलेली नाहीये, कारण या सगळ्या गोष्टी अशा ‘शिकवून’ मुलांना देता येतात यावर आमचा विश्वास नाही. कला, साहित्य वगैरेंच्या मागे लागण्यापेक्षा मी मुलीला वेगवेगळे अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. मग तो स्वयंपाक रांधण्याचा असेल, घरातली भिंत रंगवण्याचा असेल, रस्ते झाडण्याचा असेल, नाहीतर धो-धो पावसात चिंब भिजण्याचा असेल. अनुभव आणि जाणीवा यांनी ती जितकी समृद्ध होत जाईल, तितकी तिच्यात असणारी एखादी कला आपोआप अंकुरेल आणि त्यातून काहीतरी सर्जनशील कलाकृती जन्माला येईल याची आम्हांला खात्री आहे. ते आपोआप होईपर्यंत मी पालक म्हणून आनंदात एकत्र वेळ घालवणं तेवढं नेमाने करत आलोय. साहित्य म्हणाल तर गोष्टींची खूप पुस्तकं घरी आणलेली आहेत, तिच्या हाताला सहज लागतील अशी ठेवलेली आहेत, पण “वाच गं घुमा” म्हणून एका अक्षराने तिच्या मागे लागत नाही. तिला वाचता यायला लागल्यानंतरही आठवड्यातून किमान २/३ वेळा तिला गोष्टी सांगतो आणि तिने वाचलेल्या गोष्टींबद्दल आवर्जून गप्पा मारतो. ही पुस्तकं वेगवेगळ्या लेखकांची आहेत, भारतीय आहेत, अनुवादीत आहेत. त्याचबरोबर आंतरजालावर प्रकाशित होणाऱ्या कथाही वाचून दाखवत असतो. शक्यतो संस्कारकथा, पंचतंत्र आदी प्रकार पूर्णपणे टाळतो. तिच्यासाठी वाचन ही कृतीसुद्धा आई-बाबांसोबत करण्याचा ‘टाईमपास’च आहे हे मात्र आवर्जून सांगेन.

आणखी एक जबाबदारी पालक म्हणून आमच्यावर समाज टाकतो (टाकू पाहतो), ती म्हणजे मुलांवर ‘संस्कार’ करण्याची. मुळात संस्कार करणे म्हणजे चाळीला रंगाचा लेप चढवण्यासारखे काही असते आणि ते तसे करणे शक्य असते यावरही आमचा पालक म्हणून विश्वास नाही. आम्ही वेगवेगळ्या प्रसंगी जसे वागतो, आमच्याव्यतिरिक्त समाजातील इतर लोक त्याच किंवा तशाच प्रसंगी जसे वागतात, त्या सगळ्याची एकत्रित नोंद मुलांचा मेंदू करत असतो. या अनुभवांतून आपापल्या वकुबानुसार मूल वेगवेगळ्या प्रसंगी बरेवाईट वागू लागते. त्यालाच आपण संस्कार म्हणतो. तेव्हा मुलांसमोर आपले भलेबुरे विचार प्रामाणिकपणे मांडणे इतकं काम मात्र मी आवर्जून करत असतो. मला वाटणाऱ्या चिंता, भित्या, काळज्या, राग, किळस, आनंद याचबरोबर माझं काही वेळा विक्षिप्त वागणं, प्रसंगी थापा मारणं न लपवता लेकीशी डिस्कस करतो. ती लगेच माझं अनुकरण करेल आणि तसं वागेल असं मला अजिबात वाटत नाही. असं कुणाचं बघून मुलं लगेच तसं वागतात वगैरेंवर माझा पूर्ण विश्वास नाही. तसं ते वागून बघण्यापूर्वी त्यातील धोके कळले तर ते अजिबात तसं वागत नाहीत. आपल्या अनुभवातून मूल शहाणं व्हायला हवं असेल, तर ते अनुभव मुलांसोबत मनसोक्त शेअर करणं आम्हांला योग्य वाटतं.

आणखी एक गोष्ट मी करतो, ती म्हणजे लेकीला किंवा बायकोला दिलेला शब्द विनाकारण मोडत नाही आणि जे शक्य नाही त्याचं वचनच शक्यतो देत नाही. जे शक्य नाही ते जमणार नाही असं स्पष्टपणे सांगतो. माझ्या लेकीला आपल्याला अर्थिकदृष्ट्या काय परवडतं इथपासून आईबाबाला आपला पैसा कुठे खर्चायला आवडत नाही याची नेमकी माहिती आहे. महिन्याचा खर्च, आगामी योजना यांत लेकीचा सहभाग धरला जातो. तिच्या काही मागण्यांसाठी पैसे वेगळे काढले जाताहेत याचीही तिला कल्पना असते.

सर्वांत शेवटी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे व्यक्ती म्हणून माझ्या आणि जोडगोळी म्हणून आम्हां नवरा-बायकोंच्या स्वत:च्या अशा काही गरजा, आवडी, छंद आहेत आणि त्यासाठी माझ्या एकट्याचा तसंच आम्हां नवरा-बायकोंचा असा वेळ मला/आम्हांला आवश्यक आहे हे मी स्वत:ही विसरत नाही आणि लेकीलाही विसरू देत नाही. अशा प्रसंगी लेकीला स्पष्टपणे तशी कल्पना देतो.

इतकं वाचून तुम्ही म्हणाल, की या सगळ्याचा आणि बाबा म्हणून लेकीशी वागण्याचा संबंध काय? किंवा मग तू बाबा म्हणून लेकीसाठी काय करतोस? किंबहुना व्यक्ती म्हणून मी वेगळा असलो तरी ‘बाबा’ म्हणून आईपेक्षा वेगळी अशी माझी काही भूमिका आणि जबाबदारी आहे अशी जाणीव निर्माण होणार नाही, असं आम्ही दोघेही वागतो इतकंच उत्तर देता येईल.

हे जे आम्ही वागतो ते अनेकजण वागत असतीलही, पण ही पद्धत अजून सर्वसामान्य म्हटली जावी इतक्या प्रमाणात समाजात दिसत नाही. जेव्हा आम्हांला मूल झालं, तेव्हा अर्थातच या पारंपरिक भूमिकांचा आणि त्याआधारे केलेल्या अपेक्षांना आम्ही पहिल्यांदा सामोरे गेलो. पण लवकरच आम्हांला जाणवलं, की या लिंगसापेक्ष भूमिका निभावताना दोघांचीही कायच्या काय दमणूक होते आहे. लेक लहान असताना, इतर मुलांच्या आयांना बाबाने मूल खेळवायला घेऊन येणं सरावाचं नाही, म्हणून आईनेच लेकीला सोसायटीत खाली खेळायला घेऊन जाणं असो; किंवा फक्त मी बाबा आहे म्हणून, ड्रायविंग आवडत नसतानाही, गाडीतून लांब फिरायला नेणे असो… अश्या अनेक लहान-लहान बाबींचा आम्हांला जाचच होऊ लागला. आई आणि बाबाचा स्वभाव आणि ह्या पारंपरिक भूमिका यांत काही मेळ असेल तर त्याचा त्रास होत नसेलही, पण आमच्या बाबतीत आमचे दोघांचेही स्वभाव ‘आई’किंवा ‘बाबा’ या शब्दांबरोबर जे काही साचेबद्ध गुणविशेष येतात त्यांना साजेसे नव्हते – नाहीत. लेकीला भरवणं, तिच्या आजारपणासाठी रजा काढणं, तिची शी-शू काढणं, तिचे केस विंचरणं या सगळ्यांसाठी समाजाकडून आईचा पुकारा होणं त्रासदायक होतं खरं, पण आम्ही त्या पुकाऱ्याला आवश्यकतेनुसार फाट्यावर मारून जिला वेळ आहे ती व्यक्ती ही कामं उरकत असे. पण, आई ममताळू, मायाळू मुलांसाठी झुरणारी आणि झुकणारी, तर बाबा हा कसा ‘कडक’,‘शेवटचा शब्द’, धाकात ठेवणारा, पाहुणे आले की स्वयंपाकघरात न जाता त्यांच्याशी गप्पा मारणारा हवा वगैरे अपेक्षा समाजाकडून लादल्या जाऊ लागल्या, नि मग मात्र त्या पारंपरिक ‘आईबाबा’पणाची वस्त्रे फेडण्याव्यतिरिक्त आमच्याकडे पर्यायच राहिला नाही. ही आचारपद्धती फार सोपी नसली तरी वाटते तितकी कठीण नाही. अर्थातच कुटुंबकबिले हा त्यातला सगळ्यांत मोठा अडसर. पण, जेव्हा आमच्यावर पांपरिक भूमिकांनुसार काही गोष्टी करण्याचा दबाव येऊ लागतो, तेव्हा आम्ही चक्क पारंपरिक पुरुषप्रधानतेचा सहारा घेऊन ‘मला’ (पक्षी : पुरुषाला) ती कृती चालत नाही असं बिनधास्त ठोकून देऊन कित्येक गोष्टींचं बंधन झुगारतो. मजा म्हणजे, हे कारण मात्र समाजाला चालतं!

हे पण जाणून घेऊया- दिवाळीची गोष्ट आणि दिवाळी सणाची माहिती

आधी म्हटलं तसं ‘संस्कार’ करण्याची जबाबदारी पालकांचीही आहे असं म्हणतोच ना आपण? तर कोणी काय करावं, कसं जगावं याबाबतच्या समाजाने लादलेल्या लिंगभावात्मक चौकटी मानण्याचं हे बंधन झुगारण्याचे संस्कार आम्ही मुलीवर करू पाहतो आहोत, इतकं म्हणता यावं.

Read More blogs on Parenting Here