लेखक :  डॉ. आर्या जोशी


गणपती ही सर्वांची लाडकी देवता आहे. आपल्या लहानपणातही आपण उत्साहाने घरातला गणेशोत्सव साजरा केला आहे. आता मोठे झाल्यावरही आपल्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही पिढ्यांना सोबत घेऊन आपण हा उत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करतो.

ब्रह्मणस्पती ही वैदिक देवता आहे. ऋग्वेद या ग्रंथात ब्रह्मणस्पती नावाची देवता आणि तिचे सूक्त आहे. ही वाणीची देवता मानली गेली आहे. ब्रह्मणस्पती ही देवता सेनानायक म्हणूनही ओळखली जाते. तो सर्व गणांचा अधिपती म्हणजे प्रमुख आहे. याच ब्रह्मणस्पतीला पुराणकाळात ” गणपती” हे नाव मिळाले. मुद्गल पुराण, गणेश पुराण अशा विविध पुराणांनी गणपती या देवतेचे वर्णन केले आहे. स्तुती केली आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाची ठरणारी प्राचीन मंदिरेही गणपतीच्या विविध रूपांमधील शिल्पांनी सजलेली आपल्याला दिसतात. कोणत्याही पूजेमध्ये गणपतीला प्रथम पूजेचा मान दिला जातो. गणपती ही ज्ञानाची, विद्येची, कलेची देवता आहे. त्याचजोडीने संकटे दूर करणारा म्हणूनही गणपती सर्वदूर प्रसिद्ध आहे.

अशा या गणपतीची पूजा आपण गणेशोत्सवात करतो.

ही पूजा म्हणजे मूळ “पार्थिव गणेश व्रत” आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे एक महिन्याचे हे गाणपत्य संप्रदायाचे व्रत आहे हे आपल्याला माहिती नसते. महिनाभर रोज नदीवर जाऊन अंघोळ करायची आणि नदीतल्या मातीचा आपल्या हाताच्या अंगठ्याएवढा गणपती तयार करायचा. त्याची पूजा करायची आणि लगेच नदीत विसर्जन करायचा असं पूर्ण महिनाभर करायचं. रोज नाही जमलं तर व्रताच्या शेवटच्या दिवशी तरी करावं असं काळाच्या ओघात घडत गेलं. त्यामुळे गाणपत्यांचं हे व्रत हळूहळू सर्वांनी स्विकारलं आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला आपण गणेशाची प्राणप्रतिष्ठा करतो.

राष्ट्रीय एकात्मतेसाठी आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी लोकमान्य टिळकांनी या व्रताला सार्वजनिक उत्सवाचं स्वरूप दिलं आणि समाज एकत्र केला.

गणपतीच्या पूजेमध्ये वापरली जाणारी २१प्रकारची पाने ही सुद्धा औषधी वनस्पतींचीच असतात. या ऋतूत या वनस्पती आजूबाजूला सहज उपलब्ध असतात. त्यामुळे त्या देवाला अर्पण करण्याची पद्धती रूढ असल्याचे दिसते. जाणत्या लोकांना या वनस्पतीच्या औषधी गुणधर्माचीही माहिती असते.

गणपती ही संघटनेची देवता आहे. जसे समाजाचे संघटन व्हायला हवे तसेच कुटुंबातही व्हायला हवे. यावर्षी घराबाहेर पडून गर्दी करून गोष्टी विकत आणण्यापेक्षा आपण घरातच काही संधी घेतली तर? कुटुंबाचेही संघटन आणि सर्वांचाच हातभार उत्सवाला लागेल.

गणेशोत्सव हा यावर्षी अधिक आनंददायी करण्यासाठी आपण पालक म्हणून काय करू शकतो? मुलंही सध्या कंटाळली आहेत आणि उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या कौशल्यालाही वाव देता येईल.

१.गणपतीची मूर्ती विकत आणण्यापेक्षा छोटी गणेशमूर्ती घरी करून पाहता येईल.
२.गणपतीसाठी आवश्यक ती सजावट विकत आणण्यापेक्षा घरातील उपलब्ध साहित्यातच मुले आणि पालक मिळून सजावटीची तयारी घरातच करू शकतील. यासाठी काय Theme निवडायची याबद्दल मुलांना विचार करायची संधी देऊया. त्यांच्याशी बोलून संकल्पनेवर आधारित काही लिखाणही करता येऊ शकेल.
३.गणपतीच्या काळात गोड पदार्थ आवर्जून केले जातात.असे सोपे पदार्थ मुलांच्या सहभागातूनही करता येतील का? असा विचार करावा. ४.गणपतीच्या पूजेत वहायच्या पत्री विकत आणण्यापेक्षा आपल्या सोसायटीच्या आवारातच अशी काही झाडे आहेत का याचा शोध घेता येईल. ५.गणपतीच्या पूजेची तयारी ही पण एक छान गोष्ट असते. मुलांना जर विश्वासात घेऊन काही गोष्टी काळजीपूर्वक हाताळायला दिल्या तर मुले या तयारीतही आनंदाने सहभागी होतील.
६.घरी पाहुणा म्हणून आलेल्या देवाचे रंजन करण्याची पद्धतीही प्रचलित आहे. त्यामुळेच आपण आपल्या सोसायटीतही विविध गुणदर्शन कार्यक्रमात गणेशोत्सवात सहभागी होतो. यावर्षी तसे करता येणार नसले तरी आपल्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या लाडक्या बाप्पाचे मनोरंजन करण्यासाठी आपण घरातल्या घरातच असे कार्यक्रम बसवू शकतो. पालक आणि मुले मिळून अशी छान गंमत करता येऊ शकेल.
७.गणेशोत्सवाच्या काळात गणपतीसाठी प्रसिद्ध जगभरातील स्थाने, मंदिरे, कथा, रंजक माहिती अशी विविध माध्यमांवरून एकत्र करून त्याचा छान संग्रह मुले करू शकतील.

यावर्षीचा गणेशोत्सव कलेने, कौशल्याने आणि ज्ञानाने पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करूया का? ज्या देवतेची पूजा करायची, उत्सव करायचा त्याला आपली अशी कृतीशील पूजा मनोभावे अर्पण करूयात का?

तुम्ही काय केले ते आम्हालाही नक्की कळवा बरं का…

Read More blogs on Parenting Here