Women's day म्हणजे काय गं आई?
- जुई चितळे
छोटी मीरा धावत आली आणि आईच्या ओढणीचं टोक ओढून तिला खाली वाकायला सांगू लागली. आईने विचारलं, "काय झालं मीरा?"
मीराने आईच्या कानात हळूच विचारलं, "कशी दिसतीये मी?"
आई म्हणाली, "गोड .. माझी बाहुलीच आहेस तू छोटीशी! नेहेमीच गोड दिसतेस."
मीराने आश्चर्याने विचारलं, "पण मोठी दिसत नाहीये का?"
आई म्हणाली, "मोठी? छे ... पाच वर्षांचीच आहेस की अजून. असं का विचारते आहेस?"
मीरा म्हणाली, "अगं, ते शेजारचे काका मला happy Women's day म्हणाले. म्हणून मला वाटलं मी आता मोठी दिसायला लागले की काय? मी गर्ल आहे तर मग ते मला वूमन का म्हणाले?"
आई हसली आणि म्हणाली, "अगं तू आत्ता छोटीच आहेस पण मोठेपणी तू वूमन म्हणजे बाई होशील ना? तुझ्यात एक छोटी बाई दडून बसलीच आहे आत्तापासून. त्यामुळे तुला त्यांनी वूमन्स डे म्हणजे महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या."
मीराने लगेच विचारलं, "Women's day म्हणजे काय गं आई?"
आईने मीराला मांडीत घेतलं आणि म्हणाली, "याची मोठी गोष्टच सांगावी लागेल तुला. ये बस माझ्या मांडीत. हे बघ, तू कशी शाळेत जातेस, ग्राऊण्डवर खेळायला जातेस. मी रोज गाडी चालवत ऑफिसला जाते. आज्जीसुद्धा शाळेत शिकवायला जायची हो की नाही? पण खूप पूर्वीच्या काळी असं काहीही मुलींना आणि बायकांना करायला परवानगीच नव्हती, तशी पद्धतच नव्हती. मुलगे शिकायचे, काम करायला बाहेर पडायचे आणि मुलींना घरात थांबावं लागायचं."
मीराने डोळे मोठे मोठे करत विचारलं, "शाळेत जायचं नाही, खेळायला जायचं नाही तर मग काय करायच्या त्या मुली? आणि त्यांचे भाऊ जात असतील शाळेत तर मुलींना किती राग येत असेल ना?!"
आई म्हणाली, "हो मग, येतच असणार. काही काही देशांमध्ये बायकांना काम करू द्यायचे पण त्यांना पगार कमी द्यायचे. बायका माणसांच्या बरोबरीने काम करू शकतात ह्यावर विश्वास नव्हता बरेच जणांना. मुली आणि बायका हिंमतवान, हुशार असू शकतात, चिकाटीने काम करू शकतात, नवीन काही शिकून मोठ्या जबाबदाऱ्या घेऊ शकतात याची सगळ्यांना जाणीव करून द्यायला सुरुवात झाली. पण खूप जुन्या किंवा खूप जास्त लोक पाळतात अशा पद्धती मोडायला कठीण असतात. खूप प्रयत्न करावे लागतात आणि ते एकाने करून पुरत नाहीत. हळूहळू ठिकठिकाणच्या लोकांनी म्हणजे बायका आणि पुरुषांनीसुद्धा यासाठी प्रयत्न सुरु केले आणि हा विचार सगळीकडे पसरवण्यासाठी महिला दिन साजरा करणे यासारखी नवीन पद्धत चालू झाली."
मीराने विचारलं, "आई, पण हे पूर्वी झालं ना? मग आता अजूनही का साजरा करायचा महिला दिन?"
आई म्हणाली, "कारण अजूनही खूप ठिकाणी मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक केला जातो, अजूनही बऱ्याच ठिकाणी बायकांना बरोबरीची वागणूक दिली जात नाही. काही देशांमध्ये पुन्हा एकदा मुलींच्या शिक्षणावर बंदी आली आहे. बरेचदा घरात आई आणि बाबा यांची कामं वेगवेगळी पण तितकीच महत्त्वाची असतात पण त्यांना सारखाच मान किंवा महत्त्व दिलं जात नाही. आपण प्रत्येक जण माणूस आहोत, महत्त्वाचे आहोत. केवळ मुलगी आहे म्हणून मी काही कमी नाही आणि त्याचं दुसरं टोक गाठून मुलगी आहे म्हणून मीच भारी आहे असंही म्हणणं नाहीये. आपण सगळ्यांना सारखीच वागणूक देऊन, एकमेकांची काळजी घेऊ, शिकण्याची संधी देऊ, काम करण्यासाठी प्रोत्साहन देऊ असं सांगण्यासाठी सगळीकडे जागतिक महिला दिन (jagtik mahila din) आजही साजरा होतो."
मीरा एकदम कडक चेहरा करून निश्चयाने म्हणाली, "मुली आणि बायका पण कठीण कामं करू शकतात हे माहितीये मला. चिकूपिकूमध्ये नाही का त्या कॅप्टन शिवाची गोष्ट होती, जी अतिशय थंडीत आणि बर्फातसुद्धा धाडसाने काम करत होती. किंवा त्या मंगलयानच्या लीडर होत्या सायंटिस्ट रितू, हात नसलेली शीतल देवी तर पायाने आर्चरी करते आणि तिने मेडलसुद्धा मिळवली."
मीराला या गोष्टी लक्षात आहेत आणि योग्य वेळी तिला त्या आठवल्या हे बघून आईला कौतुक वाटलं. ती म्हणाली, "छोट्या मुली पण भारी असतात. शिवांगीसारख्या छोट्या मुलीने तिच्या आईचा आणि बहिणीचा जीव कसा वाचवला हीपण गोष्ट तू वाचलीस ना चिकूपिकूमध्ये? तूसुद्धा माझी एक गोड पण शूर अशी चिंगीच आहेस. मग सांग बरं आपण कसा साजरा करू या हा वूमन्स डे?"
मीरा उत्साहाने म्हणाली, "एक तर तू मला आणखी अशाच भारी काम केलेल्या मुलींच्या गोष्टी सांग. मग मी तुझ्यासाठी, शाळेतल्या आमच्या टिचरसाठी, आज्जीसाठी आणि कामवाल्या मावशींसाठी पण छोटी छोटी ग्रीटिंग्स करेन. आणि आपण सगळे सारखे आहोत आणि आपण सगळे महत्त्वाचे आहोत हे नेहेमी लक्षात ठेवेन."
आईने मीराला घट्ट जवळ घेतलं. दुसऱ्या खोलीत काम करत बसलेले मीराचे बाबा हे सगळं ऐकत होते. त्यांनीही डोळे मिटून मनात काहीतरी ठरवलं आणि त्यांच्या या आवडत्या लहान आणि मोठ्या women साठी काहीतरी खास प्लॅन करायला घेतला.
Read More blogs on Parenting Here