लेखक :  आभा भागवत


लॉकडाऊनचा काळ हे नेमकं काय प्रकारचं संकट आहे आणि काय प्रकारची संधी आहे हे लक्षात येईपर्यंत काही महिने उलटूनही गेलेत आता. पालक आणि शिक्षक म्हणून मी गडबडून गोंधळून गेलेली असताना, माझी मुलं मात्र लॉकडाऊनच्या परिणामांकडे, ऑनलाईन शिक्षणाकडे आणि घरी मिळालेल्या भरपूर वेळाकडे फारच सहजपणे बघताहेत हे जाणवलं. कंटाळा हा शब्दच जणू त्यांच्या शब्दकोषात नाहिये.

धाकटा तुहिन ९ वर्षाचा आहे आणि मोठा ओजस १३. ओजसला शाळेतला अभ्यास आवडतो आणि तो ठरवलेल्या गोष्टी मनापासून, प्रामाणिकपणे पूर्ण करतो. तुहिन चांगलाच उनाड आहे, हे घरी बसल्यामुळे पक्कं कळलं. उनाड हा शब्द मला अजिबात निगेटिव्ह वाटत नाही. उत्स्फूर्त, प्रयोगशील, मोकळा, बिनधास्त म्हणजे उनाड. सगळ्यांना अशा उनाडक्या जमत नाहीत. मी स्वतः लहानपणी खूप उनाड होते, त्यामुळे त्यात काहीही चुकीचं नाही हे खात्रीने माहित आहे. उनाडक्यांना संवेदनशील आणि अर्थपूर्ण वळण मिळतं आहे ना याची समज मात्र संपूर्ण घरालाच असायला हवी.

घराजवळच्या टेकडीवर लॉकडाऊनच्या ३ महिन्यानंतर जेव्हा जाऊ शकलो, तेव्हा तुहिनला पांढऱ्या सावरीची बरीच बोंडं सापडली. ती गोळा करून घरी आणली, फोडून बघितली. त्यात खूप मऊ मऊ कापूस होता आणि कापसात अडकलेल्या शेकडो बिया. बिया वेगळ्या करून एका बाटलीत भरल्या आणि कापूस एका पिशवीत जमवला. हे चालू असताना कापसापासून धागे आणि त्यापासून कापड करता येतं या गप्पा झाल्या पण आपल्याला ते जमणार नसल्याने घरी काय करता येईल असा विचार तो करत असावा. त्याला सुई दोऱ्याने शिवता छान येतं आणि आवडतं. मधल्या काळात जुने कपडे फाडून छोट्या छोट्या भरपूर पिशव्या शिवून झाल्या होत्या त्याच्या. शिवणकाम मुलींनी करायचं आणि मुलग्यांनी नाही या विचाराचा स्पर्श त्याला झालेलाही नाही आणि होणारही नाही असं वाटतं. माझे वडील स्वतःच्या कपड्यांच्या दुरुस्त्या स्वतः करताना त्याने पाहिलं होतं. माझ्या आईची शिवाणाची पेटी म्हणजे तुहिनला खजिनाच वाटते. आम्हालाही कोणालाच शिवणकाम मुलींनीच करावं असं वाटत नाही आणि शाळेतही त्यांना सर्वांना शिवण शिकवतात. शिवणकामाचा जितका सराव जास्त होईल तितकी सफाई येत जाते. त्यामुळे मुलांना आपणहून काही सुचणं आणि त्यासाठी येणारी कौशल्य कुठे वापरायची याचे निर्णय मुलाने स्वतःने घेणं याचं मोल वेगळं आहे.

माझी एक जुनी ओढणी त्याने मागितली, कारण मांजर बसू शकेल अशी उशी त्या कापसाची बनवायची त्यानं ठरवलं. ओढणी निम्मी कापून दिली. त्याची घडी घालून चौकोन झाला, तो तीन बाजूंनी उघडा होता, त्यातल्या दोन बाजू त्याने शिवल्या आणि एक बाजू कापूस भरायला उघडी ठेवली. काही दिवस टेकडीवरून सावरीची बोंडं आणणं चालू होतं. कापूस काढणे, बिया बाजूला करणे, बिया मोजणे, बियांची जमिनीवर चित्र करणे आणि ओघाने भरपूर पसारा घालणे असं सगळं सुंदर नाट्य चालू होतं. एकदाची उशी तयार झाली आणि मांजर त्यावर बसलं. ती उशी फारच पिळपिळीत झाल्याने कधीकधी मांजराला पांघरूण म्हणूनही घालता येते. निसर्गातल्या कच्च्या सामानातून असं उपयुक्त काहीतरी लहान मुलाने तयार करणं हे आम्हाला सगळ्यांना विलक्षण वाटलं.

मुलांची एके ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, मुलाचं वय अधिक ५ इतकी मिनिटं असतं असं ऐकलं आहे. ९ + ५ म्हणजे १४ मिनिटं लक्ष केंद्रित करणं अपेक्षित असताना तुहिन त्याच्या आवडीच्या विषयात तासनतास, दिवसनदिवस रमतो. याचं कारण त्याला जे करायचं आहे त्याचा सन्मान आम्ही सर्वजण करतो आणि त्याचं नेमकं काय म्हणणं आहे पूर्णपणे समजून घेण्यासाठी त्याला अवकाश मिळतो. हा अवकाश घर जितका देऊ शकतं, तितका इतर कुठेही मिळणं शक्य नाही.

एरवी शाळेला जुंपलेल्या वेळापत्रकात मुलांना फारच कमी स्वतःचा वेळ मिळतो. ओजस पूर्वी म्हणत असे की ‘मी घरी काय करायचं हे शाळा का ठरवते?’ घरी मुलांना एकमेकांशी खेळायचं, भांडायचं असतं, सिनेमे पुन्हा पुन्हा बघायचे असतात, नुसतंच बसायचं असतं, मांजराशी खेळायचं असतं. या सर्व गोष्टींतून त्यांच्या भावनिक गरजा खूप चांगल्या पद्धतीने शमतात. काही चांगले सिनेमे मुलांना दाखवावे म्हणून टॉम हँक्सचा ‘कास्ट अवे’ घरी दाखवला. मुलं भारावून गेली. अनेक वेळा सिनेमा बघितला आणि अनेक प्रश्न पडले, गप्पा झाल्या. सगळं घरच त्यात काही दिवस बुडून गेलं होतं. सिनेमात चकला लागलेला अग्नी तयार करण्याचा शोध फारच विचार करायला लावणारा आहे. त्यात टॉम हँक्सचा अभिनय, मोजके शब्द, त्याची बॉडी लँग्वेज सगळं मुलं नीट समजून घेत होती आणि आत साठवत होती. अमेरिकन इंग्रजीशी ही त्यांची थोडी दोस्ती झाली त्या निमित्ताने. मल्टीडिसिप्लीनरी शिक्षणाचा जणू नमुनाच आम्ही अनुभवत होतो.

कुठे कुठे हिंडायला गेलेलं असताना आवडलेले दगड मुलांनी गोळा करून घरी ठेवलेत. त्यातले तीन चार दगड तुहिननी घेतले आणि एक चूल तयार केली. उदबत्तीने अनेक खेळ तो करतोच, आता मेणबत्तीने करायला लागला. छोटी मेणबत्ती पणतीमध्ये ठेवून चार दगडांच्या मध्ये ठेवली. पातळ वाट्या घेतल्या आणि त्या मावतील इतक्या अंतरावर दगड adjust केले. काडेपेटीने मेणबत्ती पेटवायला शिकला. एक दिवस माझं काम करून चहा करायला चार वाजता स्वयंपाक घरात गेले तर तुहिन म्हणाला, हा बघ मी चहा केलाय. आलं घालून, वाटीमध्ये मेणबत्तीच्या ज्योतीवर, दगडांच्या चुलीवर केलेला चहा अचूक जमला होता. मला माहितच नव्हतं की त्याला चहात काय काय असतं आणि तो कसा करायचा असतो हे माहित आहे! छोट्या प्रमाणात करताना बरोब्बर चहा, साखर आणि दूध कमी घातलं होतं. मेणबत्तीच्या ज्योतीवर स्वैपाक करायला चिक्कार वेळ त्याला लागला होता. उनाड मुलांच्या चिकाटीची हीच कमाल असते. याचा अर्थ मी चहा करत असताना कुठून काय काय काढते आणि किती आणि केव्हा घालते हे त्याने बघितलं होतं. त्याला स्वतः चहा करताना काहीही अडचण आली कशी नाही याची कमाल वाटते. चहा इतका छान झाला हे ऐकून तुहिन म्हणत होता, “मला इतका आनंद झालाय की कोणाला सांगू असं झालंय!”

मग हा स्वयंपाक सोहोळा रोज अजूनच रंगात येऊ लागला. चहाचा सराव काही दिवस झाला. मग चॉकलेट केलं. भातुकलीतलं एक चिमुकलं पातेलं घेतलं, ते मावेल अशी वाटी. वाटीत पाणी, कारण डायरेक्ट आगीवर चॉकलेट जळतं हे त्याला माहित होतं. लोणी, कोको, साखर, दुधाची पावडर सगळं अचूक घेतलं. मी चॉकलेट करताना पुस्तकातून एकदा रेसिपी वाचते, पण याचं कुठेच काहीच अडलं नाही. त्यानंतर अनेक वेळा छोटंसं चॉकलेट खाऊ घातलं. मग त्यातूनच चॉकलेट सॉस करून बघितलं. दूध आणि पाणी घालून ते करता येतं असं तो सांगतो. तेही खूप चविष्ट होतं.

एक दिवस म्हणाला मी पोळ्या करतो. मला खरं तर ‘आगीशी जपून खेळ रे बाबा’ आणि ‘केलेला पसारा आवर’ एवढं सांगण्याखेरीज कशातही लक्ष घालायला अजिबात वेळ नसतो. तुहिनलाही मदत नकोच असते. दुपारी अचानक चिमुकली खमंग पोळी छोट्या ताटलीत घालून हजर! त्याला कणिक कुठे असते, तेल, पाणी यांचं प्रमाण, कणिक कशी मळायची, पोळी कशी आणि किती भाजायची हे सगळं कसं समजलं याचं अजूनही नवल वाटतं. काही दिवस पोळ्या करून सगळ्यांना खायला घातल्या. छोटी ताटली तवा म्हणून वापरली, छोटे चमचे उलथनं म्हणून घेतले. पोळपाट म्हणून ताटलीची मागची बाजू आणि लाटणं म्हणून आधी दगडी बत्ता वापरला, मग माझं लाटणं घेतलं. पोळ्या वाकड्या तिकड्या होऊ लागल्यावर वाटी त्यावर दाबून पुरीसारखा छान गोल कापून पोळ्या भाजल्या. स्वैपाकाचा मोठा चिमटा फार मोठा झाल्याने त्याने स्वतः चिमटा पण तयार केला. दोन आईस्क्रीमच्या चपट्या काड्या घेतल्या, एका बाजूला त्यांना रबरबँडने घट्ट गुंडाळलं, दुसरी बाजू उघडावी म्हणून मध्ये काडेपेटीतली काडी घातली. छोटीशी ताटली, वाटी गरम असताना उचलण्यासाठी हा चिमटा उत्तम आहे. हे सगळं करताना त्याला आमची कोणाचीही मदत लागत नाही. जी साधनं आजूबाजूला असतात ती कशी वापरता येतील आणि त्यातून काय तयार करता येईल हे तो ज्या सराईतपणे करतो, तेवढं आम्हाला कोणालाही जमत नाही. तो या वस्तूंचं डिझाईनही स्वतः ठरवतो आणि ती वस्तू functional असली तरच त्याला करायला आवडते.

अर्थात मेणबत्तीमुळे सगळ्या वापरलेल्या वाट्या, ताटल्या काळ्या पडल्या आहेत. कितीही घासल्या तरी साफ होत नाहियेत. तुहिन म्हणतो की निळी ज्योत होईल असं काहीतरी मला द्या, म्हणजे भांडी काळी पडणार नाहीत. फरशीवर पडणारे मेण आणि काजळीचे डाग आम्हाला रोज घासून काढावे लागतात. घरभर केलेल्या पसाऱ्यातून कधीकधी वस्तूंवरून उड्या मारत जावं लागतं. थोडी चिडचिड होते. तुहिन अनेकदा आवरत नाही म्हणून त्याच्या मागे लागावं लागतं. पण हे सगळं करताना त्याच्या आतून येणाऱ्या झऱ्याला हवा तो मोकळा मार्ग मिळतोय याचा आनंद गगनात मावत नाही. अशा कित्येक नव्या नव्या गोष्टी, प्रयोग आनंदाने करत वाढणारं मूल घरी बघणं आणि त्या करण्यासाठी त्याने ऑनलाईन शाळेच्या अभ्यासाकडे पाठ फिरवणं मला अगदीच समजू शकतं. अनेक मुलं अशीच आपापल्या घरी स्वतःचे आवडते उद्योग आनंदाने करत असणार. त्यांना समजून घेणारे पालक आणि शिक्षकही असतीलच नक्की.

एकेका मुलाला काहीतरी वेगळ्याच गोष्टींमध्ये गती असते. तुहिनचा निरीक्षण आणि स्वतः हाताने प्रयोग करणं यावर पक्का जम आहे. ही बुद्धिमत्ता शाळेच्या अभ्यासक्रमात कशी मोजता येईल? आणि ती त्याच्या व्यक्तिमत्वाचा जितका महत्वाचा भाग आहे हे मला समजतंय, तितका न्याय आपली शिक्षण व्यवस्था या विषयांना देते का? हे गंभीर प्रश्न आता मला पडताहेत.

(टीप: लहान मुलांना आगीशी, मेणबत्तीशी खेळू देताना मोठं माणूस कायम शेजारी हवं. सुती कपडे घालूनच मेणबत्ती, उदबत्ती वापरावी.

प्रत्येक मुलाची विशिष्ट विषयात गती, समज, साधनांची हाताळणी, शैली वेगवेगळी असते. मूल सुरक्षितपणे काय काय करु शकेल याचा अंदाज मोठ्यांनी घेत राहणं अत्यंत आवश्यक आहे. कुठलेही अपघात होऊ नयेत आणि कोणालाही इजा होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी लागतेच.

स्वत:चं मूल काय काय करु शकतं हे पाहून पालक म्हणून आपणच अनेकदा चकित होतो. त्यामुळे कौतुकाच्या पलिकडे जाऊन मूल समजून घेताना, मुलांना असंख्य गोष्टी करताना बघून पालक म्हणून आपलंच शिक्षण होत असतं, नाही का?)