इको-फ्रेंडली होळी साजरी कशी करायची?

- प्राजक्ता देशपांडे

चिनू आज शाळेतून परत आलीतेव्हा आजोबा बागेत काहीतरी करताना तिला दिसलेकाय चाललंय आजोबांचं हे बघायला गेली तेव्हा कळलं आजोबा बागेतला कोरडा पालापाचोळाकाड्यावाळलेली लाकडं एका ठिकाणी जमा करत होते.

आजोबाकाय करताय तुम्ही?”
चिनूबाई आलात का शाळेतूनअगं आता होळी नाही का? ती पेटवण्यासाठी पालापाचोळा एकत्र करतोय.
अरे हो. आज आम्हाला पण शाळेत टिचरनी होळीची माहिती दिली आणि गोष्टसुद्धा सांगितली.
व्वा व्वा!! रोज मी तुला गोष्ट सांगतो, आज तू मला सांग. पण त्या आधी जेवून घे.

जेवण झालं आणि चिनूने आजोबांना होळीची गोष्ट सांगितली. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रह्लाद हा विष्णूभक्त होता. हिरण्यकश्यपूला अमरत्वाचे वरदान मिळालेले असल्याने त्याला गर्व चढला होता, तो उन्मत्त झाला होता. प्रल्हादाने विष्णूचे नाव घेतलेलेसुद्धा त्याला आवडत नसे. त्याला शिक्षा द्यायला हिरण्यकश्यपूने त्याच्या बहिणीला होलिका हिला बोलावले. होलिका कधी अग्नीने जळू शकत नाही असा तिलाही वर मिळालेला होता. होलिकेने प्रह्लादाला मांडीवर घेतले आणि जाळून टाकण्याचा प्रयत्न केला पण विष्णूच्या कृपेने प्रह्लाद वाचला आणि स्वतः होलिकाच जळून गेली आणि म्हणून आपण दुष्टपणा जळून जावो या भावनेने होळी साजरी करतो.”

व्वा व्वा छान सांगितलीस हं गोष्ट!! आणि बरं का चिनू ह्या होळी सणाला ‘हुताशनी पौर्णिमा’ सुद्धा म्हणतात बरं का !! अजून काय माहिती मिळाली तुला होळीविषयी?”

“आमच्या वर्गातला प्रथमेश आहे ना, त्याच्या मामाचं गाव कोकणात आहे म्हणे. तो सांगत होता की तिथे तर चक्क पंधरा दिवस होळी साजरी करतात. गावाच्या देवाची पालखी काढतात.”

“अगदी बरोबर!! अगं होळी हा सण आपल्या संपूर्ण भारतात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. बऱ्याच गावांमध्ये तर होळी पेटवल्यावर दुसऱ्या दिवशी जेव्हा होळी शांत होते तेव्हा तिची राख एकमेकांच्या अंगाला फासतात. त्यालाच आपण धूळवड किंवा धूलिवंदन म्हणतो. आणि मग पाच दिवसांनी येते ती रंगपंचमी, जेव्हा रंग उडवले जातात. बऱ्याच घरांमध्ये होळीच्या निमित्ताने पुरणाची पोळी करतात.”

हो आजोबा आपण म्हणतो नाहोळी रे होळी… पुरणाची पोळी !!

आणि बरं का चिनू भारतातल्या उत्तर भागात तर होळीची वेगळीच मजा असते. काही ठिकाणी फक्त फुलाच्या पाकळ्या आणि गुलाल ह्यांनी होळी खेळली जाते. तर काही ठिकाणी लाठमारीचा खेळ खेळला जातो. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असतात.

“आजोबा टिचरनी सांगितलंय की सगळ्या मुलांनी इको-फ्रेंडली रंग वापरूनच होळी खेळायची आहे.  पण आजोबा इको-फ्रेंडली रंग म्हणजे काय?”

“अंग, इको-फ्रेंडली रंग म्हणजे नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले रंग. बाजारात जे रंग मिळतात त्यात वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स मिसळलेले असतात त्यामुळे काहींना त्वचेला त्रास होतो. चुकून रंग पोटात गेले तर आजारी पडण्याची शक्यता असते. शिवाय ते रंग नंतर पाण्यात जाऊन पाणीसुद्धा केमिकलमुळे जास्तच खराब होतं ना? म्हणून नैसर्गिक रंग वापरायला सांगतात.”

“पण आजोबा मला कुठून आणता येतील इको-फ्रेंडली रंग ?”

“अगं बाळा हे सगळे रंग तुझ्या आजूबाजूलाच आहेत. निसर्गाच्या चराचरात रंग भरलेले आहेत त्यातूनच निवडायचे हे रंग. म्हणजे बघ हं, काही रंग तुला आपल्या बागेत सापडतील तर काही रंग घरात, स्वयंपाकघरात सापडतील. नाही कळलं? हे बघ आज सकाळी जेवताना काय खाल्लंस? बीटाचे कटलेट्स!! बीट चिरताना आईचे हात लाल झालेले तू पाहिलेच असशील तर ह्याच बीटापासून आपल्याला लाल रंग मिळू शकेल. तसंच घरातली हळद पिवळा रंग म्हणून वापरता येईल आणि पालकाच्या भाजी पासून मिळू शकेल हिरवा रंग. हे झालं भाज्यांचं. आता आपल्या बागेत चल तिथे बघू कुठले रंग सापडताहेत.

हा बघ गोकर्ण फुलांचा वेल ह्यापासून निळा रंग तयार होईल आणि ह्या पळसाच्या फुलांपासून नारिंगी रंग मिळू शकेल. आहे की नाही गंमत ?
(ह्या सगळ्या नैसर्गिक घटकांपासून रंग तयार करायची DIY Activity तुम्ही मुलांसोबत करू शकता.)

       

ह्याव्यतिरिक्त आजकाल बाजारातसुद्धा असे अनेक इको-फ्रेंडली रंग विकायला आहेत बरं का !! आपण ते विकत आणू शकतो.”
“आजोबा आता सगळे रंग आणले की होळी खेळताना मजा येणार !!”
“हो पण चिनू, होळी खेळताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या बरं का !!”
“कुठल्या हो आजोबा?”

“होळी पेटवताना वाळलेली लाकडेपालापाचोळाशेणाच्या गोवऱ्या याचाच वापर करायचा, मुद्दाम झाडं तोडायची नाहीत.
होळीचा रंग आपल्या आजूबाजूच्या प्राण्यांवर उडता कामा नये, त्यापासून प्राण्यांना त्रास होतो.
होळी खेळताना पाण्याचा वापर शक्यतो टाळायचा. कोरड्या रंगांनी होळी खेळायची.
सध्या अनेक ताई - दादांच्या दहावी बारावीच्या परीक्षा चालू आहेआपल्या गोंधळाचा त्यांना त्रास होता कामा नये.
नैसर्गिक रंगांचाच वापर करायचा.
हे सगळं राहील ना लक्षात !!

“हो तर नक्की लक्षात ठेवीन. आणि हो सगळ्यात आधी तुम्हालाच रंग लावीन !!!”

 

Read More blogs on Parenting Here