Marathi Bhasha Gaurav Din: मातृभाषेचा अभिमान आणि महत्त्व
- वैशाली कार्लेकर
मंगेश पाडगावकर यांची एक धमाल कविता आहे -
पिंकी इंग्लिश शाळेत जाते
मी तिला फार भितो
ती water drink करते
मी आपला पाणी पितो!
आपली मराठी मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्यावर घडणाऱ्या गमतीजमती त्यांनी या कवितेत लिहिल्या आहेत. खरंतर आपली मुलं इंग्रजी माध्यमात शिकत असोत किंवा मराठी माध्यमात, गमतीचा भाग सोडला तर शक्यतो सर्व भाषा त्यांना उत्तमप्रकारे बोलता याव्यात असंच आपल्या सर्वांना वाटतं.
एखादी भाषा उत्तमप्रकारे येण्याचा मूलमंत्र म्हणजे ऐका, बोला, वाचा आणि लिहा अर्थात श्रवण, संभाषण, वाचन आणि लेखन.
ऐका
माझ्या एका मित्राच्या मुलाचा अनुभव अगदी बोलका आहे. ते एकदा रणरणत्या उन्हातून गाडीतून जात होते. वाटेत गर्द सावली आल्यावर त्याचा तीन वर्षाचा मुलगा म्हणाला, ''बाबा सावली खायची असते का...?'' त्याचा हा प्रश्न न कळल्याने बाबाने विचारलं, “सावली खायची असते का, म्हणजे काय?” त्यावर त्याचे उत्तर चक्रावणारे होते. ''अरे तूच तर मगाशी म्हणालास ना... ऊन खायला नको सावलीत जाऊ या; मग आता सावली खायची का...?”
मुलांचं आपल्या बोलण्याकडे किती बारीक लक्ष असतं याचं हे उदाहरण.
आपण कुणीही न शिकवता फक्त बालपणापासून ऐकून-ऐकून आपली मातृभाषा मराठी शिकलो. आपली मुलंही आपलं बोलणं ऐकूनच मराठी शिकत असतात. फक्त आत्ताच्या परिस्थितीत त्यांचं हे शिकणं सतत सुरू राहावं म्हणून आपल्याला जाणीवपूर्वक काही प्रयत्न करावे लागतात. गोष्टी सांगणं, गोष्टी वाचून दाखवणं, वर्णन करणं आणि मुख्य म्हणजे मुलांसमोर घरातल्यांनी बोलत राहणं, गप्पा मारणं अशा मार्गाने मुलांच्या कानावर भाषा पडत जाते. पुढे बालवाडी, शाळा इतर उपक्रम यामुळे मुलांचा घरात असण्याचा वेळ कमी झाला तरी जेव्हा ती घरी असतील तेव्हा संवाद, वर्णने, गप्पा, शेजारी किंवा नातेवाईकांशी बोलणे, गोष्टी, गाणी ऐकणं अशा सर्व मार्गांनी मराठी भाषा कानावर पडत राहिली तर आपोआपच त्यांची शब्दसंपत्ती वाढत जाते आणि शब्दांच्या अर्थाच्या विविध छटा, म्हणी-वाक्प्रचार असे थोडेसे प्रगत भाषाविष्कारसुद्धा ती सहजतेने आत्मसात करू शकतात.
बोला
खरंतर ‘ऐका’ चाच दुसरा भाग म्हणजे बोला. अनुकरणातून मुलं जे ऐकतात तसंच बोलायला शिकतात. कानावर येणारा स्वर, उच्चार, ढब हे सगळं टिपकागदासारखं टिपत असतात. बाळपणी त्यांची निरर्थक बडबडसुद्धा आपल्याला किती गोड वाटते. पण त्याच बाळांची थोडी मोठेपणीची बडबड मात्र आपल्याला कधीकधी नकोशी कटकट वाटते. मग “जरा शांत राहा, बोलू नको, आता थोडा वेळ गप्प बस, हे विचारू नको, ते सांगू नको” असा नन्नाचा पाढा ऐकवून आपणच त्यांना बोलायचं थांबवतो आणि मग मोठेपणी पुन्हा बोल बोल म्हणून मागे लागतो. त्यामुळे मुलांनी मनसोक्त बडबड करणं, गाणी म्हणणं, मोठ्यांच्या बोलण्याची नक्कल करणं हे सगळं त्यांच्या भाषाविकासासाठी अगदी आवश्यकच आहे.
वाचा
अक्षरओळख होण्यापूर्वीही चित्र पाहून, वाचून मुलं खूप काही शिकतात. चित्रातले प्राणीपक्षी, वस्तू, चेहरे, माणसं हे सगळं आणि त्याबरोबर एकीकडे ऐकू येणारं गोष्ट सांगणारं मोठ्यांचं बोलणं यातून मुलं गोष्ट समजून घेतात. अक्षरओळख झाल्यानंतर तर छोटे शब्द वाचणं, वाक्य वाचणं, त्यांचा अर्थ लावणं आणि घटना समजून घेणं ही प्रक्रिया भराभर होते.
मुलं वाचायला लागल्यावर त्यांच्या भावविश्वातले सोपे शब्द किंवा घटना असलेल्या गोष्टी वाचायला त्यांना खूप आवडतात. वाचनातून अक्षरओळख आणि शब्द ऱ्हस्वदीर्घासकट पक्के होतात. नवीन शब्दांची ओळख होते. मुलं एकदा वाचायला लागली की रस्त्यावरच्या पाट्या, दुकानांवरची नावं, वस्तूंवरची नावं असं सगळं वाचायला लागतात. अशा वेळी त्यांना वाचायला खाद्य पुरवणं एवढंच आपलं काम उरतं. चिकूपिकूच्या अंकांमधूनही हाच प्रयत्न आम्ही करतो.
लिहा
एखादी भाषा बोलता-वाचता आली की ती लिहिणं हे तसं सोपं होऊन जातं. तसं पाहिलं तर लिपी किंवा अक्षरं काढणं म्हणजे एखाद्या चित्रासारखंच असत. अक्षरओळख झाल्यावर तशीच्या तशी अक्षरं लिहिणं मुलांना सोपं जातं. हाताने लिहिणं हा हस्तनेत्रसमन्वयाचा एक भाग असल्यामुळे मेंदूसाठीसुद्धा हा एक चांगला व्यायामच होतो. मुलांनी लिहिण्याचा कंटाळा करू नये, त्यांना लिखाण आवडावं म्हणूनही प्रयत्नशील राहावं लागतं. आवडीच्या विषयावर किंवा आवडीची गोष्ट, संवाद लिहायला देणं; सुंदर अक्षर, नीटनेटकेपणा यांतलं सौंदर्य दाखवून देणं यातून त्यांना प्रोत्साहन मिळतं.
मातृभाषा का महत्त्वाची
प्रत्येक भाषेची तिथल्या संस्कृतीशीही घट्ट नाळ जुळलेली असते. भाषा त्या भाषकांच्या मूल्यांचाही आरसा असते. उदाहरणार्थ, मराठी भाषेतील तुम्ही, आपण यासारखे आदरार्थी शब्दविशेष तसेच काका, मामा, मावशी, आत्या असे वेगवेगळे नातेवाचक शब्द आपल्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात. वृंदावन, औक्षण, आरती, गुरू यासारखे अनेक संस्कृती किंवा परंपरादर्शक शब्द आपण आपल्या भाषेतच व्यक्त करू शकतो आणि समजू शकतो.
इतिहास, भूगोल, तत्त्वज्ञान, लोकपरंपरा, आहार, आरोग्य हे सगळेच विषय कुठे ना कुठे भाषेशी जोडलेले असतात. मराठीत बर्फाला हिम हा एखादाच समानार्थी शब्द आढळतो. कारण मराठी प्रदेशात बर्फ पडत नाही. पण बर्फाळ प्रदेशातील भाषेत बर्फासाठी पंधरा – वीस शब्द असतात. तसेच, आपल्याकडे पाण्याला असलेले जल, उदक, तोय असे अनेक समानार्थी शब्द नेमके कुठे वापरायचे याबाबत भाषिक संकेत दिसतात.
थोडक्यात, आत्ताच्या काळानुसार बहुभाषिक जरूर व्हावं, पण मातृभाषेतही पारंगत असावं. कारण आजचा जागतिक अर्थात 'ग्लोबल' नागरिक कोणत्या संस्कृतीच्या पायावर उभा आहे ही गोष्टही तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे. मातृभाषेत व्यक्त व्हायला मुलं शिकली की बाकीच्या भाषाही लवकर आत्मसात करतात आणि आपली भाषा, संस्कृतीही आपोआपच पुढे घेऊन जातात.
Read More blogs on Parenting Here