महाराष्ट्र दिन, कामगार दिन म्हणजे काय? मुलांना आवर्जून सांगा....
लेखक : सायली जोशी-पटवर्धन
सोसायटीत खेळण्यासाठी सगळी लहान मुलं जमली होती. क्रिकेट खेळायचं की लपाछपी हे ठरत नव्हतं कारण मुलं क्रिकेटच खेळू म्हणून मागे लागली होती आणि मुलींना मात्र लपाछपी खेळायची होती. बराच वेळ डिस्कशन झाल्यावर आज क्रिकेट खेळू आणि उद्या दिवसभर लपाछपी खेळू असे ठरले. मीरा म्हणाली, “उद्या तर समर कॅम्प, ग्राऊंड सगळ्यालाच सुट्टी आहे त्यामुळे आपण दिवसभर खाली खेळू शकतो.” त्यावर अर्णवने तिला विचारले, “उद्या कसली सुट्टी आहे, उद्या काय आहे?” ती म्हणाली, “महाराष्ट्र दिन आहे उद्या आणि लेबर म्हणजेच कामगार दिन वगैरे की काय तो पण असतो उद्या.” या मुलांचे हे संभाषण शेजारीच बसलेल्या तिसऱ्या मजल्यावरच्या जोशीआजी ऐकत होत्या.
या लहानग्यांना १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस असतो इतके तरी किमान माहित आहे हे ऐकून त्यांना थोडे बरे वाटले. पण हा दिवस नेमका काय असतो हे आपण मुलांना समजावून सांगायला हवे असे जोशीआजींना वाटले. मग त्यांनी सगळ्या मुलांना हाका मारल्या आणि आपल्या जवळ बसायला सांगितले. मग अगदी नुकत्याच चालायला लागलेल्या रमापासून ते १० वीची परीक्षा दिलेल्या अमिरापर्यंत सगळेच आजींच्या समोर गोल करुन बसले. मग आजी १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन म्हणजे फक्त सुट्टी नाही, तर या दिनाचे महत्त्व मुलांना समजावून सांगू लागल्या.
महाराष्ट्र दिन म्हणजे काय?
भारत हा जसा स्वतंत्र देश आहे, त्याचप्रमाणे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र या वेगळ्या राज्याची स्थापना झाली. भारतात एकूण २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. त्या २८ मधील महाराष्ट्र हे एक महत्त्वाचे राज्य आहे. इंग्रजांच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्र व गुजरात असे सगळे एकत्र होते. पण महाराष्ट्र हे वेगळे राज्य झाले पाहिजे यासाठी बरेच मोठे आंदोलन झाले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणून हे आंदोलन ओळखले जाते. या आंदोलनात १०० हून अधिक जणांनी बलिदान दिले. मात्र त्यांचे बलिदान वाया गेले नाही असे म्हणता येईल, कारण अखेर या चळवळीला यश आले आणि स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. याचवेळी गुजरात हेही वेगळे राज्य स्थापन करण्यात आले. १ मे हा दिवस मराठी भाषा, अस्मिता आणि शौर्य यांचे प्रतिक मानला जातो. या दिवसाच्या निमित्ताने राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रथयात्रा, शासकीय कार्यक्रम, भाषणे, परेड यांचे आयोजन करण्यात येते. आता हे झाले महाराष्ट्र दिनाबद्दल, पण कामगार दिनही याच दिवशी कसा काय? असं तुमच्यातील अनेकांना वाटेल.
आता महाराष्ट्र दिनालाच कामगार दिन कसा काय?
हा निव्वळ योगायोग आहे. कारण महाराष्ट्र दिन हा फक्त महाराष्ट्र राज्यात किंवा मराठी व्यक्तींकडून साजरा केला जातो. पण १ मे या दिवशी कामगार दिन म्हणजेच लेबर डे हा जगभरात साजरा करण्यात येतो. अमेरिकेत १८८६ मध्ये १ मे रोजी कामगार दिन म्हणून पहिल्यांदा घोषित करण्यात आला, त्यानंतर हळूहळू इतर देशांतही कामगारांच्या हक्कांसाठी हा दिवस साजरा केला जाऊ लागला. आता १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो. कामगाराच्या कामाचे तास ८ हून अधिक नसावेत. त्यांना कामाचा योग्य तो मोबदला मिळावा, कामगार म्हणून त्यांना काही हक्क आणि सुविधा असाव्यात याबद्दल शिकागो येथे मोठे आंदोलन करण्यात आले. या मागण्या काही प्रमाणात मान्य केल्यानंतर १ मे रोजी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय झाला. भारतात मात्र कामगार दिन १ मे १९२३ रोजी चेन्नईमध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. म्हणजे भारत देश स्वतंत्र होण्याच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या आधीपासूनच १ मे रोजी कामगार दिन साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा हिंदुस्थानच्या कामगार किसान पक्षाने साजरा केला आणि नंतर महाराष्ट्रात त्याच दिवशी महाराष्ट्र दिनही साजरा केला जाऊ लागला.
आजी म्हणाल्या, मुलांनो आता तुम्हाला वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने तसेच १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी सुट्ट्या असतात. त्या सुट्ट्या का आहेत हे आपल्याला माहित असते. मग या १ मे च्या सुट्टीविषयी पण आपण समजून घ्यायला हवे. आपण ज्या राज्यात राहतो त्याचा इतिहास, त्याचा वाढदिवस, त्या राज्याबद्दलची किमान माहिती आपल्याला असायलाच हवी. त्यामुळे उद्या या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण सगळे संध्याकाळी याच वेळी भेटूया. तुमच्यातील प्रत्येकाने मराठी गाणी, गोष्टी, कविता, नाटुकली असं आपल्याला आवडेल त्याचे सादरीकरण करायचे, मी तुमच्यासाठी खाऊही आणेन... आवडेल का तुम्हाला. मुलांनी होSSSSSS म्हणून जोरात आजींना प्रतिसाद दिला. एरवी शाळा, क्लासेस यांमध्ये बिझी असणारी सोसायटीतली मुलं कित्येक दिवसांनी अशा रितीने एकत्र जमणार होती. जोशीआजींच्या पुढाकाराने सोसायटीत यानिमित्ताने मुलांना फक्त दिवसाचे महत्त्वच कळले नाही तर त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठीही मदत झाली. दुसऱ्या दिवशी आजींनी आयोजित केलेल्या खास छोटेखानी कार्यक्रमात मुलांसोबत त्यांचे पालक, आजीआजोबाही सहभागी झाले आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.
महाराष्ट्र दिनाला तुम्ही मुलांसोबत काय कराल?
-
महाराष्ट्र दिनाबद्दल आपल्या लहानग्यांना आवर्जून माहिती सांगा.
- मराठी भाषा, मराठी संस्कृती, महाराष्ट्राचा भूगोल-इतिहास यांबद्दल मुलांना समजेल अशा भाषेत माहिती द्या.
- भारतात असलेली इतर राज्ये, त्यांचे वेगळेपण याविषयी मुलांशी गप्पा मारा.
- महाराष्ट्रात असलेली कोकण किनारपट्टी, समृद्ध अशी सह्याद्रीची पर्वतरांग, जंगले अशाप्रकारेही मुलांना महाराष्ट्र समजावून देता येईल.
- कामगार दिनाबद्दल मुलांशी बोला, आपण नेमके काम करतो म्हणजे काय करतो, कुठे काम करतो याबद्दल मुलांशी गप्पा मारा.
Read More blogs on Parenting Here
Print + Audio
Only Audio
Only Magazines
Magazines
Our Combo Packs
Books By Quests
Curated
Books
Parenting Courses
Expert Talks
Books on Parenting
Parenting
Blogs