लेखक :  आभा भागवत


‘Weed is a plant whose virtues have never been discovered.’ ज्या वनस्पतींचे गुण आपल्याला माहित नसतात त्यांना आपण तण म्हणतो. हव्या त्या वनस्पती उगवाव्यात म्हणून तण निरुपयोगी समजून काढून टाकलं जातं. मासानोबू फुकुओक या जपानमधल्या अभ्यासकाने जपानमध्ये नैसर्गिक शेतीचे प्रयोग करून जे साधलं त्यातून अत्यंत मूलभूत शैक्षणिक तत्वच समोर आली, असं मला वाटतं. फुकुओकांनी तणातच धान्याची पेरणी केली. कीटकनाशकं वापरली नाहीत. त्यांच्या लक्षात आलं की निसर्गाची स्वतःची समज अचंबित करणारी आहे. एखाद्या परिसंस्थेत (ecosystem) कीड का येते याची काही महत्त्वाची कारणं आहेत आणि माणसांनी त्यात ढवळाढवळ केली तर निसर्गाचा समतोल ढासळतो.

मूल आणि निसर्गातल्या अनेक गोष्टी समांतर असतात. छोटी मुलं काय करतात ते न बघताच मोठ्या व्यक्ती स्वत: काही गोष्टी ठरवतात. जन्मल्यापासून बाळांनी कधी दूध प्यावं, गाणं म्हटलं की शांत व्हावं, पोट भरलं की झोपावं, अमुक वयाचं झाल्यावर चालावं – बोलावं वगैरे वगैरे वगैरे. मुलाची निरागसता, विचार करण्याची विलक्षण वेगळी पद्धत, निर्मळ मन, प्रत्येकाची स्वतःची अशी खास समज अशा असंख्य गुणांचा जेव्हा ठाव लागेल तेव्हा मुलातल्या शंभरेक गोष्टींची आपल्याला पारख होईल. मुलांच्यातले हे सुप्त गुण म्हणजे जणू तणच असतात. त्यांना काढून न टाकता त्यांचं महत्त्व ओळखून वाढू दिलं पाहिजे. त्यांच्यातले खास गुण सपाट करून त्यावर नवीन काहीतरी पेरल्यामुळे अंगच्या गुणांचा थांगपत्ताच न लागता, मुलं बिचारी जे त्यांच्यासाठी कदाचित योग्यच नाहिये ते मिळवण्याच्या मागे लागतात. अनेक स्तरांवर अपयश बघतात, खच्चीकरणाला सामोरी जातात. निराशेशी झगडण्यात उर्जा घालवावी लागल्यामुळे आयुष्याचा समतोल कुठच्या कुठे हरवतो. निसर्गात तणाचं महत्व वेगळं आहे. तणाला असंख्य फुलं येतात आणि त्यांच्यामुळे अजून शंभर रोपं येतात. अशी रोपं रानभर पसरतात आणि त्यांच्यामुळे तयार होणाऱ्या मखमलीसारख्या सकस जमिनीत मोठी झाडं उगवतात, जमिनीचा कस वाढवतात. एवढंच नाही तर त्यावर अवलंबून अनेक कीटक, पक्षी अशी मोठी नैसर्गिक साखळीच असते. निसर्ग हा फार मोठा गुरु आहे. यातूनच प्रेरणा घेऊन लहान मुलांकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन पालकांना घेता येईल.

चार वर्षांचा असल्यापासून माझ्या मुलाला, ओजसला रस्ता शोधा हे चित्र काढायला फार आवडतं. त्याला आम्ही ‘चक्रव्यूह’ असं मस्त नाव दिलं. अगदी साध्या चक्रव्यूहांपासून अतिशय कठिण चक्रव्यूह तो तयार करतो. तासनतास त्याचं आपलं आपलं संशोधन चालू असतं. नवीन चित्र, नकाशे, ठिकाणं, रस्ते पाहिले की त्यातले आकार लक्षात ठेवून चक्रव्यूहांत वापरतो. धाकट्या तुहिनला सोडवायला सोपं जावं म्हणून सोपे चक्रव्यूहही बनवतो. एकदा तर आधी अंदाज नसताना, चक्रव्यूह सोडवल्यावर त्यातून नाचणारा मोर दिसायला लागला. त्याच्या दृश्य संवेदना चित्र, कोडं, संशोधन अशा अनेक अंगांनी तो स्वतःहून वापरतो हे पाहताना मनात येतं, की मुलांना मोकळ्या वेळाची नितांत गरज असते. स्थळ-काळाची कोणतीही बंधनं नाहीत अशा वातावरणात मूल खूप गोष्टींचा शोध लावतं. हे शोध लावण्याची प्रक्रिया अतिशय समरसून अनुभवतं आणि अनेक नवे विचार, प्रश्नोत्तरं, संकल्पना, शोध गाठीशी बांधतं. ह्या प्रवासात मूल आपणहून असंख्य गोष्टी शिकत असतं ज्या बघण्याची दृष्टी मोठ्यांनी तयार करायला हवी. विज्ञान, गणित, कला या शाखांपलीकडेसुद्धा आपल्या मुलांसाठी खूप मोठ्ठं विश्व वाट पहातंय हे पालकांनी जाणून घ्यायला हवं.

छोटं मूल गणित न शिकता जेवणाचं एक ताट कमी घेतलं गेलंय हे सांगू शकतं. त्याचं तात्पुरतं कौतुक करून विसरून जाण्याऐवजी त्याला समजणारं गणित आपण समजून घेऊ शकू का? खेडेगावामधली शाळेत न गेलेली आजी रानातून आंबे तोडून आणून विकू शकते, त्याचा भाव ठरवू शकते, पैसे मोजू शकते. याचा अर्थ तिचा स्वतःचा मोजणीचा नैसर्गिक अंदाज ती समर्थपणे वापरू शकते. आधुनिक माणसाचा यावर विश्वासच नाही. संधी मिळाली तर प्रत्येक मूल स्वतःची मोजणीची संकल्पना शोधून काढू शकेल. पण आपणच अपुरे पडतो आणि शिक्षकाला सोपं जावं म्हणून एकच सोपी पद्धत सर्वच मुलांना शिकवतो. मूल समजून घेण्याच्या आपल्या क्षमता रुंदावल्या तरच मुलांच्या हजारो सुप्त गुणांना न्याय देता येईल. एक समर्पक श्लोक आहे –

अमंत्रम् अक्षरं नास्ति, नास्ति मूलम् अनौषधिं।
अयोग्यः पुरुषः नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः।।

मंत्र होऊ शकत नाही असं कुठलंही अक्षर नाही. औषध होऊ शकत नाही असं कुठलंही मूळ नाही. माणूस कुठलाही अयोग्य नाही. फक्त योजक मिळणं कठीण आहे.

– आभा भागवत

Read More blogs on Parenting Here