लेखक :  आभा भागात


मुलांमध्ये स्वतःहून शिकण्याची अफाट क्षमता असते. याचा काही दिवसांपूर्वी आलेला अनुभव म्हणजे पावसाळी सहलीसाठी आम्ही महाडजवळ गेलो होतो. डोंगरावरच्या छोट्याशा डबक्यात जेव्हा मुलांनी बेडुकमासे पाहिले आणि उत्स्फूर्तपणे त्यांना वाटलं की ते पकडून जवळून बघावेत तेव्हा ही कल्पना मलाही आवडली. त्यानंतर जवळजवळ तासभर मुलं बेडुकमासे पकडायच्या प्रयत्नात होती. तेव्हा त्या पाण्यात त्यांनी वेगवेगळी छोटी झाडं, शेवाळी पाहिली, त्यांना स्पर्श केला, त्यांचा वास घेतला. कदाचित चवही पाहिली असेल. काय केलं की पाणी गढूळ होतं, बेडुकमासे कसे लपायला पळून जातात, पाणी पुन्हा शांत व्हावं यासाठी किती वेळ थांबावं लागतं, बेडुकमासे केवढे चपळ असतात आणि अथक प्रयत्नांनीसुद्धा पकडता येत नाहीत, बेडुकमाशांखेरीज अजून कुठले मासे आहेत आणि ते कसे वेगळे आहेत… अशा एक ना अनेक गोष्टी मुलं शिकली. स्वतःहून सुचून आणि निवडीचं पूर्ण स्वातंत्र्य मिळून, स्वतःच पद्धत ठरवत किती अनुभव मुलं घेऊ शकतात? आपण मोठे प्रत्येकच गोष्ट मोजायला बघतो, वाढवायला बघतो, त्यातून निष्कर्ष काढायला बघतो. त्या नादात कित्येक अनुभूती गुळमुळीत होऊन जातात याची आपल्याला जाणीवच नसते. मुलांना निवडीचं स्वातंत्र्य मिळालं की एकच गोष्ट विविध अंगांनी समजू शकते यावर पालक-शिक्षकांनी खूप विश्वास ठेवायची गरज आहे. एक सुंदर वाक्य आठवतंय, “How can I feel with my eyes and see with my skin?” हे अनुभवण्यासाठी तंत्रज्ञानापासून लांब आणि निसर्गाच्या जवळ जायला हवं.

माझी दोघं मुलं – ओजस, तुहिन आणि मी असं ठरवलं आहे की शक्य तेवढे दिवस संध्याकाळी घराजवळच्या टेकडीवर यायचं आणि टेकडीवरचा प्लास्टिकचा कचरा गोळा करायचा. त्यामुळे बऱ्याचशा भागात आता प्लास्टिक दिसत नाही. काही भागात अजूनही आम्ही हे काम करत आहोत. त्याचबरोबर, देशी झाडांच्या बिया पेरतो, रोपं लावतो. पावसानंतर सर्वांत जास्त जोमाने काय वाढताना दिसलं असेल? तर देशी वृक्ष लावण्यासाठी कापलेला विदेशी ग्लिरिसिडिया. मग त्या झाडांच्या फांद्या कापून त्यांचा वापर खत म्हणून व्हावा यासाठी खड्ड्यांमध्ये टाकतो. घरातल्याच मोठ्या सुऱ्या घेऊन जाऊन हे काम आम्ही करतो. झाडाची छोटी फांदी कापण्याची ताकदसुद्धा शहरी माणसाच्या दंडात नसते, हे ते काम केल्यावरच जाणवलं. तो सगळा पाला उचलून लांबवर नेऊन टाकायलाही श्रम पडतात. पण आम्ही ते आनंदानी करायला शिकलो. ओजस एक दिवस एकटाच पुढे गेला आणि बऱ्याच वेळाने परत आला. तेव्हा चुकला का काय विचारल्यावर म्हणाला, “मी मोहाच्या ६० बिया गोळा केल्या आणि जिथे येतील असं वाटलं तिथे पेरून आलो.” झाडांची ओळख होणं, बिया ओळखता येणं, बिया पेरणं, रोपं लावणं, कचरा न करणं, कचरा साफ करणं, बीमधून आलेली रोपं बघून आनंदून जाणं, प्राणी आणि पक्षी यांचे आवाज ऐकणं, क्वचित त्यांना बघणं, आकाशातली नवनवीन चित्रं बघणं, पावसात चिंब भिजणं… निसर्ग असा काठोकाठ अनुभवणं – हे खरं सुंदर जीवन! निसर्गाच्या करामती बघण्यात रमून जाऊन आमचंही जगणं आता जास्त समृद्ध होत आहे.

निसर्गाजवळची माणसं अतिशय नम्र, शांत आणि समाधानी असतात. आजची मुलं Nature Deficit Disorder मधून जाताहेत, म्हणजेच निसर्गापासून तुटलेली आहेत असं रिचर्ड लूव्ह यांनी “Last Child in the Woods” या पुस्तकात अतिशय समर्पकपणे म्हटलं आहे. निसर्गात राहून मिळतील असे अनेक अनुभव आज लोप पावले आहेत, extinct झाले आहेत. मुलांना संधी देऊन ते अनुभव पुन्हा मिळू शकतील का, हाही प्रश्नच आहे. प्रत्येक अनुभवाचा अपक्वपणा (rawness) नाहीसा होत चालला आहे. सर्व वस्तू आणि अनुभव आयते (ready-made) आणि तत्काळ (instant) मिळायचा जमाना आहे. स्वतःच्या हातांनी काही करण्याइतका कोणालाच वेळ नाहीये.

मुलांना जर निसर्गाच्या जवळ न्यायचं असेल तर पालकांना स्वत: तो छंद जोपासावा लागेल, निसर्गाच्या जवळ जावं लागेल मग आपोआपाच मुलंही तुमचं अनुसरण करतील आणि निसर्गात स्वच्छंदपणे जाण्यासाठी दरवेळी आवडीने पहिलं पाऊल उचलतील. 

माझा मुलगा तुहिन फाटक कोथरूडमधल्या म्हातोबा टेकडीवर नियमित जायचा आणि तिथल्या रोपांच्या पिशव्यांचा कचरा गोळा करायचा, पिसं जमवायचा, झाडांच्या बिया गोळा करून पेरायचा. त्याला अजूनही पावसाच्या पाण्याने तयार झालेल्या प्रत्येक डबक्यात उडी मारायची असते. केवढा हा आनंद! त्याला वाहणाऱ्या झऱ्यात खेळायचं असतं, बेडूक, सरडे हातात घ्यायचे असतात, मासे पकडायचे असतात. पाणी अडवायला चिखलाचे बांध घालायचे असतात. एका जागी तर त्याने एवढा मोठा बांध घातला की त्या जागेला आम्ही धरणाची जागा असंच आता म्हणतो.

तो अक्षरनंदन शाळेत इयत्ता ५ वी मध्ये असताना त्याने अनेक प्रश्नांचं संकलन केलं. त्याला पडलेले निसर्गविषयक काही सहज प्रश्न :

1. एका अळीने पान दोन्ही बाजूला सारखं खाल्लं आहे, असं का? ती चित्रकार आहे का?

2. बियांना स्पर्श कळतो का? नक्की कळत असणार. नाहीतर त्यांना कसं समजतं की टेबलावर ठेवलं की नाही रुजायचं आणि मातीत पडलं की रुजायचं?

3. हिरव्या अळीचं ब्राऊन फुलपाखरू का होतं ते कळलं, कारण ब्राऊन खोड असतं आणि हिरवी पानं असतात. त्यांचे रंग त्यांच्या खाद्याशी एकरूप होतात.

4. जर एका बैलाने दुसऱ्या बैलाला ढुशी दिली आणि तो खाली पडला तर तो परत उठू शकतो का?

5. लोकं कचरा पाण्यात का टाकतात?

6. बीटल्सवर पाय दिला की त्यांना पुढे का जाता येत नाही?

7. बांबूला खाली खाली असे काटे काटे का आले?

8. आपण जसे जसे वर जाऊ तसं आपल्याला उकडायला पाहिजे, कारण सूर्य जवळ येतो आणि पृथ्वी लांब जाते तर तसं का नाही होत? थंडी का वाजते?

9. झाडं शी करतात का?

10. झाडं झोपतात का? झोपत असली तर घोरतात का?

11. गाड्यांनी जास्त प्रदूषण होतं आणि लोकं झाडं कापतात तर झाडांवर जास्त प्रदूषण घ्यायचा भार नाही का येत?

12. जगातला सर्वात जास्त पिसं टाकणारा पक्षी कोणता आहे?

13. पावसाळ्यात जे हिरवं पातीवालं कोवळं कोवळं गवत येतं, ते नसतं तर आपण पण नसतो का?

14. लाव्हा इतका गरम असतो तर तो स्वतःला का नाही वितळवून टाकत?

15. वेलक्रो माणसाला चिकटगोंड्याच्या कुठल्यातरी प्रकारावरून सुचला असणार.

16. टेकडीवरून ट्रॅक्टर नेतात ते मला नाही पटत, कारण टेकडीवर प्रदूषण वाढतं, प्राणी-पक्षी घाबरतात आणि पाण्याला जिथून वाहायचं असतं तिथून वाहता येत नाही, प्रवाह बदलतात.

17. माणसाने फितुरी केली आहे. कारण निसर्गानी त्याला बनवलं पण तो निसर्गालाच त्रास द्यायला लागला.

18. मातीवरनं खूप वेळ पाणी गेल्यावर मातीचे रंग वेगळेवेगळे कसे दिसतात?

19. गोमेचे पाय असे हलतात जसं काही पाण्याच्या किंवा हवेच्या लहरीच जातात.

20. पैसेकिडे जेव्हा एकमेकांवर चढून चालतात तेव्हा आधीचा दमला की वरचा खाली येतो का?

21. बी ला मन असतं का ? बी विचार करते का?

22. झाडाच्या आत नक्की काय चालू असतं?

23. चावणारी फुलपाखरं असतात का?

24. सावली कुठल्या रंगाची असते?

असे अनेक प्रश्न तुमच्याही मुलांच्या मनात येत असतील ते नोंदवून ठेवा, जमल्यास त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा आणि मुलांसह निसर्गाच्या सुंदर जगात रमण्याचा आनंद वेळोवेळी घेत रहा.

– आभा भागवत

Read More blogs on Parenting Here