लेखक :  शोभा भागवत


एका चित्रकाराची ही गोष्ट मला फार आवडते. तो मोठेपणी जगप्रसिद्ध चित्रकार झाला तेव्हा त्याची टी.व्ही. वर मुलाखत घेतली. त्याला विचारलं, “तुमचं लहानपण कसं गेलं? तुम्हाला लहानपणी खूप कागद, पेन्सिली, रंग मिळाले का? म्हणून तुम्ही चित्रकार झालात का? “त्यानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. तो म्हणाला, “मी फार लहान असताना माझे वडील गेले. आई मजुरी करायची. ती आणि मी एका झोपडीत राहायचो. ती रोज कामाला जाताना सकाळी झोपडी सारवून जायची. मग मी कोळशाचा तुकडा घेऊन दिवसभर घरभर चित्रं काढून ठेवायचो. संध्याकाळी आई यायची. आली की हसून चित्रं पाहायची आणि म्हणायची,’ काढली का चित्रं?’ दुसऱ्या दिवशी परत सगळी झोपडी सारवून जायची. ती मला कधी म्हणाली नाही की रोज का घर खराब करतोस? मी एवढे कष्ट करते. मला रोज घर सरवावं लागतं. तिनं माझ्या चित्रांची कधी चिकित्साही केली नाही. ‘काढली का चित्रं?’ म्हणताना तिच्या डोळ्यांत जे कौतुक दिसायचं तीच माझी स्फुर्ती होती.”

या गोष्टीवरून मला मुलांना क्वालिटी टाईम देणं म्हणजे काय ते उमगलं.

- क्वालिटी टाईम देणं याचा अर्थ मूल त्या वेळात आनंदी असणं आणि पालकांनी मुलाच्या डोक्यावर बसून राहणं नव्हे तर त्याला स्वातंत्र्य देणं, त्याला जे आनंदानं करावंसं वाटतं त्याला सवड देणं, हा एक मुद्दा झाला.

आणखी एक गोष्ट माझ्या मैत्रिणीची. तिच्या कॉलेजमधल्या मुलीनं लांबसडक केस कापून टाकायचं ठरवलं. मैत्रीण म्हणाली,” केस कापण्याबद्दल माझा विरोध नव्हता; पण तिची वेणी घालण्याच्या निमित्तानं आम्ही दोघी निवांतपणे एकत्र असायचो. आमच्या खूप गप्पा व्हायच्या ते सगळं आता बंद झालं ना!”

- क्वालिटी टाईमचा हा दुसरा मुद्दा झाला, की पालक आणि मुलांनी निवांत वेळ काढून जवळ बसणं, जिव्हाळ्याच्या गप्पा मारणं.

माझी मुलगी इंडॉलॉजीत एम.ए. करत होती. भारतीय कलांच्या इतिहासाबद्दल ती अभ्यास करायची तेव्हा मला म्हणायची,” तू पण ये. मी तुला वाचून दाखवते. तुला या सगळ्यात इंटरेस्ट आहे.” आणि आम्ही दोघी मिळून तिची पुस्तकं वाचायचो. चर्चा करायचो. माझ्या आठवणीत हा आमचा क्वालिटी टाइम होता.

- मुलांनी आपल्याला काही शिकवणं, आपण त्यांना काही शिकवणं आणि तेही जबरदस्तीनं, छडी मारत नाही तर खऱ्याखुऱ्या इंटरेस्टनी, हा क्वालिटी टाईमचा तिसरा मुद्दा!

आम्ही शाळेत असताना आमच्या पंडितराव सरांकडे संध्याकाळी जायचो. त्यांच्याकडे आलेल्या लोकांशी ते इतक्या विविध विषयांवर गप्पा मारत असायचे.

त्या आम्ही ऐकायचो. छान वाटायचं! खूप शिक्षण व्हायचं. मग मध्येच त्यांना चहा हवा असला तर आतून चहा करून आणायचो. किती सुंदर होते ते दिवस.

काही एका उंचीवर पोचलेल्या माणसांच्या सहवासात असणं, त्यांचं बोलणं ऐकणं हासुद्धा क्वालिटी टाईमच असतो. संबंधित माणसाकडे क्वालिटी असली तर त्याच्या दुरून सहवासात घालवलेला वेळही क्वालिटी टाईम बनून जातो.

पालक जर सतत काही शिकवणारे असले तर त्यांच्या त्या धडपडीत सहभागी होणं, हा आनंदाचा अनुभव असतो. आमच्या कल्पनाताईना पुस्तकांचं, वाचनाचं फार प्रेम. त्यांच्या दोघी कन्या त्यांचं पाहून, ऐकून पुस्तकांच्या प्रेमात न पडल्या तरच नवल! त्या मायलेकींनी एकत्र रवींद्रनाथ वाचले. कितीतरी गोष्टी, चरित्रं, कादंबऱ्या वाचल्या. त्यांनी एकत्र बंगाली शिकण्याची धडपड केली. नृत्य शिकल्या. चित्रकलेचे खूप प्रयोग सतत चालू असतात. त्यांचे हात सफाईदारपणे काम करतात. भरतकाम करतात, पेंटिंग करतात. नवे नवे पदार्थ करतात. त्याचबरोबर अनाथ मुलांच्या संस्थांमध्ये जातात. त्यांच्याशी खेळतात, गप्पा मारतात, पुस्तक वाचून दाखवतात. एकूणच त्यांच्या आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीचं खूप समृद्ध आहे.

सतत काही नवं, चांगलं, समाजाच्या उपयोगी करणं, त्यातूनच आपले व्यासंग उभे करणं, हे जिथे चालतं त्या पालकांबरोबर घालवलेला वेळ हा “क्वालिटी टाईमच” बनतो.

काही माणसांबरोबर वेळ घालवायला आपल्याला का आवडतं? काहींचा सहवास छान वाटतो तर काहींचा तसा का वाटत नाही? पालकांची कंपनी ‘ बोअर’ असते, असं मुलं का म्हणतात? पालक अस्सल माणसं म्हणून वाढली नाहीत तर मुलंच काय इतर सगळीच त्यांच्या सहवासात कंटाळून जातील!

क्वालिटी टाईम म्हणजे भरमसाठ पैसे खर्च करून मुलांना विविध प्रकारच्या गमती-जमती पुरवणं नाही, तर त्यांना आयुष्य कळेल, ती वाढतील असे अनुभव त्यांना देणं. ते अनुभव त्यांच्या जीवनातल्या आनंदायी आठवणी बनतील असं आपण वागणं. चित्रकाराच्या गोष्टीतून असं लक्षात येतं की त्याला पैसा लागतो असं नाही. समज लागते. आपल्या मुलाबद्दल प्रेम लागतं. त्याच्या भावनांचा सन्मान मनात असावा लागतो. स्वतःला कष्ट पडले तरी त्याबद्दल आनंदच वाटतो.

काही शब्दांचे उगाचच आपण बाऊ करतो. क्वालिटी लाइफ जगायची इच्छा असेल तर आपण जाणीवपूर्वक घालवलेला वेळ हा क्वालिटी टाईमच असतो. अर्थात त्यावर आक्रमण होणार, काही गोष्टीतून अस्वस्थता येणार; पण त्यापासून आपल्या मुलांना थोडं दूर ठेवणं, जपणं हेही लहान वयात आवश्यक असतं.

- शिकण्याजोगी अनेक गोष्टी सततच आसपास असतात. मुलांच्या निमित्तानं ही संधी आपल्यकडे आयती चालून येते. मुलांच्या अभ्यासातून, त्यांच्या छंदातून, त्यांच्या भ्रमंतीतून, त्यांच्याशी केलेल्या संवादातून, त्यांच्या वाढीच्या टप्यातून आपण त्यांच्याबरोबर जो वेळ अर्थपूर्ण आनंदात घालवतो तो असतो ‘क्वालिटी टाइम.’

माणसाच्या जगण्याला क्वालिटीची जाण असली तर त्यांच्यबरोबरचा वेळ आपोआप क्वालिटी टाईम होतो. मात्र त्यात बुद्धीबरोबर भावनेचा ओलावा आवश्यक असतो. आनंदाबरोबरच जबाबदारीची जाणीव जागती असावी लागते. कुटुंबाबरोबरच समाजाचं देणं द्यायचं आहे, ही भावना असावी लागते. सांस्कृतिक पातळीची समज असावी लागते आणि या सगळ्याला पैसा, शिक्षण या अटी नाहीत बरं! अगदी काही नसलं तरी सरळ, निर्मळ मनही यातल्या बऱ्याच गोष्टींची पूर्तता करू शकतं.

मुलांना काय लागतं? प्रेम, स्वातंत्र्य, सन्मान, स्वतःचं कौतुक! चित्रकाराच्या आईनं तेवढंच दिलं आणि त्याच्या जीवनालाच एक “क्वालिटी” दिली.

Read More blogs on Parenting Here