लेखक :  शोभा भागवत


पुण्याच्या कॉर्पोरेशन शाळांमध्ये एका प्रकल्पाच्या निमित्तानं दोन वर्ष मी सातत्यानं जात होते. तेव्हा घडलेला हा प्रसंग माझे डोळे उघडणारा वाटला. मी वर्गात गेले की दोन-दोन मुलांना फळ्याजवळ बोलावून हातात खडू देऊन चित्रं काढायला सांगायचे. मुलांनी फळ्याला हात लावणं निषिद्धच होतं! त्यामुळे मुलांना ही गंमत फार आवडायची. एकदा दुसरीच्या वर्गात, एका मागे बसलेला मुलगा यायलाचं तयार होईना. कळकट-मळकट पडलेला चेहरा, खाली मान. शेवटी त्याच्या पाढीवर हात ठेऊन, “येरे बाबा” केल्यावर तो आला आणि त्यांनी इतकं सुंदर डौलदार फुलपाखरू काढलं फळ्यावर. आता त्याला कडेवर घेऊ का डोक्यावर घेऊ मला कळेना. परत तो शांतपणे मागे जाऊन खाली मान घालून बसला.

मला वाटलं प्रत्येक मुलामध्ये एक असं सुंदर फुलपाखरू दडलेलं असतं! दबलेलं असतं आपण त्याला बाहेर येऊ देत नाही. पंख उघडू देत नाही. बघणाऱ्याच्या नजरेतच सौंदर्य असतं म्हणतात ते मला शाळांच्या बाबतीत फारच खरं वाटतं. एखाद्या सुंदर बाईचा नवरा जर सतत तिच्याकडे तिरस्कारानं पहात असला, तू वाईट दिसतेस असं म्हणत राहील तर सुंदर दिसण्याच्या तिच्या सगळ्या उर्मीच मारल्या जातील. तसं आपल्या कोवळ्या मुलांच्या मनाचं शाळेत होतं. काही आलं नाही की घालून-पाडून बोलणारे शिक्षक, गरीब मुलांना तिरस्कारानं वागवणारे शिक्षक, दंगेखोर मुलांना शिक्षा करणारे शिक्षक कशाकशाला तोंड द्यायचं मुलानी! त्यातून ते मूल हळव्या मनाचं, संवेदन असं असलं तर त्याचं काही खरंच नाही! ते फुलपाखरू काढणारं मूल तसंच असावं!

हसऱ्या चेहऱ्यानं, कुतुहलभरल्या मोठया मोठया डोळ्यांची, नाचणारी बागडणारी मुलं शाळेत येतात. ३ ते ५ वर्षांची मुलं इतकी उत्साही असतात की दर दहा मिनिटांनी त्यांना काहीतरी नवीन ,काहीतरी वेगळं, काहीतरी छान करायचं असतं. त्यांना शिक्षक दरडावतात, एके ढिकाणी देवासारखं बसायला लावतात. शिक्षणातली सक्ती तिथेच चालू होते.

केरळमधे एक शाळा पहायला आम्ही गेलो होतो. तिचं नाव कनवू म्हणजे ‘ स्वप्न’. श्री. बेबी नावाच्या गृहस्थांनी ती शाळा सुरु केली. पण शाळेसारखं तिथे काहीच नव्हतं. वर्ग नव्हते, फळे नव्हते, घंटा नव्हती. २०-३० आदिवासी मुलं तिथेच राहायची. वयोगट ३ ते १६. मुलं शेती करत होती. स्वयंपाक करत होती. खोल्यांची साफसफाई करणं त्यांचंच काम. मोठं वाचनालय होतं. त्यांना जे वाटेल ते ती मुलं मोठयांकडून शिकत होती आणि मोठी मुलं नवं काही शिकण्यासाठी बाहेरगावीही जाऊन राहतं होती. या शाळेला ग्रँट नाही. शाळा देणग्या मागत नाही.

मुलं आणि बेबी सर, रोज संध्याकाळी गाणी म्हणतात तेव्हा बेबी पेटी वाजवतात. गाणी म्हणून झाली की सर्व नृत्य करतात. तेही जोरदारपणे. ते त्यांच्या संस्कृतीतलं अंगात शिणलेलं नृत्य. वर्षाकाठी महिनाभर बाहेरगावी जाऊन ही सगळी मुलं नृत्य- गीतांचा कार्यक्रम सादर करतात त्यातून वर्षाला पुरेसे पैसे मिळवतात. त्या पैशांवर शाळा चालवतात. आठ दहा वर्ष अशी शाळा चालल्यावर, बेबी सर आता शाळा मोठया मुलांच्या हवाली करून दुसरीकडे लांब राहायला गेले आहेत.

शाळेत मुलांना श्रमांचं शिक्षण मिळावं. आपल्याला लागणारे कपडे, भांडी-कुंडी मुलांनी स्वतः बनवावीत. एवढंच काय घरंही बांधावीत. शेती करावी. मूलोद्योगाचं शिक्षण शाळेत असावं हे गांधीजींनी सांगितलं.

निसर्गाच्या सहवासात मुलांचं शिक्षण व्हावं. शाळा गरीबच असावी कारण गरिबीत काहीतरी शिकून होण्याची शक्यता अधिक असते असं रवींद्रनाथ म्हणत.

मुलं तिथे शाळा असं म्हणत ताराबाई मोडक, अनुताई वाघ कोसबाडच्या टेकडीवर गेल्या आदिवासी मुलांमागे हिंडल्या.

आपल्याच पुराणकथांमधून आपल्याला ध्रुवासारखं दृढनिश्चयी बाळ भेटतं, प्रल्हादासारखा सर्व अन्याय, अत्याचारांना पुरून उरणारा धिटुकला मुलगा भेटतो. श्रावणासारखा अंध आई-वडलांना काशीयात्रा घडवायला निघालेला प्रेमळ पुत्र भेटतो. मुलांच्या बुद्धीच्या, कर्तबगारीच्या, मानसिक ताकदीच्या, करुणेच्या सर्व क्षितिजांना स्पर्श करणाऱ्या या कथांमधून आपलं शिक्षण मात्र काहीही शिकलं नाही! या गोष्टी आपल्याला सांगतात की मुलं म्हणजे मार्कांसाठी धावणारी घोडी नव्हेत. त्यांच्या अंतःसामर्थ्यचं दर्शन घ्या.

गुरुशिष्याच्या अनेक गोष्टींमधून गुरूनं शिष्याकडे कसं पहावं, त्यांना कसं शिकवावं हे आपण वाचतो या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या शिक्षणाचा विचार केला तर असं दिसतं की आज शाळांमध्ये मुलं गौणच आहेत. इतर सगळ्याला भरपूर महत्व. ती शिस्त, त्या शिक्षा, त्या परीक्षा, ते यशाचे समारंभ, अपयशाच्या आत्महत्या, त्या स्पर्धा, शिक्षकांचे पगार, शाळांच्या इमारती, कंप्युटर लॅब्ज. या सगळ्यात मनापासून भाग घेणारे पालकही. विविधतेची रेलचेल आहे पण ती दर्जेदार नाही.

ठराविक विषयांच्या पलीकडे आयुष्यभर उपयोगी पडणारं शिक्षण शाळा देऊ शकत नाहीत. श्रमनिष्ठा, व्यायाम, आहार, नैसर्गिक औषधं, शेती, पर्यावरणाचा गंभीर प्रश्न, आपल्या भाषा, आपलं संगीत, नृत्य, कला, स्वयंपाक, सफाई, वाचनाचं प्रेम यातलं किती मुलांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनून शाळेतून बाहेर त्यांच्याबरोबर येतं?

गरीब देशातल्या शिक्षित लोकसंख्येला गरिबांचं प्रेम नाही. जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत अशी विशालदृष्टी त्या शिक्षित समाजाकडे नाही. मॉल म्हंटल की डोळे विस्फारतात, अमेरिका म्हटलं की मोठेपणा वाटतो, इम्पोर्टेड वस्तू म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, मॅकडोनल्ड, पिझ्झा यांचं आकर्षण वाटतं हे देशाचं दुर्देवं आहे.

शाळेतून बाहेर पडल्यावर खऱ्या शिक्षणाची, अर्थपूर्ण जगण्याची तळमळ असलेली मुलं स्वतःच्या हिंमतीवर हिंडताहेत, चांगल्या माणसांना भेटत आहेत, चांगलं काम करणाऱ्या शाळांमध्ये, संस्थेमध्ये रहात आहेत जंगलामधून फिरत आहेत, देश समजून घेत आहेत, इथल्या मातीची ओळख करून घेत आहेत. वरवरच्या दिखाऊपणाला सोडून देऊन साधेपणाकडे जात आहेत, स्वतःला शोधत आहेत. हे खरं शिक्षण आहे. ते शाळेतच अनुभवताच येईल तो खरा सुदिन.

निदान शाळेनं एवढंतरी करावं आपले पास–नापासचे शिक्के मुलांवर मारू नयेत आणि प्रत्येकाच्या आतलं जे फुलपाखरू आहे, तेवढं जपावं! त्याला बाहेर येऊ दिलं तर ते उडणारचं आहे दूरवरचा पल्ला गाठण्यासाठी!

Read More blogs on Parenting Here