प्रजासत्ताक दिनाची माहिती
- प्राजक्ता देशपांडे
भारताचे राष्टीय सण कोणते हे विचारल्यावर आपण लगेच सांगतो, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी. स्वातंत्र्य दिन म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला. पण २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन म्हणजे नक्की काय? या प्रजासत्ताक शब्दाचा अर्थ काय ? नक्की काय ऐतिहासिक घटना या दिवशी घडली म्हणून २६ जानेवारी हा दिवस पण प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो ? हेच आपण आज जाणून घेऊ या.
प्रजासत्ताक दिन हा भारताच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. प्रजासत्ताक म्हणजे सत्ता प्रजेच्या हातात, म्हणजेच असे राज्य जेथे सर्व सत्ता जनतेच्या हातात असते.याचाच अर्थ असा की प्रजासत्ताक देशात, देशाचा प्रमुख ठराविक काळासाठी लोकांनी निवडून दिला असतो. भारताला 15 ऑगस्ट 1947, रोजी ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. पण कुठलीही संस्था मग ती शाळा असो, महाविद्यालय असो, कार्यालय किंवा ऑफिस असो किंवा देश असू दे त्याला योग्य रीतीने चालवण्यासाठी आपण काही नियम आणि अटी ठरवतो आणि ते मोडल्यास त्या संदर्भांतली शिक्षा सुद्धा ठरवतो. थोडक्यात काय एक नियमावली ठरवली जाते ज्याचं सर्वानी पालन करणं आवश्यक असत. तसंच एखादा देश अथवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले मूळ नियम, आदर्श, अटी यांचा एकत्रित लिखित संच ज्याला संविधान म्हणतात. हे नियम एकत्रितपणे राष्ट्राचे अस्तित्त्व ठरवतात. 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान लागू झाले. या दिवशी भारताला एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले.
पण २६ जानेवारीचं का?
स्वातंत्र्य मिळण्याआधी १९३० साली लाहोर येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची मागणी इंग्रंजांकडे करण्यात आली आणि तो दिवस होता २६ जानेवारी. याच दिवशी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांनी एकत्र येऊन ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड केले होते त्यामुळे 26 जानेवारी ही तारीख भारतीय स्वातंत्र्य संग्रामात एक महत्त्वपूर्ण दिवस म्हणून ओळखली जाते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक स्वतंत्र संविधान तयार करण्याचे काम सुरू झाले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने संविधान स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान लागू झाले.
भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. भारत देश स्वतंत्र झाल्यावर संविधान तयार करण्यासाठी एक समिती (committee) स्थापन करण्यात आली आणि या समितीचे अध्यक्ष होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. हे संविधान लिहिण्यासाठी तब्बल ६ महिने लागले. संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते, तेथील नागरिकांनानागरिकाचे न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्व जपण्याची हमी देते. भारतीय संविधान हे देशाच्या विकासाचा रोडमॅप आहे. हे संविधान आपल्या देशाच्या लोकशाही, एकता आणि अखंडतेचे रक्षण करते.
भारतीय संविधान हे भारतीय नागरिकांच्या स्वातंत्र्य आणि त्याच्या लोकशाहीच्या आधाराचे रक्षण करते. पण लोकशाही आणि स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय?
लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी आणि लोकांसाठी असणारे शासन. याचा अर्थ, शासनातील सर्व महत्त्वपूर्ण निर्णय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून घेतले जातात. लोकप्रतिनिधी हे लोकांनी लोकांच्यातून निवडून दिलेले प्रतिनिधी असतात.
स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही प्रकारच्या बंधनाशिवाय आपल्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा अधिकार. यात राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य समाविष्ट आहे.
लोकशाही आणि स्वातंत्र्य हे एकमेकांना पूरक आहेत. लोकशाहीशिवाय स्वातंत्र्य पूर्णपणे अनुभवता येत नाही आणि स्वातंत्र्याशिवाय लोकशाहीची कल्पनाच करता येत नाही.
भारतीय संविधानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे म्हणूनच हे लागू होण्याचा दिवस, २६ जानेवारी हा एका राष्ट्रीय सणासारखा संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस देशभक्ती, एकता आणि लोकशाही मूल्यांचा उत्सव असल्याने वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारे हा दिवस साजरा केला जातो.
राष्ट्रीय स्तरावर:
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी राष्ट्रपती, राजपथवर राष्टीय ध्वज फडकवतात, त्यानंतर देशाचे राष्ट्रपती नागरिकांना संबोधित करतात आणि देशाच्या प्रगती आणि भविष्याबद्दलचे दृष्टिकोन सांगतात. भारताची राजधानी दिल्ली येथे राजपथावर भव्य लष्करी परेड आयोजित केली जाते. यात देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांची परेड, लढाऊ विमानांचे हवाई प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतात. भारतातील विविध राज्य आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करतील असे चित्ररथ तयार करतात आणि त्या चित्ररथाचे संचलन सुद्धा या परेड मध्ये समाविष्ट असते.
या शिवाय वर्षभरात अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या १६ वर्षाखालील बालकांची निवड राष्ट्रीय शौर्य पुरस्कारसाठी केली जाते. पुरस्कारप्राप्त मुले सुद्धा या संचलनात सजवलेल्या हत्तीवरून सहभागी होतात.
राज्य स्तरावर
दिल्लीप्रमाणे देशाच्या इतर राज्यात सुद्धा राज्यपाल ध्वज फडकवतात आणि त्या त्या राज्यातील लोकांना संबोधित करतात. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात.
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुद्धा राष्ट्रीय ध्वज फडकवला जातो. विद्यार्थी देशभक्तीपर गीत, नृत्य आणि नाटक सादर करतात.देशभक्ती आणि राष्ट्रीय एकतेवर आधारित अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात.
आजकाल समाजात काही घटक प्रजासत्ताक दिन काही सामाजिक उपक्रम राबवून साजरा करतात. स्वच्छता अभियान राबवून परिसराची स्वच्छता केली जाते. तसेच अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर, वृक्षारोपण यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी मोफत सामाजिक सेवा करून गरजू लोकांना मदत केली जाते.
प्रजासत्ताक दिन हा केवळ एक दिवस नाही, तर आपल्या देशाच्या लोकशाही मूल्यांचा आधारस्तंभ आहे. या दिवशी आपण स्वातंत्र्यसैनिकांना वंदन करतो आणि आपल्या देशाच्या संविधानाचे रक्षण करण्याची शपथ घेतो.आजच्या काळात विविधतेने नटलेल्या आपल्या या देशात हा दिवस आपल्याला विविधतेत एकता साधण्याचा संदेश देतो. जागतिकीकरणाच्या काळात भारताची एक सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करण्यात मदत करतो. आजच्या युवा पिढीला लोकशाही मूल्यांचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी हा दिवस एक उत्तम माध्यम आहे. आपल्या मूलभूत अधिकारांविषयी जाणीव निर्माण करणारा हा दिवस आहे.
प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाच्या लोकशाहीचे तत्त्वज्ञान सांगणारा दिवस आहे. या दिवशी आपण आपल्या देशाच्या विकासात योगदान देण्याची शपथ घेऊया. आपण आपल्या शिक्षणात लक्ष केंद्रित करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया आणि आपल्या समाजाच्या विकासासाठी काम करूया. या देशाला उज्ज्वल भविष्य देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करूया. जय हिंद!"
Read More blogs on Parenting Here