लेखक :  शोभा भागवत


एक पालक बालभवनात माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, “माझ्या मुलाला त्याचा गट बदलून हवा आहे.” मी विचारलं, “ काय म्हणतो तो? का बदलायचाय गट?’’ तर त्या म्हणाल्या, “तो म्हणतो की our teacher does not respect the children ” मी त्याचा गट बदलून दिला; पण मनात म्हटलं, का बरं त्या ताईला मुलांबद्दल आदर वाटत नाही? का ती त्यांचा सन्मान जपत नाही? याचा अर्थ तिला शिकवण्यात मी कमी पडले आहे. त्या मुलाचं मला कौतुक वाटलं. तो हे म्हणू शकला याचा अर्थ मोठ्यांनी मुलांचा सन्मानजपणं म्हणजे काय, हे त्याला माहीत होतं.

मुलांवर प्रेम करा, असा आपल्याला खूपदा ऐकायला मिळतं; पण मुलांचा सन्मान जपा, त्यांना आदरानं वागवा, हे क्वचितच सांगितलं जातं. हे पार लहानपणा पासून होत असतं. लहान बाळ आपल्या सर्वांनाच आवडतात; पण ते बाळ एखादी गोष्ट तोंडात घालू लागलं की किती हिंसकपणे आजूबाजूची माणसं त्याच्या हातातून ती वस्तू काढून घेतात किंवा त्याला ओरडतात. ते बिचारं अचंब्यानं बघू लागतंकीयात आपलं काय चुकलं? त्याला तर तोंडात घालून चव घेतल्याशिवाय वस्तू कळत नाही. तो त्याच्या शिकण्याचा एक मार्ग असतो. मग ते बाळ ज्या वस्तू तोंडात घालेल त्या स्वच्छ ठेवणं आपलं काम आहे ना? ते करण्याऐवजी त्या बाळालाओरडणं हा आपला ‘शॉर्टकट’ असतो. त्यात त्या बाळावर आपण मानसिक आघात करत असतो. त्या वयात खरं तर अमुक वस्तू तोंडात घालू नको, हे सांगूनही काही उपयोग नसतो. ते त्याला नाहीच कळत, त्यामुळे मूल शिकेल असं वातावरण जपणं आणि त्या परिसराची काळजी घेणं, हेच आपल्या हातात असतं.

लहान मुलांना होणारे अपघात पाहिले तर त्यात क्वचितच मुलाची चूक असते. दहा दिवसांच्या बाळाला मांडीवर घेऊन आई गरम चहा पीत होती आणि चहा बाळाच्या अंगावर सांडला, बाळ भाजलं यात त्याची काय चूक? आईनं कपाळाला लावलेले छोटी टिकली पडली आणि बाळाच्या डोळ्यात गेली यात आईनं घ्यायची काळजी अधिक आहे. आईचं कानातलं छोटं होतं. ते कानातून सहजनिघणारं होतं. ते बाळानं काढलं आणि गिळलं, यात बाळाची काय चूक?

मूल वाढत असताना काही चुका आपण स्वतः सुधारायच्या असतात तर काही चुका त्यानं करू नयेत, यासाठी त्याला सांगावं लागतं, समजवावं लागतं. तिसरी-चौथीत घडलेला एक प्रसंग मला अजून जसाच्या तसा आठवतो. आमच्या शाळेत बाकं नव्हती. जमिनीवर ओळीनं बसून परीक्षा देणं चालू होतं. पाटीवर काहीतरी लिहीत होतो आम्ही. माझ्या पुढचा मुलगा खरं तर माझ्या इयत्तेतलाही नव्हता; पण त्यानं पाटीवर काही तरी चित्र काढलं होतं. मी ते डोकावून पाहत होते तर आमच्या गुरुजींना वाटलं की मी कॉपी करते आहे. त्यांनी समोर उभं केलं आणि काय झालं वगैरे काहीही न विचारता “ही मुलगी चोर आहे’’ असं वर्गाला सांगितलं. हा माझ्या मते अन्याय होता; पण मला बोलायची काहीही संधी त्यांनी दिली नाही. शिक्षकांच्या असा बाणेदारपणाचा चांगला परिणाम मुलांवर होत नाही, असंच मला आजही वाटतं. माझ्यासारख्या मुलीला त्यांनी जरी समजावून सांगितलं असतं की “तू जरी चित्र पाहत होतीस तरी मला वाटलं की तू त्याचं बघून परीक्षेतलं लिहिते आहेस. असं करायचं नसतं, त्यामुळे एवढी काळजी घे’’ तर तेवढं मला पुरलं असतं. त्यासाठी माझा असा अपमान करण्याचं कारण नव्हतं. परत त्यांचं संवादकौशल्य ही एवढं कमी दर्जाचं होतं की वर्गाला या घटनेतून काहीच शिकायला मिळालं नाही.‘चोर आहे’ म्हणजे काय? त्यांनी वर्गालाही ते शिकवण्याची संधी घालवली. सर्वांनाच समजावून देता आलं असतं की ‘’तुम्हालाही कधी तरी वाटेल आपण कुणाचं तरी बघून लिहावं. मार्क मिळवावेत; पण असं कधीही करायचं नसतं. त्यात आपला फार तोटा असतो. हा खोटेपणा असतो. तो कधी करायचाच नाही असं सगळे ठरवून टाकाल का?

याउलट आमचे एक सर होते.नववी – दहावीला ते शिकवायचे. त्यांच्याकडे एक बाई तक्रार घेऊन आल्या. ‘’माझ्या मुलाला तुम्ही चांगलं मारा. तो अभ्यास करत नाही. तो माझं ऐकत नाही. घरात काही काम करत नाही. नुसत्या उनाडक्या करत गावभर फिरत असतो. ’’सर त्यांना म्हणाले,‘’उद्या त्याला माझ्याकडे पाठवा.मी त्याला घेऊन इंग्रजी सिनेमा बघायला जातो. ’’सरांना ठाऊक असावं की असं वागणारी आई असली की मुलांना कुणीतरी प्रेमानं वागवणारं, बोलकं करणारं माणूस हवं. त्या मुलाला त्याच्या नेहमीच्या तणावपूर्ण वातावरणातून बाहेर काढण्यासाठी सरांनी त्याला सिनेमाला घेऊन जायचा मार्ग काढला असावा. मुलांचा सन्मान जपण्याचा हाही एक मार्ग आहे.

यासंदर्भात मला एक गोष्ट फार आवडते. एक शिबीर होतं. पंचवीस-तीस मुलं एकत्र राहत होती. रोज मुलं एका मुला विषयी तक्रार करत होती की तोचोऱ्या करतो. असेसहा – सातदिवस गेले. शिक्षकांनी तक्रारीकडे लक्ष दिले नाही. तेव्हा आठव्या दिवशी मुलं म्हणाली,‘’रोज आम्ही त्याच्या विषयी तक्रार करतो तरी तुम्ही त्याला शिक्षा करत नाही. आमच्या वस्तू चोरीला जातायत. आज आम्ही सगळ्यांनी शिबीर सोडून निघून जायचं ठरवलं. ’’ शिक्षक शांतपणे म्हणाले, ‘’तुम्ही तसा निर्णय घेतला असेल तर जरूर जा. हे शिबिर त्या एका मुलांसाठीच आहे. ’’ हे ऐकून तो मुलगा पुढे आला. रडू लागला. तेव्हापासून चोऱ्या बंद झाल्या.

त्या शिक्षकांनी काय केलं? शिक्षा केली नाही. अपमान केला नाही. प्रवचन दिलं नाही. फक्त समाजशील कृती केली. एक प्रकारे त्या मुलाचा सन्मान जपला आणि त्याला स्वतःला आपण बदलावं, असं वाटेपर्यंत वाट पहिली. नाही तरी आपण मोठी माणसं सुद्धा स्वतःला आतून वाटल्याशिवाय आपलं वागणं कुठे बदलतो?

चुकांच्या बाबतीत मुलं काय विचार करतात याचं सुंदर उदाहरण एका पालक बाईंनी सांगितलं होतं. मी एकदा सहा कपबश्या विकत आणल्या. त्याच दिवशी माझ्या आठ वर्षाच्या मुलानं एक कपबशी फोडली. मी कधीच ओरडत नाही, रागवत नाही. मी त्याला म्हटलं,‘’बघ ना मी आजच नव्या कपबशा आणल्या आणि तू एक फोडलीस. आता तुझी तू काहीतरी शिक्षा करून घे. ’’ तो म्हणाला, ‘’मी त्या कोपऱ्यात दहा मिनिटं उभा राहतो भिंतीकडे तोंड करून’’ त्यानं स्वतःला शिक्षा करून घेतली आणि मग तो खेळायला गेला. दुसऱ्या दिवशी असं झालं की माझ्या हातून ट्रेच खालीपडला आणि उरलेल्या पाचही कपबशा फुटल्या. आता काय करावं? मी त्याला बोलावलं आणि सांगितलं, ‘’ बघ ना. तू एक कपबशी फोडलीसतर लगेच आज मी पाच फोडल्या, आज तू मला शिक्षा कर. त्यांना काय शिक्षा केली असेल मला? तो हसला आणि मला म्हणाला,‘’आई मी तुला का$$ही शिक्षा करणार नाही. आता तुला कळलं का असं होतं? अगं! कुणी मुद्दाम नाही करत.”

हा प्रसंग मी जेव्हा जेव्हा पालक-शिक्षकांच्या शिबिरात सांगते तेव्हा अनेकांचे डोळे पाणावतात. जे आठव्या वर्षी त्या मुलाला कळलं होतं ते त्याच्या आईला 28 व्या वर्षी कळलेलं नव्हतं.

शाळेत मला नेहमी नवल वाटायचं. माझा मोठा भाऊही त्याच शाळेत होता. मला जे शिक्षक खूप आवडतते त्याला मुळीच आवडत नसत. तो म्हणायचा ते फक्त हुशार मुलांना चांगलं वागवतात. आम्हाला नाही चांगलं वागवतं.

हे घरातही होतं. हुशार मुलांना घरात सगळे चांगलेच वागवतात. शाळेत फार मार्क न मिळवणाऱ्या मुलांना दुजाभाव वाट्याला येतो. अनेकघरांत ही हुशार मुलं मोठी झाली की परदेशात निघून गेलेली आढळतात आणि म्हाताऱ्या आई-वडिलांना सांभाळतात लहानपणी दुजाभाव वाट्याला आलेली मुलं. त्यांना काय काय आठवत असेल तेव्हा?

वर्गात मैत्रिणीशी बोलल्या बद्दल तिसरीत मी पट्ट्या खाल्ल्या होत्या. मात्र कॉलेजमध्ये असताना आमचे सर वसंत बापट कविता शिकवत होते.‘’ हृदय कशास चोरिलेस सुंदरी? दे दे. न देसी तरी तुझे तरी दे ‘’अशा ओळी होत्या. मी मैत्रिणीशी बोलत होते तर सर हसून म्हणाले,‘’तुम्हाला हा विनिमय फारच पसंत पडलेला दिसतो आहे! ’’ हीदेखील चूक लक्षात आणून देण्याची सुंदर पद्धत!

खेळ शिकवणाऱ्या शिक्षकांचं मला नेहमी नवल वाटतं. शिकवण्याच्या नावाखाली ते मुलांना मारतात. शिक्षा करतात.त्यांच्या शिक्षा पाहिल्या तर कोणत्या शिक्षांनी मुलांना येत नसतं ते येणार आहे, असा प्रश्न पडतो.

मुलाला मल्लखांब येत नाही म्हणून एक सर इतर मुलांना घेऊन त्या मुलाला एकेक थोबाडीत मारायला सांगत. याने त्या मुलाला मल्लखांब येणार असतो का? दुसऱ्याला मारणाऱ्या मुलांच्या मनात किती हिंसानिर्माण होत असेल आणि मार खाणाऱ्या मुलाच्या मनात किती राग साठत असेल!

गृहपाठ केला नाही म्हणून शाळेत शिक्षा होतात. आपसात मारामारी केली की शिक्षा होतात. शिक्षकांची चेष्टा केली की शिक्षा होतात. शाळेत काही तोडमोड केली तर शिक्षा होतात. तर अशा अनेक कारणांसाठी घरीही शिक्षा होता. शाळेत पट्टीनं मारतात, कानाखाली आवाज काढतात, पायावर मारतात, वेताच्या छडीनं मारतात, अंगठे धरून उभं करतात, ड्रॉवरमध्ये बोट अडकवून ड्रॉवर लावतात, भिंतीवर डोकं आपटतात, उलट्या हातावर काठी मारतात, पट्ट्यानं मारतात. लाथ मारतात, कपडे काढून फिरवतात, गळ्यात पाटी अडकवून फिरवतात, कितीतरी शारीरिक इजा करणाऱ्या, मानसिक जखमा करणाऱ्या शिक्षा काही शिक्षक शोधून काढतात. काही पालक यात मागे नसतात.

प्रश्न असा आहे की शिक्षा करून मुलं बदलतात का? त्यांच्या मनात काय चालतं शिक्षा भोगताना? त्याच्या परिणामांचा कोण विचार करणार? केवळ मुलाचा आकार आपल्यापेक्षा लहान आहे म्हणून त्याला शिक्षा करायची का? शॉर्टकट म्हणून शिक्षा करून मोकळं व्हायचं का? आमच्यावर ताण नसतात म्हणून त्या जबाबदारीतून मोकळं व्हायचं का?

मुलांचे वर्तन आणि त्यामागचा विचार बदलण्याच्या इतर मार्गांचा विचार व्हायलाच हवा. मुलासाठी वेळ द्यायला हवा. त्याला अनेक गोष्टी समजावून सांगता यायला हव्यात. गंभीर प्रश्नात समुपदेशकाची मदत घ्यायला हवी. मारण्याने मुलं सुधारत नाहीत.

मुलांचे वर्तन आणि त्यामागचा विचार बदलण्याच्या इतर मार्गांचा विचार व्हायलाच हवा. मुलासाठी वेळ द्यायला हवा. त्याला अनेक गोष्टी समजावून सांगता यायला हव्यात. गंभीर प्रश्नात समुपदेशकाची मदत घ्यायला हवी. मारण्याने मुलं सुधारत नाहीत.

अनेकदा बायका सांगतात. नवरा मारत नाही. दारू पीत नाही; पण त्याला बायकोविषयी आदर नाही. मग तो अनादर त्याच्या वागण्या-बोलण्यात दिसतो. शारीरिक व्यवहारात दिसतो. बायको आजारी असली तर तो कसावागतो त्यात दिसतो. हा अनादर मनाला कुरतडत राहतो.

आपल्याकडे मोठ्या माणसांनाही एकमेकांचा सन्मान जपण्याचं वळण नसतं. सरकारी कचेऱ्यांमध्ये कसं वागवतात येणाऱ्या माणसाला? शाळांमध्ये पालकांना कसं वागवतात? बँका, इतर संस्था, कितीतरी उदाहरणे देता येतील. मुळात आदर मनात असला तर वागणं नीट होईल.

म्हणूनच ‘’ माझ्या शिक्षिकेला मुलांविषयी आदर नाही’’ म्हणणाऱ्या त्या मुलाचं मला कौतुक वाटलं. आदर असला तर माणसाचं मुलांशी वागणं बदलेल. शिक्षा होणार नाहीत. मारहाण होणार नाही.मुलांचा सन्मान जपला जाईल.

Read More blogs on Parenting Here