लेखक : शोभा भागवत
डॉ. ए . पी . जे . अब्दुल कलामांना कुणीतरी विचारलं “काही माणसं थोर होतात आणि काही क्षुद्र राहतात असं का ?” ते म्हणाले, ” प्रत्येक माणसाच्या आत थोरपणा आणि क्षुद्रपणा असतो. जी माणसं आतल्या थोरपणाला प्रतिसाद देतात, ती थोर होतात आणि जी क्षुद्रपणालाच प्रतिसाद देत राहतात ती क्षुद्र होतात.”
महात्मा गांधी जेव्हा वकिली करत असत तेव्हा त्यांच्याकडे आलेल्या अशीलांनी कोर्टात जाऊ नये, सामंजस्यानं झगडे मिटवावेत असा प्रयन्त ते करत. त्यांनी जर सर्वाना कोर्टात जाण्याचे सल्ले दिले असते तर ते एखादा यशस्वी वकील झाले असते पण महात्मा झाले नसते.
ताराबाई माडेकांपुढे जेव्हा मुंबईत राहून शाळा चालवायची? की कोसबाडला जाऊन कष्टात राहून आदिवासींना शिकवायचं? असे दोन मार्ग आले असतील तेव्हा त्या मुंबईतच राहिल्या असत्या तर शिक्षणतज्ञ झाल्या नसत्या, शाळेच्या संचालिका राहिल्या असत्या.
पुण्यात आमचे दंततज्ज्ञ मित्र आहेत. ते मनापासून ते व्यवसाय करतात ! आला पेशंट की कापा त्याला, पैसे उकळा असा विचार त्यांच्या मनाला शिवत नाही. आवश्यक ती सर्व उपकरणं त्यांच्याकडे असतात पण उगाचच भपकेबाज, ए .सी. दवाखाना, संगीत लावलेलं वगैरे नखरे नाहीत.
योगायोगानं त्यांच्या लेकीशी माझा संपर्क झाला. ती आमच्या संस्थेत काहीकाळ काम करत होती. अतिशय सरळ आणि गोड मुलगी. पुढे तिचं लग्न झालं. दोन वर्षांनी दिवस राहिले आणि तिच्या डॉक्टरांनी तिला सांगितलं की जुळी मुलं होणार आहेत. साहजिकच कुटुंब थोडं काळजीत पडलं. प्रश्नाचे बाऊ करणारं हे कुटुंब नाही. या मुलीचा धाकटा भाऊ इंजिनियर. नोकरी करणारा. त्यानं हा प्रश्न लक्षात घेऊन असं म्हटलं "ताईला दोन बाळं होणार आहेत तर मी सहा महिने नोकरी सोडून देतो आणि घरात लागेल ती मदत करतो."
मी जेव्हा डॉक्टरांकडून हे ऐकलं तेव्हा मला आतून भरून आलं. एकतर आपल्याकडे कायम घरातल्या मुलींनीच अनेक गोष्टीचा बळी देण्याची पद्धत. त्यात या कुटुंबातला हा मुलगा आपणहोऊन नोकरी सोडून ताईला मदत करीन, तिची बाळं सांभाळीन म्हणतो म्हणजे धन्यच!
मला वाटलं डॉक्टरांच्या मुलानं त्याच्या आतल्या थोरपणाला प्रतिसाद दिला. तो थोरपणा त्याला म्हणाला असेल, “ताई बाळंतपणाला येईल, बाबा व्यवसाय सांभाळून किती धावपळ करतील? आईवर केवढा ताण येईल ! अशा वेळी आईची तारांबळ पाहून ताईपण विश्रांती घेऊ शकणार नाही. घरचं एक माणूस जास्तीचं घरात असलं तर सगळंच सोपं होईल. आपण मदत करणं हाच एक मार्ग.”
एरवी काही कुटुंबामध्ये अशा प्रसंगी नात्यातली कुणी रिकामी बाई मदतीला येईल का? असा शोध सुरू झाला असता. पैसे देऊन बायका नेमणं हा प्रयोग झाला असता. जावयानं रजा घ्यावी, हा प्रस्ताव झाला असता. तरुण मुलगा कसा काय नोकरी सोडेल? याचा बाऊ झाला असता आणि मुलगा काय मदत करणार बाळंतपणात ! त्यांना कुठे कशाची सवय असते असाही कौतुकाचा स्वर निघाला असता.
पण या मुलानी प्रश्नच सोपा करून टाकला. तो नुसता नात्यानं मामा झाला नाही तर त्या नात्याची जबाबदारी त्यानं निभावली. माझ्या करिअरचं काय ? ही नोकरी सोडली तर पुन्हा चांगली नोकरी मिळेल कशावरून? इतक्या मुलींची बाळंतपण होतात. त्यांचे भाऊ काय मदत करतात का? मी कसा लहान बाळ सांभाळणार ? असे क्षुद्र विचार त्यानं केले नाहीत. स्वतःमधल्या थोरपणाला तो जागला आणि त्यानं आपल्या आई – वडिलांच्या मनातही एक खास जागा निर्माण केली.
आपल्या जवळच्या प्रेमाच्या माणसांसाठी जीव कसा तुटतो! ते या मुलानं कुटुंबात पाहिलेलं आहे. डॉक्टर स्वतःच नेहमी त्यांचे वडील, मोठा भाऊ, वहिनी यांच्यांबद्दल अतिशय आपुलकीनं बोलतं असतात. असं नेहमी जाणवतं की हा माणूस चांगला माणूस आहे म्हणूनच तो चांगला डॉक्टर आहे. हा माणूस जबाबदार पिता आहे, म्हणूनच तो जबाबदार व्यावसायिकही आहे.
त्यांच्या लेकानं हा निर्णय घेतला आणि त्या निर्णयामागचं हे कुटुंबातल्या वातावरणाच्या मुळांचं जाळ मला दिसू लागलं. त्यात त्याच्या आईचाही वाट असणारच. ही बाळं मोठी होत असताना त्यांना त्यांची आई सांगेल, “तुम्ही आलात ना , तेंव्हा मामानं सहा महिने घरी राहून मला मदत केली, तुम्हाला सांभाळलं.” आणि कुणी सांगावं या जुळ्यातला मुलगा मोठेपणी म्हणेलही, ”आई, माझ्या बहिणीच्या बाळंतपणात मी पण सहा महिने तुला मदत करीन बरं का !”
स्वतःमधल्या थोरपणाला प्रतिसाद दिला तर थोरपणाचा एक प्रवाह समाजात वाहू लागतो, वाढत जातो !
Read More blogs on Parenting Here