लेखक :  स्वाती उपाध्ये


‘गोष्ट’ प्रत्येकालाच आवडते, ऐकायलाही आणि सांगायलाही. गोष्ट, आपल्या आयुष्यात अगदी बाळ असल्यापासून येते. बाळाची या गोष्टींशी घट्ट मैत्री असते. मम् मम् भरवण्यापासून ते गाई गाई करेपर्यंत गोष्टी सोबत असतात आणि त्या बाळांशी बोलतही असतात. अगदी चिऊ-काऊच्याच गोष्टींचं उदाहरण बघा ना- ‘एक घास चिऊचा’ असं म्हणत, एकेक घास प्रेमाने भरवत, आई आहाराचे महत्त्व नकळतपणे पटवून देत असते. जगाशी अनभिज्ञ असलेल्या बाळांना हळूहळू नाती, प्राणी, निसर्ग अशा बऱ्याच गोष्टींचे ज्ञान या गोष्टींमधूनच होत जाते. केवढं सामर्थ्य आहे ना या गोष्टींमध्ये !!

या गोष्टी अगदी सजगपणे मुलांना सांगितल्या, मुलांबरोबर अनुभवल्या की सहजतेने मुलांवर संस्कार तर घडतातच; शिवाय पालक- मूल या नात्याचा गोफ अगदी सुंदर विणला जातो. सगळ्या पालकांना आपल्या मुलांना किती किती अन् काय काय सांगायचं असतं, शिकवायचं असतं! ते गोष्टीच्या माध्यमातून शिकवता आलं की रंजकही होतं आणि सोपंही. कितीतरी मूल्यांची रुजवण लहान वयात करायची असते. त्यासाठी ‘गोष्ट’ हे माध्यम सगळ्यात प्रभावी आहे, नाही का ? फक्त प्रत्येक वेळी गोष्ट सांगून झाल्या झाल्या त्याच्यातील बोध, मूल्य, तात्पर्य मुलांकडून घोकून न घेता, अगदी रोजच्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या प्रसंगांवेळी त्या त्या गोष्टींचा आधार घेत, मुलांमध्ये ते मूल्य कसं रुजलंय ते ओळखता यायला हवं.

गोष्ट सांगण्याची ‘कला’ जमली की मुलांच्या मनात विचार सुरू होतात. गोष्टीतून मुलं आपोआप शिकत जातात; त्यासाठी गोष्टींमधून त्यांचं कुतूहल जागं होतंय का? त्यांना काही प्रश्न पडतात का ? त्या प्रश्नांची उत्तरं त्यांचे तेच शोधत आहेत का? याकडे अगदी उत्सुकतेने, कुतूहलाने बघण्यातही वेगळी मजा असते. एकदा का आपल्याला यात मजा येऊ लागली की आपण या गोष्टींमधून मुलांशी भरपूर, उत्तम आणि सकारात्मक सुसंवाद साधू शकतो. आपला मुलांबरोबरचा हा गोष्टींमधला संवाद आपल्यालाही तणावमुक्ततेचा अनुभव देतो; शिवाय मुलांनाही अशा तणावांचं, भावभावनांचं नियोजन कसं करायचं, ते हसत खेळत सांगू शकतो.

गोष्टी या खरंच हसत हसत अनेक भावभावनांची, नात्यांची, संस्कृतीची, व्यक्तिमत्त्वांची, स्वभावांची, भाषेची ओळख करून देतात. संवादासाठी भाषेशी ओळख व्हायला लागते, त्यासाठी शब्दांची किमया कळायला लागते, अक्षरांशी मैत्री व्हायला लागते आणि हे सगळं गोष्टीतून जादूसारखं घडू शकतं. गोष्टीतील नवीन नवीन शब्द मुलं बोलताना अगदी सहजतेने उच्चारू लागतात. त्यासाठी गोष्टी ‘ऐकण्याची’ कला त्यांचे ते जमवू लागतात; ज्यातून ‘एकाग्रता’ हा गुण त्यांना बघता बघता अवगत करता येतो. स्मरणशक्ती, निरीक्षणक्षमता अशांसारखे गुणही हळूच रक्तात मिसळून जातात.

लहानपणापासून मुलांना सक्षमतेचे धडेही या गोष्टीच शिकवतात. अर्थात त्यासाठी गोष्टींची निवड ही योग्य हवी. घाबरणाऱ्या, रडणाऱ्या राजकन्यांच्या गोष्टींपेक्षा उत्तम निर्णयक्षमता असणाऱ्या, धाडसी, साहसी, विचारी मुला-मुलींच्या गोष्टी मुलींना सक्षम तर बनवतीलच; पण मुलांनाही परस्पर-पूरकतेचे धडे देतील. आणि मग मुलांना योग्य-अयोग्य, न्याय-अन्याय, त्याग-स्वार्थ अशा अनेक गोष्टी वेगळ्या सांगायलाच लागणार नाहीत.

हे सगळं घडत असताना त्यांची ‘कल्पनाशक्ती’ उत्तुंग झेप घेत असते. टीव्हीवर किंवा मोबाईलवर गोष्टी ‘बघून’ कल्पनाशक्तीचा वापरच होत नाही; पण गोष्ट ‘ऐकून’, त्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन, मुलं गोष्टींमधील प्रसंगांची, पात्रांची मनातल्या मनात कल्पनाचित्रं रेखाटत असतात. गोष्ट संपल्यावरही त्यांच्या कल्पनांना धुमारे फुटत असतात आणि मग त्यातूनच त्यांच्या स्वतःच्या गोष्टी तयार होतात. त्यातल्या कल्पनाशक्तीचा अविष्कार तर नक्कीच ऐकण्यासारखाच असतो. मुलांनी तयार केलेल्या गोष्टी ‘ऐकणं’ हाही त्यांच्याशी साधलेला एक ‘प्रेमळ संवाद’च की!

पालक या नात्याने, फक्त मुलांच्या मनावर मूल्ये लादण्यासाठी किंवा एक कर्तव्य उरकण्यासाठी नाही, तर मुलांच्या कल्पनाशक्तीला धारदार बनवण्यासाठी, त्यांचं कुतूहल जागं ठेवण्यासाठी, त्यांना योग्य विचार करता यावा म्हणून, त्यांना त्यांच्या त्यांच्या अनुभवातून शिकता येण्यासाठी आणि स्वतःमधील लहान मूल जिवंत ठेवण्यासाठी, दोघांच्याही निखळ आनंदासाठी ‘गोष्टी’ सांगणारे पालक नक्कीच सुंदर अनुभव तयार करत असतात. अशा पालकांचा आणि त्यांच्या मुलांचा आयुष्यभर एक ‘आत्मीय संवाद’ होत राहतो.

– स्वाती उपाध्ये

Read More blogs on Parenting Here