लेखक :  मोहिनी घारपुरे-देशमुख


कोणताही संवाद सुरू होतो जेव्हा आपल्याला त्या संवादाची गरज वाटायला लागते. अनेकदा ही संवादाची गरजच आपल्याला ओळखता येत नाही. अनेक प्रसंगी आपण आपल्या भवतालातील व्यक्तींना, लहान मुलांना गृहीत धरतो आणि अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा मोठं काहीतरी घडतं तेव्हा त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात येतं की हे सगळं वेळीच बोलल्या गेलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती परंतु तोवर वेळ निघून गेलेली असते. पालक-मुलांच्या नात्यात, पालक-शिक्षकांच्या नात्यात आणि दोन पालकांमध्येही हेच होतं. हाच संवाद वेळीच व्हायला हवा.

याची काही प्रत्यक्ष उदाहरणं बघू या !

प्रसंग पहिला :
इयत्ता तिसरीत शिकणारी हिमाली एके दिवशी शाळेतून घरी येताना आईला सांगत होती, “आई, आज आमच्या वर्गात स्वरा आणि गंधालीचं जोरात भांडण झालं आणि भांडणात गंधालीनी चिडून स्वराला ‘मिडल फिंगर‘ दाखवलं”.

(मिडल फिंगर दाखवण्याचा खरा अर्थ एखाद्याला ‘F*** you’ असं म्हणणं आहे. छोट्या मुलांना नक्कीच हा अर्थ माहिती नाही, परंतु ही कृती करून समोरच्याला गप्प करता येतं एवढं ‘ज्ञान’ कदाचित त्यांना या भवतालच्या जगातून मिळालं असावं.)

हिमालीच्या आईने एकदम चमकून हिमालीकडे पाहिलं आणि त्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेत संध्याकाळी तातडीने वर्गशिक्षिकेशी संपर्क साधला. हिमालीची आई पालक-शिक्षक सभेची वर्गप्रतिनिधी होती त्यामुळे तिने इतर पालकांशी याविषयी संवाद साधायचं ठरवलं. मिडल फिंगर दाखवणाऱ्या गंधालीच्या आईला जेव्हा तिने गंधालीच्या या कृतीबद्दल विचारलं तेव्हा तिने ठामपणे नकार देत म्हटलं, “छे … शक्यच नाही, माझी मुलगी असलं काही करूच शकत नाही!”

गंधालीच्या आईने चुकीच्या ठिकाणी आपल्या मुलीची बाजू घेतली. त्यामुळे वर्गशिक्षिका आणि पालक प्रतिनिधी यांच्याशी होणारा पुढचा संवाद तिथेच टळला. खरं तर, गंधाली, हिमाली आणि सगळ्याच वर्गातील मुलामुलींशी, त्यांच्या पालकांशी या विषयावर संवाद व्हायला हवा होता पण तसे झाले नाही.

जेव्हा वर्गशिक्षिकेनी मुलीच्या वर्तनाबद्दल पालकांना कळवले तेव्हा पालकांनी आपल्या मुलीकडून असं काही घडलंय का? हे तपासून पहाणं आवश्यक होतं. विश्वास दाखवण्यापूर्वी एकदा संवादाचं माध्यम वापरून जर घरात संवाद घडवून आणला असता तर ही मुलगी आपल्या पालकांच्याजवळ निश्चितच व्यक्त झाली असती. कदाचित तिने तिची चूकही कबूल केली असती आणि पुन्हा कधीही असं वागणार नाही हे सांगून तिने आपल्या वर्तनात प्रामाणिक बदलही केला असता. पण जेव्हा पालकच मुलांचं चुकीचं वागणं पाठीशी घालतात, तेव्हा पर्यायच उरत नाही. खरोखरंच विषय तिथेच संपून जातात.

पुढे कदाचित गंधालीच्या आईनं तिच्याशी या विषयावर घरात संवाद साधला असेल किंवा नसेलही…!

वर्गाच्या शिक्षिकेने याबद्दल पुढे मुलांशी संवाद साधला असेल का?
पालक प्रतिनिधीने कधी इतर पालकांशी हा विषय बोलून बघण्याचा प्रयत्न केला असेल का?

हे प्रश्नं अनुत्तरितच राहिले.

काय करायला हवे ?

“असे प्रसंग जेव्हा शाळेत किंवा मुलांच्या बाबतीत घडतात तेव्हा अशी कृती मुलांनी कुठेतरी पाहिलेली असते किंवा त्यांच्याच मध्ये कोणीतरी करून दाखवलेलं असतं हे मुळात पालक आणि शिक्षिकेने समजून घ्यायला हवं. या बाबतीत शिक्षकांनी मोकळेपणाने मुलांशी बोलायला हवं. मुलांना समजवून सांगायला हवं की आपण जे शब्द वापरतो किंवा राग, संताप ज्याप्रकारे व्यक्त करतो त्याचा अर्थ काय आहे, तो किती वाईट आहे. यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे आपण काय करू शकतो? याबद्दल मुलांशी बोलायला हवं. ही जागरूकता शिक्षिका आणि पालक या दोघांमध्येही असायला हवी आणि वेळोवेळी त्यावर संवाद व्हायला हवा. ”
– डॉ. श्रुती पानसे

 

प्रसंग दुसरा :
वर्गात एका मुलीला मुलामुलींनी खूप चिडवलं. तिला, “ए टकली, ए मठ्ठं, ए कॉपीकॅट …” असं चिडवत चिडवत मुलं आपला आनंद घेत होती. वर्गशिक्षिकेचं लक्ष नसताना हे सगळं सुरू होतं. संध्याकाळी घरी गेल्यावर ती मुलगी आपल्या आईजवळ हमसून हमसून रडायला लागली. आईने खोदून विचारल्यावर तिनं आईला सगळं सांगितलं. आईने याविषयी वर्गशिक्षिकेकडे तक्रार केली. वर्गशिक्षिकेनं जेव्हा मुलांना खडसावून विचारलं तेव्हा कोणीही कबूल झालं नाही. मुलं म्हणाली, “बाई, आम्ही तर कोणीच तिला चिडवलं नाही!” एकमेकांवर ढकलाढकली करता करता ज्यांची नावं समोर आली त्यांच्या पालकांना शिक्षिकेने फोन केला तेव्हा पालक म्हणाले, “छे … आमची मुलं असं करूच शकत नाहीत, आणि थोडीफार चिडवाचिडवी तर चालतेच लहान मुलांमध्ये, त्याला एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही. उलट त्या मुलीलाच जरा स्ट्राँग व्हायला शिकवा तुम्ही… अशी मुळुमुळू राहील, तर पुढे कसं करेल ती?”

पुढे ती हळवी मुलगी, कदाचित स्वतःला मिटून घेईल. कोणाशी मैत्रीच करू शकणार नाही. तिच्यातला आणि इतर मुलांमधला दुरावा वाढत जाईल आणि तिला चिडवणारी आजची ही लहान मुलंमुली भविष्यात अशीच मोठी होतील. आपण इतके स्ट्राँग आहोत, की आपण दुबळ्या, गरीब, हळव्या लोकांना कमजोर ठरवून त्यांना त्रास देऊ शकतो या त्यांच्यातील विचाराला खतपाणी मिळत राहील आणि यांपैकीच काही मुलंमुली पुढे कदाचित वायाही जातील… कदाचित !

वरील प्रसंगात छोट्या मुलीच्या बाबतीत जे घडलं त्यामध्ये तिला, ‘स्ट्राँग हो!’ म्हणण्यापेक्षा तिला चिडवणाऱ्या मुलांशी पालकांनी बोलायला हवं. तसंच असा प्रकार पुन्हा घडला तर त्या मुलीलाही हे सांगायला हवं की लगेचच आपल्या पालकांना किंवा शिक्षिकेला हे सांगायला हवं.

असाच एक दुसरा प्रसंग म्हणजे, आपल्या मुलाला इतर मुलं खेळताना नेहमी टार्गेट करतात आणि त्याला मारतात असं जेव्हा त्या मुलाच्या वडिलांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी इतर मुलांना जरासं जरबेनं रागावलं. त्यांना वाटलं, मुलं त्यांची माफी मागतील आणि पुन्हा एकत्र नीट खेळायला लागतील. पण इतर मुलांनी त्या मुलाशी खेळणंच बंद केलं, “तुझ्या बाबांनीच आम्हाला रागावलं, त्यामुळे तू आमच्यात खेळायला येऊ नकोस.” असं म्हटलं. खरं तर, मुलांना रागवण्यामागचा त्या पालकाचा उद्देश होता की इतर मुलांनी आपल्या मुलाशी नीट वागावं, त्याला त्रास देऊ नये आणि नीट खेळावं. पण मुलांनी सोपा मार्ग निवडला तो म्हणजे त्या मुलाशी न खेळण्याचा.

काय करायला हवे ?

“मुलं अगदी लहानपणापासूनच इतरांचं बघत असतात मग एखाद्याला चिडवायला लागतात, टार्गेट करतात. असं कोणाच्याही बाबतीत घडू शकतं. बरेचदा याबाबत शिक्षिकांनाही माहित असतं आणि जर माहित नसेल तरी असा प्रकार कळल्यावर पालकांना बोलावून त्यांनी सगळ्यांशी याबाबतीत बोलायला हवं. आपल्याकडे, ‘मुलांचं ऐकून घ्या’ हा भाग खूप कमी आहे या बाजूकडे शिक्षिका आणि पालकांनी लक्ष द्यायला हवे. यातलाच एक जरा वेगळा भाग म्हणजे जेव्हा मोठे गुन्हे होतात, पालकांची तीव्र भांडणं होतात, त्यातून काही चुकीची कृत्यं घडतात आणि मुलं जेव्हा अशा प्रसंगांचे प्रत्यक्ष साक्षीदार असतात तेव्हा अशा क्रिमिनल केसेसमध्ये न्यायलयाने असं म्हटलंय की, ‘मूल जर ८ वर्षाखालील असेल तर ते जे सांगतं ते खरं समजा.’ या वयातली लहान मुलं सहसा खोटं बोलत नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यांचं पूर्ण ऐकून घ्या. तुमचं मूल जर तुमच्याकडे येऊन काही तक्रार करत असेल तर त्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्याच्याशी मोकळेपणाने बोला. त्याला कोणी त्रास देत असेल तर त्याच्याशी संवाद साधा. शिक्षा न करता संवादाद्वारे समजावण्याचा प्रयत्न करा. तो विषय टाळू नका. म्हणजे पुढच्यावेळी तसं घडणार नाही.”
– डॉ श्रुती पानसे

आज अशा कित्येक घटना घडताना आपण बघत आहोत, ज्यात गैरवर्तन हा मुद्दा आहे. यात मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव नाहीच, तर व्यक्ती म्हणून जेव्हा ही लहान मुलं मोठी होऊन समाजात वावरू लागतात तेव्हा त्यांच्या हातून दुसऱ्यांची आयुष्यं उध्वस्त होण्याइतपत गंभीर चुकाही होतात. त्यावेळी वाटतं की यांच्या लहानपणीच यांना कोणीतरी नीट समजवायला हवं होतं, योग्य ठिकाणी कानउघाडणी करायला हवी होती, किंवा कोणीतरी जबाबदारीने समजावून सांगत समजूनही घेणारं हवं होतं.

आपल्या मुलांना लोकांसमोर कशाला उघडं पाडायचं हा विचार पालक करतात आणि मुलांच्या चुकांकडे डोळेझाक करतात. मुलांचं जीवन त्यांनी केलेल्या कृतीतून घडत जातंय ही बाब पालकांच्या लक्षात येत नाही. काही पालक मुलांकडून चूक होऊच नये म्हणून आपल्या मुलांना उठताबसता क्षुल्लक चुकांवरून ओरडतात, चारचौघात त्यांचा अपमान करतात.

ही दोन्हीही टोकं पूर्णपणे चुकीचीच आहेत.

मुळात आपल्या पाल्याकडूनही चूक होऊ शकते याचा स्वीकार पालकांनी करणं फार गरजेचं आहे. तसंच, नुसत्या स्वीकारावर न थांबता, त्याविषयी आपल्या पाल्याशी वेळीच संवाद साधणं, त्याला त्याचं नेमकं काय आणि कुठे चुकलं हे समजावून सांगणं हा संवाद होणं फार फार गरजेचं असतं. पालकांना जर आपल्या मुलांशी संवाद साधता येत नसेल, किंवा ते कठीण जात असेल तर शिक्षकांची, सुयोग्य मित्रांची, समजूतदार नातेवाईकांची किंवा थेट समुपदेशकांची मदत घेणे हेदेखील पर्याय असू शकतात व ते वापरण्यात कमीपणा मानण्याचं काहीच कारण नाही. परंतु, ‘प्रायव्हसी’ म्हणजेच स्वातंत्र्याचा अतिरेक झाल्यामुळे दुसऱ्यांनी कोणीही हस्तक्षेप केलेला पालकांना चालत नाही. आणि या कदाचित यामुळे पालक-मुलांचा संवाद घुसमटतो.

एकाकी पडलेली मुलं आणि मुलांपर्यंत संवादाच्या पातळीवर न उतरणारे पालक असं दृश्य अनेक घरात दिसतं. पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधायला हवा, त्याकरता ‘वेळ’ही काढायला हवा. आपल्या मुलांना व्यक्त होण्यासाठी तसं वातावरण निर्माण करायला हवं, आपल्या भवतालातली अशी काही माणसं आवर्जून आपल्या कुटुंबाशी जोडून घ्यायला हवी. समविचारी आणि चांगली माणसं ही कोणत्याही नात्याशिवायसुद्धा तुमच्या भवतालात असतीलच, त्यांची मदत नक्की घ्या आणि घराघरातला तुमचा संवाद दुहेरी असू द्या, व्यक्त होत राहा.

– मोहिनी घारपुरे- देशमुख

Read More blogs on Parenting Here