लेखक : डॉ श्रुती पानसे
आपल्याला अनेकदा अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं.
- घरातल्या कोणाचा तरी राग अनावर होतो. अवघड परिस्थिती जवळच्यांवर किंवा इतरांवर मनातला राग अक्षरश: फेकला जातो. आदळआपट करून, शिव्या देऊन राग व्यक्त केला जातो.
- दु:खाची गोष्ट घडली तर ती शांतपणे सहन न करता, इतरांवर आगपाखड केली जाते.
- मला तसं म्हणायचं नव्हतं. मला काय बोलायचं असतं हेच मला कधी कधी कळत नाही. …
अशी परिस्थिती का उद्भवते? आपल्याला स्वत:च्या आणि इतरांच्या भावना समजत नाहीत का? समजल्या तरी त्याचं काय करावं हे कळत नाहीत का? अशी परिस्थिती वारंवार का निर्माण होते?
आपण मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक गोष्टी करत असतो. विविध क्लासेसच्या, शाळेच्या फी भरतो. खेळ, कला या सर्व गोष्टी सांभाळतो. हे सगळं करण्यात आपण मागे पडत नाही. पण अनेकदा मागे पडतो ते केवळ त्यांच्या भावना ओळखून न घेण्यात. याचं कारण मुलांना शिस्त लावायची असते. मुलांचे लाड करून चालत नाही. मुलांवर जास्त प्रेम केलं तर ते डोक्यावर बसतील अशा अनेक कारणांनी आपल्याला समजूनसुद्धा आपण त्यांच्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. किंवा अनेकदा आपला त्यांच्याशी पुरेसा संवाद नसतो. त्यामुळे त्यांच्या भावना आपल्यापर्यंत आणि आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत.
भावना या विषयावर नव्या मेंदूसंशोधनाने बराच प्रकाश टाकला आहे. या संदर्भात मेंदूच्या कार्यपद्धतीचा विचार केला तर असं दिसतं, की मेंदूच्या रचनेत भावनेचं एक विशिष्ट क्षेत्र आहे. आपल्या भावनांना एक वेगळी जागा दिलेली आहे. ही जागा म्हणजेच लिंबिक सिस्टीम. आनंद, भीती, दु:ख, प्रेम अशा वेगवेगळ्या छटा इथे निर्माण होतात. बाहेरची परिस्थिती अनुकूल किंवा प्रतिकूल झाली की त्यानुसार आपोआप भावना निर्माण होतात. कधी मनाच्या आतूनही भाव निर्माण होत असतात. भावना निर्माण झाल्या की त्या व्यक्त करण्यासाठी या सिस्टीमकडे शरीर रक्तपुरवठा करतं. म्हणजे समजा, अचानक आपली आवडती मैत्रीण दिसली की, आपण हसतो, हात हातात घेतो. आपल्याला आनंद होतो. अशा क्रिया करण्यासाठी रक्तपुरवठा त्या अवयवाकडेच असावा लागतो.
आपल्याला दु:ख झालं की आपल्या डोळ्यात पाणी येतं. निराशा दाटून येते. जिथे आहोत तिथून दूर निघून जाण्याचा आपण प्रयत्न करतो. यासाठी सुद्धा रक्तपुरवठा लिंबिक सिस्टीमकडेच असावा लागतो.
राग येतो तेव्हा काय-काय घडतं? आपला चेहरा रागीट होतो. रागाने लाल होतो. आवाज वाढतो. हाता-पायाला कंप सुटतो. ठोके वाढतात. भावना उचंबळून आल्यामुळे शरीरांतर्गत बदलाचा परिणाम बाहेर दिसून येतो.
भावना या ब-याचदा बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतात. पण त्यांचं नियमन आपल्या मनाकडे घ्यावं. यावर एक महत्त्वाचं संशोधन डॅनिअल गोलमन यांनी केलं आहे. त्यांनी अभ्यासलेल्या केसेसमधून जे हाती आलं त्यातून त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला. या पुस्तकात डॅनिअल गोलमन बुद्धी, भावना आणि यशाचा संबंध उलगडून दाखवतात.
- माणूस हा भावनांच्या भरात काहीही करू शकतो. बुद्धिमान समजल्या गेलेल्या माणसांच्या हातूनही भावनिक चुका होतात.
- अशा चुका यशाचं रुपांतर अपयशात करू शकतात.
- म्हणून आपल्या भावना हुशारीने, बुद्धीच्या साहाय्याने हाताळल्या पाहिजेत.
- आपल्याला हव्या त्या पद्धतीने भावनांचं नियमन करता येतं. त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात. पण ते जमू शकतं.
गोलमन यांच्या मते योग्य प्रयत्नाने, स्वत:ला भावनिकदृष्ट्या समर्थ करता येतं. आपल्या नकारात्मक भावनांवर मात करून सकारात्मक भावना वाढवता आल्या की व्यक्ती जीवनात यशस्वी होते. म्हणून ते म्हणतात, केवळ बुद्ध्यांकाला काहीच महत्त्व नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपला भावनांक महत्त्वाचा आहे. बुद्ध्यांक वरच्या पातळीवर असेल, परंतु भावनांक कमी असेल तर अशांचं जीवनात यशस्वी होण्याचं प्रमाण कमी असतं. पालक म्हणून ही गोष्ट विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवी.
आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर ती नक्कीच वाढवता येते. ज्यावेळेस पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून आपल्याला आपल्या भावना ओळखता येतील त्यावेळेस आपण मुलांच्याही भावना ओळखू शकू. एवढंच नाही तर त्यांना भविष्यात भावनिक बुद्धिमान करू शकू.
भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी या चार पाय–या आहेत. वाचताना असं वाटतं, की हे सगळं आपण नेहमीच करतो. मात्र खोलात शिरून स्वत:ची चाचपणी केली की सुधारणा नेमकी कुठे करायची आहे, हे नीट लक्षात येतं.
या चारही पाय–या समजून घेऊन त्याप्रमाणे वागणं ही गोष्ट अवघड आहे, पण अशक्य नक्कीच नाही. तसंच हे काम कदाचित झट की पट होणार नाही. स्वत:ला थोडा वेळ द्यावा लागेल. स्वत:वर काम करावं लागेल. मात्र यात फायदा आहेच. आपला आणि आपल्या जवळच्यांचाही !
- स्वत:ला ओळखणं
- स्वत:च्या भावभावना योग्य त्या पद्धतीने नियंत्रित करता येणं
- आसपासच्या माणसांना ओळखता येणं, त्यांचे स्वभाव जाणून घेता येणं.
- आसपासच्या माणसांशी योग्य पद्धतीने व्यवहार करता येणं.
या चारही पाय-यांमध्ये ‘स्वत:’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. बदल घडवून आणायचे तर तो स्व-सूचना पाळून आणि स्वयंप्रेरणेने करावे लागतील.
पालक म्हणून आपल्याला या चार पाय-या समजल्या तर माणूस म्हणून आणि पालक म्हणून स्वत”ला विकसित करू शकू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलं आणि आपण यांच्यात दरी निर्माण होऊ नये हे आपल्याला जमेल.
संदर्भ – दै. लोकमत
Read More blogs on Parenting Here