लेखक :  शोभा भागवत


मुलांशी कसं वागावं, काय बोलावं कळतच नाही, हल्ली मुलं फार हुशार झालीत, हट्टी झालीत, त्यांना फार गोष्टी माहीत असतात, त्यांच्या अपेक्षा वाढल्यात, खर्च वाढलेत असं पालक बोलत असतात. प्रत्येकच पिढी पुढच्या पिढीबद्दल हे म्हणत आली आहे. ही त्यातली गमतीची गोष्ट.

आमच्याच घरातल्या चार-पाच पिढ्या पाहिल्या तर काय आढळतं ? माझी आजी पहिली पिढी. खेड्यात जन्मली, खेड्यात वाढली, लग्नानंतरही खेड्यातच सगळं आयुष्य गेलं. पण मोठा मामा सोडला तर तिच्या चार मुली आणि धाकटा आर्मीत गेलेला मुलगा हे सगळे शहरात गेले. मात्र आजीच्या मनाचा मोठेपणा, इतरांसाठी करण्याची वृत्ती, माणसा माणसात भेदभाव न करणं, सर्वांवर मनापासून प्रेम करणं हे तिच्या मुलांमध्ये, आम्हा नातवंडामध्ये आणि आमच्या मुलांमध्ये बऱ्याच प्रमाणात आलं.

त्यानंतर माझी आई- ती शहरात आलेली पहिली पिढी. तीदेखील आजीचे सर्व गुण घेऊन आली. तिनं शहरात तिचं जग निर्माण केलं. मुलं शिकली पाहिजेत, हा ध्यास घेतला. तिनं मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ठ सोसले. पैसे फार नव्हते पण तिच्या चेहेऱ्यावरचं हास्य मावळलं नाही.

मग आले मी. मला शिकायची आवड आहे हे माझ्या वडलांनी पक्क लक्षात ठेवलं. मी एस.एस.सी. झाले, बी.ए. झाले. आईला वाटायचं, ‘मुलींनी किती शिकायचं ते? बास आता. आता लग्न करून टाकू.’ वडील नाही म्हणाले. तिला हवं तेवढं शिकू दे. लग्न काय होईलच! हे जरा वेगळं घडत होतं. एम.ए ला असताना पत्रमैत्रीतून माझं लग्न मी ठरवलं एका परदेशी असलेल्या भारतीय मुलाशी. आईला खूप काळजी वाटली पण वडलांनी धीरानं लग्नापूर्वीच मला परदेशात धाडलं.

आजूबाजूचे लोक सांगत होते, तो फसवेल. पाठवू नका तिला. पण पाठवलं आणि काही विपरीत घडलं नाही. मी देखील आजीचे, आईचे संस्कार नकळत जपले. मला मिळालेली, मैत्रीतली माणसं ही माझी संपत्ती आहे. ह्या काही धारणांमुळे मला छान काम करता आलं.

नंतरची पिढी माझी मुलगी. ती थोडी माझ्या सासूबाईंसारखी करारी, सडेतोड आहे असं आम्हाला वाटतं पण माणसं जोडण्याची कला तिच्यात आहे. कष्टाला मागेपुढे पाहत नाही. ती देखील माणसं जोडून ठेवते.

मी जेव्हा चार पिढ्यांचा विचार करते तेव्हा मला, शहर का खेडं, शिक्षण किती, नवरा कसा, हे सगळे फरक कमी महत्त्वाचे वाटतात. महत्त्वाचं वाटतं ते आतलं सत्व. थोडाफार फरक असला तरी ते सर्वांच्यात सारखंच आहे असं वाटतं. वरवर पाहायला गेले तर प्रत्येक पिढी जास्त हुषार आहे असं वाटतं पण प्रत्येकाच्या हुशारीची क्षेत्रं वेगळी आहेत.

आता माझा सहा वर्षांचा नातू बुद्धिबळ खेळतो. त्याची आई त्याला म्हणाली “तू काही धड जेवत नाहीस तू प्यादंच राहणार. राजा नाहीच होणार” त्यावर तो मान वर न करता बुद्धिबळाच्या पटाकडे पाहातच म्हणाला “तुला कोणी सांगितलं प्यादं कमकुवत असतं म्हणून? एक तर प्यादं एकटं कधी नसतं आणि ते दुसऱ्या बाजूच्या शेवटापर्यंत पोहोचलं तर त्याचा वजीर होतो, तो ताकदवान असतो. उलट राजा सगळ्यात कमकुवत असतो. तो एकच घर जाऊ शकतो त्यामुळे त्याला सारखा स्वतःचा बचाव करावा लागतो.” हे इतक्या हुषारीचं सहाव्या वर्षी आम्ही कोणीच काही बोललो नव्हतो.

मात्र प्रत्येक पिढीतली हुशारी वेगळी होती. आजीला सवत होती. तिला मूल झालं नाही म्हणून तिनंच ही मुलगी (माझी आजी) शोधली आणि नवऱ्याचं लग्न लावून दिलं. तिला झालेली सहा मुलं तिनंच सांभाळली कारण आजी वयानं लहान! आता ही बाई बुद्धिबळ खेळली नसेल तरी तिला किती बुद्धी लागली असेल संसार करायला !

आजी तिच्या नवऱ्यापेक्षा लहान त्यामुळे तिच्या तरुणपणी आजोबा गेले. तिनं मुलांना वाढवलं. शेती जपली. एका मुसलमान मुलाला आपला मुलगाच मानला. त्यानं शेती पहिली, संसारात मदत केली. आजी त्याला भावजी म्हणायची. या आजीचं बुद्धिबळ वेगळं होतं!

आईपुढे तर केवढं आव्हान! खेड्यातून शहरात! शिक्षण फारसं नाही. पैसेही फारसे नाहीत. चार मुलांना वाढवायचं, शिकवायचं. सर्वांचं हसतमुखानं करायचं, नव्या गोष्टी शिकायच्या! माझ्या आईची सासू म्हणायची, “अनंतफंदी डोक्याला चिंधी पण बायको आनंदी” आई हसतमुखाने, कष्ट करत बुद्धिबळ खेळली.

माझं लहानपण खूप छान गेलं. घरी, शाळेत, शेजारी-पाजारी, नातेवाईकांच्यात खूप लाड झाले. लग्नानंतर जग बदललं. कामं बदलत गेली पण नवरा बायकोच्यात टोकाची भांडणं नव्हती. एकमेकांच्या साथीनं संसारही केला, सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळल्या. पैसे कधी खूप, कधी चणचण असे सगळे दिवस पहिले. मुलांना छान वाढवलं. त्यांच्याशी संवाद टिकून आहे हे आमचं बुद्धिबळ!

माझ्या मुलीची मुलं अजून लहान आहेत पण त्यांचं करून ती खूप कामं करण्याच्या धडपडीत असते. पालक शिक्षणाचा अभ्यास करते. चित्रकार म्हणून कामं करते. मुलांबरोबर छान खेळते. ह्या पिढीत आर्थिक परिस्थिती बदलली. समृद्धी झाली. आव्हानं वाढली. ती माझ्याहूनही सर्वार्थानं वेगळं चांगलं जीवन जगते आहे याची मला खात्री वाटते. हे तिचं बुद्धिबळ !

या पाच पिढ्यांच्या बुद्धिबळात फरक असले तरी बुद्धी तीच लागते. कधी तिरकं जावं लागत, कधी सरळ, कधी अडीच घरं, सगळीकडे लक्ष ठेवावं लागतं.

चार पिढ्या पाहता असं लक्षात येतंच की श्रीमंती ही असलेल्या पैशांवर कधीच अवलंबून नव्हती. पैसे नसताना आपण कसे वागलो यांवर श्रीमंती ठरायची आणि त्यात सगळ्या पिढ्या जिंकल्या!

आज आपण म्हणतो की मुलं व्यसनांच्या आहारी जात आहेत, त्यांना पैसा लागतो, त्यांना भ्रष्टाचार हा मार्ग वाटतो, इतरांसाठी करण्याचे दिवस संपले, पण असं नाही. मुलं पिढ्यांचे कित्ते गिरवतात असंही नाही. कधी-कधी आधीची पिढी पैशांचे गैरव्यवहार करणारी असते पण नंतरची तरुण मुलं त्या मार्गानं जायचं नाकारतात. कितीही त्रासदायक बातम्या छापून आल्या तरी ज्या मुलांना वेगळ्या वाटेनं जायचंय ती जातातच आणि चांगलं काम करतातच.

अदिती-अपूर्वा, संचितीसारख्या मुली सेंद्रिय शेती करतात, अमृता राणे अरुणाचल प्रदेशातल्या जंगलात पक्ष्यांवर संशोधनाला जाते, हत्तीवरून एकटी हिंडते, एखादी मुक्ता आदिवासी लहान-लहान मुलांची तंबाखू कशी सुटेल याची चिंता करते, एखादा सौरभ साधी राहणी स्वीकारतो – मातीची घरं बांधतो, एखादा चिन्मय हिमालयात जातो आणि तिबेटच्या सीमेवर १० महिने बर्फ असतं तिथे राहतो, शाळेतल्या मुलांना शिकवतो, अशी कितीतरी मुलं आहेत. ती कष्टाला घाबरत नाहीत. सर्वार्थानं चांगलं जगतात.

आजच्या मुलांच्या पालकांनी विवेकी, विचारी होण्याची गरज आहे. आपण पालक म्हणून कसे आहोत? प्रेमळ की रागीट? कामसू की आळशी? संवेदनशील की बधीर? आपण अभ्यासू आहोत की पारंपरिक? उत्साही की निरुत्साही? आपली सामाजिक जाणीव कशी आहे? आपली मूल्यं पक्की की डळमळीत? यावरच ठरतं मुलांचं भलं होणं किंवा बुरं होणं.

आपण काय करणार आहोत? कसे वागणार आहोत? मुलांशी कसं बोलणार आहोत? यावर त्यांचं भवितव्य अवलंबून आहे. आपल्या घरानं मुलांना काय-काय शिकवायचं असतं? प्रेम म्हणजे काय, शांती म्हणजे काय याचा अनुभव घरच देतं, जीवनातली मुळं कशी असतात, पंख कसे असतात हे घरानचं द्यायचं असतं. खरेपणा, कष्टाळू वृत्ती, सातत्य, समाजाविषयी प्रेम, घरच शिकवू शकते. निर्मळ हास्य घरच मुलाला देत असतं. माणुसकीचं महत्त्व घरच शिकवतं आणि हे सगळं नुसतं तोंडी शिकवणं नसतं तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकवलं जातं.

पालकांनी आपलं मूल ओळखायला शिकलं पाहिजे. ते कसं आहे, त्याच्यात काही त्रुटी आहेत का? त्याला काय-काय कळतं? त्याच्यात कोणते गुण आहेत? कोणत्या इच्छा घेऊन ते जन्माला आलं आहे? पालकांनी मुलांना असं म्हणायला हवं की तू मला आवडतोस, तुझ्यावर माझा विश्वास आहे, तुझं मत मला महत्त्वाचं वाटतं, तू हे छान करतोस, आपलं चुकलं तर पटकन माफी मागता आली पाहिजे. पालकांचा मुलांबरोबरचा संवाद कायम मोकळा,निर्मळ, अर्थपूर्ण असायला हवा.

मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये.

मुलांना सतत आज्ञा करू नयेत.

मुलांना धमक्या देऊ नयेत.

मुलांची कुणाशी तुलना करू नये.

मुलांना उपदेश करू नये.

कंटाळा येईल असं प्रवचन देऊ नये.

मुलांचे निर्णय आपण घेऊ नयेत.

मुलांवर शिक्के मारू नयेत.

मुलांना रागावू नये.

मुलांना मारू नये.

हे सगळं पालकांनी प्रामाणिकपणे पाळलं, तर मुलं कशाला वाईट मार्गाला जातील?

पूर्वी राजाची मुलं देखील आश्रमात का पाठवली जात? त्यांना ऐषआरामापासून दूर का ठेवलं जाई? तर लहान वयात या गोष्टींची चटक लागू नये म्हणून ब्रम्हचर्याश्रमात चैन वर्ज्य होती. एकदा लहानपणी चैनीचा मोह सुटला की गृहस्थाश्रमातही कर्तव्य जास्त महत्त्वाचं वाटतं. संपत्तीच्या आहारी मन जात नाही. माणूस संयमाने जीवन जगतो.

आपलं भारतीय पालकत्वाचं हे शहाणपण लक्षात ठेवलं तर दहा वर्षानंतर मुलं कशी असतील याची चिंता करायची वेळच येणार नाही.

कितीही पिढ्या बदलल्या तरी जगण्याचं शहाणपण त्या हरवू देणार नाहीत. बदल होतील ते वरवरचे पण आतला गाभा, सत्व बदलणार नाही.

 

Read More blogs on Parenting Here