लेखक : प्राजक्ता देशपांडे
बाप्पाकडून काय काय शिकता येईल?
गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत !! गोड-धोड आवडीने खाणारा, आनंदाच्या प्रसंगी नाचणारा, शिक्षणाची आवड असणारा आणि वेळ पडली तर राक्षसांशी युद्ध करणारा सर्वांना आपला वाटणारा हा देव आहे. घरातल्या आजी-आजोबांपासून ते घरातल्या चिमुकल्यांपर्यंत गणपतीचं सर्वांशी एक विशेष नातं आहे. दैवत्वाच्या पलीकडे जाऊन भक्ताच्या घरी हक्काने १० दिवस मुक्कामाला येणारा हा देव आहे. बाप्पा घरी आल्यावर अखंड त्याच्या मागे असणारी आणि त्याच्या विसर्जनाच्या वेळेस डोळ्यातून पाणी काढणारी चिमुकली सगळ्याच घरात असतात. त्यांना तो त्यांचा मित्रच वाटतो. बाप्पाच्या गोष्टी, गाणी, आरोळी हे मुलांना शिकवावं लागतंच नाही ते त्याचं ते शिकतात. आणि म्हणूनच गणपतीच्या गोष्टी आणि गाण्यांमधून मुलांनापर्यंत आपण काही महत्त्वाची मूल्यं पोहचवू शकतो.
आई-वडिलांवर प्रेम करा, आदर करा!
गणपती आणि भाऊ कार्तिकेय यांच्यात पैज लागते की, संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालून जो कोणी सर्वात आधी कैलासावर परत येईल तो जिंकला. तेव्हा बाळ गणेश आई-बाबांभोवती प्रदक्षिणा घालून त्यांनाच स्वतःचं विश्व मानून ही पैज जिंकतो. प्रत्येक लहान मुलासाठी त्याचे आई-वडीलच त्याचं जग असतात. आणि अशा आई-वडिलांचा आदर करावा, त्यांचं ऐकावं आणि त्यांच्यावर प्रेम करावं हे आपल्याला कळतं.
कुणालाही कमी लेखू नका
शरीराने अवाढव्य असणाऱ्या बाप्पाचं वाहन मात्र चिटुकला उंदीर आहे. शरीराने, रंगाने, उंचीने किंवा जाती-धर्मानेसुद्धा आपल्यापेक्षा वेगळ्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आदर केला पाहिजे त्याला सामान वागणूक दिली पाहिजे. कुठलाही जीव कितीही लहान असला तरी त्याची कृती महत्त्वाची आहे आणि श्रीगणेशाच्या दृष्टीने सर्व सामान आहेत.
Check- उंदीर मामा आणि त्याच्या मित्रांचा गंमत अंक
स्वतःला कमी लेखू नका
माणसाचं शरीर आणि डोकं मात्र हत्तीचं असणाऱ्या गणेशाची अनेकदा पौराणिक गोष्टींमध्ये असुरांकसून चेष्टा, विटंबना केली जाते. पण तरीही गणेशाने त्यांना युद्धात हरवून त्याच्या शक्तीची जाणीव करून दिली आहे. तसेच लांब सोंड किंवा अगडबंब पोट असूनही आपला बाप्पा ६४ कलांचा अधिपती आहे. कुठलीही कला ही आवड आणि प्रयत्न यांच्या जोरावर आपण आत्मसात करू शकतो हे आपल्याला श्रीगणेश शिकवतो.
Check- शूर चिंगी आणि तिच्या साहसी मित्रांचा अंककुठलंही काम हातात घेतलं की ते पूर्ण करायचंच
महाभारत या ग्रंथाची रचना व्यास मुनींनी केली असली तरी त्या रचनेला कागदावर उतारवण्याचं काम मात्र श्रीगणेशाने केलं आहे आणि हे काम करत असताना जेव्हा शाई कमी पडते तेव्हा गणेश स्वतःचा एक दात तोडून लिखाण पूर्ण करतो. यातून आपण शिकायला हवं की कुठलही काम हातात घेतल्यावर ते पूर्ण करावं, अर्धवट सोडू नये. ते काम पूर्ण करण्याचा संपूर्ण प्रयत्न करावा.
Check- सण साजरे करू या अंक
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
शंकराकडून आत्मलिंग मिळवून, जगाचा स्वामी होण्याचा रावणाचा विचार होता पण आत्मलिंग खाली ठेवलं तर तेथेच प्रस्थापित होईल अशी अट होती.
त्यावेळी संध्यापूजेसाठी थांबल्यावर पूजा होईपर्यंत मी आत्मलिंग सांभाळीन असा गणेशरुपी लहान मुलगा म्हणाला. रावण पूजेत मग्न झालाय ते पाहून घरी लवकर जायचंय सांगून ते आत्मलिंग खाली ठेऊन श्रीगणेश निघून गेला. त्यामुळे जगाचा स्वामी होण्याची रावणाची योजना फसली. शंकराचा निस्सीम भक्त असणाऱ्या आणि जग जिंकण्याचं सामर्थ्य असणाऱ्या रावणाला श्रीगणेशाने युक्तीने हरवलं. प्रत्येक संकटाचा सामना हा केवळ शक्तीने नाही तर बुद्धी आणि चातुर्य वापरून करावा.
कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नका
कुबेराला त्याच्या संपत्तीचा खूप गर्व झाला होता. त्याच्या संपत्तीचं प्रदर्शन करण्यासाठी त्याने भगवान शंकर आणि त्याच्या परिवाराला जेवणासाठी आमंत्रित केलं. जेवणासाठी गेल्यावर श्रीगणेश तिथलं सगळं जेवण फ़स्त केलं आणि मग अजून भूक भागली नाही असं म्हणत तिथल्या वस्तू खायला सुरवात केली. कुबेर घाबरले आणि त्यांनी शंकराकडे धाव घेतली. तेव्हा त्यांना समजलं की, आपलं गर्वहरण करण्यासाठी श्रीगणेश हे सगळं करतो आहे. शेवटी कुबेराने माफी मागितल्यावर आई - पार्वतीने बनवलेल्या एका मोदकामुळे गणेशाची भूक शांत झाली. देव हा पैशाचा भुकेला नसून त्यासाठी भक्ताचा भाव महत्त्वाचा आहे. भक्तिभावाने अर्पण केलेली दुर्वांची काडीसुद्धा सोने, हिरे यापेक्षा जास्त मौल्यवान आहे.
Knowledge is the biggest power
शक्तीची अनेक रूपे आहेत. सामर्थ्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हातात तलवार घेणं गरजेचं आहे. अनेक संकटं किंवा समस्या ह्यांचा सामना करताना शक्तीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ ठरते. ज्ञानाने आपण जग जिंकू शकतो. त्यामुळे अभ्यास असो, खेळ असो किंवा कोणतीही कला असो तिचं संपूर्ण ज्ञान आत्मसात करण गरजेचं आहे.
मोठं डोकं, मोठे कान, लहान डोळे आणि अगडबंब पोट
गणपतीच्या अनेक गोष्टी आपल्याला जशा अनेक गोष्टी शिकवतात तसंच त्याचे अवयवही आपल्याला काही सूचना करतात. मोठं डोकं, मोठा विचार, मोठी ध्येयं असावी हे दर्शवतं. तसंच मोठे कान सगळ्या गोष्टी नीट ऐकून निर्णय घ्या हे सुचवतात. लहान डोळे, बारीक आणि दूरदर्शी नजर असावी हे सांगतात आणि अगडबंब पोट हे इतरांच्या लहान चुका पोटात घालून त्यांना माफ करायची क्षमता अंगी बाळगावी हे शिकवतात.
गणेशोत्सव हा काही फक्त धार्मिक सण नाही. भक्ती, शक्ती आणि एकात्मतेची मूल्यं शिकवणारा एक उत्सव आहे. गोष्टी, गाणी आणि वेगवेगळ्या कलांमधून लहान मुलांना भेटणारा बाप्पा हा जास्त जवळचा आणि घरातला एक सदस्य वाटतो. आपले सण, परंपरा त्याच्या मागचे उद्देश्य आणि त्यातून शिकता येणारी मूल्य ही जर मुलांना समजावून सांगितली तर आपली ही संस्कृती फक्त टिकणार नाही तर येणारी ही पुढची पिढी आपली संस्कृती मनापासून जपेल. चला तर मग लाडक्या बाप्पालकडून छान छान गोष्टी शिकू या.
गणपती बाप्पा मोरया !!
Read More blogs on Parenting Here
Print + Audio
Only Audio
Only Magazines
Magazines
Our Combo Packs
Books By Quests
Curated
Books
Parenting Courses
Expert Talks
Books on Parenting
Parenting
Blogs