लेखक :  शोभा भागवत


एकदा एका प्रशिक्षण शिबिरात मी सर्वाना विचारलं, ‘ तुमचं लहानपण आठवून सांगा. तुमच्यावर कुणा माणसाचा, प्रसंगाचा, कोणाच्या सांगण्याचा काय संस्कार झाला आणि तो आयुष्यभर टिकला?`

कुणी सांगितलं माझ्या आजोबांचा माझ्यावर संस्कार आहे.ते सगळं फार नीटनेटकं करत. स्वतःचे कपडे स्वतः धूत, धोतर वाळत घालतं तर त्याला एकही सुरकुती नसे. सगळं कमीत कमी पैशात कसं होईल अशीही दृष्टी असे. जिथे बसनं जाणं शक्य आहे तिथं उगाच रिक्षा करत नाही. ८०व्या वर्षी ते म्हणाले, की आता मी माझ्या लुनाचं लायसन्स रिन्यू करत नाही इतकी लूना चालवली. मी केर काढताना ते सूचना देत. कपाटाखालचा केर काढताना खाली बसावं, झाडू आडवा धरावा. जेवतानाही त्यांचा व्यवस्थितपणा दिसून यायचा. थोडंसंच जेवतील पण अगदी छान चवीने प्रत्येक पदार्थाचा आनंद घेतील. गांधीजींच्या एकादश व्रताचं स्वतः पालन करणारे हे आजोबा. त्यांच्या मुलीनं तिच्या बंगल्याबाहेर कोटा फरशा बसवला तर त्यांना इतकं वाईट वाटलं. ते म्हणाले, ‘अगं तू असं करशील असं मला वाटलं नाही. पैसे आहेत म्हणून कुठेही काही बसवायचं का? पाऊस पडला, पाणी सांडलं तर या फरशीवरून मुलं घसरतील. शहाबादी फरशी खडबडीत असतात. त्यावरून घसरत नाही. उगाच पैसे वाया घालवता आणि त्याची गैरसोय जास्त, सोया कमी’ असे हे आजोबा. त्यांच्या नीटनेटकेपणाचा, सगळ्यात रस घेण्याचा आणि अलिप्त असण्याचाही माझ्यावर मोठा संस्कार झाला आहे.

आणखी कुणी सांगितलं, संस्कार म्हणजे काय तर “मी लहान असताना आमची आई बाजूला बसायची आणि मग वडील स्वयंपाक करायचे. मला पोळ्या करायला वडलांनी शिकवलं. पोळ्या लाटायच्या कशा ते सांगायचे. कडा पातळ व्हायला हव्यात म्हणजे कच्च्या राहणार नाहीत. मधलं थोडं जाड हवं. भाजताना म्हणायचे ताव्याखाली ताव एवढाच हवा की पोळीवर बदामीचं डाग पडतील. काळे पडणार नाहीत. प्रत्येक गोष्ट मन लावून करायला त्यांनी शिकवलं. हा संस्कार झाला.”

हे पण वाचुया – दिवाळीची गोष्ट आणि दिवाळी सणाची माहिती

एक म्हणाली, “माझी आई सतत हसतमुख असायची. गरीबी होती. चार मुलं वाढवली, शिकवली; पण आम्ही कधी तिचं वडिलांशी भांडणं झालेलं ऐकलं नाही. तिला फक्त दोन रोजच्या साड्या असायच्या आणि कुठे जायचं झालं तर त्यासाठी चांगल्यापैकी एक साडी. पण कधी तिनं तोंड वाकडं केलं नाही. हा संस्कार माझ्यावर झाला आहे. मला वाटतं, आज आम्हाला एवढं सगळं मिळतं तरी आईइतकं हसतमुख आम्ही असतो का? एवढे कष्ट आम्ही करू शकू का?”

हे सगळं ऐकणारी एक छोटी सहा वर्षाची मुलगी तिथं होती. ती म्हणाली, “मला बोलायचं!”.आम्हा सगळ्यांना तिचं कौतुक वाटलं. ती म्हणाली, “आधी मी जेवताना मच मच आवाज करून जेवायचे. एकदा सुट्टीत मी मामाकडे गेले तर मामी मला म्हणाली, “असा आवाज करू नये जेवताना. असा आवाज कुत्रा करतो. तू कुत्रा आहेस का?” तू कुठं गेलीस तर लोक तुला हसतील. असा आवाज करणं सोडून दे.” मग तेव्हा पासून मी आवाज करत जेवत नाही. मामींनी माझ्यावर असा संस्कार केला.”

कुणी सांगितलं, शिक्षक म्हणायचे, “परीक्षा महत्वाची नाही. तुम्ही आयुष्यभर कसं काम करता ते महत्वाचं आहे. कुणी म्हणालं, “आमचे सासरे आहेत त्यांचं सगळीकडे लक्ष असतं. स्वयंपाक करताना ते सांगतात एवढी का कणीक घेता? एवढ्या संपतील का पोळ्या? अन्न वाया घालवू नको. किती लोकांना जेवायला मिळत नाही. विचार करून जेवण तयार करा. त्यांच्यामुळे आम्हाला मोजकं जेवण करायची सवय लागली.”

मी म्हटलं, “तुम्ही कोणी कसं सांगितलं नाही की आम्ही लहानपणी गीता पाठ केली त्याचा आमच्यावर संस्कार झाला. स्तोत्रं पाठ केली त्याचे संस्कार झाले. तेही संस्कार असतात बरं का. पण ते वाणीचे संस्कार असतात. पाठांतराचे असतात. पुढे त्या श्लोकांचा अर्थ जगताना समजत जातो.

पण कोणी नुसतं पाठांतर शिकवून त्याला संस्कार वर्ग म्हणत असेल, तर तो मुलांवर अन्याय आहे.

संस्कार हे सहज होतात. एखाद्या गोष्टीची चांगली सवय लागते. तिचं महत्व लक्षात येतं आणि तो संस्कार बनतो. संस्कार कुठल्याही परिस्थितीत आपल्याला सोडत नाही. समजा माझ्यावर चांगलं बोलण्याचाच संस्कार आहे. तर कुणीही कितीही वाईट वागवावं तरी माझ्या तोंडून अपशब्द येणार नाही. हा झाला संस्कार. माझ्या हाताला काटकसरीनं पाणी वापरण्याची सवय आहे. त्यामुळे मी कितीही पाणी उपलब्ध असलं तरी ते थोड्या प्रमाणातच वापरेन. हा संस्कार झाला. माझ्या मनावर समानतेचा संस्कार असला तर मी कोणालाही तुच्छतेनं वागवूच शकणार नाही.

मुलांवर संस्कार करताना आपण हे सगळं लक्षात ठेवावं लागतं. मुलांना लागणाऱ्या वाईट सवयींवर लक्ष ठेवून त्या वेळीच बदलाव्या लागतात. काही मुळातून शिकवाव्या लागतात. काहींबद्दलचे विचार तयार करावे लागतात. काही स्वतःच्या वागण्यानं उदाहरण घालून घ्यावं लागतं. हे संस्कार म्हणजे काय तर मूल्यं असतात. त्यामुळे पालकांनीही हे लक्षात ठेवायला हवं की संस्कार करण्याचं कोणाला कंत्राट देता येणार नाही. आपल्या वागण्यातून, विचारातून, मुलांशी वारंवार केलेल्या संवादातून, चांगल्या माणसांच्या सहवासातून, महत्वाच्या अनुभवातून संस्कार होत असतात. शांतपणे आत झिरपत असतात. ते मुरायला सवड द्यावी लागते.

जेव्हा असं वागू का तसं अशी व्दिधामनःस्थिती होते तेव्हा आपल्या मुलानं योग्य, खरा, हितकर आणि चांगला मार्ग निवडावा, एवढी त्याची तयारी होणं हा संस्कार आहे.

संस्कार म्हणजे काय असतं तर, नीटनेटकेपणाचा असतो, संस्कार मोठ्या मनानं आजूबाजूला पाहण्याचा असतो, संस्कार कोणालाही न दुखावता बोलण्याचा असतो, संस्कार त्या-त्या वयात आपली जबाबदारी समजण्याचा असतो, संस्कार आपल्या घासातला घास दुसऱ्याला काढून देण्याचा असतो, चंगळवादाला विरोधी राहणी जपण्याचा असतो, संस्कार सतत नवं काही शिकण्याच्या इच्छेचा असतो, सगळंच्या सगळं आयुष्य त्यातलं सुख-दुःखं समतोलांन झेलण्याचा असतो, संस्कार सतत जागृत असण्याचा असतो, सगळं मनापासून करण्याचा असतो. कितीतरी संस्कार असतात ते पावलोपावली दिसतात, समोर येतात. मुलांचं त्यांच्याकडे लक्ष वेधणं हे पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे.

Read More blogs on Parenting Here