लेखक :  शोभा भागवत


खेळातून तयार होणारं पालकांचं आणि मुलांचं नातं खूप महत्वाचं आहे. पालकांना जर मुलांशी काय खेळावं हे कळलं तर ते नातं अधिकच चांगलं होईल. पालकांना खेळ म्हटलं की असं वाटू शकतं की मैदानावर जाऊन खेळायचे खेळ. पण घरातसुद्धा पुष्कळ खेळ खेळता येतात. आणि ते लहान वयात आवश्यकही आहेत. एरवी बोलताना पालक-मुलांचे संवाद असे असतात, “बघ हं, अंघोळ केली नाहीस तर दाराबाहेर ठेवीन. पाच मिनिटांत जेवण संपलं नाही तर बक्षीस रद्द. नाही दात घासलेस तर रात्री झोपू देणार नाही, लक्षात ठेव.” हे ताण-तणावाचे, शिस्तीचे संवाद कमी व्हायला खेळ मदत करतात.

पालक हल्ली त्यांच्या दिनक्रमानेच एवढे दमून जातात की मुलांसाठी काहीही करू म्हटलं की त्यांना ते जास्तीचं काम वाटतं. खेळ खेळून जर मूल प्रसन्न झालं, खुश झालं तर खेळताना खूप हसणारी आई, खुश होणारे बाबा , असं वातावरणच बदलेल. मूल कदाचित न कुरकुरता अभ्यास करेल, आनंदाने जेवेल. आई-बाबा आपली कामं उत्साहाने उरकतील. मग अशा कुटुंबाचं काम वाढलं का कमी झालं म्हणायचं? 

१. एका मुठीत नाणं आणि एका मुठीत कागदाची पुडी ठेवली आणि मुलाला विचारलं - “ओळख कुठल्या हातात काय आहे?” मूल एका हाताला हात लावून काहीतरी म्हणेल, बरोबर का चूक ते मूठ उघडल्यावरच कळेल. कधी शिताफीने दोन्ही वस्तू एकाच हातात आणि दुसरा हात मोकळाच असं करता येईल. मग मुलाच्या हातात त्या वस्तू देऊन – “आता मला ओळखायला सांग” असं सांगता येईल. 

२. कधी मुलाला म्हणता येईल की,“हा रुमाल घे. पण तो जादूचा आहे बरं का. मी तुझ्याकडे टाकला की त्याचा बॉल होईल. आणि तू माझ्याकडे टाकशील तेव्हा त्याचा पक्षी होईल. आता सुरु करूया आपण खेळ.” खेळता-खेळता प्रत्येक वेळी त्या रुमालाचं रूप पालटेल. कधी त्याची छोटीशी मुलगी होईल, कधी त्याचं छोटसं मांजर होईल. कधी त्याचं अंडं होईल. 

3. कधी वर्तमानपत्राचं पान घेऊन बसायचं आणि मुलीला सांगायचं, “याच्यामध्ये गोंधळ हा शब्द कुठे आहे सांग.” ती शोधेल-शोधेल आणि अचानक तिला सापडेल. मग ती आपल्याला एखादा शब्द सांगेल आणि आपण तो शोधायचा.

४. कल्पनाशक्तीचा खेळ खेळता येईल. समजा ‘हवा’ हा विषय घेतला तर ज्याला जे सुचेल ते हवेबद्दलचं वाक्य त्याने म्हणायचं. कोणी म्हणेल –हवा सगळीकडे असते. कोणी म्हणेल – हवा थंड असते. कोणी म्हणेल – कधी ती गरमपण असते. थंड हवेची ठिकाणं असतात पण उष्ण हवेची का नसतात? कधी-कधी आपली हवा टाईट असते. हवा झाडाची पानं हलवते. हवा कपडे वाळवते. थंड हवेने तेल गोठतं, पाण्याचा बर्फ होतो. हवा नसली तर आपण जगूच शकणार नाही. – असं जे जे प्रत्येकाला सुचत जाईल ते ते बोलत गेलं तर हवेबद्दलची इतकी माहिती जमा होते.

५. स्वयंपाकघरात असलेले सारखे पेले लहान मूल ओळीने मांडेल, तिरके एकमेकांवर ठेवेल, त्यांच्या वेगवेगळ्या जोड्या करेल, एकात एक घालेल, एकावर एक रचना करेल. फक्त एका प्रकारच्या भांड्यांशी  मुलं इतक्या विविध प्रकारे खेळू शकतात. 

६. कणीक भिजवली की त्यातला एक छोटा गोळा मुलाला दिला की त्यातून ते काय-काय करुन बघतं. ताटल्या, वाट्या, गणपती आणि अशा बऱ्याच गोष्टी. 

७. कधी काचेचे बाऊल्स घेऊन त्यात कमी जास्त पाणी घालून जलतरंग करता येईल. काड्यांनी किंवा चमच्यांनी ते हळूच वाजवलं तर त्यातून निर्माण होणाऱ्या नादामुळे मुलं इतकी खुश होतात.

खेळांमध्ये विविधता आहे, विविध प्रकारे डोकं चालवण्याची मागणी आहे, प्रसन्नता आहे. यातून बौद्धिक विकासच होतो.

७-८ वर्षांचं असल्यापासून जर मूल दरवर्षी एक मैदानावरचा खेळ खेळायला शिकलं तर साधारण १५व्या वर्षी आपला खेळ कुठला हे मूल स्वतः ओळखू शकतं. डॉ. शारंगपाणी म्हणतात तसं- मुलाला खेळ निवडावा लागत नाही, खेळच मुलाला निवडतो. मूल तोपर्यंत बॅडमिंटन, टेबल टेनिस, क्रिकेट, फुटबॉल, नेटबॉल हे खेळलेलं असेल किंवा बुद्धिबळ खेळलेलं असेल. शहरात आपल्या घराजवळ जो खेळ खेळणं शक्य असतं तो आपला खेळ.

खेळाडू मूल प्रत्येक खेळातून बऱ्याच गोष्टी शिकत असतं. शिस्त शिकतं, नियम शिकतं, नियमित वेळेवर उठणं, वेळेच्या आधी पोहोचणं हे घडतं. खाण्यावरचा ताबाही मुलं सहज शिकतात. या सगळ्या गोष्टी मुलाच्या वयात येण्याच्या काळात जे हार्मोनल बदल होतात ते पेलायला त्याला मदत करतात.

– शोभा भागवत
लेखिका, संचालिका- गरवारे बालभवन 

Read More blogs on Parenting Here