लेखक : मंदार मोरोणे
अलगद रुजावे बीज वाचनाचे
“आमच्या घरी टीव्हीच नव्हता,” एक तरुण लेखक सांगत होता. अत्यंत कमी वयात त्याने आपल्या लेखनातून नाव कमावले होते आणि जाणकारांचे लक्ष वेधून घेतले होते. अशा या तरुणाची मुलाखत सुरू होती. “टीव्ही नव्हता आणि आई-वडील दोघेही त्यांच्या मोकळ्या वेळात पुस्तकं वाचत बसले आहेत, हेच चित्र मला आठवते. बहुतेक यामधूनच मला वाचनाची आवड लागली आणि मग यथावकाश लेखनाचीही,” तो अधिक विस्तारपूर्वक सांगत गेला.
मुलं अभ्यास करीत नाहीत या सनातन तक्रारीप्रमाणेच मुलांचे वाचन कमी झाले हा सतत समोर येणारा प्रश्न आहे. अर्थात, काही घरांना तो भेडसावतो आणि काही ठिकाणी तो प्रश्न आहे याची पण जाणीव नसते. पुन्हा आता याला ‘मुले स्क्रीनवर वाचतात की हातात छापील साहित्य घेऊन वाचतात?’ हा आणखी एक वेगळा पदर जोडला गेला आहे. तर मुद्दा आहे मुलांचे वाचन. ही आवड केंव्हा लागते, कशी लागते याचे काही निश्चित ठोकताळे नाहीत. पण, जे जे वाचतात त्यांच्याशी बोलल्यावर काही सूत्रं आपल्या सहज हातात लागू शकतात. पहिलं सूत्र या तरुण लेखकाने सांगितलं तेच. आई-वडील काय करतात ते बघत मुलं वाढत असतात. त्यातून त्यांची जगण्याची शैली आणि सवयी तयार होत जातात. बालपणी लागलेल्या यातील काही सवयी नंतर बदलतात, काही टिकूनही राहतात. पण, चांगल्या-वाईट सगळ्या गोष्टींची रुजवात त्या कोवळ्या वयातच होते. वर्तमानपत्रे विकत घेण्यासाठी महिन्याला पाचशे रुपये खर्च करणे अनेकांना अनावश्यक वाटते. ग्रंथालये असताना पुस्तके विकत कशाला घ्यायची? असे जबर प्रश्न विचारणारेही असतात. पण, दारात रोजचं वर्तमानपत्रं आलं की त्यावर अधाशासारखे तुटून पडणारी मोठी माणसे रोज दिसली की घरातील लहानांच्या मनातही कुतूहल जागृत होणारच. अशाच लहानसहान बाबींमधून वाचनाची, ते ही छापील वाचनाची आवड निर्माण होत जाते.
अर्थात, सगळं आपसूक होत जातं असंही नाही. वळण लावायचं म्हटलं की सरधोपट मार्ग सोडावा लागणार, काही प्रयत्न करावे लागणार, हे तर निश्चितच. यातील काही अप्रत्यक्ष पद्धतीने करता येतात तर काहींसाठी थेट रस्ता धरावा लागतो. असे काही अप्रत्यक्ष प्रयोग सांगण्यासारखे आणि करून बघण्यासारखे आहेत. माझ्या ऒळखीच्या एका घरात सकाळी पेपर आला की आजी तो उचलायची आणि आपल्या दोन-अडीच वर्षाच्या नातीसमोर घेऊन बसायची. त्यातले नातीला काही समजण्याचा प्रश्नच नव्हता. पण, वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणारे व्यंगचित्र मात्र आजी आपल्या नातीला रोज दाखवायची, मजकूर वाचून दाखवायची. हळूहळू नातीला त्या व्यंगचित्रांची आवडच लागली. दारात वर्तमानपत्र वाटणारे काका आले की नात धावत जाऊन तो घ्यायची. आधी ते कोण वाचणार यावरून मग आजोबा आणि नातीत भांडण व्हायला लागले. स्वाभाविकपणे, रोज आजोबाच हरायचे. पण, वाचनाची अशी रुजवात होत असेल तर हारना भी कुबूल हैं!
दुसर्या एका मित्राने मुलीसाठी पुस्तके विकत घेणे सुरू केले. ती अगदी दीड-दोन वर्षांची असतानापासूनच. स्वाभाविकपणे ती चित्रांची होती. विविध आकारांची होती, मराठी, हिंदी, इंग्रजीमधील होती. ही सगळी पुस्तके त्याने एका स्वतंत्र कप्प्यात ठेवली. आणि तीही अशा ठिकाणी ठेवली की जिथे तिचा हात सहज पोहोचू शकेल. लहान आहे म्हणून ती पुस्तके खराब करेल अशी भीती न बाळगता त्याने सातत्याने हे केले. तिच्या आजूबाजूला पुस्तके राहतील याचा शक्य तितका अकृत्रिम प्रयत्न केला. मुलगी उत्सुकतेने पुस्तके चाळू लागली. त्यातल्या काहींवर तिने रेघोट्या मारल्या, रंगकाम केले. पण, असे करत करतच ती पुस्तकं हातात घेऊन बघू लागली. पुढील वर्ष-दीड वर्षात तिने पुस्तके आवडीने वाचणे सुरू केले. ती वाचते आहे हा आनंद मित्रासाठी आणि त्याच्या पत्नीसाठी अवर्णनीय होता.
आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच. मुले अनेक गोष्टी स्वत:हून टिपतात, स्वीकारत जातात. आपल्याला फक्त वातावरणनिर्मिती करायची असते. अनुभव घेण्याची संधी निर्माण करून द्यायची असते. तेच वाचनालाही लागू पडते. वाचन करायला चांगले साहित्य सहज हाती पडेल, असा प्रयोग आपल्या मुलांसाठी सहज करू शकतो. चांगलेच हाती लागेल, हे निश्चित. अर्थात, ही तर केवळ सुरुवात आहे. परीक्षा तर वाढत्या वयात लपली आहे.
मंदार मोरोणे, नागपूर
Read More blogs on Parenting Here