लेखक :  करूणा पुरी


‘घरी येऊन बघ, कबीरने पेपरचे काय काय कटिंग करून ठेवलंय ते…’

सासूबाईंनी फोनवर सांगितले, तेव्हा कागदाचे छोटे-मोठे तुकडे हॉलमधल्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलेले माझ्या डोळ्यासमोर आले. ऑफिसमधून घरी गेल्यानंतर ते गोळा करता करता नाकी नऊ येणार आणि होणारी चिडचिड तर वेगळीच… तमाम आयांसारखी! काय सारखा पसारा करतो हा मुलगा? आवरायचं नाव नाही. नुसतं हे काढ, ते काढ, हे पसर, ते पसर, कधी कागद काप, तर कधी फरशी किंवा भिंतीवर रंग, तर कधी बेडशीटच रंगवलेली… ऑफिसमधून घरी जाऊन दमलेल्या जीवानं पसारा पाहायचा आणि अजून थकायचे… वगैरे वगैरे.. असे अनेक विचार रागानं मनात आले.
पण…

‘आवरतो ना गं आई; पण आधी बघ ना मी काय केलंय ते… किती भारी झालंय ना?’ असं आनंदानं आणि उत्साहानं सांगणारा कबीरचा निरागस चेहरा डोळ्यासमोर आला आणि राग एकदमच शांत झाला.
माझ्या मुलाचं असा पसारा करणं आणि त्यातून काहीतरी ‘प्रयोग’ करणं नवीन नाही. त्याची सतत काही ना काही खुडबूड, लुडबूड सुरू असते. का कोण जाणे; पण त्यातूनच त्याला खूप आनंद मिळतो आणि आता त्याचा तो आनंद मलाही आनंद देऊ लागला आहे. घरात पसारा पाहून चिडचीड होणं साहाजिक आहे. ऑफिसमधून परत आल्यानंतर घराचा चेहरामोहराच बदललेला म्हटल्यावर त्रागा होणारच. माझ्याही अनेक मैत्रिणी मुलांच्या पसाऱ्यानं, नीटनेटकेपणा नसल्यानं खूप वैतागतात..

पण खरे सांगू का? या पसाऱ्यातूनच मुलांना निखळ आनंद मिळत असतो. (खूप चिडचीड करून झाल्यानंतर मला सापडलेले हे शहाणपण आहे). खेळता खेळता, त्यात रमता रमता त्यांच्या हातून पसारा होत जातो आणि त्याच पसाऱ्यात ते परत रमतात. लवकर कंटाळत नाहीत, की आपल्यामागे कोणतीही भुणभुण करत नाहीत. त्यांचं त्यांचं मस्त चाललेलं असतं. त्यांना गुंतवून ठेवण्याचा आपला ‘लोड’ही कमी होतो.

मुलांची जिज्ञासू वृत्ती सतत जागृत असते आणि ती पडताळण्यासाठी ते त्यांच्या त्यांच्या परीने सतत काहीतरी नवं करून पाहत असतात. कधी नेमकं काय करायचंय हे माहीत असतं, तर कधी फक्त काहीतरी वेगळं करायचंय हे डोक्यात असतं. कधी तो प्रयोग जमतो, तर फसतो. कधी करायचं असतं भलतंच आणि होतं भलतंच; पण ते पिच्छा लवकर सोडत नाहीत. चिकाटी, संयम, सर्जनशीलता हे गुण असेच तर विकसित होतात त्यांच्यात. (हेही मला उशीरा सुचलेलं शहाणपण!)

मुलांची जिज्ञासू वृत्ती सतत जागृत असते आणि ती पडताळण्यासाठी ते त्यांच्या त्यांच्या परीने सतत काहीतरी नवं करून पाहत असतात. कधी नेमकं काय करायचंय हे माहीत असतं, तर कधी फक्त काहीतरी वेगळं करायचंय हे डोक्यात असतं. कधी तो प्रयोग जमतो, तर फसतो. कधी करायचं असतं भलतंच आणि होतं भलतंच; पण ते पिच्छा लवकर सोडत नाहीत. चिकाटी, संयम, सर्जनशीलता हे गुण असेच तर विकसित होतात त्यांच्यात. (हेही मला उशीरा सुचलेलं शहाणपण!)

मध्यंतरी, एक सेलिब्रेटी आई जाहीर व्याख्यानात म्हणाली होती, की मुलांना आपण का सतत एंटरटेन करायचं? होऊ द्या ना त्यांना बोअर. त्या कंटाळण्यातूनच ते स्वत:च्या करमणुकीचा पर्याय शोधतात. हे अगदी खरं आहे. नाही तर, आपल्यावरच मुलांना सतत कशात ना कशात तरी गुंतवून ठेवण्याचं दडपण राहतं. माझा अनुभव सांगते, एका गुरुवारी आमच्या सोसायटीतील लाइट बराच वेळ जाणार होते. मोबाइल नाही, टीव्ही नाही. कबीरचं अवघ्या एका तासात सुरू झालं, ‘आई बोअर होतंय.’ हे करून बघ, ते कर असे पर्याय त्याला दिले; पण परत काही वेळानंतर तेच…आई बोअर होतंय. मी म्हटलं, हो बोअर मग! बराच वेळ सोफ्यावर लोळून झाल्यानंतर पठ्ठ्याला काय सुचलं काय माहीत? घरात लहान बॉक्स होते तीस-चाळीस. तेही त्यानेच जपून ठेवले होते. ते एकदम जमिनीवर ओतले आणि फेव्हिकॉल, कात्री घेऊन काहीतरी करू लागला. रमलाय म्हणून मीही दुर्लक्ष केलं. एक-दीड तासानंतर त्यानं त्या बॉक्समधून मस्तपैकी घर बनवलं. आपल्या कंटाळ्यातून त्यालाच सुचलेला हा टाइमपास होता. येथे त्याची ‘ट्यूब’ पेटली होती. तेच जर मी त्याला काहीतरी सांगितलं असतं, तर तो तेच करत बसला असता; पण त्यानं स्वतंत्र विचार करून स्वत:च्या आयडियातून काहीतरी चांगलं साधलं होतं, याचा त्याला आनंद आणि मलाही समाधान.
मुलांची जिज्ञासूवृत्ती शमवणं किंवा जागवणं हे पालकांच्या हातात असतं. हे करू नकोस, ते करू नकोस, तुला जमणार नाही, कशाला उगाच पसारा करतोस अशी वाक्ये मुलांचा आत्मविश्वास कमी करतात. माझ्या काही जणी ओळखीत आहेत ज्या, घरात पसारा होईल किंवा तो/ती एखादे खेळणे मोडेल म्हणून आपल्या मुलांना खेळच काढू देत नाहीत! मग मुले रमणार कशात? हाती काही नसेल करण्याजोगं, तर ते टीव्ही-मोबाइल या आयत्या आणि सोप्या मनोरंजनाच्या साधनांकडेच वळणार. तेच तर आपल्याला नकोय. टीव्ही-मोबाइलचा अतिवापर मुलांच्या सर्जनशीलतेला मारतो आणि असे होऊन कसे चालेल?
त्यामुळे, करू द्या मुलांना बिनधास्त पसारा.
त्यात त्यांचा खेळ रंगू दे किंवा त्यातून नवा खेळ तयार होऊ दे.
त्यात मन रमू दे.
टाइमपास होऊ दे.
कोणता तरी प्रयोग जमू दे, फसू दे…
त्यातून त्यांना आनंद मिळतोय हे महत्त्वाचं.
परत हेच, की हे सांगणारी मी काही आदर्श आई नाही. कबीरच्या पसारा करण्यातून मला हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे. बरे, त्या दिवशी, कबीरनं त्या कापाकापीतून आठ ते दहा पेपरची ‘किरिगामी’ केली होती. पेपर कटिंगचे वेगवेगळे छाप आणि नक्षी. आपल्याला हे जमलंय याच आनंदात तो बराच वेळ होता.
…आणि पसाऱ्याचं काय?
तर, आम्ही दोघांनी मिळून तो आवरला!

Karuna Puri Sr. Journalist,
Writer and Parents blogger

Read More blogs on Parenting Here