शोभा भागवत लिखित ‘आपली मुलं’ या पुस्तकातील लेख
लेख क्र. 10 : अभ्यास- मुलांचा आणि आपला
लेखन: शोभा भागवत
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे
मुलांची लहानपणी टेप केलेली कॅसेट ऐकत होतो. आवाज किती वेगळे वाटत होते ! भाषा ताजी होती. बोलण्यात उत्साह होता. मधेच बोलता बोलता मुलीला ढेकर आला तर ती हसत म्हणाली, “पादले !” त्यावर मुलगा म्हणाला. “पादले नाही ढेकर आली.” सगळं बोलणं किती लडिवाळ होतं. मुलाला विचारतं होते. कावळा कसा करतो ? काव काव.
चिमणी कसं करते ? चिव चिव.
पोपट कसं करतो ? पोप पोप्.
कावळा-काव, चिमणी- चिव तर पोपट-पोप. एकदम तो भलतंच विठू विठू कसं बोलेल ? त्या पोपच मग विठू करायचं. त्याला पोपट दाखवून ऐकवून पुरावा द्यायचा.
किती प्रकारे मुलांचं शिक्षण चालू असतं !
शाळेत गेल्यावर प्राण्यांची माहिती असा एक प्रकार लिहायचा असतो. इतके दिवस चिमणी कशी चिव् चिव् करते, दाणा कशी टिपते, माना कशी वेळावते, घरात टुण-टुण उड्या कशी मारते, खिडकीतून उडून कशी जाते, तारेवर कशी बसते हे साभिनय सांगणारं मूल चिमणीची माहिती लिहिताना चिमणीचा रंग करडा असतो असं माहितीचं पहिलं वाक्य लिहितं, तेव्हा हा करडा रंग त्याच्या संबंध शिक्षणाला व्यापून राहणार हे दिसू लागतं. अरे ! तुला जे वाटतं ते लिही. तू जे एरवी सांगतोस चिमणीबद्दल ते लिही म्हटलं तर मुलाला पटत नाही. बाई रागावतील असं उत्तर मिळालं.
हे मुलाचे नैसर्गिक बाळवळण मोडायचं आणि मग पुन्हा संवेदनशीलता, ललित-लेखन हेही अभ्यास अभ्यासक्रमातूनच शिकवू पाहायचं असा आपला प्रयत्न असतो.
हे अभ्यासाचं करडं भूत मुलाला अनेक वर्ष छळतं. लोळवतं. निरर्थक गोष्टी पाठ कराव्या लागतात. लक्षात ठेवाव्या लागतात. परीक्षेत पुन्हा लिहून दाखवाव्या लागतात. मुलांचा अभ्यास हा आईवडिलांच्या चिंतेचा विषय बनतो. या सगळ्यात नवं नवं शिकण्याची क्षमता, जिज्ञासा, त्यातला आनंद हेही गवसेनासं होतं.
एकदा शेवटची परीक्षा दिली, पदवी घेतली, की किती माणसं पुढं अभ्यास करतात ? शिकत राहतात ?
आपापल्या क्षेत्रातलं, व्यवसायातलं आवडीचं नवं नवं ज्ञान मिळवणं, काही सखोल विचार करणं हे मोठेपणी चालू राहतं ? आणि असे आपण विद्यार्थीदशा हरवलेले पालक पोरांच्या मागे अभ्यासाचा ससेमिरा लावत राहतो. मग तीन वर्षाच्या पोरानं अ आ इ ई किंवा ए बी सी डी लिहावं असं आपल्याला वाटतं, त्यानं चित्रविचित्र श्लोक, गाणी पाठ करावीत, म्हणून दाखवावीत असं वाटतं. त्यानं चांगले मार्क मिळवावेत, बक्षिसं मिळवावीत, पुढं जावं अशा आपल्या सदिच्छा असतात. ह्या शर्यतीत आपलं मूल काय गमावतं आहे, कोणते ताण सोसतं आहे, त्याच्या प्रकृतीवर याचा काही परिणाम होतो आहे का, त्याचं व्यक्तिमत्व यातून कोणता आकार घेतं आहे याचं भान आपल्याला राहतं ?
दोन मुलं आपल्याला असली तरी त्यांचे स्वभाव, व्यक्तिमत्व सारखी नसतात, सवयी सारख्या नसतात. एक मूल लवकर उठणारं असतं. दुसऱ्याचे डोळे आपण होऊन उघडायची वाट पहिली तर दहा सुद्धा वाजू शकतात. लवकर उठणाऱ्या मुलाचे डोळे नऊ वाजले की मिटायला लागतात आणि तेव्हा हे उशिरा उठणारं मूल बागडतच असतं. ते बारा वाजेपर्यंतही आपल्याला तंगवू शकतं. एक मूल शिस्तीचं असतं. त्याला आपले कपडे, पुस्तकं, खेळणी, वस्तूंचे संग्रह उपजतच जपण्याची कला माहीत असते तर दुसरं वेंधळं असतं. काय केव्हा कुठे होतं. कुठे गेलं त्याला पत्ताच नसतो. एक मूल अभ्यासाचा, कर्तव्याचा ताण घेणारं असतं. अभ्यास पुरा झाला नाही तर त्याला चालतच नाही. ते रडतं, कळवळून रडतं. तर दुसऱ्याला त्याच्या अभ्यासाची काळजी फारशी नसते. दुसरीकडे कुठे गेलं तर शिस्तीचं मूल फारसं रमत नाही असं दिसतं. त्याला आपलं घर, आपला परिवार जास्त प्रिय असतो; पण हे दुसरं उनाड मूल इतकं नवं नवं पाहायला उत्सुक असतं, समजून घेण्यात पटाईत असतं. त्याचं बाहेर फारसं काही अडत नाही. अभ्यासात सुद्धा असंच दिसतं. एकाची भाषा विषयात मुळातच उमज जास्त असते, एकाला गणित म्हणजे हातचा मळ वाटतो. एक मूल आनंदी असतं. एक गंभीर असतं. शाळेतही एका वर्गातल्या सत्तर मुलांमध्ये गणवेष एवढंच साम्य असतं. बाकी प्रत्येकाचं मूळचं धन वेगळंच असतं. ह्या मुलांमध्ये जे मुळात नाही ते निर्माण करायचं आणि मुळात आहे ते अधिकाधिक फुलवायचं यासाठी आपल्याला किती तरी गोष्टी शिकाव्या, समजून घ्याव्या आणि डोळसपणे पाहाव्या लागतात.
उनाड मुलाला थोडी शिस्त लावावी लागते तेही त्याच्या मूळ प्रेरणा मारल्या जाऊ नयेत याची काळजी घेऊन. शिस्तीच्या मुलाला कानात थोडं वारं भरावं लागतं तेही त्याच्या मूळ शिस्तीचा अपमान न करता.
क्रिकेटमध्ये चांगला बॅट्समन म्हणे बॉलर च्या हातून बॉल सुटेपर्यंत बॉल कसा मारायचा तो निर्णय घेत नाही. त्या पाव क्षणात तो निर्णय घेतो आणि फटका मारतो किंवा मारत नाही. जो आधीच ठरवून ठेवतो अशी बॅट फिरवायची तो चकतो. त्यामुळे नव्यानं क्रिकेट, बॅटमिंटन आपण खेळू लागलो की बॅट आणि बॉल, फूल आणि रॅकेट यांची भेटच होत नाही ! दोघंही आपापल्या मार्गानं निघून जातात !
पालक आणि मुलांचं नातंही काहीसं असंच असतं. माझ्या मुलानं कसं वागावं, काय व्हावं ह्याचा निर्णय मी आधी घेऊन कसं चालेल ? त्याचा कल पाहून त्याचा पिंड पाहूनच ते ठरवायला हवं.
आपल्या चिमुकल्या जीवनातही आपल्याला आपलं मन सारखं हे हवं, ते नको, हे बरोबर आहे, हे नाही हे बजावत असतं. त्याला ‘गप्प बस रे काटर्या !’ म्हणून धपाटा घालून पोराचं रडणं थांबवू पाहवं तसं आपण गप्प बसून पाहतो; पण ते पुन्हा वर येत राहतं. ते मन भौतिक गोष्टींमध्ये रमत नाही. आपण त्याला संपत्ती, सत्ता, प्रतिष्ठा, लौकिक यांनी दडपू पाहतो; पण ते दडपले जात नाही, त्याची मागणी वेगळीच असते.
मग माणसं अस्वस्थ राहतात किंवा शांती शोधण्यासाठी कुणी देव, कुणी बुवा, कुणी महाराज, कुणी भगवान यांना शरण जातात. ‘हरे कृष्ण हरे रामा ’ पंथाच्या परकीयांच्या आकर्षणाबद्दल विचारलं असताना एक अमेरिकन बाई सांगत होत्या. "We Americans grow up with lots of toys, lots of books, lots of clothes, lots of things, just things and we find this is not what we wanted" आणि मग जे मिळालं नाही याच्या शोधात आम्ही भटकत राहतो. आपणही वस्तूंच्या मागे लागलो आहोत का ?
माझे वडील एक गोष्ट सांगायचे. एक कुटुंब असतं. गरीब असतं. मुलांना शिकवण असते दुसऱ्याचं काही घ्यायचं नाही. एकदा वडील आणि मुलगी रस्तानं जात असतात. मुलगी मागे असते. वडलांना रस्त्यात एक सोन्याचा दागिना पडलेला दिसतो. त्यांना वाटतं, मुलगी अजाण आहे तिला तो हवासा वाटेल म्हणून ते त्यावर माती टाकतात. तेवढ्यात ती लहान मुलगी ते पाहते आणि म्हणते, “बाबा दुसऱ्याच्या विष्ठेवर तुम्ही का माती टाकतात ? माझ्यावर विश्वास नाही का ?”
अशी एकेक गोष्ट त्या आतल्या आवाजाला पक्की पटावी लागते.
हे काम सोपं नाही. मुलं इतक्या परस्पराविरोधी गोष्टी पाहत असतात, ऐकत असतात, शिकत असतात की कधीकधी आपल्यालाही तो गुंता उलगडत नाही; तर मुलांना तो कसा उलगडेल ?
यासाठी हा गुंता उलगडण्याची ताकत नसली तरी आपल्याला काही पटलेल्या चांगल्या गोष्टींवरची श्रद्धा भक्कम असावी लागते. एवढा वारसा मुलाला दिला तरी त्याला पुढे मार्ग काढता येतो.
एखाद्या घरात विद्याव्यासंग हे मूल्य मुलांना मिळतं, एखाद्या घरात औदार्याचा गुण मुलांकडे दिला जातो, एखाद्या घरातून कलांची देणगी मिळते, एखादं घर सरळपणा शिकवतं, सेवा शिकवतं, एखादं घर जिद्द शिकवतं. आपल्या घरातून आपल्या मुलांना काय मिळत आहे ?
ह्या मूल्यांचे काही घास भरवता येत नाहीत किंवा इंजेक्शन्सही देता येत नाहीत. जमिनीच्या पोटात पाणी झिरपत जावं तशी ही मूल्यं निरीक्षणातून मनात झिरपत जातात. जणिवांची मुळं त्यांच्यापर्यंत पोचली की, ती व्यक्तिमत्वात शोषली जातात आणि शरीर, मन, बुद्धी, आत्मा यांच्या आविष्कारातून फुलून येतात.
नकारातून ही मूल्यं देता येत नाहीत. जसं नीट जेवण्याबद्दल मुलांना आपण शिकवतो. ती सगळं खात नाहीत, टाकतात. मग आपण संतापतो. मी एवढे कष्ट करून स्वयंपाक केला त्याची किंमत नाहीत तुला ? जेवली नाहीस तर सगळी जीवनसत्वं कशी मिळणार तुला ? थांब तुला उपाशीच ठेवलं पाहिजे दिवसभर. मग सगळं जेवशील पटपट !
आपण आपल्या अहंकाराची, ज्ञानाची नुसती कारंजी उडवत असतो ! मूल या सगळ्यातून काय ऐकतं ? आई आपल्याला रागावते, बोलते. म्हणजे आईला आपण आवडत नाही. आपण कुणाला तरी आवडत नाही ही भावना त्यांना सहन होत नाही आणि मग जेवणावर तो नकार लादला जातो. जेवावसंच वाटत नाही म्हणून तर जेवताना मन प्रसन्न असावं, कटकटी नसाव्यात. भांडणं, वादविवाद नसावेत असं म्हणतात.
आपण मुलाला कसं जेवायला घालतो ? आपल्याला जसं वाटतं आपण केलेल्या पदार्थाचं मुलांकडून, घरातल्या इतर माणसांकडून कौतुक व्हावं तसंच मूल ज्या गोष्टी मनापासून करतं त्याचं पण आपण कौतुक केलं पाहिजे. नुसतं छान छान म्हणून मुलं फसत नाहीत. तुमचं खरंच त्यात लक्ष आहे का हे ती पाहतात. दिखाऊपणा त्यांच्या लगेच लक्षात येतो. आपल्या आई-वडिलांना आपण जे करतो त्यात खरा रस नाही हे समजलं की ती आपल्यापासून दूरच जातात.
किती प्रकारे मुलं विचार करू शकतात हे निरीक्षण करणं फार गमतीचं असतं. मुलगी लहान असताना तिला तो प्लास्टिकच्या टोपल्यांचा मनोरा असतो ना तो आणला होता. मला वाटलं ती एकावर एक बास्केटस् ठेवेल; आणि खेळेल; पण तिनं एकदा तो मनोरा करून पहिला. एक एकामागे एक त्या बास्केट्स लावल्या आणि आता झुक् झुक् गाडी झाली म्हणाली, मग तिचं रंगांकडे लक्ष गेलं. सारख्या रंगाच्या जोड्या काढल्या. एक मोठी, एक छोटी अशा जोड्या लावल्या आणि म्हणाली, ‘ही आई आणि हे तिचं पिल्लू ’ मग सगळ्या बास्केटस् गोल लावल्या न् म्हणाली, ‘हे सर्कसमधले हत्ती गोल फिरतायत.’ त्या एका खेळण्यात ती काय काय पाहत होती ! ही तिची प्रतिभा शाळेत निबंध लिहितानाही फुलायला हवी, नाही का ?
सध्या मुलं टी. व्ही. वर क्रिकेटचे सामने पाहतात. खेळाडूंची नावं त्यांना पाठ असतात. एकदा कॅच कसा गेला ते आपलं पाहणं हुकलं तर स्लो मोशनमध्ये ती करून दाखवतात. कसा कॅच घेतला ते. तोंडानं रनिंग कॉमेंट्री चालू असते.
‘बहुतही खुबसूरतीसे शॉट लगा दिया ’ हे बहुतही खुबसूरतीसे म्हणत असतात. हे क्रिकेटमधील निरीक्षण हे शब्दात सांगणं, व्यक्त करणं मुलांच्या अभ्यासात झिरपायला हवं. ते नातं शिक्षकांना जोडता यायला हवं; पण शिक्षक जर आठ तास शाळा आणि उरलेले तास शिकवण्या यात गुंतले तर ते मुलांबरोबर कसे राहणार ? मग त्यांना नवं नवं काही माहित नसतं. त्यांच्या, पूर्वीच्या व्यासंगाच्या शिदोरीवरच ते शिकवत राहतात आणि मुलांचं जीवन आणि शिकणं यातली दरी वाढत राहते.
आमच्या शाळेतले बहुतेक सर, बाई पुस्तकातले धडे शिकवणारेच होते; पण काही शिक्षक मात्र असे भेटले की ते अनेक विषयांवर आमच्याशी गप्पा मारायचे, मोठी माणसं त्यांच्याकडे यायची त्यांच्याशी गप्पा मारायला आम्हाला सोडून निघून जायचे. लायन्स क्लबची पार्टी कशी असते चला बघायला, म्हणून आम्हा सात-आठ मुलांना घेऊन जायचे. आज आपण इंग्रजी सिनेमा पाहायचा बरं का म्हणून सिनेमाला न्यायचे. आता तुम्ही किती मार्क मिळवता याला महत्व नाही. तुम्ही १५ । २० वर्षांनी कसे असाल, काय करत असाल त्यात मला रस आहे असं म्हणायचे. ह्या सरांनी आम्हाला पुस्तकातले धडे शिकवले नाहीत, जीवनातले धडे दिले. त्यांनी मुलांचं पालकपण स्वतःहून स्वीकारलं होतं.
आपल्या मुलांना असे पालक, असे शिक्षक भेटायला हवेत. पालकांना चांगलं शिक्षक होता आलं पाहिजे. शिक्षकांना चांगलं पालक होता आलं पाहिजे. जेवढं जमेल तेवढं तरी ! वेळ नसतो, पैसा नसतो, ताण असतात, शांतता नसते, ह्या सगळ्या सबबी आहेत पालकांच्या आणि शिक्षाकांच्याही. ज्याला सर्वात जास्त कामं असतात त्यालाच सर्वात जास्त वेळ असतो असं म्हणतात. कारण त्याला वेळेची किंमत कळलेली असते. वेळेचं चीज करण्याची कला माहीत असते.
‘वडिलांना वेळ नसतो ?’ ही बहुतेक, घरांमधली आजची किंचित कौतुकानं सांगण्याची गोष्ट आहे. यातून अनेक गोष्टी होतात. मुलं वाढवण्याच्या आनंदाला वडील मुकतात. आईवरचा ताण वाढतो. आई चिडचिड करते. तो राग मुलांवर निघतो. वडील हा प्राणी महत्वाचा असतो. मुलांकडे लक्ष देणं ही बिनमहत्वाची गोष्ट आहे हा संदेश मुलं पकडतात, हा वारसा ती पुढे आपल्या संसारात चालवतात. मुलं बिघडली की, ‘तुम्ही लक्ष दिलं असतंत वेळेवर तर असं झालं नसतं.’ असं आई वडिलांना सुनावते !
ह्या सगळ्या गोष्टीचं द्रष्टेपण आपल्यात असायला हवं की नको ?
सगळ्याच प्रकारच्या ज्ञानसंपादनाचा वेग आपल्याला वाढवायला हवा. याचा अर्थ धापा टाकत त्यामागे धावायचं असा नव्हे. आपण आपल्या काळात शाळेतून शिकलो, आजूबाजूच्या काही गोष्टींतून, माणसांतून शिकलो. आता मुलांना टी. व्ही., चित्रपट, खेळ, पुस्तकं, मासिकं, नाटकं यातून इतकं शिकायला मिळतं ! मुलीला शाळेतल्या धड्यात वझीर शब्द आला. वझीर म्हणजे काय गं विचारलं तर म्हणाली तो नाही का राजाहून थोडा बुटका असतो आणि तिरका, सरळ कसाही चालतो तो वझीर. पुस्तकातल्या वझिराआधी बुद्धिबळातल्या वझिराशी तिची ओळख झाली यात चुकीचं काय म्हणायचं ? आमच्या वेळी हे असं नव्हतं म्हणून प्रश्न सुटणार नाहीत.
यासाठीच आपलं पालकांचं काम दिवसेंदिवस अधिकाधिक कैशल्याची मागणी करणार आहे असं दिसतं आहे.
मुलांकडे किती लक्ष द्यायचं आणि दुर्लक्ष किती करायचं, रागवायचं केव्हा अन् समजवायचं केव्हा, शाबासकी कधी द्यायची आणि शिक्षा कधी करायची, दूर केव्हा ठेवायचं आणि प्रेमानं पोटाशी केव्हा घ्यायचं याचा विवेक यातला तोल आपल्याला कळायला हवा. कडकपणे पण वागता आलं पाहिजे आणि मैत्रीपण कायम ठेवता आली पाहिजे. ही तारेवरची कसरतच असते. ती करायची तर आपला आपल्याला तोल सापडायला हवा. आपला अभ्यास वाढवायला हवा.
आणि हा अभ्यास म्हणजे काही पुस्तकं घेऊन, नोटस् घेऊन, भाषणं ऐकून, लायब्ररीत बसून करायचा अभ्यास नव्हे.
अभ्यास या शब्दाचा अर्थच एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणं असा होतो. ठीक आहे. आज मला मुलांना गोष्ट सांगता येत नाही; पण मी ती सांगून बघीन. चुकेलमाकेल पण थांबवणार नाही. दहा वेळा गोष्ट सांगितली, मुलांना त्यातलं काय आवडतं कळलं की आपोआप चांगली गोष्ट सांगता येईल.
आज मला मुलांशी प्रेमानं नाही बोलता येत. मला चटकन् राग येतो. माझी भाषा कडक असते. जेव्हा जेव्हा मी असं बोलेन तेव्हा मी स्वतःला बजावीन हे चुकलं माझं. पुढच्या वेळी असं नाही बोलायचं किंवा आताच हे वाक्य थोडं शांतपणे, प्रेमानं मी बोलून बघते. मग आपोआप, ‘गाढवा, लाज नाही वाटत असं बोलायला ?’ या वाक्याऐवजी ‘का बरं असं बोलायचं ?’ ‘असं बोलू नये रे राजा. एकदा शब्द तोंडात बसले की निघत नाहीत.’ अशी वाक्यं सुचू लागतील.
आज मला संताप येतो. मी मुलांना धपाटे घालते; पण मारल्याबरोबर मला जाणवलं पाहिजे हे चुकलं. मुलाला म्हणता आलं पाहिजे मी खरं तुला कधीही मारायचं नाही असं ठरवलं होतं; पण विसरले. रागाच्या भरात लक्षात नाही राहिलं. असं दहा वेळा घडलं की मारणं बंद होईल.
आज भांडण झालं की मी मुलीशी बोलणं टाळते. संवाद बंद होतो. तो बंद झाला की मला तो संवाद पुन्हा सुरु करता यायला हवा. तिला जवळ बसवून, तिच्याजवळ बसून मला म्हणता आलं पाहिजे हे बघ कशावरून भांडलो आपण ? तुझं हे वागणं मला आवडलं नाही. मला त्याचा असा असा त्रास झाला. तुला माझं म्हणणं पटलं नाही. कारण मला ते नीट मांडता आलं नाही. आता तुला काय वाटतं त्या सगळ्याबद्दल आपण बोलू या. असं होत राहिलं की मुलीचाही माझ्यावरचा विश्वास वाढेल, माझीही भांडण्याची सवय जाईल.
राग आला की दहा आकडे मोजावेत असं म्हणतात. हल्ली घरात टेपरेकॉर्डर्स असतात. आवाज चढला की टेंपरेकॉर्डर्स सुरु करावा. लगेच आवाज खाली येईल. मुलांचं निरीक्षण करण्याचं कौशल्य, मुलांशी संवाद साधण्याचं कौशल्य, आपल्या मनातलं मोकळेपणानं सांगण्याचं कौशल्य, दुसऱ्याच्या मनातलं समजून घ्यायचं कौशल्य, काही विसरण्याचं कौशल्य, काही आठवणीने उल्लेख करण्याचं कौशल्य, क्षमा करण्याचं कौशल्य (त्यात स्वतःलाही क्षमा करणं आलंच) बरंचसं देण्याचं कौशल्य आणि ग्रेसफुली घेण्याचंही कौशल्य अशी किती तरी कौशल्यं आपल्याला यायला हवीत.
हा आपल्याला मुलं वाढवण्याच्या निमित्तानं मिळालेला अभ्यासक्रम आहे. तो फक्त मुलांच्यासाठी घरातच नव्हे तर आपल्या सबंध जीवनात उपयोगी पडणार आहे. आणि केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या मुलांच्याही पदरात हा अभ्यास बरंचसं यश घालणार आहे.
Read More blogs on Parenting Here