शोभा भागवत लिखित ‘आपली मुलं’ या पुस्तकातील लेख
लेख क्र. 11 : कशासाठी ? मुलांसाठी !
लेखन: शोभा भागवत
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे

‘आपली मुलं’ या लेखमालेतला हा शेवटचा लेख. हा लिहिताना याचंच सगळ्यात वाईट वाटतं आहे.

लहानपणी दरवर्षी सुट्टीत आम्ही आजोळी जायचो. तिथून निघताना दरवेळी आई पण रडायची आणि आजी पण रडायची. त्यांना माहीत असायचं आपण पुन्हा भेटणार आहोत, तरी तो वियोग दरवेळी चटका लावायचाच. तेव्हा ३५ वर्षाची असलेली आई आता ६५ वर्षाची आहे आणि तेव्हा ५५ वर्षाची असलेली आजी आता ८५ वर्षाची आहे तरी या क्रमात बदल नाही !

हे कशाचं वाईट असतं ? एकमेकांना भेटून नेहमीपेक्षा काही नव्या गोष्टी बोलून जो उत्साह आलेला असतो, चार दिवस हसत खेळत गेलेले असतात ते सगळं आता थांबणार याचं वाईट वाटतं की हे माणूस आता पुन्हा दिसेल का नाही या शंकेनं वाईट वाटत असतं ?

ह्या लेखनाच्या निमित्तानं एक छानसं वातावरणं घरी-दारी होतं. लेख जन्माला घालण्यापूर्वी आम्ही दोघं त्याबद्दल बरंच बोलत होतो. लेख झाल्यावर नव्या बाळाकडे पाहावं तशा उत्सुकतेनं तो वाचत होतो.

मुलांनाही सध्या आपली आई आपल्याबद्दल काही तरी लिहीत असते याची गंमत वाटायची. काहीही लिहीत असलं की ती विचारायची ‘माणूस’ चा लेख लिहिते आहेस ?’ लेख घेऊन माणुसचा अंक आला की ती त्यातली चित्रं पाहायची. चित्रातले काही प्रसंग त्यांच्या स्वतःच्या अनुभवातले होते ना ? मग मुलं म्हणायची, मी असा कुठे दिसतो ? मग चित्रकार चित्रं कशी काढतो याबद्दल गप्पा व्हायच्या. ‘आम्हाला वाचून दाखव ना नवीन लेख ’ – ही पण मागणी मी मोठ्या कौतुकानं पुरी करायची.

आणि तुम्हाला गंमत सांगते. या लेखानंतर एकदा मुलाला कशावरून तरी मी रागावले तर म्हणाला, “लेखात लिहितेस रागावू नका आणि रागावतेस नाही का गं? थांब आता सांगतो सगळ्यांना !”

मुलाच्या मनातली शंका काही वाचकांच्याही मनात असते. ते विचारतात तुम्ही सगळं असं वागता का नाही ? आम्ही एकदा येणार आहोत बघायला. मी म्हणते जरूर या. हे सगळं १०० टक्के मला जमत नाही. मी देखील माणूसच आहे. माझ्याही हातून चुका होतातच. कधी आपण असे वागलो याचा त्रासही होतो, वाईटही वाटतं; पण यातून काही शिकण्याची एक पायरी पुढेही जाता येतं. ती चूक आहे हे पटतं, हळूहळू बदल होतो. हे कायमचं चालू राहतं. स्वतःच्या चुकांकडे जर इतक्या उदारपणे पाहायचं तर मुलांच्या चुकांकडे किती उदारपणे पाहायला हवं तेही कळत जातं.

पण आपल्या मनात स्वतःबद्दल आणि मुलांबद्दल एक अहंकार जागा असतो. माझं मूल म्हणजे त्यानं असं असं वागलंच पाहिजे, नाही म्हणजे काय ? आणि मी म्हणजे अशी तशी आई (किंवा वडील) आहे का ? मला सगळं नीट केलंच पाहिजे !

कित्येकदा आपल्या भूमिकांना आणि कर्तव्यांना माफी मिळते; पण मुलानं आपण ठरवलेलं सगळं केलंच पाहिजे हा आग्रह कायम राहतो. स्वतःला जे जमत नाही त्याची विविध कारण आपण शोधतो, इतकंच नव्हे तर स्वतःला पटवून देतो.

लेख वाचल्यावर माझी एक मैत्रीण म्हणाली, ‘हो ! तू काय नोकरी करतेस ! तू असतेस कुठं मुलांजवळ ? आम्ही दिवसभर तेच ते करत असतो. म्हणून वैतागच येतो. तुला काय होतं असं वागावं न् तसं वागावं म्हणायला ?’

हीच माझी मैत्रीण एरवी मात्र बाईनं घरातच असावं म्हणजे मुलांचं सगळं ‘नीट ’ होतं असं हिरीरीनं सांगत असते.

‘नीट’ होण्याच्या आपल्या कल्पना कोणत्या ? मुलांना विविध पदार्थ करून घालणं ? त्यांचे कपडे नीट ठेवणं ? त्यांनी हाक मारली की आपण हजर असणं ?

आपल्या दिनक्रमाचा सगळा मक्ता काय मुलांना दिलाय का आपण ? हे खरं आहे की, मुलांच्या गरजांप्रमाणे आपण आपला वेळ देतो, श्रम देतो, पण त्यापलीकडे मला माझं म्हणून काम असतंच. मग ती नोकरी असेल, घरकाम असेल, वाचन असेल, किंवा इतर काही असेल, माझ्या स्वतंत्र वेळाची गरज मला कळली, त्यावर इतरांनी कुणी हक्क सांगू नये असं पटलं तर मुलाचंही स्वतंत्र मला समजू शकतं. मग मी तुला वाहून घेते आणि तू मला वाहून घे म्हणजे माझं सगळं ऐक, मला हवं ते कर अशी अपेक्षा राहत नाही.

माझं मूल म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते सगळं मी सांगेन तसं कसं वागेल ?

चांगलं काय ते आपल्यालाही माहीत असतंच की, पण तसं वागतो का आपण सगळं ? अनुभवातूनच आपण शहाणपण शिकतो. ते सुद्धा शिकायचं असलं तर, नाहीतर तेच ते अनुभव पुन्हा पुन्हा येऊन त्याच त्या चुका आपण करतच राहतो.

कित्येकदा आपल्याकडे खिलाडू वृत्ती नसते, मूल एखादं स्पर्धेतलं चित्र रंगवत असतं. आपल्याला वाटतं ते त्यानं अगदी छान रंगवावं. आपणच त्याला सूचना देतो. कधी सूचना देणं काही आपल्याला जमत नाही; पण त्यानं रंग वाईट लावलाय, रंग फरफटवला एवढंच कळतं. आपण त्याला रागावतो; पण काय कर हे सांगणंही नेहमी बरोबर नसतं. कारण मग ते आपल्यावरच अवलंबून राहायला शिकतं. अशी ही तारेवरची कसरत असते. त्यापेक्षा ते चित्र रंगवण्याच्या सुंदर अनुभवातून मुलाला शांतपणे जाऊन देणं महत्वाचं असतं. स्पर्धा गौण आहे. ही स्पर्धा जिंकली नाही तर आपलं फार काही बिघडणार नसतं; पण स्पर्धेचं स्तोम माजवून चित्र रंगवण्यातला आनंदही आपण मुलाला मिळू देत नाही. आणि आत्मविश्वासही मिळू देत नाही.

‘आपलं चुकेल का काय ?’ ही भीती त्याच्या मनात आपण पेरून ठेवतो नि हे पीक जन्मभर उगवतचं राहतं. आपलं काही चुकणार तर नाही ? ही भीती मोठेपणीसुद्धा केवढी खोलवर रुजलेली असते ! कोणतीही नवी गोष्ट करायची. तरी आपण घाबरतो. आमची आई इतकी वर्ष लाडू करतेय. सुंदर करते पण दर वेळी तुपात रवा घालताना ‘जय देवा गजानना ’ म्हणते. शेवटी लाडू तीच करणार किंवा बिघडवणार असते; पण संकट घालायचं गजाननाला. त्यानं तरी कधी कुठे लाडू केलेले असतात ?

चुकण्याची, हरण्याची, अपयशाची, लोक काय म्हणतील याची भीती इतकी घट्ट धरून बसतो आपण की त्यानंच अर्धा आनंद नाहीसा होत असतो. मुलांना आपण हा विश्वास देऊ शकू का की चुकलं तरी चालेल तू करून बघ. का चुकलं ? असा प्रश्न विचारायला शीक. त्याचं उत्तर शोधायला शीक.

उत्तर शोधण्याची आपल्याला तरी कुठं सवय असते ? माझी मुलगी इतिहासाचा अभ्यास करत नाही, तर मी इतिहासाचं पुस्तक वाचून पाहते का ? समजून घेते का ? तिला जे आवडतं त्यातून इतिहास समजावून देते का ? काय केलं म्हणजे तिला हे कळेल ह्याचं उत्तर मला शोधता येतं का ? तिनं इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे, एवढंच मी तिला पुन्हा पुन्हा ओरडून, ओरडून, मारून, रागावून, बाईंचा धाक घालून सांगत राहते. त्या पुन्हा पुन्हा केलेल्या चुकीचा काहीही उपयोग होत नसतो, हे मला कळतं पण वळत नाही. मुलांचा अभ्यास आनंदानं घेणं हे मला जमत नाही.

पेपरातल्या प्रश्नांना पाठय पुस्तकातली उत्तरं देणं एवढंच आपण शिकतो. त्यालाच शिक्षण मानतो. प्रश्न विचारणं आणि स्वतःची स्वतंत्र उत्तर शोधणं आपल्याला जमत नाही.

घरातल्याच चार माणसांशी कसा संवाद साधायचा याचीही मोकळीक मुलांना नसते. भावंडं भांडायला लागली की आईनं मध्ये पडायचं, मुलाचा प्रश्न आईनं वडलांकडे मांडायचा. असं का ? त्याला कळू दे की प्रत्येकाच्या स्वभाव. त्याच्याशी कसं वागायचं काय बोलायचं ते त्याला ठरवू दे आणि वडलांनाही कायम आई कशाला हवी वकिली करायला ? त्यांनाही कळायलाच हवं मुलांशी कसं वागायचं ते. ते रागावतात. ते संतापतात हा काही शहाणपणा नव्हे याचा अर्थ ते पालक व्हायला लायक नव्हते. त्यांना नको ते प्रमोशन मिळालंय नि त्या जागी काम करता येत नाहीय. असंही काही घरात आईचं होत असेल.

सर्वांनी एकत्र येणं जितकं आवश्यक तितकंच दोघादोघांनी एकत्र येणं काही गप्पा मारणंही महत्वाचं असतं. गेल्या मे महिन्यात माझा नऊ वर्षाचा मुलगा आणि मी पहाटे फिरायला जायचो, तेव्हा इतर कुणी नसायचं त्यामुळं इतक्या वेगळ्या पातळीवर आमच्या गप्पा चालायच्या. मलाही शांतपणा असायचा, त्यालाही. बोलता बोलता तो म्हणाला, ‘मला कधी कधी वाटतं तुला माझ्यापेक्षा आभा जास्त आवडते’ मी म्हटलं, ‘मी कधी कधी आभाची बाजू जास्त घेते हे मला जाणवतं पण तुला मी कारण सांगते ते पटतं का बघ. तू लहान होतास तेव्हा तू पाच वर्षाचा होईपर्यंत मी घरात होते. आभा मात्र दोन वर्षाची असतानाच मी नोकरी करायला लागले मला सारखं वाटतं तिच्यावर अन्याय झालाय. तुझे खूप लाड झालेत !’

‘पण त्यात माझा काय दोष ?’

‘खरंच तुझा काही दोष नाही त्यामुळं त्याची शिक्षा तुला नाही मिळता कामा.’

‘तू तिचे थोडे लाड कर पण माझी पण बाजू घे.’

‘ही मी काळजी घेईन आणि तू पण समजून घे मी तिची बाजू का घेते ते.’

‘पण तू तिची बाजू घेतेस याची तिला खात्री असते मग ती खोटं पण सांगते खूपदा.’

‘हं ! असं काही नाही होता कामा आणि लहानपणी तिच्यावर अन्याय आणि मोठेपणी तुझ्यावर अन्याय असं नको व्हायला, नाही का ?’

‘हो ना !’

मुलानं अगदी जोरात हो ना म्हटलं.

असं दोघादोघांनी स्वतंत्र बोलण्यात त्या वेळी इतर ताण नसतात. हा फार मोठा फायदा होतो. यातून आपण जास्त जवळ येतो.

हे सगळं जे मुलांबद्दल मी लिहिते त्याबद्दल मला त्यांची खरं तर क्षमा मागायला हवी. त्यांच्या खूप खाजगी गोष्टींची मी जाहीर वाच्यता केली; पण अशासाठी केली की, त्यातला अनुभवाचा वाटा सर्वांपर्यंत पोहोचावा.

मी जे मनापासून अनुभवलं, मुलांच्या लहानपणातला आनंद घेतला ते तुम्हाला सांगावंसं वाटलं. एरवीच्या बालविकासाच्या अमूर्त संकल्पना पुस्तकात आपण वाचतो, शिकतो, ऐकतो त्या मनात रुजत नाहीत असं वाटलं. जिवंत अनुभव सांगितले की ते सर्वाना भिडेल असं वाटलं.

माझी मुलं हुशार, सर्वगुणसंपन्न आहेत असा माझा मुळीच दावा नाही. सर्वच लहान मुलं हुशार असतात. संवेदनाक्षम असतात. त्यांचे हे गुण टिकावेत ही काळजी आपण कशी घ्यायची, हा मुख्य मुद्दा.

हे सगळं लिहिताना हे लहान मुलांबद्दल फार तर १० वर्षाच्या मुलांपर्यंत लिहिलंय हे तुम्हालाही जाणवलं असेल. कारण माझा अनुभव तेवढाच आहे आणि जो अनुभव नाही त्याबद्दल लिहिण्याचं तज्ज्ञपण मी कुठून आणू ? ते मला आणायचं नाही.

ह्या लेखनात अनेकदा उद्वेगानं मी शिक्षणाबद्दल लिहिलं, टी. व्ही. बद्दल लिहिलं, चित्रपटांबद्दल लिहिलं. मुलांशी वाईट वागणाऱ्या पालकत्व नसणाऱ्या माणसांबद्दल लिहिलं ते खोटं नाही.

पण मला हेही पटलं की, नुसतं उद्वेगानं बोलून काही फारसं होत नाही. ह्या सगळ्यातून मार्ग काढणं हे आपल्याला जमायलाच हवं.

आजच्या जाहिराती मुलांवर कोणते संदेश आदळतायत ? मुलींकडे पाहून जिभल्या चाटा, दाराशी साबण विकायला आलेल्या सुंदर मुलीला प्रेयसी करण्याची स्वप्नं पाहा, दारू प्या, डिस्को नाचा, मुलींच्या गालावरची मुरुमं जाईपर्यंत तिला लग्नाला हो म्हणू नका, अमुक शॅम्पू वापरा, तमुक साड्या नेसा, अंग उघडं टाकून नाचा, मंजुळ बोला, कृत्रिम हावभाव करा, भुवया कोरा, लिपस्टिक लावा !

पुरुषार्थाचे, स्त्रीत्वाचे हेच आदर्श आहेत अशी मुलांची समजूत व्हायला नको असेल तर मी काय करायला हवं ? यामागचा अर्थ, त्यातला दिखाऊपणा, त्यातला खोटेपणा, अवास्तवपणा याबद्दल बोलायला हवं आणि चांगलं काय असतं, हेही दाखवायला हवं. चांगले चित्रपट असतात. नाटकं असतात. माणसं असतात. पुस्तकं असतात. चित्रं असतात. त्यातलं सौंदर्य, उदात्तपण मुलांपर्यंत पोहोचवायला हवं तेच ह्या आदळणाऱ्या लाटा दूर ठेवील.

मुलांना चांगल्या-वाईटाचा विवेक शिकवणं, त्याबद्दल विचार करायचं सामर्थ्य देणं, आत्मविश्वास देणं, निर्णयक्षमता देणं हे आपलं काम आहे आणि ‘देणं ’ तरी कसं म्हणू ? ते त्यांना घेता यावं अशी परिस्थिती निर्माण करणं हे आपलं खरं काम आहे.

मी जशी लिहीत गेले ना तशा मलासुद्धा काही गोष्टी अधिक स्पष्टपणे कळल्या. त्याची बांधिलकी वाढली. मुलांना असं वागवायला हवं, हे मीच लिहिलंय. तेव्हा आता तसं मला वागलं पाहिजे याची जाण वाढली. हा अहंकार नव्हे, हे ‘मूल’ ह्या विषयातलंच थोडं जास्त कळणं आहे.

अनेक वाचकांची पत्रं येतायत, फोन येतायत, काही पालक आपापले प्रश्न घेऊन भेटायला येतायत आणि ह्या सर्वांशी बोलताना मला खूप बरं वाटतंय, मुलांबद्दल विचार करणाऱ्यांच्या वर्गात भर पडतेय हे समाधान मिळतंय. एक डॉक्टर म्हणाले, हे लेख मला पंधरा वर्षांपूर्वी वाचायला मिळाले असते तर मी माझ्या मुलाशी वेगळा वागलो असतो. तरुण आया म्हणतात आम्ही लेख वाचतो आणि मिस्टरांना वाचायला लावतो. मोठ्या आया म्हणतात आमची मुलं आम्हाला विचारतात तू अशी वागलीस का गं आम्ही लहान असताना ? एक आई म्हणाली, माझी लहान मुलं ‘माणूस ’ आला की अंक पाहतात आणि दोन पाठमोऱ्या मुलांचं ते चित्र दिसलं की, मला म्हणतात, ‘आई,मुलांवरचा लेख आलाय गं. वाच !’ कुणी मानसशास्त्र जाणणारे म्हणतात ‘तुम्ही थियरी इतक्या सहजपणे अनुभवातून मांडलीत !’

हा तुमचा-आमचा सहवास आता संपणार याचं वाईट वाटतंय !

पण आपण हे ठरवून टाकू की, हा विषय मागे पडू द्यायचा नाही. याबद्दल लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, वाचलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, सर्वांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, तुम्हाला जे जे जमेल ते तुम्ही करायचं. मलाही आणखी लिहायचंय. तुमची माझी पुन्हा लेखनातून भेट होईलच आणि तेव्हा आपणही पालक म्हणून मोठे झालेले असू नाही का ?

आपल्या संवादाची संधी ज्यांनी आपल्याला दिली त्या ‘माणूस ’ च्या मेधा राजहंस आणि श्री. माजगावकरांना धन्यवाद देऊन ही लेखमाला संपवते. ‘अच्छा !’

संकलन – आभा भागवत;
संकल्पना – प्रसाद मणेरीकर

Read More blogs on Parenting Here