शोभा भागवत लिखित ‘आपली मुलं’ या पुस्तकातील लेख
लेख क्र. 2 : आनंदाचे अनुभव
लेखन: शोभा भागवत
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे
लहानपणच्या माझ्या एका मैत्रिणीची आई अतिशय हौशी होती. ती आम्हा सात-आठ छोट्या मुलींना जमवून आमचे नाच बसवायची, नाटकं बसवायची, आम्हाला गोष्टी सांगायची. एकदा तिनं आमच्यासाठी खास बाहुलीच्या लग्नाचा बेत केला होता. तारा, मणी, मोती आणून आम्हाला बाहुला-बाहुलीसाठी दागिने करायला शिकवले होते. शिंप्याकडून कापडाचे रंगीत रंगीत तुकडे आणून पोशाख शिवले होते. लग्नाच्या फराळासाठी खास छोटे छोटे लाडू-करंज्या केल्या होत्या. आम्हाला जरीच्या साड्या नेसवल्या होत्या. आमच्या एका मैत्रीणीला तिची आई साडी देईना तेव्हा त्यांनी स्वतःची साडी दिली. तिला नेसवली होती. (अशा कार्यक्रमात आईनं स्वतःची साडी न देणं हा फार दु:खद अनुभव असतो. तो मनाला लागून राहतो.) खेळायच्या छोट्या मोटारीतून नवरा-नवरीची वरात पण काढली होती.
हे बाहुलीचं लग्न मला अनेकदा आठवतं तेवढी खरी मोठी लग्नं आठवत नाहीत. कारण मला वाटतं हे लग्न खास आमच्यासाठी होतं. आम्ही त्याची तयारी केली होती. आम्ही जे म्हणू ते प्रमाण होतं. एरवीच्या मोठ्या लग्नात नवे कपडे घालून मिरवण्याशिवाय काही स्वतःला कामच नसतं. बरं, अशा लग्नात लहान मुलांकडे फारसं कुणी लक्षही देत नाहीत. मुलं मुलं आपापसात खेळत असतात आपली.
असे खास मुलांसाठी, म्हणून आपण काही कार्यक्रम करतो का? आपल्या घरात होणाऱ्या कार्यक्रमात मुलं आपली फरफटली जातात एवढंच. आपल्याला जो सिनेमा पहायचा असतो, तो केवळ प्रोढांसाठी नसला तर मुलांना आपण बरोबर नेतो. आपल्या कुणा मावशी-काकीकडे जायचं असलं की, आपल्याबरोबर मुलांना नेतो. लग्नाला नेतो. इतर समारंभांना नेतो, सहलींना नेतो, गावाला नेतो. ह्यात मुलं बहुधा नाही म्हणत नाहीत. थोडी मोठी असली, त्यांना निवडीची परवानगी असली तर ती कधीकधी नाही पण म्हणतात. त्यांचा नकारही नेहमी आपल्याला पटतोच असं नाही. तो आपल्या गैरसोयीचा असला तर आपण त्यांना दामटून बरोबर नेतोच.
अर्थात आपल्याही काही असचणी असतात. मुलं घरी राहतो म्हणाली तर त्यांना पाहणार कोण? हा प्रश्न असतो. पुन्हा आपण जिथे जाणार तिथे कदाचित ‘हे काय? मुलांना न घेता कसे आलात?’ हा प्रश्नही विचारला जाण्याची शक्यता असते. कधी तरी आपल्याला आपलं मूल मिरवायचंसुद्धा असतं.
जाणूनबुजून ही मुलांची फरपट आपण करतो असं नाही; पण असा एखादा निर्णय घेताना, कार्यक्रम ठरवताना, मुलांचंही काही मत असतं, मार्ग असतात, विरोध असतात, प्रश्नांवर तोडगेसुद्धा असतात हे आपण विचारात घेत नाही.
कधीकधी काही माणसांविषयी मुलांची मतं इतकी ठाम बनलेली असतात की, ती बदलणं फार कठीण जातं. अशा वेळी केवळ मोठ्या माणसांना मान दिला पाहिजे, या सक्तीपायी त्या जीवाला त्या मोठ्या माणसांशी नमतं घ्यायला लावणं, त्यांना मान देणं, त्याचं ऐकणं हे जमत नाही. मुलांवर फार अन्याय होतो.
एकदा आमच्याकडे ओळखीच्या एक मोठ्या बाई आल्या होत्या. मुलं घरात होती. मी जवळच कुठे तरी काही कामासाठी गेले होते. या बाईंनी आल्यावर मुलाला हुकुम सोडला, ‘जा रे, तुझ्या आईला बोलावून आण ! म्हणावं अमुक आल्यात !’ मुलांनी नेमका काय विचार केला मला माहीत नाही; पण त्याला कामासाठी गेलेल्या आईला केवळ या बाईंशी गप्पा मारण्यासाठी बोलावून आणावं हे पटलं नाही. कोण कशासाठी येतं, किती म्हत्वाचं किंवा जवळचं असतं याचा मुलांना बरोबर अंदाज असतो. त्या बाई रागावल्या. मग त्या म्हणाल्या, ‘इथं माझी नात असती तर जा म्हटल्याबरोबर गेली असती !’ हे वाक्य मुलाला फारच लागलं. कारण तुलना आली. कुठे तरी त्याला वेडं ठरवलं गेलं. तो पुन्हा नाही म्हणाला. मग त्या बाई म्हणाल्या, ‘मी सगळ्यांना सांगीन हा मुलगा ऐकत नाही सांगितलेलं. सगळ्यांना वाटतं तू शहाणा आहेस, पण असा कसा वागतोस?’ झालं हा आरोप म्हणजे कळसच झाला !
मी आल्यावर या बाई मला हसत हसत सांगायला लागल्या काय काय घडलं ते. मी त्यांची तात्पुरती समजूत घातली. मग त्या गेल्यावर मुलाला म्हंटल, ‘काय झालं रे?’ तो म्हणाला, ‘त्यांनी नुसतं विचारलं असतं तर मी गेलो असतो; पण असं बोलावणारी माणसं मला मुळीच आवडत नाहीत. मी अशांचं कधीच ऐकणार नाही. त्याच्या बोलण्यात राग होता, संताप होता, अपमान होता, दुखावलेपणाचा सूर होता. मला त्याची बाजू समजली; पण एवढं सगळं समजून मुलांशी बोलणारी माणसं या समाजात कुठे मिळणार होती? अशाही माणसांशी जुळवून घ्यायला त्याला शिकवायला हवं !’
मोठी माणसं मुलांशी अशी वागतात ती वाईट हेतूनं मुळीच नाही; पण लहान मूल म्हणजे, त्यानं आपण सांगू ते तत्परतेनं ऐकलं पाहिजे, म्हणू तिथे चटपट गेलं पाहिजे, अशीच आपली अपेक्षा असते. आपल्याला त्याची जरूर नसते, तेव्हा त्यानं मुकाट्यानं एकाग्र चित्तानं अभ्यास करत बसलं पाहिजे, पण आपल्याला गरज लागली, तर कोपऱ्यावरल्या दुकानात धावत जाऊन साखर आणून दिली पाहिजे. तेव्हा तो जर म्हणाला, मला अभ्यास आहे तर तो उर्मट ठरतो, न ऐकणारा ठरतो.
सगळ्या प्रकारच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला मुलानं शिकलं पाहिजे हे मान्य; पण सारखी दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे तारेवरची कसरत कशी जमावी? एखादी खाष्ट सासू जसं सुनेला म्हणते, ‘ज्यात त्यात काय विचाराचं ते? आपलं डोकं चालवून थोडं काम करायला शीक !’ आणि तिनं स्वतंत्रपणे काही केलं की लगेच म्हणते, ‘कधी दुसऱ्याला विचारायचं नाही सवरायचं नाही; आपल्या मनात येईल ते करत सुटायचं.’ जेव्हा तुम्ही आपलं डोकं चालवून काम करायला सांगता तेव्हा ते करताना काही चुका होणारच, हे गृहीतच धरायला नको का? तसंच एका विशिष्ट प्रकारचं वळण मुलाला लावताना, त्याची दुसरी बाजूही लक्षात घ्यावी लागतेच. अभ्यासाला बसल्यावर उठवायचं नाही म्हटलं की, मूलं उठणार नाही; मग जेव्हा कामासाठी त्याला उठवायचं, तेव्हा त्याला त्या आणीबाणीचं कारणही थोडक्यात सांगायला हवं; पण इतकं मुलाशी बोलत बसायला वेळ कुणाला असतो? आणि जरूर काय त्याची? ‘सांगतो ते मुकाट्यानं कर का म्हणून विचारायचं नाही !’ हे सुभाषित आपणही लहानपणी अनेकदा ऐकलेलं असतं.
हे वाक्य लिहिलं आणि आठवणं झाली आम्हाला पोहायला शिकवणाऱ्या सरांची. पोहणं म्हणजे पाण्याशी खेळणं आहे. कुठे तरी स्वतःच्या शरीराला पाणी उचलून कसं धरत, ते समजून घेणं आहे; पाण्याचा मुलायम स्पर्श अनुभवणं आहे, शांतपणे तरंगताना, फ्लोटिंग करताना, साऱ्या शरीराला विसावा देणं आहे, त्याचा कधी त्यांनी पत्ताच लागू दिला नाही. ते कधीकधी आम्हाला पाण्यात बुडवायचे. घाबरलं तर इतक्या जोरात ओरडायचे की, घाबरायलाही आम्ही घाबरायचो ! कानात पाणी जातं म्हणलं की खेकसून म्हणायचे, ‘आमच्या नाही का जात पाणी कानात?’ काही विचारलं की म्हणायचे, ‘मार २०० पाय. सांगतो म्हणून करायचं. का म्हणून विचरायचं नाही.’ कधी तर ते विहिरीच्या काठावरून ढकलून पण द्यायचे !
अर्थात असं वागूनही त्यांच्याकडे बरीच मुलं पोहणं शिकली. माझ्यासारखी काही भीतीनं शिकली नाहीत !
या पोहण्याच्या शिक्षकांचा आणि शाळेतल्या इतर काही शिक्षकांचा अनुभव पहिला तर असं वाटतं की, मुलांना काही शिकवायचं, तर ते त्यांना ओरडून, मारून, अपमान करूनच शिकवलं तर ते येतं असं काहींना वाटतं. यात फक्त शिक्षकच असत असं नाही. काही पालकांनाही असचं वाटतं.?
याचं कारण बहुधा मुलांना न ओरडता, न मारता, न रागावता शिकवावं कसं, जे शिकवतो त्यामागचं तत्व सोप्या शब्दात स्पष्ट कसं करावं, हे आपण कधी शिकलेलेच नसतो. कधी कधी तर केवळ पूर्वतयारी नसल्यानं आपण मुलांना वाईट अनुभव देतो.
बालवाडीत प्रथम जाण्याच्या अनुभव हा असाच असतो. मोठ्या उत्साहानं, नवे कपडे घालून, डबा घेऊन, पोर शाळेत पोचतं; पण आईला घरी जाऊ द्यायला काही तयार नसतं. रडायला लागतं. मग बाईनी पकडून ठेवायचं, दार लावायचं, आईनं निघून जायचं. आता ही आई आपल्याला पुन्हा कधीही दिसणार नाही अशा आकांतात पोर रडत राहतं. त्याचं पाहून इतरही शांत बसलेली मुलं सूर काढतात.
हा पहिला अनुभव जरा आनंदाचा अनुभव होणार नाही का? एकदा एक बालवाडी –प्रवेशाची छोटीशी फिल्म पाहिलेली आठवते. त्यात आईबरोबर मूल येतं. आईचं बोट धरून शाळाभर हिंडतं. बाईंची ओळख करून घेतं. बाई मुलाच्या घरी येऊन मैत्री करतात. शाळेत पहिला दिवस येतो. मूल येतं. बाई वर्गातल्या इतर मुलांची ओळख करून देतात. दोन-तीन मुलं पांढऱ्या उंदरांशी खेळत असतात. त्यातलं एक मूल हातातला उंदीर या नव्या मुलाला दाखवतं. नवं मूल त्याला हात लावून पाहतं. चटकन हात मागं घेऊन हसतं. सगळीच मुलं हसतात. ते मूल हळूहळू रमतं आणि आई केव्हा गेली न केव्हा आली ते त्याला कळतही नाही.
आपल्या बालवाड्यांमध्ये पालकांनी थांबायचं म्हंटल तर जागा हा मोठा प्रश्न असतो. या प्रश्नापेक्षाही, मुलाच्या मनाची पूर्वतयारी नसते, हा अधिक महत्वाचा प्रश्न आहे. अडीच-तीन वर्ष आईला दिवसभर चिटकून असलेलं मूल एकदम शाळेत रमेल कसं? यासाठी घरातसुद्धा मूल खेळत असताना आईनं त्याला सांगून थोडं बाजूला जाऊन परत येणं व हा काळ हळूहळू वाढवणं, हेही करायला हवं. पंधरा दिवस तरी मुलाबरोबर शाळेत थांबणं, त्याच्या बरोबरीच्या मुलांमध्ये त्याला रमवणं, खेळण्याची ओळख करून देणं, हे व्हयला हवं.
पोहण्याच्या अनुभवात काय किंवा बालवाडीच्या अनुभावात काय रडणारी मुलं नंतर शिकतात, रमतात हे खरंच आहे; पण हे अनुभव थोडे अधिक आनंददायक नाही का करता येणार?
अलीकडे खास मुलांसाठी अशी बरीच नाटकं येऊ लागलीत. काही चीत्रपटही येतात. मुलांसाठी रेडिओ, टी.व्ही., वर कार्यक्रम होतात. शाळांनी आयोजित केलेल्या सहली, स्नेहसंमेलनं, स्पर्धा असतातच; पण याशिवाय पालकांनी स्वतःच्या मुलांसाठी खास वर्षातून एखाद्या वेळी तरी काही कार्यक्रम योजायला हवेतच.
मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्या मित्रमंडळींना बऱ्याच ठिकाणी बोलावलं जातं. थोड्या कळत्या वयाच्या मुलांवरच ह्या कार्यक्रमाची योजना सोपवता येते. खायला काय करावं, इथंपासून कोणकोणते खेळ खेळावेत, मुलांना काय द्यावं ते सगळं मुलं सुचवतात. एखादी गोष्ट आपल्या बजेटमध्ये बसत नाही तर पर्यायही सुचवतात. आपणच सगळा पुढाकार घेऊन करण्याची जरूर नसते. या प्रसंगी खेळायच्या यादीत दगडांनी विटांचं कूट करण्यापासून, बाजाची पेटी वाजवण्यापर्यन्त सगळ्या खेळाचा समावेश असतो.
आपण आनंदानं घेतो असे कित्येक अनुभव, त्यांची माधुरी मुलांनाही हवीशी वाटत असते. रात्रीच्या वेळी घरात सगळे दिवे मालवून, खिडकीतून येणाऱ्या पौर्णिमेच्या चांदण्यात बसून गझल ऐकणं मुलंही तितक्याच तन्मयतेने करू शकतात.
सहलीला गेलं असताना जंगलात, काळ्याकुट्ट अंधारात जीव मुठीत धरून केवळ रातकिड्यांची किर्रकिर्र ऐकत वर चमकणारे, उडणारे काजवे पाहत मुलंही खूष होऊ शकतात.
काही आनंदाचे अनुभव असे सहजगत्या मिळू शकतात तर काही मुद्दाम निर्माण करावे लागतात.
रोज रात्री झोपायच्या वेळी दोन्हीकडून दोन मुलं आपल्याला बिलगली आहेत, गोष्ट गोष्ट असा गलका करताहेत आणि आपणही मुद्दाम मुलांसाठी वाचून ठेवलेली गोष्ट, हावभाव, अभिनय, आवाजांचे चढउतार यासकट सांगतो आहोत. गोष्ट ऐकत ऐकत मुलं कुशीत झोपी जात आहेत. हा मुलांनाच काय आपल्यालासुद्धा, मोठा आनंदाचा ठेवा वाटतो आणि अशी कितीशी वर्ष वाट्याला येतात आयुष्यात? सुख सुख म्हणतात ते याहून काय वेगळं असतं? असं वाटायला लावणारी ही वर्ष मुलांच्या लहानपणीच अनुभवायला मिळतात.
मुलांना वेगवेगळी गावं दाखवायची, प्रेक्षणीय स्थळ दाखवायची, किल्ले दाखवायचे, तशीच वेगवेगळी माणसंसुद्धा आवर्जून भेटवायला हवीत. आमचे एक चित्रकार ज्येष्ठ मित्र येतात. नवीन केलेली चित्रं दाखवतात. ती चित्रं कुठं ठेवून दाखवायची, यासाठी जागा निवडण्याची त्यांची गडबड सुद्धा पाहण्याजोगी असते. मग चित्रातला मूड कसा पकडला ते, ते सांगतात . त्या मूडमध्ये आपल्याला घेऊन जातात आणि एकेक चित्र पोटचं पोर असल्यासारख्या हळूवारपणे ठेवून देतात. हे सगळं मुलांना असंच पाहायला मिळतं, याचं मला समाधान वाटत असतं. मुलाला बघून ते म्हणाले होते, याला मोठी भिंत द्या रंगवायला. त्याच्या हालचाली कशा जोरदार आहेत, तसेच हात फेकून रंगाचे फटकारे उठले पाहिजेत. त्याला छोट्या कागदावर चित्र काढायला लावू नका !
आपल्यासुद्धा लहानपणीच्या आठवणीत निसर्गाच्या अनुभवांबरोबरच काही अस्सल माणसांना भेटल्याच्या आठवणीही कायम ताज्या राहतात.
जीवनाची ही सुदैवी बाजू बघता बघता दुर्दैवी बाजूची जाण येणं, माहिती असणं, हेही फार महत्वाचं आहे. हे आनंदाचे अनुभव घेणं जितकं महत्वाचं, तितकंच ते इतरांना देणंही महत्वाचं आहे. यासाठी अशा अनुभवात ज्यांना हे मिळू शकत नाही त्यांना आठवणीनं सहभागी करून घेणं. सहजपणे सामील करून घेणं जमायला हवं.
अभिजात रसिकता आणि उथळ विलासीपणा, रंगढंग यातला फरक मुलांना जाणवला पाहिजे. हे अनुभव ओरबाडायचे नसतात, हावरेपणानं ओढून घ्यायचे नसतात. छान वातावरण तयार करून त्यांचं त्यात हलकेच स्वागत करायचं असतं. हे मुलं बघूनच शिकत असतात.
त्यामुळे असे आनंदाचे अनुभव सुजाणपणे घेणं आपल्याला शिकत राहायला हवं
Read More blogs on Parenting Here