शोभा भागवत लिखित ‘आपली मुलं’ या पुस्तकातील लेख
लेख क्र. 3 :आपलं मूल आहे तरी कसं ?

लेखन: शोभा भागवत
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे

लहानपणी आमच्या शेजारचं कुटुंब आणि आमचं कुटुंब यांची फार दोस्ती होती. शेजारच्या कुटुंबातील सगळी माणसं गोरी. त्यामुळं काळं-गोरं हा कायम चर्चेचा विषय. मी अगदी लहान ४-५ वर्षांची असल्यापासून माझा मुक्क्कम शेजारीच जास्त. शेजारच्या बाईना कामात मदत करणं, बाकीच्यांच्या अधेमधे लुडबुड करणं मला आवडायचं. आई म्हणते की, मी तिला म्हणयची, ‘बाहेर कुणाकडे काम केलं की कौतुक करतात म्हणून मला बाहेरच काम करायला आवडतं.’ सकाळी मला उठायला उशीर झाला तर शेजारचे तात्या उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले म्हणत मला उठवायचे. हातात खाऊची पुडी द्यायचे. संध्याकाळी त्यांच्याबरोबर फिरयला न्यायचे. एकूण ह्या शेजारच्या घरी मला फारच भाव होता.

पण एक गोष्ट नकळत घडायची. ही सगळी मंडळी मला कौतुकानंच पण ‘काळी माऊ’ म्हणायची. तेव्हा मला ते फारसं वाईट वाटत नसावं; पण आपण काळ्या आहोत हे पुढं फार दिवस माझ्या मनात घर करून राहिलं. आमची आत्या बोलायला चुणचुणीत हुशार होती. तिचे पण काही बोल माझ्या मनात असे कायमचे राहिले. एकदा दिवाळीच्या गडबडीत एका किंचित अंधाऱ्या खोलीत मी काही तरी करीत बसले होते; तेव्हा आत्या तेथे आली आणि म्हणाली, ‘अग बाई, शोभे तू होय ! मला दिसलीच नाहीस अंधारात !’ ती माझ्या वडीलांना म्हणायची, ‘बापू आत्तापासून हुंड्याचे पैसे जमवायला लागा. मुलगी खपवताना जड जाईल.’ हे पण माझ्या फार दिवस लक्षात राहिलं आणि त्यामुळंच की काय कुणास ठाऊक हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही, लग्नासाठी कुणाला दाखवून घेणार नाही. हे माझ्या मनात पक्कं झालं आणि प्रत्यक्षात कोणताही समारंभ न करता, हुंडा देणं-घेणं, मानपान हे शब्दसुद्धा न उच्चारता अतिशय सन्मानानं आम्ही लग्न केलं. गंमत म्हणजे पत्र मैत्रीतून आमचं लग्न ठरलं. माझा होणारा नवरा तेव्हा अमेरिकेत होता. मी भारतात ! आम्ही एकमेकांना पाहिलेलं नव्हतंच. पत्रांतून मनं जुळली म्हणून लग्न करावंसं वाटलं. मग एकमेकांचे फोटो पहिले. लग्नासाठी मीच अमेरिकेत जायचं ठरलं तेव्हा माझे वडील म्हणाले, ‘आम्ही लग्नासाठी पैसे बाजूला ठेवले होतेच. तेव्हा अमेरिकेचं तिकीट मी काढणार.’ माझे सासरे म्हणाले, ‘अहो, आम्ही तिला आमची सून मानलं तेव्हा आम्ही तिकीट काढून तिला पाठवणं योग्य !’ आणि तेवढ्यात नवऱ्याचं पत्र आलं की, ‘आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं तेव्हापासूनच ती माझी बायको आहे हे मी मानलंय. तेव्हा तुम्ही कोणी प्रवासाचा खर्च करायचा प्रश्नच येत नाही’ आणि त्यानंच तिकीट पाठवून दिलं. तेव्हा मी शिकत होते त्यामुळं मिळवती नव्हते.

हे सगळं निघालं हुंडा द्यावा लागेल प्रकरणातून; तर इतकं सविस्तर लिहायचं कारण असं की, लहानपणापासून आपण काळ्या आहोत हे जे काही मनात पक्क रुतून होतं, ते हळूहळू जायला अनेक वर्ष लागली.

योगायोगानं सासरची सगळी मंडळी पुन्हा गोरीपान ! लग्न ठरवलं तेव्हा एकदा सासुबाईंनी मला विचारलं होतं, ‘तू काळी आहेस हे त्याला कळवलं आहेस का ?’ मात्र त्यांनी ते इतक्या काळजीनं आणि पुढं काही घोळ होऊ नये ह्या हेतूनं विचारलं की ते मला लागलं नाही. माझ्या काळेपणाचा हा एवढाच उल्लेख!

सासूबाई, नात्यातल्या एका बाईंची गंमत सांगतात. त्यांच्या एका मुलाची बायको काळी होती. तिला त्या म्हणायच्या, ‘काय मेली काळी घूस आलीय घरात !’ दुसऱ्या मुलाची बायको एकदम गोरीपान ! तर म्हणायच्या, ‘काय नुसती पांढरी पाल आहे झालं !’ काळे-गोरेपनावरून असे असंख्य वाक्बाण आपण ऐकत असतो; पण त्याचा मुलांवर किती खोलवर परिणाम होत असतो हे आपल्या लक्षात येतच नाही.

कधी याउलट सुंदर दिसणाऱ्या मुलाला, विशेषतः मुलीला, सगळे लहानपणापासून इतके चढवून ठेवतात की, त्यापायी तिच्या व्यक्तीमत्वात कायमचा एक आखडूपणा येतो. मग चर्चा होते, ‘दिसते छान, पण फार कॉन्शस आहे ना ही? त्यामुळं सगळं रूप मारलं जातं.’ नाकापेक्षा मोती जड व्हावा तसं व्यक्तिमत्वापेक्षा तिचं सौदर्य जड होत.

एकाच घरातल्या दोन मुलांत ही तुलना झाली तर फारच कठीण असतं. हा गोरा, तो काळा, ही हुशार, तो मट्ठ, हा धीट, ती लाजाळू, ही नाजूक, ती दांडगोबा हे सहज दिसणारे मुलांचे विशेष, त्यांचे गुण–अवगुण ठरतात. एकाच मांजरीला झालेली तीन पिल्लं तीन वेगवेगळ्या रंगांची असतात. एक काळू, एक गोरु, एक भुरू अशी त्यांची सहज नावं ठेवली जातात; पण ते काही त्यांचे गुण ठरू शकत नाहीत; पण माणसात काळं हा चक्क अवगुण ठरतो, याचं वाईट वाटतं.

माणसाचं विश्व थोडं व्यापक झालं, अनेक माणसं भेटत राहिली, जवळ येत गेली, तर त्याला कळंत की, नुसतं काळं, गोरं, सुंदर, कुरूप, उंच, ठेगणं यापेक्षा माणसाचं सबंध व्यक्तिमत्व, त्याचं मन, त्याची समज, त्याच्या आतली श्रीमंती यांना बाह्य स्वरूपापेक्षा जास्त महत्व असतं. ही समज आली की, मग सुंदर असून उथळ असणारी माणसं आकर्षण वाटत नाहीत. नुसतीच देखणी पण मठ्ठ माणसं असह्य होतात. देखणेपणापायी गर्विष्ठ बनलेली माणसं जवळ येऊ शकत नाहीत हे सगळं कळतं; कारण ती संपूर्ण माणसं नसतातच. काही जादूनं त्यांचं सौदर्य गेलं, तर ती माणसं म्हणून उरणारच नसतात. याउलट दिसायला जेमतेम असणारी काही माणसं, व्यक्तिमत्वानं, सगळी रुपाची उणीव भरून काढतात. त्यांचं बोलणं, त्यांचे विचार, त्यांचा आचार इतका लोभसवाणा असतो की ती त्यापायी आकर्षक आणि सुंदर भासतात.

तेव्हा समृद्ध व्यक्तिमत्व ही सर्वात महत्वाची गोष्ट. शरीराचं सौदर्य त्यानंतर येतं; कारण ते आपल्या हातातलं नसतं. ते मिळवण्यासाठी कष्ट करावे लागलेले नसतात हे पक्कं कळणं फार महत्वाचं आहे.

हे जसं आपल्याला कळलं पाहिजे, तसं ते लहानपणापासून आपल्या मुलांनाही समजलं पाहिजे. सगळी समज काही लहानपणीच येणार नाही; पण निदान स्वतःबद्दलचे काही अहंगंड, न्यूनगंड त्यांच्या मनात रुजू नयेत, याची काळजी आपण घेतली पाहिजे.

यासाठी आपलं मूल आहे तरी कसं हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. गुणांच्या आणि अवगुणांच्या ढोबळ वर्गवाऱ्या आपण करत असतोच; पण त्यापलीकडे मूल कसं आहे हे त्याच्या मनात डोकावलं तरच कळू शकतं. त्याचं मन त्याच्याच शब्दांमधून कधी तरी अचानक उलगडत जातं.

आपण कसे आहोत हे समजून घेण्यासाठी मानसशास्त्रात, अनेक प्रकारच्या प्रश्नावल्या असतात. ह्या प्रश्नावल्या मोठेपणी नोकरीच्या निवडीच्या वेळी कदाचित समोर येतात. कधी काही प्रश्न निर्माण होऊन मानसोपचार तज्ज्ञकडे जावं लागलं तर समोर येतात; कधी एखादं प्रशिक्षण घेताना त्या हाती येतात. मोठेपणी या प्रश्नावल्यांची उत्तरं देताना जाणवतं की, ‘अरे, आपण असे आहोत हे अशा स्पष्ट शब्दात आपल्याला कधी जाणवलंच नव्हतं !’ माणसाच्या व्यक्तिमत्वाला एवढे पदर असतात की, त्या पदरापदरावर पुन्हा अनेक छटा असतात याबद्दल आपण विचारच केला नव्हता.

या प्रश्नावल्यांमधून, स्वतःची-स्वतःबद्दलची कल्पना बाहेर येते. आपल्या व्यक्तिमत्वाला आपल्याला आणि लोकांना माहित असलेला भाग, फक्त आपल्यालाच माहित असलेला भाग, फक्त लोकांनाच माहित असलेला भाग आणि कुणालाच माहित नसलेला अज्ञात भाग आपल्याला उमजत जातो.

अशीच एक प्रश्नावली सोडवत असताना माझी मुलं मागं लागली, ‘आम्हाला पण सांग ना काय करतेस म्हणून.’ मग त्या मूळ इंग्रजी प्रश्नावलीचं भाषांतर करून दिलं. ती प्रश्नावली म्हणजे काही गुण, काही अवगुणांची यादी होती. तुम्ही कसे आहात ते तुम्हीच शोधून काढायचं होतं.

मुलांना ही यादी देऊन वाचून नुसत्या चुक-बरोबरच्या खुणा करायला सांगितल्या. काही शब्दांचे अर्थ कळेनात तेव्हा त्यांच्या संदर्भात त्यांचे अर्थ सांगितले.

खुणा करून झाल्यावर पाहिलं, तर मुलांनी इतक्या प्रामाणिकपणे आपल्या काही दोषांवरही खुणा करून ते असल्याचं मान्य केलं होतं ! बहुतेक सगळ्या गुणांवर बरोबरच्या खुणा होत्या, त्यावरून मुलांशी बोलणं झालं.

वेळेचं फारसं भान नसलेल्या माझ्या मुलीनं वक्तशीर त्या शब्दावर खूण केली होती. मी तिला म्हंटल, ‘आभा, वक्तशीर म्हणजे वेळेवर सगळं करणारी. उठल्याबरोबर तोंड धुणारी, दुध पिणारी, वेळेवर अभ्यासाला बसणारी, वेळेवर जेवणारी, वेळेवर शाळेत जाणारी, वेळेवर परत येणारी असं वागतेस का गं तू ?’

‘सारखं काय गं वेळेवर वेळेवर म्हणतेस ? म्हणजे काय ?’ आता ही माझी परीक्षा होती.

‘अगं, म्हणजे तू उठल्यावर नुसतीच बसून राहतेस. मग काही तरी खेळ काढून खेळतच राहतेस. मांजराशी खेळत बसलीस तर खूप वेळ त्यातच घालवतेस. मग सगळ्याला उशीर होतो. अभ्यास पुरा होत नाही, शाळेत जायला गडबड होते; हो की नाही? म्हणजे मग वेळेवर काही होत नाही !’

‘मग वेळेवर खेळायचं पण असतं की गं लहान मुलांना !’

‘हो ना, खेळलं तर पाहिजेच; पण अभ्यासाच्या वेळी अभ्यास, खेळाच्या वेळी खेळ, शाळेच्या वेळी शाळा !’

‘पण एखाद्या लहान मुलीला अभ्यासाच्या वेळी खेळायचं असलं तर ? मग ती खेळायच्या वेळी अभ्यास करेल !’

बाई शाळेत अभ्यास बघणार, झाला नसला तर पट्टी मारणार, याचा धाक जबरदस्त होता; त्यामुळं मुलीला ते मान्य करावं लागलं, पण वक्तशीरचा अर्थ तिला समजावून देता देता, मला असं समजलं की आपण ज्या वेळी ज्याच्या म्हणून ठरवतो त्या वेळेत बसायचं बंधन मुलांवर पडतं. सवय झाली की ते अंगवळणी पडतं; पण प्रत्येकाचा नैसर्गिक कल, झोपण्याचं, जगण्याचं वेळेचं चक्र याला पूर्ण न्याय द्यायचं ठरवलं तर ११ ते ५ शाळा, हेही बदलावं लागेल. मग मुलाला खेळावंसं वाटतं तेव्हा खेळायची वेळ असेल; अभ्यास करावासा वाटतो तेव्हा अभ्यास असेल; मधे एक लेख वाचलेला आठवतो. त्यात लेखकानं प्रत्येकानं आपापलं असं नैसर्गिक वेळापत्रक शोधून काढायचं आवाहन केलं होतं. त्याप्रमाणे काम केलं तर जास्त प्रभावीपणे काम होतं हा अनुभव होता.

शेवटी आमच्या चर्चेत वक्तशीरपणाचा अर्थ मुलीला समजावून देताना ७ च्या आसपास उठणं आणि ११ ला शाळेत जायचं असतं म्हणून मधल्या वेळात तोंड धुणं, दुध पिणं, शी, अंघोळ, अभ्यास, जेवण सगळं उरकणं हेच मी सांगते आहे असं माझ्या लक्षात आलं. मुलीच्या संदर्भात तिला हे कळणं, याच्याशी तिनं जुळवून घेणं, हे महत्वाचं होतं. माझ्या सोईचं होतं; त्यात तिच्या नैसर्गिक प्रेरणा मारल्या जाणं अपरिहार्य होतं.

या गुंतागुंतीला माझ्याकडे उत्तर नव्हतं. कित्येकदा मुलांच्या नैसर्गिक प्रेरणा मारण्याचंच काम आपण करत असतो मग ती भूक असो, खेळ, असो, अभ्यास असो, झोप असो.

‘संशयी’ या शब्दावर मुलांनी खूण केलेली पाहून मला आश्चर्य वाटलं. मी म्हंटल.

“तू संशयी आहेस का ?”

“हो ’

“कशाचा संशय येतो तुला ?”

“मी बाहेर गेलो की आभा माझी मोटार घेईल आणि मोडेल असा संशय येतो.”

“असा का संशय येतो ?”

“कारण तिनं तसं केलेलं आहे खूप वेळा !”

मग जरा थांबून तोच म्हणाला, “म्हणजे मी काही खरा संशयी नाही; पण ती तसं वागते म्हणून मला संशय येतो, मला तुझा नाही संशय येत.”

मग मुलगी पटकन म्हणाली, “हा मला मोटार देत नाही, मग मला पण संशय येतो ! मला असं वाटलं की या सगळ्या मोठ्या गुणा-दुर्गुणांची बीजं किती छोटी असतात ते आपल्याला कळलंच नव्हतं. मुलांच्या संदर्भात या सगळ्या यादीत विशिष्ट जग होतं. तेही प्रत्येकाचं जग वेगळं होतं. कधी ते एकमेकांवर अवलंबबूनही होतं.”

पण या शब्दांच्या निमित्तानं अशा काही गोष्टींची मजेत चर्चा झाली हे मला अपूर्वाईचं वाटलं आणि यादीतले सगळे गुण आपल्यात असलेच पाहिजेत ही मुलांची इच्छा मोलाची वाटली.

एक दुसऱ्या प्रकारची प्रश्नावली अभ्यासताना मी मजेत मुलांना काही प्रश्न विचारले होते.

‘तुला आतापर्यंतच्या शाळेत पाच वर्षांत जे जे सर आणि बाई होत्या त्यांच्यापैकी कोण सगळ्यात आवडतं? मुलांनी एका शिक्षिकेचचं नाव सांगितलं आणि आम्हाला आश्चर्य वाटल ! दुसऱ्या एक बाई खूप प्रेमळ होत्या. मुलाचं त्यांना खूप कौतुक होतं. त्याच त्याला आवडत असतील असं वाटलं होतं. त्याला कारण विचारलं तर तो म्हणाला- ‘नुसतं प्रेमळ असून काय उपयोग ? चांगलं शिकवलं पण पाहिजे !’

म्हणजे त्याच्या आवडी-निवडीला आम्हाला न दिसलेलं हे एक अदृश्य परिमाण होतं, याचं नवल वाटलं.

आणखी एक प्रश्न दोघांनीही विचारला होता. ‘बाहेरची माणसं आली की तुम्ही त्यांच्याशी कसे वागता?’ मुलीनं उत्तर दिलं, ‘मी त्यांच्याकडे बघून हस्ते, त्यांना नाच करून दाखवते, गप्पा मारते.’

मुलगा म्हणाला, “कोणी आलं की आतल्या खोलीत गप्प बसून राहतो. मग ते थोड्या वेळानं म्हणतात, ‘अरे, शोनील कुठं गेला ? मग मी बाहेर येतो.”

इतके दिवस आम्ही मुलगी धीट आहे, मुलगा लाजरा आहे एवढंच म्हणत होतो; पण त्याच्या लाजरेपणातली ही छटा आम्हाला कळली नव्हती. लोकांशी संवाद साधायचा दोघांचा मार्ग स्वतंत्र होता. मुलालाही लोकांशी बोलावं असचं वाटत होतं; पण त्यांनी आठवण काढल्यावर, आपण होऊन जाऊन नाही.

यानंतर आम्हीही आठवणीनं घरात माणसं आल्यावर गुपचूप आत बसलेल्या मुलाची आवर्जून आठवण ठेवू लागलो. कारण त्यांचे कान बाहेर लागलेले असणार याची जाणीव झाली होती. नाही तर कदाचित आम्हीच म्हटलं असतं, ‘नाही, तो लाजरा आहे. तो नाही बाहेर यायचा’ आणि मुलगा खरंच लाजरा बनला असता.

आता मुलांना विचारण्याच्या प्रश्नांची एक यादीच माझ्याकडे जमली आहे. मुलं आपापल्या मित्र-मैत्रिणींना मुद्दाम घेऊन येतात आणि म्हणतात याला विचार ना गं ते गमतीचे प्रश्न आणि प्रश्नोतरं चालू असताना कधी सगळी विचारात पडतात, कधी गोंधळतात, कधी मजेशीर उत्तर पटकन बाहेर पडलं की खिदळतात. मुलं खेळता-खेळता, बोलता-बोलता अशी स्वतःचं वागणं, स्वतःच्या आवडी-निवडी यांबद्दल स्वतःच्याच मनात डोकावताना पाहून असं वाटतं की आपण स्वतः कसे आहोत हे यांना लहान वयातच समजू लागेल. जेव्हा स्वतःला बदलणं सोपं असतं तेव्हाच ती बदलू शकतील. अधिक चांगली माणसं होतील. सहजपणे जगू शकतील.

तुला सर्वात वाईट कशाचं वाटतं ? याचं उत्तर बहुतेक मुलं कोणी रागावलं की, मारलं की असं देतात. असं झालं की जीव द्यावा असं वाटतं. घरातून पळून जावं असं वाटतं, असंही मुलं सांगतात. हे आई-वडलांनी आपापल्या मुलांच्या तोंडून एकावंच !

या प्रश्नांच्या उत्तरांमधून मुलांच्या आवडत्या गोष्टी बाहेर येतात, तशाच मुलांच्या खूप खुपणाऱ्या गोष्टीसुद्धा बाहेर पडतात. दिसायला सुरेख असणाऱ्या मुलाला एकदा विचारलं होतं-

“तू कसा दिसतो असं वाटतं तुला ?”

“बेकार !”

“आं ? अरे, आम्हाला तर वाटतं तू खूप छान दिसतोस !”

“पण सगळे म्हणतात हा मुलीसारखा दिसतो.”

“हो. छान दिसतो म्हणूनच तसं म्हणतात.”

“पण मला नाही मुलीसारखं दिसायला आवडत.”

मुलीचं काहीही आवडत नाही, मुलांचं एक वयच असतं, त्यातलीच ही प्रतिक्रिया !

एकदा मुलीला विचारलं होतं, ‘तू वडलांसारखी आर्किटेक्ट होणार की आईसारखी एम.ए. होणार ?’ तिनं उत्तर दिलं-

“मी आर्किटेक्ट होणार एम.ए. खूप लांब असतं. आर्किटेक्ट जवळ असतं.”

हे उत्तर ऐकून आम्ही आवक झालो. वास्तविक आर्किटेक्ट म्हणजे काय आणि एम.ए. म्हणजे काय तिला काहीच माहित नव्हतं. फक्त वडलांचं ऑफिस घरातच आहे, त्यामुळे ते सारखे भेटतात; पण आईचं ऑफिस लांब आहे त्यामुळे ती सकाळी गेली की संध्याकाळी येते, हे तिला खूपत होतं. आर्किटेक्ट- एम.ए. यांच्या अर्थाच्या जंजाळाशी तिचा काही संबंध नव्हता. तिनं तिला काय वाटतं तेच व्यक्त केलं होतं.

आणि मुलांचं विश्व म्हणूनच सरळ, मोकळं, लोभस असतं. ती जे जगतात तेच अनुभवतात आणि तेच व्यक्त करतात. यापेक्षा वेगळं काही असू शकतं हे त्यांच्या कल्पनेतही नसतं.

मुलीनं पहिलीत असताना लो. टिळकांची गोष्ट शाळेत ऐकली आणि ती घरी येऊन सांगत होती- मग टिळकांनी काही शेंगा खाल्या नव्हत्या. ते बाईना म्हणाले, ‘मी नाही शेंगा खाल्ल्या. मी नाही पट्टी खाणार !’ मग बाई म्हणाल्या, ‘जा घरी ! मग काय त्यांना बरंच की ते धावत धावत घरी आले. जिना चढले. दारावरची बेल वाजवली. त्यांच्या बाबांनी दर उघडलं आणि म्हणाले, ‘लोकमान्य टिळक, तू आता घरी कसा ?’

अशा वेळी त्या गोष्टीत खरं तर टिळकांच्या वेषात आपलं मुलचं शिरलेलं असतं इतक्या आत्मीयतेने ते प्रत्येक गोष्ट अनुभवत असतं.

हे मुलाचं विश्व समजून घेण्यासाठी आपण मात्र वेळ काढायला हवा !

  • तुला कशाचं वाईट वाटतं ?
  • कशाचा राग येतो ?
  • काय आवडतं ?
  • घरात यायला बरं वाटतं का बाहेर ?
  • अनोळखी माणसाशी बोलायची लाज वाटते ?
  • आनंद कधी होतो ?
  • भीती कशाची वाटते ?
  • राग आला की तू काय करतेस ?
  • सर जे सांगतात ते खरं मानतेस ?
  • नशीबवान आहेस असं वाटतं का ? का ? का नाही ?
  • आई-वडलांचं तुझ्यावर प्रेम आहे का दुसऱ्या भावंडांवर ?
  • आपल्यापेक्षा हुशार मुलं आवडतात का ?
  • आई-वडलांना खूष करण्यासाठी काय करतेस ?
  • मित्रांशी भांडणं होतात ?
  • चूक कोणाची ?
  • भांडणं घरी सांगता का ?

हे आणि असे अनेक प्रश्न या यादीत आहेत. मात्र हे प्रश्न परीक्षा घेण्याच्या थाटात, मुलांना मानसिक ताण देऊन, बरोबर की चूक उत्तर याचा बाऊ न करता विचारायचे. मुलांना त्यात गंमत वाटली पाहिजे.

खरं तर उत्तरं मुलं देतात आणि परीक्षा आपली होत असते. आपलं मूल कसं आहे हे आपल्याला कळत असतं. त्याच्या घडणीतला आपला वाटा कळत असतो.

मानसशास्त्रात या प्रश्नावल्या देतात तेव्हा त्यांच्या उत्तरांची काही वर्गीकरणं असतात. त्यावरून त्यांचे गुण मोजता येतात. त्यावरून माणसांच्या स्वभावाचं चित्र उभं राहतं. हे सगळं मुलांशी बोलताना मुलांशी संवाद साधायला, त्यांना बोलकं करायला, त्यांना समजून घ्यायला. या प्रश्नावल्यांचा काय उपयोग होतो असा अनुभव आला आणि असंही वाटलं की, मानसशास्त्रज्ञांनी पन्नास प्रश्न आपल्याला दिले, तरी आपल्या मुलाच्या संदर्भात, आणखी पन्नास प्रश्न आपण शोधून काढू शकतो. त्यांची उत्तरं आपल्याला समजून घ्यायला शिकलं पाहिजे. कारण त्यांचे संदर्भही आपल्याच घरात विखुरलेले असतात.

Read More blogs on Parenting Here