लेखक : आभा भागवत
माझे बाबा घरी विशेष काम करत नसत. त्यांच्या आईने कधी शिकवलं नाही आणि ‘मुलगा मुलगा’ म्हणून करूही दिलं नाही असं ते सांगत. हीच कथा अनेक घरांमध्ये तेंव्हाही असे आणि अजूनही आपल्या पिढीतच काय पुढच्या पिढ्यांमध्येही दिसते. समजायच्या वयात आल्यापासून घरातली कामं आईच करणार आणि बाबांना विशेष काही जमतच नाही, याचा मला स्वतःला फार त्रास होत असे. ‘आता या वयात शिकणं सोपं नाही’, असं म्हणत आईने कायमच त्यावर पांघरूण घातलं. आईचीही तब्येत बिघडू लागल्यावर मात्र बाबांनी आपणहून चहा करणं, बाहेरची खरेदी न कंटाळता करणं, क्वचित सरबत करणं असं काय-काय करायला लागल्याचं आठवतं. माझ्या मोठ्या भावाला मात्र स्वतःला स्वयंपाकही आला पाहिजे असं वाटत असे. त्याच्या जंगलातल्या वास्तव्यात तो सर्वच गोष्टी स्वतः करतही असे. मुख्य म्हणजे मुलगा म्हणून मी ठराविक कामं करणार नाही हे त्यालाच चुकीचं वाटे. तसं बघितलं तर खऱ्या अर्थाने सलग काही महिने, वर्ष घरकाम आणि स्वयंपाक करण्याची वेळ माझ्यावरही लग्नाआधी आलेली नव्हती. पण सर्व गोष्टी करुन बघितलेल्या होत्या आणि करायची तयारी होती.
या पार्श्वभूमीवर घरात काम न करणारा नवरा मला चालणारच नव्हता. घर ही दोघांची जबाबदारी आहे त्यामुळे आपणहून दोघांनी घरकाम केलं पाहिजे, हे माझं मत ठाम होतं. तसंच दोघांनीही बाहेर काम करून अर्थार्जन केलं पाहिजे या बाबतीतही आम्ही सहमत होतो. लग्न झाल्यावर सुरुवातीच्या काळात अमेरिकेत बराच काळ वास्तव्यामुळे घरकाम आम्ही दोघंही करत असू. त्यामुळे त्यात अमुक इतकी समानता होती. डिश वॉशर, व्हॅक्युम क्लीनर, वॉशिंग मशीन, ड्रायर, ओव्हन, मायक्रोवेव्ह अशा मशीन्सच्या सहज आणि स्वस्त वापरामुळे परदेशातलं आयुष्य कामांच्या समान विभागणीसाठी सोपं होतं. भारतात परतल्यावर मात्र कामाच्या बायांकडून कामं करून घेणे आणि त्या आल्या नाहीत तर आपणच करणे याची गणितं खूपच बदलली. मुलं झाली नव्हती तेव्हा आयुष्य सोपं होतं. काम फार पडत नसे. मुलांच्या जन्मानंतर मात्र घरात करायच्या गोष्टींमध्ये एवढी मोठी भर पडते, की माणसंच कमी पडतात. खूप ओढाताण, कामांचा ढीग आणि तेच तेच करून आलेला कंटाळा याला उत्तरं शोधण्यात काही वर्ष जातातच. मुलं लहान असताना त्यांना सगळंच नवीन असतं त्यामुळे सर्व कामांमध्ये त्यांची गोड लुडबुड चालू असते. पण मोठ्या माणसाला हवी तशी मदत करण्याचं ते वय नाही. तो खेळ असतो मुलांचा, तो खेळच राहू द्यावा.
दोन्ही मुलगे झाल्यावर एक घिसापिटा विचार मनात आलाच, की आता घरकामात मनापासून (की नाईलाजास्तव) मदत करणारी मुलगी नाही राव झाली आपल्याला. पण मग असल्या जुनाट विचारातून स्वतःला बाहेर काढायचं ठरवलं. मुलगी काय कामात मदत करायला हवी असते का? मुलींना मुलग्यांसारखं वाढवतात पण मुलग्यांना मुलींसारखं नाही, असे पालकत्वातले काही आव्हानात्मक पैलूही समजले. स्त्री-पुरुष समानता नुसती बौद्धिक पातळीवर काय उपयोगाची? प्रत्यक्ष आयुष्यात जर समानता अवलंबता आलीच नाही तर? पुरुषांनी समानता नाकारणं आणि स्वतःच्या सोयीप्रमाणे कामं न करणं हाच मार्ग स्वीकारला तर काय स्त्रिया जबरदस्ती करू शकणारेत का? मग मुलगे मोठे होताना त्यांच्याशी काय बोलायला हवं, त्यांना कसं वाढवायला हवं, त्यांना कुठली उदाहरणं मुद्दाम दाखवायला हवीत … जेणेकरून स्वतःला वरचढ समजणारे पुरुष ते होणार नाहीत … याचा विचार सुरु झाला. मला स्त्री म्हणून वावरताना घरात, समाजात काय खटकतं हे त्यांच्याशी मोकळेपणाने बोलायला लागले. समानता अशी एकदम रुजवता येत नाही. सतत, वर्षानुवर्ष त्याची उकल आणि चर्चा करत रहावी लागते. मनात आणि वागणुकीत समानता असणारी माणसं शोधत राहावी लागतात, मुलांना दाखवत राहावी लागतात. तसंच असमान वागणारी माणसं दाखवून ते चांगलं नाही हे सांगावं लागतं. त्यातून मुलं स्वतंत्र विचार करू लागतात, हे मी घरी अनुभवते आहे.
घरचा बाबा जर कामं करत असेल, तर मुलग्यांना ती त्यांचीही जबाबदारी वाटते. काम करताना कंटाळा, ढकलपंजी, अर्धवट कामं करणे या गोष्टी दिसल्या तर मुलं सोयीस्करपणे तेच उचलतात. ज्या घरांमध्ये मनापासून घरकाम करणारा, आईची खरोखर काळजी करणारा, मुलांबरोबर वेळ घालवायला उत्सुक असणारा बाबा मुलं बघतात ती मुलं नक्कीच ते गुण उचलतात. नुसतं समानतेविषयी बोलत राहिलं आणि कृतीतून मात्र काहीही उतरलं नाही तर मुलं कृतीचंच अनुकरण करतात.
आमच्या घरी जेव्हा मला बरं वाटत नसेल, व्यावसायिक कामांचा ताण असेल, कामासाठी बाहेरगावी गेलेली असेन किंवा कामांमुळे घरात लक्ष द्यायला वेळच नसेल; तेव्हा नवरा घराची आणि मुलांची संपूर्ण जबाबदारी घेऊ शकतो. सुरुवातीला ही घडी बसवून द्यायला आवर्जून काही गोष्टी कराव्या लागल्या, जसं – बायांकडून जास्तीची कामं करून घेणं, बाहेरून डबा मागवणं, रोज जमीन झाडली पुसली गेलीच पाहिजे या आग्रहातून स्वतःला बाहेर काढणं, पसारा मान्य करणं, मित्र मैत्रिणींची शक्य तिथे मदत घेणं वगैरे. या सोप्या वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात करताना खरंच वेळेवर सुचत नाहीत आणि आपणच आपल्या ताणात भर घालतो. शिवाय मुलांना स्वतंत्रपणे घरात छोटी कामं करता येणं – जसं स्वतःचं ताट वाटी घासणे, भरमसाठ भांडी घासायला न टाकणे, स्वतःचं कपाट आवरणे, पलंगावरची चादर, उशीचे अभ्रे बदलणे, मांजराचा शीचा टब साफ करणे, झाडांना रोज पाणी घालणे इत्यादी लक्षात ठेवून करता येणं, हेसुद्धा आवश्यक होतं.
समानता आणि स्वातंत्र्य या दोन गोष्टी अगदी हातात हात घालून जातात. स्त्री जे व्यावसायिक काम करते, कितीही छोटं किंवा मोठं असो … त्याचा मिळणारा आर्थिक मोबदला हा स्वतःच्या स्वतंत्र बँक खात्यात तिने जमा करायलाच हवा. स्वतः गुंतवणूक करणं, स्वतःचे जमाखर्च बघणं, स्वतःच्या मिळकतीतून घरासाठी, मुलांसाठी, मित्र मैत्रिणींसाठी खर्च करणं यातून आत्मविश्वास वाढतो. स्वतःचे पैसे स्वतःच्या हातात असणं, आपण नेमके किती पैसे मिळवतो याचा हिशोब ठेवणं आणि त्यात नवऱ्याने हस्तक्षेप न करणं हे अत्यंत आवश्यक आहे. हेदेखिल स्वातंत्र्य स्त्रियांनी घ्यायला हवं. नाहीतर फक्त नवरा सर्व आर्थिक व्यवहार बघत असेल, एकटाच मिळवत असेल आणि खर्च करत असेल, तर नवरा स्वतःला वरचढ समजतो आणि स्त्री स्वतःला कमी लेखत राहते. घरात केलेल्या कामांचा तर हिशोब करायची आपल्याकडे पद्धतच नाही. बाहेरचं काम आणि घरातलं काम यांचं मूल्य आहे तरी काय हे सहज कधीतरी नक्की शोधावं आणि सर्वांनी लक्षात ठेवावं. घरातल्या कामांच्या आर्थिक मूल्याची आणि खर्चाच्या बचतीची जाणीव मुलांनाही हवी.
एखादं काम करायला जेव्हा मुलं नकार देतात, तेव्हा पुन्हा ते आईच्याच गळ्यात पडतं, तेव्हा चिवटपणे त्यांना सांगावंही लागतं की हे तूच करायचं आहेस. कुठलं काम करायला नवऱ्याला कमीपणा वाटत असेल किंवा केवळ आळस आणि सोय म्हणून तो नकार देत असेल, तर बायकांनी आवर्जून त्याला ते करायला सांगावं. जे वागणं पटत नाही त्याबद्दल बोलता आलंच पाहिजे. आयांनी, बायकांनी असं चिवट झाल्याशिवाय पुरुष बदलणार नाहीत. घरकाम न करण्याची सोय पुरुषांना आहे, बायकांना नाही. त्यामुळे हे असमान समाजमानस लक्षात घेऊन पुरुषांनीही असं म्हणणं बरोबर नाही की, “हे हे करतोय ना मी, त्याहून जास्त नाही करणार.” स्त्रीयांना असमान घटक म्हणून अनेक ताण वेगवेगळ्या टप्प्यांवर सहन करावे लागत असतात. ते इतके सूक्ष्म असतात की अनेकवेळा त्यांची जाणीव स्वतः स्त्रियांनाही होत नाही. मुलं वाढवणं, घरकाम करणं, पैसे मिळवणं, खर्च करणं, बाहेरची कामं करणं या सर्वांमध्ये समानता यायला हवी असेल तर मुलामुलींना अभिनव पद्धतीने वाढवायला हवं. त्यांच्याशी समानातेविषयी सतत संवाद साधायला हवा, त्यांना समान संधी मिळायला हव्यात. ही मोठी जबाबदारी प्रत्येक पालकाने नीट समजून घेऊन पार पाडायला हवी. पुरुष पालकांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणले तर मुलांमध्ये ते रुजायला अवघड नाहीत. स्त्री पालकांनीही चांगले पुरुष भविष्यात तयार करण्यासाठी हा समतोल कसा साधायचा याचा विचार अजून खोल करायची गरज दिसते. ‘गुड मेन’ ची आपली व्याख्या नक्कीच तपासायला हवी.
Read More blogs on Parenting Here