लेखक :  जयदीप कर्णिक


भरभक्कम धरण. त्यात लांबवर पसरलेलं, बांधून ठेवलेलं हिरवं पाणी. मस्त पाण्यात पाय टाकून बसलोय. धरणाला भेगा पडल्यात, पण अगदीच किरकोळ. अचानक धुवाधार पाऊस सुरु झालाय. बघता बघता आज्ञाधारक पाणी वेडंपिसं झालंय. भिंतीला धडका मारतंय. भेगांमधून घुसू लागलंय. अक्राळविक्राळ रेटा. भिंत टिकणार तरी किती? एका क्षणी धरण फुटतं आणि आपण त्या पाण्यात गटांगळ्या खायला लागतो. प्राणांतिक धडपड. एखादी झाडाची फांदी, एखादा खडक, हाताला जे लागेल त्याला आपण धरू पाहतो. भर पाण्यात आपण घामाने भिजून गेलोय… समीर खडबडून जागा झाला आणि आपण बिछान्यावर घामाने भिजलोय हे त्याच्या लक्षात आलं.

पहाटेचे तीन वाजलेत. फोन कॉलने वेळी अवेळी उठायला लागणं समीरला नवीन नाही. अल्पवयीन गुन्हेगारांना मदत करणाऱ्या सेवाभावी संस्थेत मानसोपचार तज्ञ म्हणून रुजू झाल्यापासून तिकडे मुलांनी काही गडबड केली की समीरला फोन यायचाच. इमर्जन्सी नसेल तर फोनवर सूचना देऊन काम व्हायचं पण इमर्जन्सी असेल तर कुठल्याही वेळेला जावं लागायचं. म्हणूनच बायको आणि सहा वर्षांचा यश एका बेडरूम मध्ये झोपायचे आणि हा दुसऱ्या. उगाच त्यांना कशाला रोजची झोपमोड?

आज ह्या स्वप्नाने जाग आली. कालच्या केस संबंधित हे स्वप्न असेल का? अलिप्त राहणं हे मानसोपचार तज्ञासाठी सगळ्यात महत्वाचं. ऐकणं, सांगणं आणि स्वतःचं जगणं ह्यात वॉटरटाईट भिंत त्याला बांधता यायलाच हवी. ताण न घेता काम करणं हा त्याच्या पेशाचा भाग होता. पण नेहमीच ते सोपं नसतं. लहान मुलांच्या बाबतीत तर अजिबात नाही. मुलं म्हणजे देवाघरची फुलं वगैरे सुविचार तो लहानपणी शिकला होता. त्यामुळे मुलांवर अविश्वास दाखवणं त्याला अगदी क्रूरपणाचं वाटायचं. पण विश्वास तरी कसा ठेवणार? एकेकाच्या गुन्ह्यांची नुसती जंत्री वाचली तरी डोकं गरगरायला लागायचं. अगदी बालिश, किरकोळ वाटावेत अशा कृत्यांपासून अट्टल गुन्हेगाराचा थरकाप होईल अशा जबर जघन्य अपराधांपर्यंत त्यांची मोठ्ठी रेंज असते. गुन्ह्याच्या प्रतवारीप्रमाणे पोलीस केस, न्यायालयीन खटले यामधून जाऊन काही मुलं सुटतात, काही सुधारगृहात पाठवली जातात, तर सोळा ते अठरा वयोगटातील निर्घृण कृत्य करणाऱ्या काहींना नवीन कायद्याप्रमाणे प्रौढ गुन्हेगारांसारखं खटल्याला आणि शिक्षेला सामोरं जावं लागतं.

संस्थेमध्ये गेले काही दिवस सतत मुलं येत होती. काही नवीन मुलं होती, काही पुन्हा नव्याने येत होती. त्यांचे जवाब घेणं, त्यांना बोलतं करणं, घटना आणि त्यामागची पार्श्वभूमी समजून घेणं, त्यांना किमान काही महिने इथे राहण्यासाठी तयार करणं ही कामं करून तो थकून गेला होता. त्यातल्या काही जणांना हँडल करणं खरोखरच अवघड होतं. रात्री उशिरापर्यंत त्याला थांबायला लागत होतंच, पण गेले चार दिवस सलग रात्रीही फोन येत होते. जेमतेम चार पाच तास झोप मिळत होती. ‘खबरदार आज मला फोन केलात तर’, त्याने नाईट सुपरवायझरला बजावलं होतं.

आज फोन आला नव्हता. पण हे स्वप्न. तो खिडकीजवळ आला. इमारती आणि रस्त्यावरच्या दिव्यांनी रात्र आणि दिवस यातली सीमारेषा मिटवून टाकली होती. मावळतीकडे चाललेला चंद्र अगदीच मलूल दिसत होता. तो दुसऱ्या बेडरुममध्ये आला. आईला बिलगून झोपणारा यश आता मोठा दिसायला लागला होता. लहानपणी अगदी गुणी बाळ असणारा यश आता दिवसेंदिवस हट्टी होत चालला होता. प्रत्येक गोष्टीला विरोध करायला, आपलाच हेका चालवायला शिकला होता.

दिवसभर असंच करतो का हा? त्याने बरेचदा बायकोला विचारलं होतं. ‘हो रे, फार त्रास देतो’, ‘नाही रे, अगदी गुणी आहे आपलं बाळ’ – ती प्रत्येक वेळेला वेगळं उत्तर देत रहायची. एकदा शाळेत पेन्सिल तुझी की माझी वरून त्याची मित्राशी जुंपली होती. यश मित्राला चांगलाच भारी पडल्याने त्यांना शाळेकडून बोलावणंही आलं होतं. अगदी घुमा झालाय हल्ली. गप्प बसून काहीतरी उद्योग करत असतो किंवा मग अचानकच चवताळून काहीतरी तोडून मोडून टाकतो. त्याला यशची काळजी वाटायला लागली होती. पण कामात पूर्ण बुडून गेल्यामुळे त्याला स्वतःला त्याच्याकडे लक्षच देता येत नव्हतं. यशच्या अंगावरचं पांघरूण सारखं करून तो पुन्हा आपल्या बेडरूममध्ये आला.

बाल गुन्हेगारीत मुलींच्या मानाने मुलग्यांचं प्रमाण इतकं जास्त का? अशी मुलं आतूनच काही घेऊन येतात की हा संगोपनातला दोष म्हणायचा? छोट्या छोट्या गोष्टींना घाबरणारी, अंधारात पटकन आई बाबाला बिलगणारी, नुसत्या सावल्यांना किंवा मोठ्या आवाजाला घाबरणारी, छोट्या छोट्या गोष्टींसाठी आई वडिलांवर, मोठ्यांवर अवलंबून असलेली मुलं क्रूर कशी आणि कधी बनतात? एखादं विध्वंसक कृत्य करण्यापूर्वी त्यांच्या आतला कोवळा तंतू तुटला असतो का? कुठल्या अनावर क्षणी आपल्या तात्कालिन गरजेसाठी ती एखादं टोकाचं कृत्य करू शकतात? काय आनंद मिळतो त्यांना त्यातून? फुलपाखरांचे पंख उपटणे, लसलसत्या कोंबाला चिरडून टाकणे यातून मिळणारा आनंद घेत घेत ती व्यसनांचा डोस वाढवावा तसा आनंदाचा डोस वाढवतात का? गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या घरातील मुलांबद्दल, घरदार नसलेल्या मुलांबद्दल, गुन्हेगारीसाठी वापरल्या जाणाऱ्या मुलांबद्दल, दारिद्र्याचे चटके सोसणाऱ्या मुलांबद्दल आपल्याला कणव वाटते. गरीब घरातली मुलं वेगळ्याच ग्रहावरची वाटतात. त्यांच्याविषयी हळहळ दाखवून, किंचित सहानुभूती, किंचित संवेदना दाखवून निर्लेप मनाने पुढल्या मुलाकडे वळता येतं. पण संपन्न घरातल्या गुन्हेगारीकडे वळणाऱ्या मुलांची भीती वाटते. हादरून जायला होतं… धरण फुटल्यासारखे विचारांचे प्रवाह प्रचंड वेगाने वाहत होते आणि सकाळ होईपर्यंत तो झोपेची फांदी शोधत अगतिकपणे वाहत होता.

“मुलांचं म्हणणं ऐकणं हे माझं मुख्य काम आहे”, तो एकदा बायकोला सांगत होता. “इतके वाईट वाईट गुन्हे केलेली मुलं स्वतःबद्दल सांगताना किती क्षुल्लक प्रसंग सांगतात! आईने बाथरूममध्ये कोंडून ठेवल्याचा, मित्रांनी ए ढोल्या, ए गेंड्या म्हणून मुलींसमोर चिडवल्याचा, आपण सोडून बाकी सगळ्या मित्रांना वाढदिवसाला बोलावल्याचा, सगळ्यांसमोर घरातले सतत अपमान करत असल्याचा, मोबाईल, टीव्ही बघू न दिल्याचा, मोठ्या भावाला सिगारेट पिताना बघितलं तेव्हा त्याने आपल्याच तोंडात सिगारेट दिल्याचा… एखाद्या मुलाला काय काय सांगायचं असतं तर दुसरा एखादा खुनशीपणे नाहीतर थंडपणे नुसता बघतच राहतो आपल्याकडे.” समीर इतकं पोटतिडकीने सांगत असताना बायकोला शब्दकोड्यातील अडलेला शब्द जास्त महत्वाचा वाटत होता.

या जगण्याच्या धावपळीत मुलांकडे बघायला वेळच नाहीये आई बापांना. छोटी छोटी म्हणताना मुलं पटकन मोठी होऊन जातात. चुका करणाऱ्या मुलांवर लगेच शिक्के बसतात. आईवडील कधी बेपर्वा तर कधी असहाय्य असतात, समाज गाळणी घेऊन बसलेला असतो, पोलिसांना पोटं असतात, कोर्ट पुरावे बघतात, मुलं सुधारगृहात येतात. समीरने गेल्या अनेक वर्षांत बघितलंय. मुलं सुधारगृहात येतात, जातात, जातात, येतात, येतच राहतात. काही घरांचे दरवाजे त्यांना बंद होतात, काही दरवाजे तोडून ते बाहेर पडतात, काही रस्त्यांनाच घर मानायला लागतात. चारसहा महिन्यात अवघं आयुष्य उद्ध्वस्त होईल इतके अनुभव गोळा करतात. त्यातली कितीतरी मुलं अगदी साधी भोळी दिसतात. अगदीच शेजार पाजारची वाटतात. ही मुलं आपल्याच मुलांसारखी दिसतात, हे किती भयानक आहे असं त्याला राहून राहून वाटत असतं. आपण मुलांमध्येही आपली तुपली करतोय ह्या विचारांनी त्याला स्वतःचाच रागही येतो. पण विचारांना थोपवता येत नाही. भयंकराच्या लाटा सतत आदळत राहतात. इतकं सगळं काही तो बायकोला सांगत नाही, पण यश मोठा व्हायला लागल्यापासून त्याच्या मनावरचा ताण वाढत चाललाय हे तो स्वतःशी नाकबूल करू शकत नाही.

सात वर्षांच्या सुरेशला शाळेत जातायेता पैसा कमवायचा मार्ग सापडला होता. मोठ्या मुलांवर शाळेची नजर असते म्हणून ते त्याच्या कंपासमध्ये कसल्या कसल्या पुड्या ठेवत. नऊ वर्षांच्या विनोदला शेजारचा दादा खाऊ देऊन काहीतरी वेगळंच करायला लावत होता. अकराच्या आरिफला टपरीवाल्याने वर्गातल्या पोरांना टपरीवर आणायला रीतसर नेमलं होतं. पकडला गेला नसता तर लवकरच त्याचं प्रमोशनही झालं असतं. तेराच्या रघुला आईच चकण्याच्या पिशव्या भरून दारूच्या गुत्त्याबाहेर उभी करायची. पंधरा वर्षांच्या हेमंतने गाडीचा दरवाजा अलगद उघडायचं कौशल्य प्राप्त केलं होतं. रापलेली, डोळ्याखाली काळी वर्तुळं आलेली, उवांनी भरलेली डोकी कराकरा खाजवणारी ही मुलं सुधारगृहात येऊन धुऊन चोळून स्वच्छ झाली की किती गोजिरवाणी दिसायची. पुन्हा पुन्हा येणारी मुलं त्याला पाहून गोड हसली की त्याला चरकायला व्हायचं. त्या घाणेरड्या, किळसवाण्या दिसणाऱ्या मुलांशी तो व्यावसायिक सफाईने बोलायचा, पण आपल्या मुलांसारखीच ती नीटनेटकी झाली की त्याला अगदी नको नको व्हायचं.

“आज यशने कमालच केली.” बायको सांगत होती.
“बागेत जाताना मी त्याची सायकल न्यायलाच विसरले. शेजारची रिया तिची सायकल बाजूला ठेऊन लॉनवर लोळत होती. ह्या पट्ठ्याने तिच्या डोळ्यादेखत तिची सायकल पळवली. नंतर झाडीत अशा ठिकाणी लपवली की अर्धा तास ती आणि तिची आई शोधत होत्या.” बायकोचा चेहरा फुलला होता.
मनातल्या हेमंतला त्याने आतल्या आत गप्प केलं.
“तू सायकल नेत जा गं त्याची. आणि नसेल सायकल एखाद दिवशी तर पकडापकडी खेळावं, सी सॉ खेळावं.”
“अरे गम्मत आहे रे सगळी. तू कसलं टेन्शन घेतोयस?”
“टेन्शन घेऊ नको तर काय? पोरगं इतक्या भयंकर भयंकर गोष्टी करतंय आणि तू निवांतपणे हसतेस? तुला कितीदा सांगितलं यशचं दप्तर अधून मधून तपासत जा, शाळेजवळ पानटपरीपाशी तो घोटाळत नाही ना हे बघत जा, कुणाला तो त्रास देत नाही ना, त्याला कोणी छळत नाही ना याकडे लक्ष ठेवत जा. पण तू इतकी कूल असतेस. अगं अशीच सुरुवात होते सुधारगृहात येणाऱ्या मुलांची.”
“धिस इज टू मच समीर. तू जरा अतीच करतोयस. काम खूप होतं का आज?”
“हो, दमलोय मी. जरा पडतो.”
“सुट्टी घेतोस का दोन दिवस? मस्त आराम कर.”
“गावालाच जाऊया त्यापेक्षा. लगेच आप्पांना फोन लावतो.” कामातून सुटका मिळण्याच्या विचारानेच तो एकदम एक्साईट झाला.

वळणावळणाचे रस्ते, उतरून आलेले ढग, वाऱ्यावर हलणारी शेतं… समीर सगळं विसरला.

गाडी घरासमोर थांबली. अंगणातच आप्पा आणि टिप्या. समीरला बघताच टिप्या अंगावर झेपावला. लाड करत कशीबशी समीरने स्वतःची सुटका करून घेतली तर त्याने यशकडे आपला मोहरा वळवला. यशही टिप्याला बघून हरखून गेला होता. दिवसभर यशकडे बघावंही लागलं नाही. फक्त यश आणि टिप्या. त्याला खायला देणं, शेकहँड करणं, बॉल फेकून त्याला आणायला शिकवणं यापासून त्याच्या अंगावर चढणं, त्याची शेपूट ओढणं इथपर्यंत खेळ बदलत गेले. ताटलीत त्याला काहीतरी खायला घेऊन आला आणि कुणाचं लक्ष नाही बघून यशने त्याच्या ताटलीत चांगली मुठभर माती टाकली.
“हे काय चाललंय, यश! दोन ठेऊन देईन पुन्हा टिप्याला त्रास दिलास तर” समीर जोरात ओरडला.
यश काहीच बोलला नाही. नजरेत थंडपणा होता की खुनशीपणा? तो हबकला.

समीरचा आवाज ऐकून आप्पा आणि बायको धावत बाहेर आले. आप्पांनी शांतपणे यशला जवळ घेतलं. ताटलीतलं खाणं कोंबड्यांना दिलं. यशचं बोट धरून पुन्हा ताटलीत काहीतरी आणून यशकडे दिलं. यशने ते टिप्यासमोर ठेवलं. टिप्याने लाडाने शेपटी हलवली.

“चल, जरा फिरून येऊ.” आता आपली पाळी आहे हे समीरने ओळखलं. तो मुकाट्याने आप्पांच्या मागोमाग निघाला.

खरं तर तो अजून मघासच्या धक्क्यातून सावरला नव्हता.

“यशचं चुकलंच रे, पण तूही किती जोराने ओरडलास! अगदी घाबरून गेला पोरगा.”

“घाबरून गेला म्हणजे काय, त्याची चूक त्याला कळायला नको? आप्पा, मी रोज गुन्हेगार मुलं बघतो. अशाच छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात होते त्यांची. न जाणो यश पण त्यांच्यासारखा झाला तर! इतकं छान, समजून उमजून वाढवतोय आम्ही त्याला, आणि तो अशी भयंकर गोष्ट करतो ?”

“भयंकर बियंकर काही नाही रे. त्याचं चुकलं हे खरंच आहे, पण खोडसाळपणा होता तो. टिप्याबरोबर दिवसभर मस्तीच चालू होती न त्याची. थोडं जास्तच केलं त्यानी. पण चूक कळली रे त्याला.”

“काहीही काय आप्पा! शेपटी खेचून टिप्याला त्रास देण्यापर्यंत मी समजू शकतो पण त्याच्या अन्नात माती कालवायची? हे विकृत नाही का?”

“नको रे असले जाडे भरडे शब्द वापरूस. निव्वळ खेळ होता तो. आता टिप्या काय करेल हे बघण्याचा. चुकीचं होतंच पण लगेच विकृत, भयंकर, क्रूर वगैरे लेबलं नको लाऊस. क्रौर्य आहे, पण अगदी आदिम. खरंतर क्रौर्य नाहीच. कुतूहलच म्हणायला हवं. तुला सांगू का समीर, सगळ्यांनाच आवडतं दुसऱ्याला त्रास द्यायला, जोखून बघायला, शिंगांना शिंग लावून टक्कर घ्यायला. सगळेच करून बघतात हे. आपल्या आधीच्या मोत्याच्या शेपटीला बांधून तुम्ही लवंगी माळ पेटवली होतीत, आठवतं? डबा खायच्या सुट्टीआधीच राजूचा डबा खाऊन त्यात दगडं भरून ठेवली होतीत. रमेशला नीट पोहता येत नसताना विहिरीत ढकललं होतंत. आणि काजवे बाटलीत भरायचात ते विसरलास वाटतं?”

“हो आठवतंय ना.” त्याला गोल गोल करून मोर किड्याला त्याच्या घरातून बाहेर काढल्याची, चतुरांच्या झुंजी लावल्याची, बोराएवढ्या कैऱ्या नुसत्याच ओरबाडल्याची, उद्या खुडायला कोणी सांगायला नकोत म्हणून आजच मोगरीच्या अर्ध्याकच्च्या कळ्या चिरडल्याची आठवण आली.

“कुणाला तरी त्रास देण्याची एक अनिवार इच्छा असते माणसाला. नुकतं जन्मलेलं बाळ आईला काय कमी त्रास देत असतं? अगदी इवल्या इवल्या इच्छा असतात ह्या कृतींच्या मागे. त्या इच्छांकडे जरा नजर टाकायची. मुलं काय करतायत त्याच्याकडे लक्ष ठेवायचं, मोठं नुकसान होत नाही न हे बघायचं, कधी समजवायचं तर कधी दुर्लक्ष करायचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोबत रहायचं. काहीतरी लेबल लावून त्यांना वेगळं काढायचं नाही. आपण भयंकर आहोत असं मुलांना स्वतःलाच वाटायला लागणं हे सगळ्यात जास्त भयंकर.”

“बरोबर आहे तुमचं आप्पा! पण म्हणून काय चुकल्यावर ओरडायचंच नाही का?” समीर आता जरा नरमला होता.

“चूक केल्ये हे सांगायला हवंच समीर, वेळप्रसंगी रागवायलाही हवं. शिक्षा करायलाही हरकत नाही, पण शिक्षा चुकीपेक्षा मोठी नको. शिक्षा माणसाला सुधारायला मदत करणारी हवी, त्याला आणखी वाईट बनवणारी नको.”

जरा वेगळं वागणाऱ्याला कचरा म्हणून लगेच बाजूला टाकायला चाळणी घेऊन टपलेल्या समाजाला आप्पा काय बोलले ते समजलं असतं तर सुधारगृहांवरचा ताण किती कमी झाला असता. सुस्कारा सोडत समीर स्वतःशीच पुटपुटला. आप्पा कळल्या न कळल्यासारखे हसले.

रुटीन पुन्हा सुरु झालं आणि थोड्याच दिवसात शाळेतून चिट्ठी आली. ‘यशचे हल्ली वर्गात लक्ष नसते. वर्गात मस्ती करणे, शिक्षकांच्या नकला करणे आणि अभ्यास पूर्ण न करणे वाढले आहे. शनिवारी दुपारी एक वाजता येऊन भेटावे.’
यशचं बोट धरून समीर शाळेकडे निघाला आणि गावाला आप्पा गालातल्या गालात हसल्याचा त्याला भास झाला.

Read More blogs on Parenting Here