लेखक :  देवयानी खरे


दिवाळी म्हणजे सर्वांचा सण! ए… दिवाळी आली रेssss असं म्हणत गल्ल्यांमधून धावणारी मुलं मला अजूनही आठवतात. मुलं तर इतकी खुश असायची, आता शाळेचं टेन्शन नाही म्हणून घराच्या कोपऱ्यात दप्तर खुपसून घरभर, गल्लीत सगळीकडे धिंगाणा करायची. सुट्टीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहायचा. घरांमध्ये आईबाबांच्या कामांची लगबग सुरु झालेली असायची. घर साफ कर, सामान हलव, रंगरंगोटी, पणत्या-रांगोळ्यांची खरेदी आणि महत्त्वाची, न विसरता येणारी गोष्ट म्हणजे महिनाभर नाकात घर करून बसणाऱ्या फराळाची तयारी. बस्स! हीच ती दिवाळी! रात्री अंधारात चमकणारे दिवे, आकाशकंदील आणि हातात फराळाचं ताट. या खाऊची आम्ही वर्षभरापासून वाट बघायचो. फराळाशिवाय दिवाळी हे समीकरण काही जुळतच नाही. विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातून-गावागावातून प्रवास करणारा हा फराळ दिवाळीसाठी प्रत्येक घरात एकाच वेळी तयार होतो, तेही एकात्मतेचा संदेश देत! गोड, तिखट आणि खमंग, खुसखुशीत ठेवा म्हणजे फराळ! या फराळाची मज्जा म्हणजे आईने तो करायचा आणि आपण मदत करताना थोडा थोडा खात जायचा.

आजकाल दिवाळीचा फराळ म्हटला की चिवडा, चकली, शेव, लाडू आणि करंजी असेच काहीसे ४ ते ५ पदार्थ ऐकायला मिळतात. काही वेळा तर भेट म्हणून चॉकलेट पण दिली जातात. पण यांच्याही पलीकडे दिवाळीच्या फराळ-उत्सवात(Diwali Faral) काहीसे जुने, पारंपारिक आणि भन्नाट नावांचे पदार्थ आहेत जे आता कदाचित आपल्या विस्मरणात गेले आहेत. सगळेच पदार्थ आपण घरी केले नाहीत तरी एखादा करून बघायला आपल्याला आणि मदत करताना मुलांनासुद्धा मजा येईल! चला, बघू या काही वेगळ्याच पदार्थांची गमतीदार नावं आणि त्यांच्या आकारांची मज्जा!

कडबोळी :
दक्षिण भारतातल्या बेळगावात ‘कडबोळी’ हा प्रकार जास्त करून तयार केला जातो. तांदळाचं पीठ, लोणी आणि काहीसे मसाले टाकून कडबोळी तयार करतात. काही घरांमध्ये चकलीऐवजी मिश्रधान्यांची कडबोळीसुद्धा तयार करतात. ही कडबोळी पिळून वळतात म्हणून की आतून बोळकी म्हणजेच पोकळ होतात म्हणून त्यांना कडबोळी म्हणतात, हे काही माहित नाही. चकलीसारखा यंत्राच्या सहाय्याने नसून हाताने वळून तयार करण्याचा हा पदार्थ आहे.

ढेबऱ्या :
ठाणे जिल्ह्यात भातशेती खूप मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे त्या भागात तांदळाचे अनेक पदार्थ बनवण्यात येतात. त्या भागात शेतमजुरांच्या घरी तांदूळ हेच धान्य असायचं म्हणून तिथे तांदुळात गुळ टाकून ढेबऱ्या नावाचा पदार्थ केला जायचा. याच्या छोट्या छोट्या गोल गोल आकाराच्या पुऱ्या लाटून त्या तुपात किंवा तेलात तळायच्या. असा हा सोपा पदार्थ सणांच्या दिवशी आणि दिवाळीला हमखास बनायचाच. कदाचित अजूनही त्या भागातील काही घरांमध्ये हा पदार्थ केला जात असेल.

बोरं :
कोकणातला बोरं हा पदार्थ म्हणजे कोणाचे दात किती टणक आहे याची परीक्षाच जणू! तांदूळ पीठ, गहू पीठ, गुळ, तीळ असे जिन्नस एकत्र करून छोटे छोटे गोल आकाराचे लाडू म्हणजे आपल्या आजच्या भाषेत बॉल्स तयार करून तळायचे. तळल्यावर हे खायला इतके टणक असायचे की कोण पहिले खातो याची स्पर्धा लागे. बोरांच्या आकाराचे आणि तळून काढल्यावर रंगानेही तसेच म्हणून याचं नाव पडलं असावं, ‘बोरं’!

लंवग लतिका :
बंगालमधून आपल्या घरात प्रवेश करणारा दिवाळीच्या पदार्थांमधला खाऊ म्हणजे लवंगलतिका. नावातच लवंग हा शब्द असल्यामुळे या पदार्थात लवंग असणार हे निश्चितच. मैदा, रवा, पिठीसाखर, काजू यांचा आणि वरून लवंगा टोचून तयार केला जाणारा हा गोड, काहीसा खुसखुशीत पदार्थ म्हणजे घरच्यांची पसंती. या पदार्थाचा आकार विड्याचं पान तयार करून आपण जशी त्याला वरून लवंग टोचतो अगदी तसा. आतमध्ये खव्याचं सारण भरून याचा आकार आधी पुऱ्या लाटण्यापुरता गोल असतो आणि मग बनवताना त्रिकोणी असा होतो. यामुळे यामध्ये दोन आकारांची गंमत आहे. तळल्यानंतर साखरेच्या गोड पाकात या लवंग-लतिका बुडवायच्या आणि मटकवायच्या.

खजुऱ्या :
पश्चिम महाराष्ट्रातल्या खजुऱ्या या पदार्थाचं नाव ऐकलं की खजूर असं ऐकल्याचा भास होतो, हो ना ? दिवाळीतला हा फराळाचा पदार्थ बाजरीपासून बनवला जातो. मात्र यात खजूर न टाकता बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ, तीळ आणि गुळ घालतात. आता या पदार्थाची गंमत अशी की लाटताना गोल दिसणारी ही गोल भाकरी नंतर मात्र चौकोनी होते, ती कशी? तर चौकोनी वड्या पाडून. आणि मग या वड्या तुपात खमंग तळल्या जातात. झाल्या खजुऱ्या तयार. याचं नाव असं का पडलं हे गमतीदार कोडंच आहे.

चंपाकळी :
वाटतं ना की आपण एखाद्या फुलाचं नाव ऐकतोय म्हणून. हा पदार्थ सोनचाफ्याच्या फुलाप्रमाणे दिसतो म्हणून याला चंपाकळी म्हणतात. चंपाकळी गोड आणि खारी दोन्हीही असते. रवा, साखरेचा पाक आणि थोडासा पिवळा रंग एकत्र करून याचं पीठ मळतात. मग त्याची गोल छोटी पुरी लाटून त्याला मध्ये काप देऊन फुलासारखा आकार देतात. गोल पुरीला मधून एका चिमटीत पकडून हलकीशी पिळी दिली की झाली चंपाकळी तयार. मग ती तेलात तळून घेतात.

सांजोऱ्या:
पश्चिम महाराष्ट्रातला अजून एक पदार्थ म्हणजे सांजोऱ्या. मळलेल्या कणकेच्या वाटीत दूध, गूळ आणि रव्याची मऊ गोळी भरून या तयार करतात. अगदी पुरणपोळीप्रमाणे ही गोड पोळी तयार होते. याच्यामध्ये जे गोड सारण भरतात त्याला ‘सांजा’ असे म्हणतात. सांज्याच्या पुऱ्या म्हणून याला सांजोऱ्या असे नाव पडले आहे. मध्य भागातून टम्म फुगणारी ही गोड आणि गोल आकाराची सांजोरी सगळ्यांनाच खूप आवडते.

चणपापडी:
चणपापडी हा चण्याच्या डाळीपासून केला जाणारा तिखट पदार्थ आहे. याचा पण आकार गोल-गोल असतो. चण्याच्या पिठात विविध मसाले घालून त्याच्या छोट्या गोल पापड्या करून तळतात. चण्याच्या पिठाची पापडी म्हणून याचं नाव पडलं चणपापडी.

आपण आता ज्या पदार्थांची नावं ऐकलीत ती तुम्ही यापूर्वी ऐकली आहेत का? आहेत ना मजेदार ही नावं! दिवाळीच्या प्रत्येक पदार्थाचे रंग-रूप, आकार, चव, स्पर्श व आवाज वेगवेगळे आहेत. म्हणून आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना आनंद देणारा दिवाळीचा फराळ आपल्याला जास्त आवडतो. फराळाच्या, भेटीच्या निमित्ताने आपण एकत्र येतो, सोबत वेळ घालवतो आणि दिवाळीचा आनंद साजरा करतो. तुम्ही पण तुमच्या घरी तयार होणाऱ्या फराळातल्या पदार्थांची यादी करा, त्यांचे आकार, चव लिहून काढा. याव्यतिरिक्त काही जुन्या पदार्थांची नावं ऐकायला मिळाली तर त्यांच्याविषयी पण जाणून घ्या. यावर्षी दिवाळीला एखादा तरी असा नवा पदार्थ तयार करू या, मुलांना पण मदतीला घेऊ या आणि दिवाळी आणखी मजेची करू या.

Read More blogs on Parenting Here