लेखक : रेणू गावस्कर
चिकूपिकूच्या मागील अंकात गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांना खूप खूप आवडणारी ‘जयतिलक’ गोष्ट तुम्ही मुलांना वाचून दाखवली असेल. गुरुदेवांनी लहान मुलांसाठी कितीतरी गोष्टी लिहील्या, कविता लिहील्या, कवितांना छान छान चाली लावल्या. गुरुदेव लेखक होते, कवी होते, चित्रकारही होते. खरं म्हणजे ते काय नव्हते हे सांगणं तसं कठीण आहे. त्यांनी मुलांना उत्तम शिक्षण मिळावं म्हणून कोलकत्याजवळील बोलपूर या गावी शांतिनिकेतन नावाची एक सुंदर शाळा काढली. माझी दोनही मुलं लहान असताना आम्ही सारे कुटुंबीय या शाळेत जाऊन काही दिवस राहीलो होतो. ती शाळा इतकी छान आहे की मुलांनाच काय आम्हा मोठ्यांनादेखील तिथल्या शाळेत प्रवेश घ्यावा असं वाटलं. शाळेचा परिसर खूप मोठा आहे. सगळीकडे झाडंच झाडं, खास करुन सप्तपर्णी वृक्ष.
शांतिनिकेतन ही शाळा गुरुदेवांच्या लहानपणच्या आठवणींशी अगदी जोडलेली आहे. शिक्षा करणं, मारणं, वाईट शब्द वापरणं हे सगळं लहान असताना गुरुदेवांच्या वाट्याला आलं. त्यामुळे आपण शाळा सुरु केल्यावर असं काही करायचं नाहीच हे त्यांनी मनाशी पक्कं ठरवलं होतं. पण कधी कधी व्हायचं काय, की शांतिनिकेतनातली मुलंसुध्दा खूप मस्ती करायची, दंगा करायची. शिक्षकांना अगदी सतावून सोडायची. एकदा असंच झालं. एका वर्गातल्या मुलांबद्दल शिक्षकांनी गुरुदेवांपाशी जोरदार तक्रार केली. मग करता काय? गुरुदेवांना त्या तक्रारीची दखल घ्यावीच लागली. दुसरे दिवशी गुरुदेव त्या वर्गावर गेले. मुलांना अंदाज होताच, त्यामुळे गुरुदेव वर्गावर आल्यावर मुलं एकदम चिडीचूप झाली. गुरुदेव म्हणाले, ‘मला वाटतं आपण एक नाटक बसवावं.’ मुलांना जो काही आनंद झाला! त्याच रात्री गुरुदेवांनी मुलांसाठी झकास नृत्यनाटिका लिहीली. शाळेत नाटक करायचं म्हणजे गुरुदेवांनी ते लिहायचं हे ठरलेलं होतं. नाटकात सगळ्या मुलांना तर काम करायला मिळायचंच पण शिवाय खास बाब अशी की स्वतः गुरुदेवसुध्दा एखादी तरी भूमिका करायचेच. काही दिवस तालमी झाल्या. नाटक बहारदार झालं. त्यानंतरच्या आठवड्यात जेव्हा गुरुदेवांनी या विशिष्ट वर्गाला भेट दिली. तेव्हा तुलनेनं तो वर्ग शांत होता. नंतर होणार्या दंग्याबद्दल सांगोपांग चर्चा झाली. सगळ्यांनाच पटतील असे उपाय काढले गेले. सर्वांचं समाधान झालं. आहे की नाही मजेशीर शिक्षा?
रतिंद्रनाथ टागोर म्हणजे गुरुदेवांचा मोठा मुलगा. त्यांनी वडलांच्या सुंदर आठवणी एका पुस्तकात लिहील्या आहेत. त्यातदेखील गुरुदेव कशा शिक्षा करायचे याचं गंमतीदार वर्णन केलंय रतिंद्रनाथांनी. रतिंद्रनाथ हे गुरुदेवांच्या शाळेचे पहिले विद्यार्थी. ते तिथे शिकले, मोठे झाले आणि वडलांना शाळेच्या कामात मदत करु लागले. एकदा रतिंद्रनाथ सगळ्या मुलांना घेऊन पद्मा नदी पार करुन पलिकडच्या ठिकाणी सहलीला गेले. मुलांना खूप मज्जा वाटली. वनभोजन झाले, खेळ झाले, मुलांनी गाणी म्हंटली. सगळं होता होता किती वेळ गेला काही कळलंच नाही. अगदी संध्याकाळ होऊन गेली तेव्हा कुठे रतिंद्रनाथांना वेळेचं भान आलं. घाईघाईने सगळे परतले. नावाड्यानं नाव हाकली ती, पलिकडच्या तीराला लागली. मुलं भराभर उतरली. समोर बघतात तो काय, नदीकिनारी गुरुदेव अगदी अस्वस्थ होऊन येरझारा घालताहेत. पद्मा नदीचं पात्र तसं मोठं, तिला पूरही बर्याच वेळेस येत असे. त्यामुळे मुलांना परतायला उशीर झाला, तसे गुरुदेव नदीकिनारीच आले. रतिंद्रनाथांनी वेळ पाळली नाही म्हणून गुरुदेव रागावले होते. पण ते एका शब्दानेही काही बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी रतिंद्रनाथ वडिलांपाशी गेले. त्यांनी आपली चूक मान्य केली, मनापासून क्षमा मागितली व मी काय शिक्षा घेऊ असे वडिलांना विचारले. गुरुदेवांनी शिक्षा दिली नाही. मग मुलाने स्वतःला योग्य वाटली ती शिक्षा स्वतःच घेतली.
प्रिय पालकहो, हा लेख मी खास तुमच्यासाठी लिहीला आहे. रतिंद्रनाथांनी लिहीलेलं ‘On the edges of Time’ हे पुस्तक मला खूप आवडलं. त्यातून गुरुदेवांच्या कितीतरी आठवणी मला मिळाल्या. गुरुदेवांनी शांतिनिकेतनात जे काही प्रयोग केले त्या सगळ्याचं मूळ गुरुदेवांच्या बालपणात आहे. विशेषतः शिक्षण कसं असू नये याचे धडे लहानपणी गुरुदेवांना खूप गिरवावे लागले. ते सगळे लक्षात ठेवून शांतिनिकेतनाचा 1901 साली श्रीगणेशा झाला. यानंतरच्या लेखात गुरुदेवांच्या लहानपणाबद्दल आपणा सर्वांनाच सांगणार आहे. तोपर्यंत नमस्कार.
Read More blogs on Parenting Here