शोभा भागवत लिखित ‘आपली मुलं’ या पुस्तकातील लेख
लेख क्र. ४ : आपण पालक म्हणून कसे आहोत ? :
लेखन: शोभा भागवत
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे
लग्न करायचं म्हंटल की, वधू-वर एकमेकांच्या किती चौकशा करतात, माहिती काढतात. शिक्षण स्वभाव, आर्थिक परिस्थिती, नोकरी, रूप, घरदार, घरची माणसं, नातेवाईक, इस्टेट, पूर्वेतिहास. कुठून कुठून माहिती मिळवली जाते. मग देणं-घेणं, घासाघीस, रुसणं-फुगणं, मागण्या, मग लग्न होतं एकदाचं; पण हेच वधू-वर जेव्हा पालक बनणार असतात, त्यांना जेव्हा मुलाची चाहूल लागते, तेव्हा आपण पालक म्हणून योग्य आहोत, त्यासाठी आपण काही विचार केला आहे, बालसंगोपनाचं काही शिक्षण घेतलं आहे का, बालमानसशास्त्राविषयी काही वाचलं आहे का, याचा काहीही विचार ते करत नाहीत.
लेकुरे उदंड झाली नाटकात खूप मुलं असलेलं एक पात्र गमतीनं म्हणतं, ‘अहो, मुलचं ती. त्यांना काय कळतंय ? ती व्हायचीच !’ तसंच लग्न झालं की पालकांना काही कळत असो-नसो, त्यांना मुलं व्हायचीच, असंच गृहीत धरलेलं असतं त्यासाठी काही पूर्वतयारी, काही शिक्षण, याची गरजच भासत नाही !
मुलांना जर आपले आई-वडील निवडण्याची संधी असती, तर बहुतेक त्यांनी विचारलं असतं,
आई-बाबा, तुम्हाला आम्ही हवे आहोत असं म्हणता; तर-
१) लहान मुलाची काळजी कशी घ्यायची, याचा तुम्ही काही अभ्यास केलाय का ?
२) आम्हाला तुम्ही खायला-प्यायला केव्हा, काय काय देणार ते माहीत आहे का ?
३) आमच्या रडण्याची कारणं तुम्हाला माहीत आहेत का ?
४) आमची वाढ कशी होते ते तुम्ही कोठे वाचलंय का ?
५) आमच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी, काय करणार आहात तुम्ही ?
६) आमची प्रेमाची भूक भागवणारा आहार का ?
७) आमच्यासाठी तुम्ही दोघंही, काही वेळ राखून ठेवणार आहात का ?
८) आम्हाला मोकळेपणानी वाढू देणार आहात का, की तुमच्या अपेक्षांच्या कात्रीनं सारख्या आमच्या प्रेरणा छाटणार आहात ?
९) मुलांशी कसं वागायचं याबद्दल, मुळात तुमचं दोघांचं एकमत आहे का ?
१०) आम्ही तुम्हाला कशासाठी हवे आहोत ?….
असे असंख्य प्रश्न ! मुलं हे प्रश्न विचारू शकत नाही हे किती बरं आहे नाही का ? नाही तर या जगात येणं त्यांनी नाकारलंच असतं, मुलांच्या या असहायपणाचा आपण फार फायदा घेतो. घरातल्या मोठ्या माणसांच्या पारंपरिक ज्ञान-अज्ञानाच्या तुटपुंज्या माहितीवर बालसंगोपन आपण निभावून नेतो. बाळाच्या वाढीच्या वेळापत्रकाऐवजी बारसं केव्हा करू या, उष्टावण केव्हा, संक्रांतीला हलव्याचे दागिने, काळ झबलं, बोरन्हाण, कुठल्या सणाला सोन्याची साखळी न कधी हातातली अंगठी या चर्चा-कौतुकातच आपण रमून जातो. त्यालाच पुन्हा संस्कार म्हणून आपलं कर्तव्य पार पडल्याचं समाधान मिळवतो.
वेगवेगळ्या वयातल्या मुलाच्या मानसिक गरजांचं ज्ञान आपल्याला हवं. एवढंच नाही, तर बाळ पोटात वाढत असताना बाईचं मन सांभाळावं लागतं, नाही तर मुलावर त्याचे परिणाम होतात, हे किती पुरुषांना माहित असतं ? डोहाळजेवणांचा अर्थ हिरवी साडी, फुलांची वाडी भरणं, मोरावर नाही तर चंद्रावर बसवणं, फोटो काढणं एवढ्यापुरताच मर्यादित होतो. मानसिक प्रसन्नता त्यातून किती मिळते ते त्या बाईनंच ठरवावं. कित्येकदा तर शिकलेल्या मुलींना हे सोपस्कार करून घेण्यात लाज वाटत असतानाही केवळ घरातल्या वडील माणसांच्या हौस ऊर्फ आक्रस्ताळेपणापायी हे प्रकार करून घ्यावे लागतात.
खरं तर लग्नापूर्वीच, पण ते जमलं नाही, तर निदान गरोदरपणापासून नवरा-बायको, दोघांनीही बालसंगोपनाचा अभ्यास करायला हवा. आपल्या अनुभवी मित्रमंडळीशी बालसंगोपनातल्या अनुभवानंविषयी गंभीरपणे बोलायला हवं. बाळाचे कपडे, पाळणा या तयारीबरोबर ही तयारीपण महत्वाची आहे.
मूल तान्हं असताना त्याचं सगळं आईनं किंवा घरातल्या आजीसारख्या मोठ्या बायकांनीच करायचं असतं, असाही एक समज असतो. पुरुषांनी म्हणजे- वडलांनी बाळाला कधी घेतलं, तर तो अगदी कौतुकाचाच प्रकार म्हणून पाहिलं जातं. खरं तर मुलाचे शी-शुचे कपडे बदलणं, त्याला चमच्यानं दुध पाजणं, रडत असेल तर कारण शोधून थांबवणं, झोपवणं, अगदी अंघोळ घालणंसुद्धा वडलांना जमायला काय हरकत आहे ? त्यात न जमण्यासारखं काही नसतं. काही वत्सल पुरुष हे करतातही, पण या सुंदर अनुभवातून पुरुषांना वगळणं हा त्यांच्यावर अन्याय आहे, हे स्त्रियांनाही कळायला हवं.
स्वतंत्र कुटुंबात लहान बाळाचं हे सगळं करायचं, तर बाई थकून जाते. शिवाय रात्रीची जागरणं असतातच. माझ्या एका मैत्रिणीचा नवरा म्हणायचा, ‘तू दिवसभर बाळाचं करतेस. मी ऑफिसमध्ये असतो. रात्री बाळ उठलं तर, तू उठू नकोस. मी त्याला घेईन. तुझी झोप पुरी व्हायला हवी.’ तो खरंच रात्री उठून बाळाचं दूध कोमट करून बाटलीत भरून त्याला पाजायचा, बाळाचे कपडे बदलायचा, त्याला झोपवायचा.
बाळाचं लस टोचण्याचं वेळापत्रक असंच आईवडील दोघांनाही माहीत हवं. कुठल्या महिन्यात काय आहार द्यायचा हेही माहित हवं.
माझ्या एका होम-सायन्सच्या प्राध्यापक मैत्रिणीनं मुलगा ७|८ महिन्यांचा होईपर्यंत त्याला दूध-पाण्यावरच ठेवलं होतं. एकदा वरणभात दिला, तो त्यानं ओकून टाकला, म्हणून परत दिला नाही. एकदा केळ दिलं ते थुंकलं, परत दिलंच नाही. काही मुलं असतात नाठाळ. खात नाहीत. मग त्यांच्या एका वेळच्या दुधात अंड फेसून घालता येतं. एखाद्या दुधाबरोबर केळ कुस्करून गाळून मिसळून देता येतं. वरण-भातसुद्धा असा बारीक करून दुधातून देता येतो. एखादवेळ पाण्याच्याऐवजी मोसंबीचा रस पाजता येतो. लिंबाचं गोड, कोमट सरबत देता येतं. भाजीच सूप देता येतं. ज्यांना घरात वरण-भात शिजवता येतो त्यांनी विकतचे घन आहार कशाला द्यायचे ? आहाराच्या बाबतीत आणि विशेषतः मुलाच्या आहाराच्या बाबतीत जे जे नासतं, खराब होतं तेच खाण्याजोगं असतं, हे लक्षात ठेवायला हवं, जे पदार्थ महिना-महिना टिकू शकतात अशा पावडरी, डब्यातलं अन्न, बिस्किटं हे खाण्याजोगं नाही. कारण त्यात चैतन्य नसतं. जेवढं नैसर्गिक, जेवढं ताजं तेवढं पौष्टिक !
पण माहीत असायला आहाराचा अभ्यास हवा, निदान माहीती हवी. चौरस आहार आपण शाळेत कधी तरी शिकतो आणि नंतर विसरतो. मूल वाढवायचं, म्हणजे या सगळ्या ज्ञानाला उजाळा द्यावा लागतो.
चांगल्या जबाबदार पालकांना, म्हणजे आई-वडील दोघांनाही आहाराची माहिती हवी. रोग, त्यांची करणं व उपाय माहीत हवेत, मुलाच्या वाढीचे टप्पे माहित हवेत. बालमानसशास्त्र थोडंफार कळायला हवं. मुलाला चांगल्या सवयी लावणं जमायला हवं अशा किती तरी गोष्टी !
जबाबदार पालक हा काय नसतो ?
तो प्रेमळ पालक असतो.
तो डॉक्टर असतो.
तो शिक्षक असतो.
बालमानसशास्त्रज्ञ असतो.
तो आहारतज्ज्ञ असतो.
तो खेळाडू असतो.
तो भाषातज्ज्ञ असतो.
तो सामान्यज्ञानी असतो.
म्हणजे असायला हवा ! पुन्हा हे सगळं तज्ज्ञपण त्याला रोजच्या व्यवहारात उतरवता यायला लागतं. लायब्ररीतल्या कपाटातल्या पुस्तकात बंद करून नाही ठेवता येत !
या प्रत्येक शाखेसाठी चार-चार, सहा–सहा वर्ष शिक्षणात घालवावी लागतात तेव्हा पदवी मिळते आणि अनुभव नंतरच !
पण कोणतंही शिक्षण न घेता, पालक होण्याचा अनुभव मात्र कोणालाही मिळवता येतो. इथंच सगळं चुकतं !!
हे झालं अगदी लहानपणाचं. मूल जसंजसं मोठं होतं तसतशा त्याच्या गरजा वाढू लागतात. पालकांना कळेनासं होतं, जुमानेनासं होतं आणि पालक गोंधळून जातात.
अशा वेळी मुलाशी वागताना कोणतंही आधुनिक ज्ञान त्यांच्या हाताशी नसतं. शास्त्रज्ञाची सगळी संशोधनं पुस्तकात बंदिस्त असतात आणि सहजपणे आपले आईवडील आपल्याशी जसे वागले तसंच थोडंफार आपण मुलांशी वागत जातो. त्यातल्या चुकांची पुनरावृत्ती नकळत करतो.
एखाद्या गोष्टीचा राग आपल्या मनात लहनपणापासून घुमसत असतो. मग आपण म्हणतो आम्हाला नाही लहानपणी चांगले कपडे घालायला मिळाले म्हणून आमच्या मुलांना आम्ही चांगले, फ़ँशनेबल, ऐटबाज, महाग कपडे आणणार ! मग मुलांना आपण चमकदार सिन्थेटीक महाग कपड्यांनी सजवतो. हे खरं तर आपण आपले स्वतःचेच लाड करत असतो !
मूल जोवर भराभर वाढत असतं, त्याची त्वचा कोवळी असते तोवर महाग, सिन्थेटीक कपडे त्याला आणूच नयेत. एक तर लहान होऊन ते फुकट जातात. शिवाय नायलॉन, टेरीलिन-टेरीकॉट इ. प्रकारचे कपडे त्वचेला अपाय करतात. छोट्या मुलांना चढवल्या जाणाऱ्या स्ट्रेचेबल घट्ट चड्ड्या पाहिल्या की फार अस्वस्थ वाटतं. असे कपडे त्याच्या वाढीतही अडथळा आणतात.
लहान मुलांना कायम सुती मुलायम मोकळे कपडेच घातले पाहिजेत. ते कमी भपकेदार दिसले तरी चालतील असं सगळ्या पालकांनी ठरवायला हवं.
तसचं तऱ्हेतऱ्हेचे दागिने, घट्ट वेण्या, बो, प्लास्टिक बूट, नायलॉन मोजे, पावडर, काजळ, तीट, कुंकू, टिकल्या, प्लास्टिक, चड्ड्या, करकचून बसणारे इलास्टिक, घट्ट लोकरी कपडे अशा अनेक गोष्टींबद्दल बोलता येईल.
मुलांसाठी खरेदी करताना हौस, भपका एवढंच परिमाण नसावं. मुलाचं भलंही त्यात पहावं.
वाढत्या वयाच्या मुलांशी अनेक गोष्टी मोकळेपणानं बोलायची सवय ठेवली तर त्यांचं आणि आपलंही जगणं सुसह्य होतं. एकमेकांच्या गरजा, एकमेकांची मतं एकमेकांना समजत जातात. त्यांचा मान ठेवणं शक्य होतं. असं मोकळं काही बोलायची पद्धत आपली नसते आणि त्यामुळं मुलं मोठी होत जातात तसतशी ती दुरावत जातात, कळेनाशी होतात.
का दुरावतात मुलं आई-वडीलांना? अनेक कारणं असतात. पण सगळ्यांच्या मुळाशी एकमेकांशी चांगला संवाद नसणं हेच कारण असतं. अनेकदा मुलं वाढतात आणि पालक तेवढेच राहतात. मुलं सगळ्या बदलांना स्वीकारतात, पालक स्वीकारू शकत नाहीत. काही एका वयानंतर आपला मुलगा किंवा मुलगी सज्ञान झाली आहे, मोठी झाली आहे, त्याला-तिला स्वतःची मतं आहेत त्याप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र आहे, हे मान्य करायलाच हवं. जे पटत नसेल ते सांगावं; हवं तेव्हा सावध करावं; पण जबरदस्तीनं ऐकायला लावू नये. आपण आपल्या मुलांच्या जीवनाचे रथ कायम हाकू शकणार नाही. कधी तरी त्याच्या दोऱ्या त्यांच्या हातात द्याव्याच लागतात, याची तयारी आधीपासूनच हवी. मग मुलाचं लग्न झालं तरी त्यानं बायकोचं न ऐकता आपलंच ऐकावं हा अट्टहास उरणार नाही. आपण पालक म्हणून ही तयारी केली आहे का ? मुलं वाढवणं हा एक प्रकारे निष्काम कर्मयोगच आहे ! लहानपणी त्यांचं लालन-पालन करायचं, त्यांच्यासाठी झीजायचं, वाढीच्या वयात त्यांना फुलण्यासाठी सगळी मदत करायची. शिकवायचं, पण हे सगळं त्यांनी म्हातारपणी आपलं करावं, ऐकावं यासाठी नाही. या फलाची अपेक्षा ठेवली तर सगळ्या कर्मातील गंमतच निघून जाईल ! चांगली माणसं घडवण्यासाठी आपण प्रयत्न करायचे एवढंच आपल्या हातात असतं. आपल्या मुलांकडून आपल्या काय काय अपेक्षा आहेत ? त्या अपेक्षांच्या दडपणाखाली मुलाचं लहानपण तर दडपून जात नाही ना ?
पालकत्वाची काही तयार समीकरणं मात्र नाहीत. असं असं वागा, हे हे करा, ते करू नका म्हणजे तुमची मुलं चांगली होतील असं कोणीही सांगू शकणार नाही. कारण प्रत्येक मुलं वेगळं असतं आणि पालकही. शिवाय शेवटी पालक हाही मुलांच्या वाढीला कारण होणाऱ्या समाजाचाच एक भाग असतो. समाजाचे त्या त्या काळातले गुण अवगुण, ताण प्रदूषण, धोके, समस्या त्याच्याही उंबरठ्यावर आदळत असतात. परिणाम करीत असतात. फक्त आपल्या सहवासात मुलं जास्त वेळ असतात, त्या वेळाचा सदुपयोग करायला आपण शिकायचं असतं. मुलं म्हणजेच आपलं जीवनसर्वस्व असं तर आपण मानत नाही ना ? उद्या आपली मुलं आपल्या मनासारखं वागेनाशी झाली, तर आपण काय करणार आहोत ? त्यांच्याकडे कशा दृष्टीनं पाहणार आहोत याचा विचार केलाय आपण?
ती मोठी झाली, त्यांना पंख फुटले की, आपल्या हातात काही राहत नाही. आपण आपल्या हातात काही ठेवायचा प्रयत्नही करू नये. कारण मग ती मोकळेपणानं आकाशात हिंडू शकणार नाहीत. आपल्याला तरी पतंग उडवणं हवं असतं का ? असे पतंग थोड्याशा संघर्षाने काटले जातात, किरकोळ मोहांच्या झुडपात अडकून फाटतात, जमिनीवर कोसळतात !
आपली मुलं कोसळलेली पहायचीत आपल्याला ?
आजचं आपलं जीवन, आर्थिक ओढाताण, जीवनाचा वेग, स्पर्धा, महागाई, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, तुटपुंजेपणा माणुसकीचा लोप, वेळेची कसरत या सगळ्यात असह्य ओढाताण आहे. ही झुंज, हे आव्हान बिकट होत जाणार आहे. जागृतपणानं, सुबुद्दपणानं हे समजून घेणं गरजेचं आहे. आपली मुलं या धकाधकीत उभी राहायला हवी असतील तर विविध प्रकारे त्यांची व्यक्तिमत्वं समृद्ध करायला आपण झटलं पाहिजे, नाही तर ती उद्या कोसळून पडतील. त्यांचे त्यांना निर्णय घेता येणार नाहीत.
आपली मुलं जीवनसंघर्षात चिवटपणे आणि आत्मप्रतिष्ठा राखून उभी रहावीत म्हणून काय विचार केलाय आपण ?
सुखी माणसाचं बालपण सुखाचं असतं असं म्हणतात. आपल्याला आपल्या मुलाचं बालपण जोपासायचं आहे. ते हरवता कामा नये याची काळजी घ्यायची आहे, याची जाणीव आहे आपल्याला ? यासाठी स्वतःलाच विचारू या- आपण पालक म्हणून असे आहोत का ? या जागृत जबाबदार पालकत्वासाठी आपल्या रोजच्या जीवनात काय करता येईल, याचं शिक्षण कसं घेता येईल ते पाहू या पुढच्या लेखात.
Read More blogs on Parenting Here